देशातील परिवर्तनवादी चळवळींचे ध्येय आहे आदर्श भारत निर्मितीचे! अर्थात समताधिष्ठित, बंधुभावाधिष्ठित, न्यायाधिष्ठित समाज निर्मितीचे. महाराष्ट्र तर या बाबतीत अग्रेसर राज्य असून त्याला ’फुले-शाहू-आंबेडकरी’ विचारांचा रास्त अभिमान आहे. आदर्श समाज निर्मितीच्याच उदात्त उद्दीष्टाने निर्मात्याने या धरतीवर सुरूवातीपासून पैगंबरांना पाठविले. प्रत्येकाने आपापल्या भौगोलिक क्षेत्रात व आपापल्या समाजात या आदशर्र् क्रांतिसाठी पराकोटीचा संघर्ष केला. पैगंबरी शृंखलेतील शेवटचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी 1442 वर्षांपूर्वी ही आदर्श क्रांति घडवून एक आदर्श समाज उभा केला. जेथे स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय प्रत्यक्षात प्रस्थापित होता. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या क्रांतीचे गुणगान करतांना राष्ट्रपिता महात्मा फुले म्हणतात. ‘ तेरावी सद्दीची पैगंबरी खुण! दावीतो प्रमाण कुराणात!
जगी स्त्री पुरूष सत्यधर्मी होती! आनंदे वर्तती ज्योती म्हणे!‘
फुलेंचा हा दुर्मिळ अखंड त्यांनी लिहिलेल्या ’सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथाच्या मूळप्रतीच्या मुखपृष्ठावर असून हरी नरके यांनी इंग्लंडच्या म्यूझियम मधील मूळ प्रतीवर स्वत: वाचलेला आहे. मात्र येथील प्रस्थापितांनी बहुजन समाजाला मुस्लिमांशी जोडणारा हा अखंड मुद्दामहुन त्या ग्रंथाच्या पुढील आवृत्त्यांतून गाळून टाकला. तो पून्हा या ग्रंथात समाविष्ट करण्यासाठी समस्त परिवर्तनवादी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांची गरज आहे.
संतश्रेष्ठ तुकोबांच्या गाथेतही पैगंबरांचा आदरयुक्त उल्लेख आहे. आवल नाम आल्ला बडा लेते भूल न जाये! आल्ला एक तू नबी एक !! धृ !! (संत तुकाराम महाराज अभंग गाथा - देहू देवस्थान - अभंग - 440) तुकोबांनी अनेक अभंगांतून एकाच इश्वराची, समतेची, बंधूत्वाची, न्यायाची ठाम भूमिका मांडली आहे.
छत्रपति शिवरायांनी देखील कुराणाबद्दल, पैगंबरांबद्दल आदर व्यक्त केला आहे. राष्ट्रपिता फुल्यांनी पैगंबरांवर पहीला पोवाडा लिहिला. या पोवाड्यात महात्मा फुले लिहितात,
‘ कोणी नाही श्रेष्ठ ! कोणी नाही दास ! जात प्रमादास खोडी बूडी !
मोडिला अधर्म आणि मतभेद ! सर्वात अभेद ठाम केला !‘
अर्थात-पैगंबरांनी श्रेष्ठ कनिष्ठ हा भेद नाकारला ! गुलामगिरी (दास्यत्व) नाकारली. जाती-पातीला बुडासकट नष्ट केले! अधर्म आणि भेदाभेद मोडून काढला! सर्वात अभेद, समता, बंधुभाव ठाम केला! एक भारतीय महान सुपुत्र डॉ.इक्बाल (रह.) पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेचे वर्णन करतांना म्हणतात, ‘ एक ही सफमें खडे हो गए मेहमूद व अयाज! ना कोई बंदा रहा ना कोई बंदा नवाज.‘ अर्थात राष्ट्रप्रमुख व शिपाई एकाच रांगेत खांद्याला खांदा लाऊन उभे ठाकले! कोणी गुलाम राहिला नाही ना कोणी मालक!
पैगंबरांनी ही महान सामाजिक क्रांती घडवतांना संपूर्ण समाज व्यसनमुक्त केला. दारू व तत्सम नशा आणणारे पदार्थ हराम, निषिध्द ठरविले. आज आपल्या देशात व्यसनाधिनता वाढत आहे. पैगंबरांनी दारूचे उत्पादन, वाहतुक, खरेदी-विक्री व सेवन या सर्व गोष्टी हराम ठरविल्या! समाज व देशहितासाठी हे करावेच लागेल. र्दु्दैवाने आपले सरकार पैशांसाठी लॉकडाऊन मध्ये सुध्दा दारूला बंद करत नाही! सरकारला दारूपासून मिळणार्या उत्पन्नाची चिंता आहे, दारूपासून उध्वस्त होणार्या संसाराची व इतर दुष्परिणामांची नाही.
अर्थव्यवस्थेमध्ये जी अभूतपूर्व क्रांति पैगंबरांनी घडवली त्यात व्याज देण्या-घेण्या वर बंदी हे अत्यंत महत्वाचे घटक आहे! तुकोबांनी आपली वडिलोपार्जित व्याजाची कागदपत्रे इंद्रायणीत बुडविल्याचे सर्वज्ञात आहे. एकीकडे पैगंबरांनी व्याजाला हराम ठरवले तर दुसरीकडे श्रीमंतावर जकात अनिवार्य केली. याचा ईष्ट परिणाम हा झाला की समाजातील प्रत्येक कुटूंब जकात देण्या इतपत सधन झाले! जकात घेणारा कोणी शोधून सापडेना!
पैगंबरांची शैक्षणिक क्रांति अभूतपूर्व आहे! स्त्री पुरूषांवर, मुला-मुलीवर, अबाल वृध्दांवर शिक्षण अनिवार्य ठरवून त्यांनी एका निरक्षर समाजाला 100 टक्के साक्षर केले. साक्षर कैद्यांना प्रत्येकी 10 निरक्षर नागरिकांना साक्षर करण्याची ऐतिहासीक शिक्षा देऊन त्यांनी आपल्या ठायी असलेली शिक्षणाची महत्ता विषद केली. स्त्रियांच्या बाबतीत पैगंबरांनी घडवलेली क्रांति अविस्मरणीय अशी आहे! स्त्री शिक्षण, वारसाहक्क, विधवा विवाह, स्त्री-भृणहत्या बंदी, व्याभिचारी नराधमांना कठोर शासन आदी पैगंबरांचे कार्य बोलके आहे. नसता आपल्या देशात आजही उत्तर प्रदेशात हाथरस मध्ये घडलेली घटना आणि ती हाताळणारे निष्क्रीय नव्हे अत्याचारींचे समर्थक शासन आणि तितक्याच निष्क्रीयतेने हा सर्व अत्याचार पाहणारी जनता या सर्व बाबी अत्यंत निंदनिय आहेत.
पैगंबरांचे वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी घडवलेल्या या महान, न भूतो न भविष्यती अशा क्रांतीचे श्रेय यत्किंचितही स्वत:कडे न घेता सारे श्रेय जगत निर्मात्या अल्लाहला दिले! मी तुमच्यासारखाच एक सामान्यकार्यकर्ता! हे सर्व या अल्लाहच्याच कृपेमुळे घडले अशी ठाम भूमिका घेऊन स्वत:ची विनम्रता त्यांनी जगापुढे ठेवली. मी जे काही करतो ते नि:स्वार्थपणे केवळ अल्लाहसाठी! नावलौकीकासाठी कदापि नव्हे! याच निस्वार्थपणाची आज नितांत गरज आहे. नसता अनेक चळवळींमध्ये केवळ कार्यकर्त्यांच्या स्वार्थी वृत्तिमुळे फूट पडत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यासाठी कार्यकर्त्यांचे योग्य प्रबोधन महत्वाचे आहे. केवळ स्वार्थासाठी जर आपण चळवळींचे नुकसान करत असू तर आपल्याला या महापुरूषांचे नाव तरी घेण्याचा नैतिक अधिकार आहे का? हा विचार प्रत्येकाने करावयास हवा. आज विघटनाची नव्हे तर संघटनेची नितांत गरज आहे. भारतातील परिवर्तनवादी चळवळींच्या कार्यकर्त्यांनी पैगंबर आणि त्यांच्या कार्याकडे सामाजीक परिवर्तन घडवणारे क्रांतिदूत या दृष्टीने पाहिले पाहीजे. आपल्याला अपेक्षित परिवर्तन घडविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांमध्ये एकजूट अनिवार्य आहे. आज अनेक कार्यकर्ते ही एकजूट घडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत व त्यांना यशही येत आहे. मराठा, मुस्लिम, माळी, महार, मातंग इ. प्रमुख समाज घटकांमध्ये ऐक्य दिवसेंदिवस वाढत आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या महाराष्ट्र शाखेने पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या ’सामाजिक ऐक्य परिषदेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सामाजिक ऐक्य परिषदेचे खंदे समर्थक आदरणीय ह.भ.प.रामदास महाराज कैकाडी यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. वारकरी चळवळीतील समतेचा, बंधूत्वाचा, न्यायाचा एक खंदा समर्थक हरपला! सिंह हरपला! सर्व कार्यकर्त्यांतर्फे त्यांना आदरांजली!
पैगंबर जयंती साजरी करणार्या त्यांच्या अनुयायींचे अर्थात मुस्लिम बांधवांचे हे आद्यकर्तव्य आहे की त्यांनी पैगंबरांचे हे खरे क्रांतिकारी कार्य सर्वधर्मीय समाजबांधवांपर्यंत पोहचवावे. त्यासाठीच हा अल्पसा लेख!
- डॉ. रफिक पारनेरकर
Post a Comment