मादक पदार्थांचे व्यसन जगभरात मानवी समाजासाठी शाप म्हणून उदयास आले आहे. लाखो निष्पाप मुले आणि जबाबदार तरूण देखील व्यसनाधीन झाले आहेत. नशा इतका हावी झाला आहे की सण, उत्सव, दैनंदिन कामकाज, सुख-दुःख, एखाद्याला भेटायला गेल्यास, माणूस कुठेही नशा करण्याचे निमित्त शोधून काढतात. ते अमली पदार्थांसाठी आपले अमूल्य जीवन संपवितात. नशा करणारा माणूस आतून पूर्णपणे संपून बरबाद होतो. समाजा कडून तिरस्कार होतो आणि शारीरिक आणि मानसिक आजारात वेदनेने मरतो. आता तर 5-6 वर्षांपर्यंतची लहान मुले सुद्धा तंबाखू खाताना, जीवघेणे रसायनांचा उग्र वास घेवून नशा करताना दिसतात. भारतातील प्रत्येक तिसऱ्या दारुचे व्यसन कारणाऱ्यास अल्कोहोलशी संबंधित समस्या संदर्भात मदत करण्याची गरज आहे.
अमली पदार्थाचा जाळ्यात अडकलेले निष्पाप बालपण:-
मुलांच्या मादक पदार्थांच्या नशेच्या घटना सतत वाढत आहेत. गलिच्छ वातावरण, झोपडपट्टी क्षेत्राव्यतिरिक्त, त्यात संपन्न घरांमधील मुले देखील आहेत. लहान वयातच नशा मुलांच्या मेंदूवर, विकासावर घातक परिणाम करतो. अशी मुले मानसिक आजाराची शिकार होतात. नशेचे इंजेक्शन घेतल्यास एचआयव्हीसारख्या धोकादायक आजारांचीही शक्यता असते. आपल्या आजूबाजूचे वातावरण नशेसाठी सर्वात मोठे कारण आहे, ज्यांचे पालक किंवा शालेय शिक्षक मादक पदार्थांचे व्यसनाधीन असतात अशा मुलांमधे नशा करण्याचा धोका सर्वात जास्त असतो, चांगल्या संस्काराची कमतरता, ख़राब शेजार, वाईट संगत, मुलांवर इंटरनेट, टीव्ही फिल्म्सचे प्रभाव, नेहमी व्यस्त पालक जे मुलांना वेळ देत नाहीत, बऱ्याचदा मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात आणि विचार न करता मुलांच्या बेकायदेशीर मागण्या पूर्ण करतात, पालकांचा मुलांवर नियंत्रण नसणे, अशी मुले नशेकडे त्वरित आकर्षित होतात. याव्यतिरिक्त, रस्त्यावर काम करणारी मुले सर्वात जास्त अमली पदार्थांच्या आहारी जातात.
मुलांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत:-
भारतीय शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय तर्फे वर्ष 2018 मधील राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार देशात 10 ते 17 वर्षाचा वयोगटातील तब्बल 1.48 कोटी मुले व्यसन करतात. व्हाइटनर, पंचर सोल्यूशन, कफ सिरप, पेट्रोल, थिनर, सनफिक्स बॉन्ड फिक्स यासारख्या तीक्ष्ण रासायनिक हानिकारक ज्वलनशील पदार्थांचा वास घेवून नशा करणाऱ्या मुलांची संख्या 50 लाख आहे आणि 20 लाख मुले भांग, 30 लाख मुलं दारू, तर 40 लाख मुलं अफीमचा नशा करतात. सिगारेट, तंबाखू, ड्रग्स सह इंजेक्शन व इतर पदार्थांचा नशा ही मोठ्या प्रमाणावर करतात. ही मुले रेल्वे स्थानक, बसस्थानक, झोपडपट्टी, निर्जन भागात, सार्वजनिक उद्याने अशा ठिकाणी गटांमध्ये मिळून नशा करतांनी आढळतात. लहान मुलापर्यंत हे जीवघेणे नशेचे विष सहज उपलब्धता ही सर्वात मोठी समस्या आहे. 2016 मध्ये दिल्ली सरकारच्या समाजकल्याण विभागाच्या पुढाकाराने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशाच्या राजधानीत 70 हजार मुले अमली पदार्थांच्या आहारी असल्याचे आढळले. आज कोरोना काळात, नशा करण्यासाठी अल्कोहोल आधारित हैंड सेनेटिझर प्यायचे व्यसन लागत आहे, असे अनेक प्रकरण समोर आलेत, ज्यामध्ये सेनेटिझरचे प्राशन करणारी व्यसनी व्यक्ती मृत्युमुखी पडली आहेत.
नशेमुळे गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ:-
क्राइम ब्युरोच्या नोंदीनुसार मोठ्या प्रमाणात गुन्हे, खून, दरोडा, अपहरण इतर सर्व प्रकारच्या गुन्हांमध्ये नशेचे प्रमाण 73.5% आणि बलात्कार सारख्या जघन्य गुन्ह्यात हे 87% टक्के पर्यंत आहे. देशातील वाढत्या गुन्हेगारी, गंभीर आजार आणि हिंसाचारामध्येही नशेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नशेमुळे या लहान निर्दोषांचे बालपण उध्वस्त होत आहे, तसेच यांचात बाल गुन्हेगारी, आजारपणं ही फार वाढते. मुलांचा मानसिक विकास नशेच्या तावडीत थांबून जातो. नशेत माणसाचा स्वतावर नियंत्रण नसते आणि नकारात्मक विचार वेगाने वाढतात. पैशासाठी मुले खोटे बोलायला लागतात, जबाबदारी पासून दूर पडतात आणि नशेकरिता मोबाईल, पर्स, चेन स्नॅचिंग, वाहने चोरी सारखे गुन्हे करतात आणि ते मोठे होऊन गंभीर गुन्हे करायला लागतात. अशा प्रकारे, आपल्या समाजात एक नवीन गुन्हेगारी साम्राज्य सुरू व्हायला लागते. आजकाल ही लहान किशोरवयीन मुले मोठ्या गुन्ह्यात खूपच सक्रिय दिसत आहेत. आपण दररोज अशा बातम्या पाहतो आणि वाचतोच. कित्येकदा आपल्याला विश्वास सुद्धा बसत नाही की ही ऐवढी लहान-लहान मुले माणुसकीला काळीमा फासणारी घाण कृत्य कशी काय करू करतात? पण हे कटु सत्य आहे. कधी-कधी लोक या मुलांना चोरी करताना पकडतात आणि त्यांना थोडेसे रागावून, थापड़ मारून सोडून देतात, परंतु मुळात त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा किंवा सुधरविण्याचा प्रयत्न होतांना दिसतच नाही. ही मुले आपल्या राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य आहेत. जर आपण आज त्यांचे अस्तित्व व्यवस्थापित केले नाही तर आपण त्यांना भविष्यातील आधारस्तंभ कसे म्हणावे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते अल्कोहोलच्या दुष्परिणामांवर धक्कादायक तथ्य आणि आकडेवारी
• दारूच्या व्यसनाने दरवर्षी 30 लाख हून अधिक लोक जीव गमावतात. दारू हे दर 20 मृत्यूंपैकी 1 मृत्यूचे कारण आहे. दर 10 सेकंदात एक व्यक्तीचा मद्यपान संबंधित कारणामुळे मृत्यू होतो.
• जगात जवळपास 38.3% लोकसंख्या दारू पीते, म्हणजेच हे लोक वर्षाला सरासरी 17 लिटर अल्कोहोलचे प्राशन करतात. एकंदरीत, अल्कोहोलमुळे जागतिक आजारांचे ओझे 5.3% टक्क्यांनी जास्त वाढते.
• सुमारे 3.10 कोटी लोक अंमली पदार्थांच्या दुष्प्रभावाने आजारी आहेत. सुमारे 1.10 कोटी लोक ड्रग्स इंजेक्ट करतात, त्यापैकी 13 लाख एचआयव्हीने जगत आहेत, 55 लाख हेपेटायटीस सी सह जगतात.
• 200 पेक्षा जास्त रोग आणि गंभीर जखमांसाठी मद्यपान हे एक मुख्य कारण आहे. नशेमुळे आयुष्यात मृत्यू आणि अपंगत्व वेळेपुर्वी येते. 20-39 वयोगटात होणाऱ्या मृत्यूंपैकी दरवर्षी, अंदाजे 13.5% मृत्यू दारूमुळे होतो.
• सुमारे 23.7 कोटी पुरुष आणि 4.6 कोटी महिला दारूशी संबंधित समस्यांचा सामना करत आहेत. भारतात दरवर्षी रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात सुमारे 1 लाख मृत्युचा अप्रत्यक्षरित्या अल्कोहोलच्या गैरवापराशी संबंध असतो. दुसरीकडे, दरवर्षी 30 हजार कर्करोगाच्या मृत्यू मागील एक कारण म्हणजे मद्यपान होय.
सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारतातील सुमारे 15.10 कोटी लोक दारुचे गंभीर शिकार आहेत, त्यातील 7.7 कोटी लोकांना उपचारांची तातडीने गरज आहे. वर्ल्ड ड्रग रिपोर्ट 2020 नुसार, जगातील जवळपास 6.66 कोटी लोक गंभीर नशामुळे विविध विकारांनी ग्रस्त आहेत. कोरोना कालावधीत ही आकडेवारी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुरू केलेला “सेफर”, एक उपचारात्मक उपक्रम आहे जो उच्च प्रभाव, पुरावा-आधारित, खर्च-प्रभावी हस्तक्षेपाचे निरीक्षण करून दारूमुळे होणारे मृत्यू, आजार आणि अपघात कमी करण्याचा प्रयत्न करतो.
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने नुकतीच आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटकडून सुमारे 1300 कोटी रुपयांची ड्रग जप्त केली, भारतात जप्त करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांची ड्रग, तर ऑस्ट्रेलिया मधून 1200 कोटी रुपयांची ड्रग जप्त करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी नवी मुंबईत अफगाणिस्तानातून भारतात आणलेली 1000 कोटी रुपयांची ड्रग जप्त केली आहे. 20 सप्टेंबर 2020 रोजी सीमा सुरक्षा दलाने जम्मू आंतरराष्ट्रीय सीमेवर 300 कोटी किंमतीची 62 किलो हेरॉईन जप्त केली. अशी बरीचशी ड्रग, नकली दारू, नशेचा भरमसाठ साठा जप्त केल्या जातो. परंतु अशा जीवघेणा अमली पदार्थांचे व्यसन लोकांमध्ये कमी होतांनी दिसत नाही. विषारी दारूमुळे मृत्यूची संख्याही वाढत आहे, दोन महिन्यांपूर्वीच विषारी दारूमुळे पंजाबमध्ये शेकडो लोकांचा जीव गेला. बऱ्याच राज्यात अशाच घटना घडल्या आहेत. व्यसनाधीन लोक केवळ स्वतःची नासाडी करीत नाहीत तर कुटुंब, शेजारी, नातेवाईक, समाज यांनाही लाजिरवाणे करतात. बॉलिवूड सुद्धा ड्रग्सच्या नशेपासून दूर नाहीत, सुशांतच्या बाबतीत ड्रग कनेक्शन विषयी नवीन माहिती गोळा केली जात आहे ज्यात सिनेमातील मोठया स्टार्सची नावे पुढे येत आहेत. पार्टीचा नावाखाली पुर्वीपासून नशा केला जात आहे.
स्वातंत्र्यानंतर देशात दारूचे व्यसन 60 ते 80 टक्क्याने वाढले आहे. हे खरे आहे की दारू विक्रीतून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. परंतु या प्रकारच्या उत्पन्नामुळे आपल्या सामाजिक संरचनेला तोटा होतो आणि कुटुंबचे कुटुंबे उद्ध्वस्त होतात. आपण वेगाने विनाशाकडे जात आहोत. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने देशातील सर्वाधिक प्रभावित 272 जिल्ह्यांमध्ये 2020-21 साठी अमली पदार्थ विरोधी कार्य योजनेंतर्गत व्यसनमुक्ती अभियान सुरू केले आहे. केंद्र व राज्य सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये व्यसन मुक्तीसाठी अनुदान, लोकजागृती कार्यक्रम, जाहिराती आणि आरोग्य सेवा यासाठी खर्च करतात. व्यसनाधीनतेपासून मुक्त होण्यासाठी व्यसनी लोकांकरीता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मसंयम आणि दृढ इच्छाशक्ती, योग्य उपचार, मार्गदर्शन, कुटूंबाचा आणि प्रियजनांचा आधार, र्निव्यसनी मित्र, सकारात्मक प्रोत्साहन देणारी माणसं, पौष्टिक आहार, व्यायाम, आनंदीत वातावरण, स्वत:ला व्यस्त ठेवणे, जबाबदारी समजून घेणे, कौटुंबिक निष्ठा आणि सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांसाठी वेळ द्यावा, त्यांच्याशी मैत्रीपुर्वक वागावे, मुलांच्या संगतीवर लक्ष द्यावे, मुलांचे बदलत असलेले वर्तन समजून घ्यावे, समस्या दिसताच तज्ञाशी बोलावे, चांगले पालक आणि जबाबदार नागरिक होण्याचे कर्तव्य पार पाळावे.
-डॉ. प्रितम भि. गेडाम
भ्रमणध्वनी क्रं 82374 17041
Post a Comment