Halloween Costume ideas 2015

ओह! ही डोकेदुखी..!

मानवी मेंदू एकीकडे जग पादाक्रांत करतोय. अस्तित्वावर या विश्‍वावर विजय मिळवू पाहतोय; पण प्रगतीसोबतच डोकेदुखीही वाढलीय. ती एक साखळीच आहे. प्रगती झाली, मग त्या ताणापायी डोकेदुखी इतर आजारही वाढले अन् त्यावरील इलाज मग अत्याधुनिक आलेत. तपासण्या, सीटी, एमआरआय स्कॅन आलेत... सारं सारं अत्याधुनिक.
           काही आजार हे अतिमहत्त्वाकांक्षी, घोडदौड करणार्‍या, थांबता न येणार्‍या मनाच्या तळाशी ठाण मारून बसलेले असतात. ताण, चिंता, दबाव सहन करण्याची मेंदू, मनाची एक क्षमता असते. त्यापल्याड मन, मेंदू सहन करू शकत नाही. मांसपेशी मज्जातंतूवर ताण येतो. मग रबर ओढल्यासारख्या किंवा कपडे पिळल्यासारख्या वेदना पूर्ण डोक्याला कपाळाला मानेच्या भागाला घेरून टाकतात. टेंशन हेडेक (ढशपीळेप हशरवलहश) हा असाच अतिदुर्लक्षित डोकेदुखीचा प्रकार. डोकं म्हटलं की, सर्वांत जास्त सजग होण्याची गरज. थोडंसं छातीत दुखलं की, माणूस ईसीजी, इकोपासून तर टीएमटी अँजीओग्राफीपर्यंत सारं करून घेतो. पण, त्या हार्टवरही नियंत्रण असणार्‍या मनाच्या दुखण्याला मेंदूच्या कार्याला तो दुर्लक्षित करतो. त्यात काय डॉक्टरला दाखवायचं. डिस्प्रीन, क्रोसिन वगैरे घेऊन टाक; आराम कर थोडा, ठीक होऊन जाईल वगैरे. पटकन पेनकिलर घेता यावी, नेहमीच इतकीही सोपी, साधी नसते डोकेदुखी. त्याला शारीरिक, भावनिक, मानसिक, कौटुंबिक, न्यूरॉलॉजिकल, सोशल असे कितीतरी पैलू असतात.
    बरेचदा फक्त औषधांनी बरे होणारे आजार नसतात. सोबत मनाला निरोगी करण्याच्या पद्धतीही वापरायच्या असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातल्या अर्ध्या लोकांना आयुष्यात कधी न कधी डोकेदुखीने ग्रासलंय. मुख्यत्वे मायग्रेन अन् टेंशन हेडेक हेच दोन प्रकार आपल्याला बघावयास मिळतात. त्यातही 20 ते 25 टक्के डोकेदुखी मेंदूतल्या रक्तवाहिन्यांशी संबंधित असते. योग्य निदान करायला तज्ज्ञ आवश्यक असतात.
    उरलेला 60 ते 70 टक्के हा मोठा वर्ग ताण-तणावातून येणार्‍या डोकेदुखीच्या विळख्यात असतो. पण, जनजागृती नसल्यानं आपण सायकियाट्रिस्टला भेटत नाही. चार-दोन महिने औषधं अन् सायकोथेरपी कौन्सिलिंग सत्र झाल्यावर लक्षात येतं की, विनाकारणच इतक्या वर्षांपासून टेंशन डोकेदुखी घेऊन आपण जगत होतो. डोकेदुखीचे प्राथमिक आणि दुय्यम असे दोन प्रकार आहेत. प्राथमिक डोकेदुखी म्हणजे डायरेक्ट मेंदूतल्या रचनेत, रक्तवाहिन्या वा मांसपेशी, मज्जातंतूंमध्ये बदल झाल्यामुळे होणारी डोकेदुखी. बरेचदा रासायनिक बदलांमुळे पण असे होते. मायग्रेन, टेंशन हेडेक, क्लस्टर हेडेक ही प्रामुख्याने महत्त्वाची. दुय्यम डोकेदुखीत इतर शारीरिक कारणं असतात. त्यामुळं डोकेदुखी हे फक्त लक्षण असतं दुसर्‍या कुठल्यातरी आजाराचं. ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, उच्च रक्तदाब, नशा, अल्कोहोल हँगओव्हर, स्ट्रोक, आईसक्रीम हेडेक अशी कितीतरी कारणं.
    आपण प्रामुख्यानं टेंशन हेडेक अन् मायग्रेन या दोन मुख्य डोकेदुखी कारणांच्या लक्षणांवरच चर्चा करू. या दोनमधे बरेचदा गोंधळ असतो. मायग्रेन आहे की नाही? किंवा टेंशन हेडेक आहे का? बरेचदा मिश्र लक्षणं असतात. मायग्रेन व्हॅस्कुलर हेडेकमध्ये साधारणपणे मळमळ, उलटी फोटोफोबिया-लाइट उजेडाचा त्रास होणे, फोनोफोबिया- आवाजाचा त्रास अन मग चिडचिड होणे, डोक्याच्या अर्ध्या भागात दुखणे, सहन होणारच नाही इतपत दुखणे. यात ऑरा’ असतो. म्हणजे रीींंरलज्ञ आल्यासारखं महिन्यातून ठराविक तीन-चार दिवस भयंकर वेदना होतात. मग हळूहळू ते पूर्ववत होतं. मेंदूतल्या रक्तवाहिन्या फुगतात आणि त्या अवतीभवतीच्या मज्जातंतूंवर, मांसपेशींवर दबाव आणतात. यामुळे असह्य वेदना होतात.
    याउलट टेंशन हेडेक हा सततच्या डोकेदुखीचा प्रकार. म्हणजे सहन होऊ शकणारी; पण कधीच ब्रेक’ न घेणारी डोकेदुखी. डॉक्टरांच्या दैनंदिन पेशंट पाहणीतल्या अनुभवानुसार डोकेदुखीच्या शंभरातल्या 60 ते 70 केसेसमधे ताण-तणाव, चिंता, नैराश्य, हीच प्राथमिक कारणं. यात मायग्रेनसारखं तीव्रतेनं डोकं दुखत नाही. दिवसभरच हलकं हलकं दुखत राहतं. टेंशन हेडेकची कारणं शोधणं महत्त्वाचं. कारण त्यावरच उपचार अवलंबून आहे. आतमध्ये धुमसत जाणारं मन ओळखणं गरजेचं. बरेचदा दैनंदिन जगण्यातला ताण, टार्गेट, नात्यातली अस्थिरता, आयुष्याकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा अन् त्या पूर्णत्वास न गेल्यामुळं मनाची होणारी पडझड अन् विचारांची घालमेल अस्वस्थ करते. मेंदूच्या मांसपेशी अशा चिंतेनं ताणल्या जातात. कपाळ किंवा संपूर्ण डोक्याचा भाग ठणकल्यासारखा किंवा आतून कुणीतरी ठोके मारल्यागत दुखतं.
    डोकं बधीर झाल्यासारखं वाटणं, मुंग्या आल्यासारखं, पूर्ण शरीर थकल्यासारखं गळून पडल्यासारखं वाटतं. नीटशी झोप होत नाही. पूर्ण कपाळावरच्या मांसपेशी ओढल्यासारख्या वाटतात.
    उपचार : धकाधकीच्या जीवनात आपण क्षणभरासाठीही शांत राहून काही न करता निसर्गासोबत राहणं. आपले छंद जोपासणं विसरलो आहोत. फक्त काम आणि भौतिक सुखाच्या मागे माणूस धावत सुटलाय. आपण गर्दीत मागे राहता कामा नये, ही भावना प्रत्येकाच्याच मनात घर करून बसलीयं. प्रत्येक जण नुसता धावतोय. अँटीडिप्रेसंट किंवा चिंता, बेचैनी कमी करणारी काही औषधं यात प्रभावी ठरतात. आधुनिक औषधांचे फार साइड इफेक्टसुद्धा नसतात. ताण कमी झाला की, छान झोप येते. अन् छान झोप आली की, मग डोकं पण दुखत नाही. योग, विपश्यना माइंडफुलनेस किंवा ध्यान पद्धतीनेसुद्धा मन शांत ठेवता येतं.
    कधीकधी जगण्याची गती थोडी मंद करून शांत निसर्ग अन् त्याची गोड अनुभूती एंजॉय’ करणंही जमायला हवं. निव्वळ अर्थार्जनाच्या धडपडीत हातात असलेलं सुख, छोट्या छोट्या गोष्टीतल्या तरल आनंदाला मुकता कामा नये. हे सुंदर जगणं एकदाच मिळालंय. त्याचा पुरेपूर आनंद घ्यायलाच हवा. काम, कुटुंब अन् विरंगुळा, छंद यांची योग्य सांगड घालता यायला हवी. टेंशन हेडेक नक्कीच कमी करता येण्यासारखं आहे. अन् मानवी मनाच्या निकोप, निरोगी आरोग्यासाठी ते अत्यंत गरजेचंही आहे!

- डॉ.श्यामल सराडकर
8975163024
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget