Halloween Costume ideas 2015

आजची युवापिढी व्यसनाच्या आहारी

आज आपल्या देशातील युवा पिढीवर व्यसनांचा इतका पक्का विळखा बसलाय की व्यसन करणे म्हणजे फॅशन, चैन, अनुकरण प्रतिष्ठेचं झालं आहे. सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा,  मावा, चरस, गांजा, ड्रग्स, खर्रा, कोकेन इत्यादींसह नशायुक्त अन्य अंमली पदार्थाचं व्यसन देशातील जवळपास ७० टक्के तरुणांपर्यंत पोहाचलं आहे. तसेच आयुष्यात कधीही कसलेही  व्यसन न केलेल्या तरुणांचे प्रमाण १० टक्के इतके आहे. तसेच ज्याची जेवढी कमाई तो त्याप्रमाणे व्यसन करतो. आज सगळीच युवापिढी बिघडलीय असं अजिबात नाही. कुठेतरी  गणित चुकतंय बहुतांश तरुणवर्गाला व्यसनांनी आपल्या जाळ्यात ओढून घेतलेलं दिसून येते. आज भारताची ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षाच्या आतील आहे. युवापिढीला व्यसनाधिन  बनवून भारताला महासत्ता बनण्यापासून अनेक परदेशी षङ्यंत्र करीत असल्याचे दिसते. देशाच्या प्रगतीचा कणा म्हणजे तरुणच या व्यसनांचे लक्ष्य बनला आहे. एका सर्व्हेनुसार सध्या  दररोज ५५०० तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याचे दिसते.

व्यसन म्हणजे काय
एखादी गोष्ट वारंवार करण्याची सवय तसेच सवयीसोबत असणारी सशर्तता. आपण एखादी गोष्ट करतोच त्या वेळी बरे वाटते अशी सवय म्हणजे व्यसन आहे. एखादी गोष्ट केल्याविना   बरे वाटत नाही अशी सवय म्हणजे व्यसन आहे. एखाद्या सवयीच्या आहारी जाणे म्हणजे व्यसन आहे. एखादी गोष्ट केल्याविना करमत नाही, जमत नाही, ताजेतवाने व तरतरीतपणा  जाणवत नाही म्हणजे व्यसन आहे. सिगारेट व मद्यपानामुळे होणारे नुकसान सिगारेट पिल्याने केवळ पिणाऱ्या माणसाच्या आरोग्यवरच परिणाम होत नाही तर याचा परिणाम जमीन  आणि पर्यावरणावरही होत असतो. सिगारेट हे प्लॅस्टिकपेक्षाही जास्त धोकादायक असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. सिगारेट पिऊन फेकून देण्यात येणारे फिल्टर हे  जमिनीबरोबरच पर्यावरणालाही हानी पोहचविते. सिगारेटमधील फिल्टर हे ‘सेल्युलोज एसिटेट फायबर'पासून तयार केले जाते. जे एक प्रकारचे ‘बायोप्लास्टिकच’ असते. हे कुजण्यासाठी  अनेक दशकांचा कालावधी लागतो. त्यामुळे मोठा काळ जमिनीत राहिल्याने जमिनीची उपजाऊ क्षमता कमी होत जाते. यामुळे बिबियाणे अंकुरित होत नाहीत. जर झालेच तर त्या  अंकुराचा विकास होत नाही. एका अंदाजानुसार जगभरात एका वर्षात ४:५० लाख कोटी सिगारेट पिल्यानंतर त्याचे फिल्टर फेकून दिले जातात. या फिल्टरांच्या संपर्कात आल्यास झाडांची   उंची २८ टक्के घटते. यामुळे प्लास्टिकपेक्षाही सिगारेट धोकादायक असल्याचा अहवाल एका संशोधनात करण्यात आला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने तयार केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील एल.सी.ओ.एल. आणि अंमली पदार्थाचे व्यसन ही गंभीर चिंता बनत आहे. तर मद्यपान केल्यामुळे दर ९६ मिनिटांत एका भारतीयाचा मृत्यू होतो. मद्यपानाच्या प्रभावाखाली महिलांवरील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुन्हे केले जातात. अंमली पदार्थाच्या वापराशी संबंधित समस्यांमुळे दररोज भारतभरात १० टक्क्यांपेक्षा जास्त लोक   आत्महत्या करतात. भारतात १३ टक्के लोक मादक पदार्थाच्या आणि अशा पदार्थांच्या गैरवापरात गुंतलेले आहेत, जे २० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. व्यसनी व्यक्तीच्या जीवनावर  खालील दुष्परिणाम होऊ शकतात

मानसिक परिणाम
सतत चिडचिड होणे, आपल्यावर अन्याय होतो असे वाटणे, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ह्या विकारांचे प्रमाण वाढणे. एकलकोंडेपणा, अनामिक भीती, वैफल्यग्रस्तता, संशय,  आपल्याला कोणी समजून घेत नाही असे वाटणे आदी. शारीरिक दुष्परिणाम शरीरातील सर्व इंद्रियांची हळूहळू क्षमता कमी होणे, रक्तवाहिन्या कमकुवत होणे, स्नायू, सांध्यांची   कार्यक्षमता कमी होत जाणे, लैंगिक क्षमता नष्ट होणे किंवा नपुंसकता निर्माण होणे, शुक्राणूंचा नाश, मज्जासंस्थेशी संबंधित कार्यात बिघाड, पचनशक्ती क्षीण होणे, यकृत आणि किडनी  खराब होणे, मधुमेह, रक्तदाब इ. विकार होणे.

आर्थिक दुष्परिणाम
व्यसनावर जास्तीतजास्त पैसे उडवणे, नोकरी-व्यवसाय यांकडे दुर्लक्ष, कार्यक्षमता कमी झाल्याने आळशीपणा वाढणे, घरातील आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष, उधाऱ्या करणे किंवा कर्जे काढणे,  नोकरी व्यवसाय बंद पडणे वगैरे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय व्यसन दिन संयुक्त राष्ट्र महासभेने ७ डिसेंबर १९८७ रोजी एक ठराव संमत केल्यानंतर २६ जून हा दरवर्षी संपूर्ण जगात   अंमली पदार्थाचे गैरवर्तन आणि तस्करीविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो. तर भारतात दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी व्यसन दिन साजरा केला  जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे भारत ड्रग्सपासून मुक्त करणे आणि प्रतिभा जपणे. तसेच महाराष्ट् शासनाच्या वतीनेही आतापर्यंत सहा वेळा (पुणे- २०१२, नागपूर-२०१३, मुंबई- २०१५, गोंदिया-२०१६, अमरावती-२०१७ आणि बीड-२०१८) आदी ठिकाणी व्यसनमुक्ती साहित्य संमेलन घेण्यात आले. जागतिक आरोग्य संस्थेच्या माहितीप्रमाणे अंमली पदार्थाच्या पहिल्या  अनुभवाचे वय भारतात १९९० मध्ये १९ वर्षापासून तर २००६ मध्ये १६ व्या वर्षापर्यत घसरले होते. भारतीय लोकसंख्येच्या जवळजवळ २५ टक्के मुले १० ते १४ वर्ष वयोगटातील आहेत.  सध्या जगभर १२ ते १९ या वयोगटातील तरुण मुलामुलीमध्ये अंमली पदार्थाबद्दल जाणीव, कुतूहल आणि वापर वाढत चालला आहे. आपला देशही याला अपवाद नाही.

विद्यार्थ्यांची जबाबदारी

इतर विद्यार्थ्यांच्या अंमली पदार्थाच्या सेवनाला बळी पडू नये, अंमली पदार्थ सेवन अत्यंत घातक आहे. त्यामुळे याच्या सेवनापासून दूर रहावे. मुलींनी द्रव पदार्थ सेवन करताना काळजी  घ्यावी कारण त्यामध्ये ‘रोहयप्नोल'सारखे डेट रेप ड्रग्स असू शकतात. आपल्या शाळा, महाविद्यालयात, परिसरात, गावात होणाऱ्या अंमली पदार्थाच्या वापर व विक्रीबद्दल शाळेचे   मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य, सरपंच किंवा पोलीस पाटील, पोलिसांना कळवावे जेणेकरून यावर आळा बसेल.

-प्रा. मोहसीन खान
संस्थापक अध्यक्ष, अल इम्रान प्रतिष्ठान,
बिलोली, जि.नांदेड, मो.९८६०२०१०९९
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget