Halloween Costume ideas 2015

आर्थिक दिवाळखोरी आणि बौद्धिक व वैचारिकही

आपल्या घरात आग लागली असताना घरचे लोक आपलं घर नव्हे संसार वाचवायचा प्रयत्न करतात. घर म्हणजे नुसत्या भिंती, दारं, खिडक्या आणि छत नसते. घर म्हणजे आपल्या उभ्या जीवनाचा आधार, आपला संसार एवढेच नव्हे तर आपल्या संस्कृतीसभ्यतेची ती पाऊलखूण असते. आपल्या व आपल्या कुटुंबचा इतिहास असतो. मग अशा इतक्या महत्त्वाच्या घराला अग्नीपासून वाचवण्याचा आपण सर्वशक्तीनिशी प्रयत्न करतो. आपला देश सर्व देशवासियांसाठी एका घरासारखाच आहे. हे घर आज चोहोबाजूंनी पेटलेलं आहे. आपण स्वतःचं घर आगीत खाक होताना काहीच न करता नुसते बघत बसत नाही. घराबरोबर आपला जीव सुद्धा पेट घेईल म्हणून अगदी जसे प्रयत्न करतो तसे प्रयत्न आज आपल्या देशाला या आगीपासून वाचवण्याचे कुणी प्रयत्न करत असेल असे दिसत नाही. या गोष्टी लोकांच्या नजरेस आणून देण्याची गरज नाही. कारण प्रत्येक नागरिकाला देशाच्या हलाखीच्या परिस्थितीची कल्पना आहे. प्रत्येकाला दुसरा एखादा कुणी या घराला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दिसत नाही. ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे ते या पेटलेल्या घराला वाचवण्याचे प्रयत्न तर सोडाच ते घराबाहेर देखील पडायला तयार नाहीत. त्यांना या आगीवर विश्वास असेल कदाचित की काहीही झाले तरी आपण घराच्या ज्या भागात आहोत तिथं काहीही होणार नाही. देशाची अर्थव्यवस्था देशोधडीला लागली आहे. जीडीपी दर किती होता किती खाली गेला हे या देशाच्या सामान्य नागरिकाला कळत नसते. फक्त आपल्या घरच्या मुलाबाळांचं, आईवडिलांचं कमीतकमी दोन वेळचं पोट भरण्याइतकी कमाई होईल का? याचीच त्याला चिंता असते. मुलांना शाळेला पाठवायचा विचार तर कोट्यवधींनी सोडूनच दिलाय. बेरोजगार युवक ज्यांनी शर्थीचे प्रयत्न करून शिक्षण घेतलं, एका उज्ज्वल भविष्याची स्वप्नं पाहिली त्यांना नोकरी मिळणार का? हीच चिंता आहे. यांची आणि गत सहा-सात वर्षांच्या काळात ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, कधी नोटबंदीमुळे तर कधी कोरोना लॉकडाऊनमुळे अशा कोट्यवधींची स्वप्नंदेखील धुळीस मिळाली आहेत. काही जण विचार करत असतील की सध्या जरी अर्थव्यवस्था कोलमडली तरी फक्त हे भारतातच घडले नाही तर जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था कोरोनामुळे पणाला लागली आहे. आपण एकदा या संकटातून बाहेर पडलो तर आपल्या देशाचीही स्थिती सुधारेल. पण इतर देशांमध्ये एक व्यवस्था आहे ती राबवण्यासाठी यंत्रणा आहे. ती चालवण्यासाठी राज्यकर्ते आहेत. आपल्याकडे व्यवस्थाच उरली नाही, यंत्रणेची चिंता नंतरची गोष्ट. व्यवस्था असती तर नक्कीच अर्थव्यवस्था सुधारली असती. आपल्या देशात लोकशाही आहे. जर सत्तारुढ पक्ष आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास अपयशी ठरत असेल (प्रयत्न केले तरच यशापयशाचा प्रश्न उद्भवेल) तर मग विरोधी पक्षाचे नेते जैं पक्षाकडून जनतेला आशा होती तो पक्ष उरला कुठे? काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी काही काँग्रेस नेत्यांविषयी जाहीरपणे आरोप केला की ते आतून भाजपला पाठिंबा देत आहेत हे वास्तव आहे. पण बराच उशीर झाला राहुल गांधी आणि गांधी कुटुंबाला हे कटु सत्य समजायला. नोटबंदीपासून आजवर सरकारने जे काही निर्णय घेतले, मग ते इथल्या पब्लिक सेक्टर, रेल्वे स्टेशन, विमानतळ, रेल्वेचे आंशिक खाजगीकरण हे जे सगळे निर्णय सरकारने घेललेले आहेत ते काही भारतातील १३० कोटी जनतेच्या हितार्थ नाही तर काही बड्या उद्योगपतींच्या अर्थव्यवस्थेसाठी घेतलेले आहेत हे सर्वांना माहीत आहे. आर्थिक मंदीच्या काळात जेव्हा लहान मोठे कारखाने उद्योग-व्यापार बंद होत आहेत अशात अंबानी अडानींना हजारो कोटींचा फायदा होतो कसा? म्हणजे भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीला जात असताना देखील त्याचा लाभ अडानी-अंबानींना होतो हे समजण्यासारखी गोष्ट नाही. हा सगळा खाटाटोप जो या सरकारने चालवला आहे यामागे नक्कीच एक विचारसरणी आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे किंवा फक्त कोरोनामुळेच ही अवस्था झालेली नाही. भारतातील ८० टक्के जनतेला गरीब बनवणं यामागे सरकार आणि ज्या विचारधारेचे हे सरकार आहे त्यांचं हे कारस्थान आहे. म्हणून अर्थव्यवस्था बिघडली तर तिला सावरता येते पण ती संपुष्टात आणणेच ज्यांचा विचार आहे त्यांच्या बौद्धिक आणि वैचारिक दिवाळखोरीची कीव येते. घरात आग लागली असता ती जर विझवण्याचा विचार केला नाही तर मग संपूर्ण घर आणि घरात बसलेले त्याच आगीत जळून खाक झाल्याशिवाय राहाणार नाहीत. जगातील सभ्यता-संस्कृतीचा नेहमी नाश होत असतो आणि नवनवीन सभ्यता उदयास येत असतात हे विनाश आणि उदय त्या त्या संस्कृतीतील विचारवंत आणि शासनकर्त्यांच्या बौद्धिक आणि वैचारिक क्षमतेवर अवलंबून असतात. इतर जनसमुदायांविषयी द्वेष, जातियवाद, जातीव्यवस्थेवर ज्यांची विचारसरणी आधारित असते अशा संस्कृती जगातून किंवा राष्ट्रातून नष्ट होत असतात. आपल्या देशाचाही भला मोठा इतिहास याविषयीचा आहे. ज्या संस्कृती आपसातील योगदान, कल्याणकारी उपक्रम आणि मानवतेच्या भल्यासाठी कार्यरत असतात तेच फक्त कायम राहातात. या विरुद्धच्या विचारधारेने शेवटी संस्कृतीचा हास होणे अटळ असते.


- सय्यद इफ्तिखार अहमद

मो.: ९८२०१२१२०७

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget