मुंबई
अंजुमन-ए- इस्लाम या प्रख्यात शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा नुकताच अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी द्वारे ‘सर सय्यद एक्सलेन्स नॅशनल अवॉर्ड’ हा वार्षिक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. गेल्या 147 वर्षातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान, तसेच समाजातील सीमांत आणि वंचित घटकांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार, स्त्री शिक्षण आणि स्त्री सबलीकरणाचा पुरस्कार, आपल्या 97 शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम वयापासून म्हणजेच पूर्व प्राथमिक व प्राथमिक ते थेट पदव्युत्तर व संशोधन आदी शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर दर्जेदार शिक्षण देत आहे. या सर्व बाबींचा विचार करून संस्थेच्या अविरत प्रयत्नांच्या सन्मानार्थ अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीने हा पुरस्कार शनिवार दि. 17 ऑक्टोबर 2020 रोजी ऑनलाईन सोहळ्यात संस्थेला प्रदान केला.
रु. 1 लाख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व प्रसिद्ध वरिष्ठ रेडियोलोजिस्ट डॉ. झहीर काझी यांनी हा सन्मान मेघालय राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते स्वीकारला. या कार्यक्रमात सर सय्यद इंटरनॅशनल एक्सलेन्स ॲवॉर्ड हे अमेरिकेचे प्रा. गेल मिनॉल्ट यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मेघालय राज्याचे राज्यपाल मा. श्री. सत्य पाल मलिक तर अध्यक्षस्थानी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. तारीक मन्सुर, रजिस्ट्रार अब्दुल हामीद (आपीएस), वेबमास्तर डॉ. फैजा अब्बासी, प्रा. शाहीद शकील आदी उपस्थित होते. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचेवतीने अध्यक्ष डॉ. जहीर काझी यांनी हे पुरस्कार स्वीकारला. सत्काराला उत्तर देताना डॉ. जहीर काझी म्हणाले की, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने आमच्या संस्थेला हे पुरस्कार दिल्याबद्दल मी माझ्या संस्थेच्यावतीने आभार मानतो. अंजुमन-ए-इस्लाम ही शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देत आहे.
या संस्थेमधून एकाचवेळी सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. अभियांत्रिकी, युनानी मेडिसीन, आर्किटेक्चर, फार्मसी, हॉस्पिटलिटी, केटरिंग व हॉटेल मॅनेजमेंट, लॉ, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, होम सायन्स, टीचर्स ट्रेनिंग व इतर कौशल्यविकास कार्यक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रम या संस्थेमार्फत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात महाविद्यालय कार्यरत आहेत.
या संस्थेच्या माजी विद्यार्थी जगभरात वेगवेगळ्या नवाजलेल्या संस्थेमध्ये वाणिज्य, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, आरोग्यशास्त्र या क्षेत्रात आपली सेवा बाजावत आहे. सोलापूर येथे व्यावसायिक अभ्यासक्रमसोबत प्राथमिक ते हायस्कूलपर्यंत इंग्रजी माध्यमची शाळा सुरू असून होटगी येथे संस्थेच्यामार्फत यावर्षी फॉर्मसी व इतर पदवीचे अभ्यासक्रमाचे महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आहे. सोलापूर सेंटरचे को-ऑर्डिनेटर रियाजअहमद पीरजादे यांनी हे पुरस्कार संस्थेला मिळाल्याबद्दल अध्यक्ष डॉ. जहीर काझी व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.
कार्यक्रमाची सुरूवात कुराण पठण करून करण्यात आली. कुलगुरू प्रा. तारीक मन्सुर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. मुजाहिद बेग यांनी आभार मानले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
अंजुमन-ए-इस्लामचे पनवेल स्थित अब्दुल रज्जाक काळसेकर पॉलिटेक्निक व काळसेकर टेक्निकल कॅम्पसमध्ये पदविका ते पदव्युत्तर तसेच पुढील संशोधनात्मक व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जातात. अंजुमन-ए-इस्लाम ला या पूर्वीही अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून सर सय्यद एक्सैलेन्स नॅशनल अवॉर्डबद्दल समाजातील सर्व वर्गातून संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, जनरल सेक्रेटरी जी. ए. आर. शेख व पदाधिकारी तसेच मुंबई शिक्षण संस्थांचे एकझ्युकेटीव चेअरमन बुरहान हारिस आणि संस्थाचालक मंडळाचे अभिनंदन होत आहे.
Post a Comment