Halloween Costume ideas 2015

मुस्लिमांच्या शैक्षणिक क्रांतीचे नायक : सर सय्यद



१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर इंग्रजी सत्तेने मुस्लिम समाजाची सर्व केंद्रस्थाने उद्ध्वस्त केली. अनेक सामाजिक, धार्मिक संस्था संपवल्या. प्रशासनातून मुस्लिम समाजाला बाजूला सारले. मुस्लिम समाजाची मदरसा शिक्षण प्रणाली मोडीत काढली. व्यापार व्यवसायावर निर्बंध लादून राजकीय भुमिका घेणाऱ्या मुस्लिमांच्या दुर्बलीकरणाच्या ऐतिहासिक पध्दतीची मुहुर्तमेढ रोवली. अनेक मौलवींना फासावर टांगले. मुस्लिम विद्वानांच्या कत्तली घडवून आणल्या. मुस्लिमांच्या सामाजिक, राजकीय दमनाचे प्रयत्न चहुबाजूने सुरु होते. या परिस्थितीने अस्वस्थ झालेल्या सर सय्यद यांनी मुस्लिमांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, त्यांच्या अभ्युदयासाठी मोहम्मदन कॉलेजची स्थापना केली. इसवी सन १८७५ मध्ये स्थापन झालेल्या या कॉलेजचे नंतर अलिगड युनिव्हर्सिटीमध्ये रुपांतर झाले. कालांतराने वद्यापीठातून अलिगड चळवळ उदयास आली. त्यातून जन्मलेला विचारप्रवाह आजही मुस्लिम समाजाला दिशा देण्याचे काम करतो. हा विचारप्रवाह समृध्द व्हावा म्हणून सर सय्यद यांनी खुप खस्ता खाल्ल्या. अवमानना सहन केली. हालअपेष्टा सोसल्या. मोहम्मदन कॉलेज उभे करण्यासाठी सर सय्यद यांनी अक्षरशः भिक मागितली. 

मुस्लिम समाजाच्या विरोधात घेतलेल्या टोकाच्या भुमिकेमुळे इंग्रजांविषयी समाजात पराकोटीची द्वेषभावना होती. मदरसा शिक्षणप्रणालीवरील आघातामुळे मुस्लिम समाजात इंग्रजीविषयी देखील रोष होता. इंग्रज आपली भाषा आणि संस्कृती मोडीत काढत आहेत, असे त्यांना वाटत होते. अशा विरोधी परिस्थितीत सर सय्यद यांनी वास्तवाचे भान घेउन इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा विचार मांडला.  त्यामुळे सर सय्यद यांना विरोध होणे स्वाभाविक होते. मुस्लिमांना सर सय्यद इंग्रजीच्या व इंग्रजांच्या समर्थनात आहेत, असे वाटे. त्यामुळे ते त्यांच्याविरोधात गेले. अनेक वर्तमानपत्रात सर सय्यद यांच्याविरोधात लेख प्रकाशित झाले. काहींनी  तर फतवे देखील आणले. पण सर सय्यद या साऱ्यांना बधले नाहीत. 

प्रख्यात विद्वान मौलाना अल्ताफ हुसैन हाली हे सर सय्यद यांचे मित्र होते. त्यांनी सर सय्यद यांचे पहिले चरित्र लिहिले आहे. ‘हयात ए जाविद’ या नावाने ते विख्यात आहे. त्यामध्ये सर सय्यद यांनी कशापध्दतीने निधी जमवला त्याची माहिती दिली  आहे. सर सय्यद यांनी सुरुवातीला बनारसमधील आपल्या काही हिंदू आणि मुस्लिम मित्रांकडे मदत मागितली. सर सय्यद हे बनारस मध्ये इंग्रजांच्या सेवेत कार्यरत होते. मोहम्मदन  कॉलेजच्या स्थापनेनंतर त्यांनी ती नोकरी सोडली. बनारसमधून मिळालेल्या रकमेतून महाविद्यालयाची उभारणी अशक्य होती. मग अलिगड, लाहोर, पटियाला, पटना, मिर्झापूर, हैदराबाद अशा अनेक शहरात देणग्या गोळा करण्यासाठी फिरायला लागले. अख्ख्या भारतभर सर सय्यद यांनी पायपीट केली.

बक्षिस योजनेतून वीस हजार रुपये जमवले  

नवाब अमुजान हे सर सय्यद यांचे जवळचे नातवाईक होते. एकदा सर सय्यद यांनी त्यांना मुस्लिम समाजातून शिक्षणसंस्थेसाठी दहा लाखांचा निधी जमवता येईल का? असा प्रश्न केला. त्यावेळी अमुजान यांनी  दहा लाख पैसेही जमवणे शक्य नसल्याचे सांगून सर सय्यद यांचा विचार मोडीत काढला होता. कालांतराने मोहम्मदन कॉलेज उभे राहिले. मौलाना हाली हा प्रसंग नोंदवून लिहितात, ‘‘ असे अनुभव आल्यानंतरही सर सय्यद थांबले नाहीत. अवघ्या वीस वर्षाच्या काळात महाविद्यालयाची सात – आठ लाख रुपयाची इमारत उभी राहिली. आणि महाविद्यालयाचे वार्षिक निधी संकलन ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते.’’ 

सर सय्यद यांनी मोहम्मदन कॉलेजसाठी निधी जमवताना प्रचंड खस्ता खाल्या. स्वतःची आणि कुटुंबांची सर्व संपत्ती महाविद्यालयाला दिली. सुरुवीतीच्या काळात सर सय्यद यांनी महाविद्यालयासाठी निधी उपलब्ध होईना, तेव्हा एक बक्षिस योजना जाहिर केली. अनेक वस्तू बक्षिसाच्या रुपात ठेवल्या. मुस्लिम समाजातून ही बक्षिस योजना जुगारासारखी असल्याची टिका झाली. धार्मिक दृष्टीने हे ‘हराम’ ( निषिध्द ) कार्य असल्याचे म्हटले गेले. मात्र सर सय्यद यांचा विचार बदलला नाही. त्यातून संस्थेला तब्बल २० हजार रुपयांचा नफा झाला. तो सर  सय्यद यांनी महाविद्यालयासाठी वापरला. 

ओवाळणीच्या रकमा घेतल्या, स्वतःचे ग्रंथालयही विकले. 

पटियाला संस्थानचे वजीर खलिफा सय्यद मोहम्मद हसन खाँ यांना नातू झाल्याचे सर सय्यद यांना समजले. त्यांनी वजीरसाहेबांना ओवाळणी म्हणून पाच रुपये मागितले. पण सर सय्यद ओवाळणी का मागत आहेत, याची वजीर साहेबांना कल्पना होती. वजीर साहेबांनी सर सय्यद यांच्या महाविद्यालयाला मोठी रक्कम निधी म्हणून दिली. महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी पैश्याची चणचण जाणवू लागली, त्यावेळी सर सय्यद यांनी स्वतःच्या ग्रंथालयातील ग्रंथ विकले. त्यातूनही गरज भागेना तेव्हा मित्रांच्या ग्रंथालयातील ग्रंथ निधी म्हणून घेउन ते विकले. तर कधी गाण्याच्या कार्यक्रमात गजला गाउन पैसा मिळवला. तर कधी स्वतःच्या चित्रकलेचे वेड त्यांच्या कामी आले. चित्रे बनवून ती विकली. त्यातून त्यांनी पैसा उभा केला. सर सय्यद यांचा जन्म उच्चभ्रु कुटुंबात झाला होता. त्यांचे अजोबा सर सय्यद यांची उर्दु बिघडू नये म्हणून त्यांना गल्लीतल्या मुलांमध्ये खेळायलाही पाठवत नसत. ते सर सय्यद महाविद्यालयासाठी स्वतःची पत, प्रतिष्ठा विसरुन पडेल ते काम करायला लागले. कधी बाजारात पुस्तकांचे दुकान लावत तर कधी त्याच बाजारात झोळी पसरुन भिक मागायला लागत. एकदा सर सय्यद  मदत मागायला येत असल्याचे पाहिल्यानंतर काही विरोधकांनी लघवीनंतर स्वच्छतेसाठी वापरलेल्या विटांचे तुकडे त्यांच्या झोळीत टाकले. सर सय्यद यांनी आनंदाने त्याचाही स्विकार केला. पण आपली ध्येयनिष्ठा अढळ राखली.

हास्यकथा कथन

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात शहरामध्ये विनोदविरांच्या हास्यकथा कथनाचे कार्यक्रम व्हायचे. लोक त्यातून आनंद घ्यायचे. पण कथाकथनकाराकडे अतिशय तुच्छ नजरेने पाहायचे. त्यांना समाजात विदुषकांसारखे अत्यंत वाईट स्थान होते. पण त्यातून पैसा चांगला मिळायचा. सर सय्यद यांना मोहम्मदन महाविद्यलयातील गरीब विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुरु करायची होती. त्याकरीता पैसा जमवण्यासाठी सर सय्यद यांनी हास्यकथा कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले. पण सर सय्यद यांच्या मित्रांनी समाजात अप्रतिष्ठा होईल म्हणून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. सर सय्यद निर्णयावर ठाम होते. त्यांनी हास्यकथा कथनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर सय्यद यांनी अत्यंत जोशपुर्वक भाषण केले. मौलाना हाली यांनी त्यातील काही अंश ‘हयात ए जावीद’ मध्ये दिला आहे.  सर सय्यद त्या भाषणात म्हणाले, ‘‘ कौन है जो आज मुझको स्टेज पर देखकर हैरान होता होगा ? वही जिनके दिल में कौम का दर्द नहीं. वही जिनका दिल झुठी शेखी और झुठी मशख्त ( मोठेपणा ) से भरा हुआ है ।  आह उस कौमपर जो शर्मनाक बातों को अपनी शेखी और इफ्तेखार ( गर्व /अहंकार ) का बाईस समझे और जो काम कौम और इन्सान की भलाई के लिए नेक नियती से किए जाएं उनको बेइज्जती के काम समझे । आह उस कौमपर जो लोगों को धोका देने के लिए मुकर व पिंदार ( धोका आणि दुराभिमान ) के काले सुत से बने हुए तखद्दुस के बुर्खे को अपने मुंह पर डाले हुए हो, मगर अपनी बदसुरती और दिल कि बुराई का कुछ इलाज न सोचें । आह उसपर जो अपनी कौम को जिल्लत और निकबत के समंदर में, डुबता हुआ देखे, और खुद किनारे पर बैठा हसता रहे अपने घर में खुले खजाने ऐसी बेशरमी और बेहयाई के काम करें जिनसे बेशरमी व बेहयाई भी शरमा जाए, लेकीन कौम के भलाई के काम को शरम और नफरे  का काम समझे । ( लाजिरवाणे आणि हेटाळणीचे काम )

ऐ रईसों और दौलतमंदो । तुम अपनी दौलत व हिश्मत पर मगरुर होकर यह मत समझो की कौम की बुरी हालत हो और हमारे बच्चों के लिए सबकुछ है, यही उन लोगों का खयाल था जो तुमसे पहले थे । मगर अब इन्हीं के बच्चों की वह नौबत है, जिसके लिए हम आज स्टेज पर खडे हैं । ऐ, साहिबों । हर कोई तस्लीम करता है के, तालीम न होने से कौम का हाल रोज बरोज खराब होता जाता है । कौम के बच्चे इखराजात  ए तालीम  के सरअंजाम न होने से ( शिक्षणाचा खर्च उचलण्याची ऐपत नसल्याने  ) जलील और रजील होते जाते हैं । (अपमानित होणे )  मैने कोई पहलू ऐसा नहीं छोडा जिससे कौम के गरीब बच्चों के इखराजात ए तालीम में मदत पहुंचे । मगर अफसोस कामयाबी नहीं हुई । खुद लोगों से भिख मांगी मगर कलील मिली । ( कमी प्रमाणात मिळाले. ) व्हॉलेंटर बनाने चाहे मगर बहोत कम बनें  और जो  बने उनसे कुछ बन न आई । पस मैं स्टेज पर इसलिए आया हूं के कौम के बच्चों की तालीम के लिए कुछ कर सकूं ।’’

सर सय्यद यांच्या या भाषणावरुन त्यांची भुमिका व त्याविषीयीची तडफ दिसून येते. सर सय्यद अनेक संस्थानिकांकडेही निधीसाठी गेले होते. आपल्या अनेक मित्रांकरवी त्यांनी संस्थानिकांशी संपर्क केला. हैदराबादचे सहावे निजाम मीर महिबूब अली यांना सर सय्यद भेटायला गेले. पण मीर महिबूब अलींशी त्यांची भेट झाली नाही. तर प्रवासाचा खर्च निघावा म्हणून सर सय्यद यांनी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला. स्वतः नर्तकाच्या भुमिकेत स्टेजवर उभे राहिले.  मोठ –मोठ्या श्रीमंत व्यक्तींनाही त्यांनी निधीसाठी साद घातली. निधीसाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केले. पण दुर्दैवाने मुस्लिम समाजाने त्यांच्या या कार्याची दखल त्यांच्या हयातीत आणि मृत्युनंतरही म्हणावी तशी घेतली नाही. 


- सरफराज अहमद

मो. ८६२४०५०४०३

(सदस्य, गाजियुद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर, संपादक- डेक्कन क्वेस्ट)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget