शाळांना समस्यांनी ग्रासले; शिक्षकांची अनोखी शक्कल, मदतीची मागणी
कोल्हापूर (अशफाक पठाण)
कोल्हापूर-सांगली येथे आलेल्या महापुराने मानवी जीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. घरांची मोठी पडझड झाली असून, दैनंदिन साहित्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. घरे उभारण्यासाठी बराच काळ लागणार असल्याने बांधण्याची मोहिम हाती घ्यावी व पूरग्रस्तांना धीर द्यावा अशी मागणी येथील नागरिक सरकारकडे करीत आहेत. पुरामुळे शाळांचेही अतोनात नुकसान झाले असून, विद्यार्थ्यांची दफ्तरेही पूर्णपणे भिजल्याने शालेय साहित्याचे नुकसान झाले आहे. महापूर ओसरला मात्र अडचणी कायम असून, थोडाही पाऊस सुरू झाला की नागरिकांत धडकी भरत आहे. त्यामुळे उपाययोजना युद्ध स्तरावर कराव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.
महापुरामुळे पूर्ण उध्वस्त झालेली खिद्रापूर येथील उर्दू विद्यामंदीर. ही शाळा पूर ओसल्यानंतर सुरू होण्याआधीच पुन्हा बंद पडली. कारण या शाळेची इमारत पुराच्या पाण्यात राहिल्याने भिंती कमकुवत झाल्या. त्यामुळे येथे बसणेही धोकादायक असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. या शाळेतील विद्यार्थ्यांची बसण्याची दुसरी व्यवस्था म्हणून गावातील मराठी शाळेतील एका -(उर्वरित पान 2 वर)
खोलीत करण्यात आली. या एका खोलीत सहा वर्गाचे विद्यार्थी बसविणे आणि त्यांना शिकविणे हे कठीण काम असल्याने शाळेतील शिक्षकांनी यावर तात्पुरता तोडगा काढला आणि गावातीलच मशिदीच्या वरच्या मजल्यावर तीन वर्ग सुरू केले. त्याच शाळेतील एका शिक्षिकेच्या घरी दोन वर्ग सुरू केले आहेत. अश्या प्रकारे शिक्षकांनी स्वतःला वाहून घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव सर्वस्व पणाला लावले आहे. शिक्षकांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे पालक व विद्यार्थ्यांतूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक शाळांमधील ग्रंथालयांचे मोठे नुकसान झालेले आहे. पुस्तके ही विचारांची देवाण-घेवाण करणारे साधन म्हणून आपण ओळखतो. ग्रंथालयातील पुस्तके ही कोणत्याही शाळेची एक अनमोल संपत्ती असते. अशी संपत्ती ज्यामुळे विद्यार्थी घडतो. त्यांच्या जडणघडणीत पुस्तकरूपी मित्रांची महत्त्वाची भूमिका असते. कुरूंदवाड मधील अल्लामा इक्बाल या शाळेतील ग्रंथालयातील जवळ-जवळ 2500 ते 3000 पुस्तके पुरामुळे खराब झाली. तसेच शाळांतील क्रीडा साहित्य, प्रयोगशाळा, संगणकांचे मोठे नुकसान झाले. शाळेतील महत्त्वाची कागदपत्रे, विद्यार्थ्यांच्या दाखल्यांचे दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच भरीस भर म्हणजे पुरामुळे पाण्यात विद्यार्थ्यांची दप्तरे बुडाल्याने त्यातील पुस्तके, वह्या आदी शैक्षणिक साहित्य काहीच कामाचे उरले नाही. अशा परिस्थितीत बालभारतीकडून घोषणा करण्यात आली होती की पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तके पुन्हा छापून देण्यात येतील. तेव्हा थोडाफार धीर मिळाला होता. विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली मात्र ते ही अपुरीच. सर्व पुस्तके लवकर मिळालीत तरच विद्यार्थी योग्य पद्धतीने अध्ययन करू शकतील. नाहीतर यंदाचे शैक्षणिक नुकसान अटळ आहे. वह्या व अन्य शालेय साहित्याची वाणवा आहे. यामुळे पालक, विद्यार्थी व शिक्षक तणावात आहेत. सर्व प्रकारच्या नुकसानीचे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आले असल्याचे प्रशासन सांगत आहे. अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही. शासनाची मदत येईपर्यंत सामाजिक संस्था, संघटनांकडूनही मिळत असलेल्या आधारामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
Post a Comment