माझं कुटुंब माझी जबाबदारी!
कोणतीही जबाबदारी अंगावर घेणं हे मर्दाचं लक्षण असतं असं म्हणतात. याबाबतीत आम्हांला मराठी माणसाचा भलता म्हणजे भलताच अभिमान आहे. (या ठिकाणी 'भलताच'चा अर्थ 'फार' असा घ्यावा, उगाच 'भलताच' घेऊ नये.) सेना-भाजपची युती तुटली असं जाहीर करून शिवसेनेची शिकार करण्याची जबाबदारी अंगावर घेणारा शिकारी कोण होता, तर तो होता आमचा मराठी माणूस, आमचे नाथाभाऊ! मिठाशिवाय जेवणाला चव नसते. स्वयंपाक करतांना मीठ वापरावंच लागतं. अर्थात जिथे जे वापरायचं ते वापरावंच लागतं आणि जिथे जे टाळायचं तिथे ते टाळावंच लागतं! मिठाशिवाय जेवणाला चव नाही हे जरी खरं असलं तरी बासुंदीत कोणी मीठ घालतं का? यशस्वी राजकारणी होण्यासाठी माणूस पाककलेतही निष्णात असावा लागतो की काय? (बिहारहून परतल्यावर देवानाना नागपूरकरांना विचारायला हवं.) 'युती तुटल्याची घोषणा करण्याची हिम्मत फक्त या नाथाभाऊमध्येच होती!' असं 'वाघाची शिकार करण्याची हिम्मत या नाथाभाऊ मध्येच होती!' असं एखाद्या शिकारीच्या आवेशात सांगणारे नाथाभाऊ आता, 'शिकारी खुद यहां शिकार हो गया.' या शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिताहेत म्हणे! असो.
तसा आम्हांला नाथाभाऊंचा अभिमान आहे, पण त्यांच्यासारखी अशी कोणतीही जबाबदारी अंगावर घेणं आम्हांला कधीच जमलं नाही. आम्ही तसे अगदीच बेजबाबदार. (कोणासारखे काय सांगणार, इकडे बायका-पोरं तरी नाराज होणार नाहीतर तिकडे राजकारणी तरी नाराज होणार!) आमच्या जन्मापासून ते थेट लग्नापर्यंतची जबाबदारी आमच्या आई-बापांनी पार पाडली. नाव पूनम असलेलं, पण अमावास्येला पृथ्वीतलावर अवतरीत झालेलं आणि आपल्या अवतरण दिनाच्या सर्व खुणा आपल्या अंगावर बाळगणारं आपलं सहावं कन्यारत्न आमच्या गळी मारण्यासाठी आमच्या सासरेबुवांनी एका संस्थाचालकाशी ओळख काढून आम्हांला प्राथमिक शाळा मास्तर बनविण्याची जबाबदारी पार पाडली. अर्थात अगदी पहिल्या महिन्यापासूनच आम्हांला पगार देण्याची जबाबदारी तो संस्थाचालक पार पाडू न शकल्यामुळे मग आमच्या कुटुंबाची सगळी आर्थिक जबाबदारी आमच्या सासरेबुवांनाच पार पाडावी लागली. जावयाची दुहेरी फसवणूक केल्यावर त्याची फळं भोगावीच लागणार ना? हसत करावे कर्म भोगावे मग रडत तेचि, यालाच म्हणत असावे का? तरी मनात कोणताही किंतु न ठेवता आम्ही त्या आमच्या सासरेबुवांना पाच वर्षात पाच नातवंड देण्याची जबाबदारी न कुरकुरता पार पाडली! तसं आमच्यासारख्या स्वाभिमानी माणसाला आयुष्यभर त्यांच्यावर अवलंबून राहणं कुठे आवडणार आहे? (आणि त्यांचं आयुष्य तरी किती उरलंय आता?) म्हणतात ना की एक दरवाजा बंद झाला की देव दुसरा दरवाजा उघडतो म्हणून! मुलगा लागेल की दोन चार वर्षात नोकरीला! हेही असो. असं जबाबदारी झटकत जगण्याची आम्हांला अजिबात लाज वाटत नाही. का, म्हणजे काय? 'यथा राजा तथा प्रजा!' माहीत नाही का? माणसाने कोणाकोणाची जबाबदारी अंगावर घ्यावी? राजा असला म्हणून काय झालं? त्याला त्याची काही कामं आहेत की नाही? तो दिवसरात्र जनतेचीच कामं करायला लागला तर त्याने आपलं खासगी आयुष्य केंव्हा जगायचं? आणि राजा असं दिवसरात्र जनतेच्याच कामात गुंतुन राहिला आणि बाळराजे जर रात्र रात्र भर बाहेर ''धुवांधार' पार्ट्या झोडू लागले तर? कोणाच्या कुळाची 'दीपिका' वाया जात असेल तर जाऊ देत, पण राजाचा कुलदीपक कसा वाया जाऊ द्यायचा? त्यासाठी मग 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' चा नारा देऊन जनतेला कामाला लावण्यात काय चुकीचं आहे? याला बेजबाबदार म्हणणार का? असा बेजबाबदार माणूस कधी राजा होऊ शकतो का? असे असते तर आम्ही नसतो का राजा झालो? पुन्हा असो.
अर्थात, सगळेच काही असे बेजबाबदार असतात असं नाही. 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' काहींच्या रक्तातच भिनलेली असते. परवा अशाच एका पठ्ठ्याच्या 'मालामाल' बायकोला चौकशीसाठी एका सरकारी कार्यालयातून बोलावणं आलं. लगेच या महाशयांनी 'मलाही तिच्यासोबत येऊ द्या. ती बिचारी घाबरून जाईल, अस्वस्थ होईल' असा अर्जच त्या कार्या लयाकडे केला. त्यालाही तिच्यासोबत चौकशी सुरू असतांना थांबायचं होतं म्हणे. म्हणजे उद्या तिला जर मुक्कामाला 'येरवड्यात' पाठवली तर तिथे यांच्यासाठी देखील सोय करावी लागेल की काय? 'तुम्ही स्वतःला काय 'बाजीराव' समजता की काय?' असं म्हणून त्याचा अर्ज फेटाळला गेला म्हणे! या 'बाजीराव'ला त्याच्या 'मस्तानी' सोबत चौकशीच्या ठिकाणी हजर राहण्याची परवानगी नाकारल्यानंतर त्याने म्हणे राजा बुद्धिगुप्तला फोन केला. 'हॅलो, राजासाब मैं बाजीराव बोल रहा हुं.' 'बोला बाजीराव.' 'सर, वो क्या है ना, के मैं मेरी वाईफ के साथ वो इन्कवायरी की जगह जाना चाहता हूं सर. वो बडी मासुम है सर. घबरा जायेंगी सर. आपको क्या लगता है सर?' 'खरं आहे रे बाबा. जशी तुझी बायको मासुम आहे ना, तसाच माझा बाळसुध्दा मासुम आहे रे. मी तर म्हणेन की त्याच्या इतकं मासुम कोणीच असू शकत नाही. किंबहुना मासुम हा शब्दच मुळी त्याच्यासाठीच बनला आहे. त्यांनी तुला तुझ्या बायकोसोबत जाऊ द्यायलाच हवं, म्हणजे मग उद्या मलासुद्धा माझ्या बाळासोबत जाता येईल ना?'
- मुकुंद परदेशी
मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८
Post a Comment