Halloween Costume ideas 2015

परलोकावर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय अबु सईद खुदरी यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी ऐशोआराम आणि निष्काळजीपणाचे जीवन कसे व्यतीत करू शकतो, जेव्हा इसराफील (अ.)   (अंतिम निवाड्याच्या (कयामतच्या) दिवशी जो मृतात्म्यांना जागे करण्यासाठी सूर नावाची तुतारी फुंकणार आहे तो देवदूत.) सूर (तुतारी) हातात घेऊन, कान लावून, मान झुकवून वाट पाहात आहेत की केव्हा आदेश येतो सूर फुंकण्याचा? (अंतिम निवाड्याच्या दिवसाच्या तुतारीची हकीकत कोणाला कशी कळणार?)’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर (स.)! मग  आमच्यासाठी तुमचा काय आदेश आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘याचे पठण करीत राहा- ‘हसबुनल्लाहु व निअमल-वकील.’ (अल्लाह आमच्यासाठी पुरेसा आहे आणि तो योग्य कार्य  घडविणारा आणि देखरेख करणारा आहे.)’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांची अस्वस्थता आणि काळजी पाहून आणि अधिकच उद्विग्न झाले आणि विचारले, ‘‘जर आपली ही स्थिती आहे तर आमची काय स्थिती होईल? सांगा,  आम्ही काय करावे जेणेकरून त्या दिवशी सफल होऊ.’’ पैगंबरांनी त्यांना सांगितले, ‘‘अल्लाहवर विश्वास ठेवा, त्याच्या देखरेखीत जीवन व्यतीत करा, त्याच्या दासत्वात जीवन व्यतीत  करणारे सफल होतील.’’

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, (अंतिम निवाड्याच्या दिवशी) एक दास अल्लाहच्या समोर येईल, अल्लाह त्याला विचारील, ‘‘हे  अमुक माणसा, मी तुला प्रतिष्ठा दिली नव्हती काय? तुला पत्नी दिली नव्हती काय? तुझ्या ताब्यात घोडे आणि उंट दिले नव्हते काय? आणि मी तुला अवधी दिला नव्हता काय? तू  तुझे राज्य चालवित होता आणि लोकांकडून कर वसूल करीत नव्हता काय?’’ तो त्या ईशदेणग्यांचा स्वीकार करील. मग अल्लाह त्याला विचारील, ‘‘तुला एक दिवस माझ्यासमोर हजर  व्हावे लागेल, असे तुला वाटत होते काय?’’ तो म्हणेल, ‘‘नाही.’’ मग अल्लाह त्याला म्हणेल, ‘‘ज्याप्रकारे तू मला जगात विसरला होतास, तसेच आज मी तुला विसरेन.’’ मग असाच   एक दुसरा मनुष्य (अंतिम निवाड्याचा दिवस नाकारणारा) अल्लाहसमोर हजर होईल आणि त्यालादेखील वरीलप्रमाणे प्रश्न केले जातील. मग एक तिसरा मनुष्य हजर होईल आणि  अल्लाह त्यालाही तेच प्रश्न विचारील जे पूर्वीच्या दोन्ही मनुष्यांना (जे सत्य नाकारणारे होते) विचारले होते, तेव्हा हा तिसरा मनुष्य उत्तर देईल, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या! मी तुझ्यावर, तुझ्या ग्रंथावर आणि तुझ्या पैगंबरांवर ईमान बाळगले होते, मी नमाज (प्रार्थना) अदा करीत होतो, रोजे (उपवास) करीत होतो, तुझ्या मार्गात माझी संपत्ती खर्च करीत होतो.’’ (पैगंबर  मुहम्मद (स.) पुढे म्हणाले,) आणि अशाचप्रकारचे पूर्ण क्षमतेने आपले आणखीन अनेक पुण्यकर्म सांगेल, तेव्हा अल्लाह त्याला म्हणेल, ‘‘थांब, पुरे झाले.’’ मग अल्लाह म्हणेल, ‘‘आम्ही  आता तुझ्याविरूद्ध साक्ष देणाराला बोलवितो.’’
तेव्हा तो आपल्या मनातल्या मनात विचार करील की माझ्याविरूद्ध साक्ष देणारा हा कोण असेल. मग त्याचे तोंड मोहोर लावून बंद केले जाईल. (कारण तो अल्लाहसमोरदेखील खोटे बोलायला मागेपुढे पाहणार नाही, ज्याप्रमाणे जगात पैगंबर आणि ईमानधारकांच्या समोर निर्लज्जपणे खोट्या पवित्रतेचा डांगोरा पिटत होता. मग त्याच्या मांड्या, मांस आणि हाडांना  विचारले जाईल तेव्हा ते सर्व त्या व्यक्तीची एक-एक लबाडी व्यवस्थितपणे सांगतील. मग अशाप्रकारे अल्लाह अनावश्यक संभाषणाचा दरवाजा बंद करील.’’
पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘हा तोच मनुष्य आहे ज्याने जगात धर्मद्रोह केला आणि हा तोच मनुष्य आहे ज्यावर अल्लाहचा कोप झाला.’’ (हदीस : मुस्लिम)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget