Halloween Costume ideas 2015

आपल्या अस्तित्वाला उपयोगी सिद्ध करा

जहां भी जाएगा रौशनी लुटाएगा
किसी चरा़ग का कोई मकां नहीं होता
वजूद अर्थात अस्तित्व, मानवी अस्तित्व एकमेकांसाठी कल्याणकारी असावयास हवा. प्रत्यक्षात मात्र माणसं एकमेकांना शक्य तेवढी हानी पोहोचवितांना दिसत आहेत, असे का होत आहे? या प्रश्‍नावर विचार केला तर असे लक्षात येते की, अशा माणसांनी आपल्या अस्तित्वाचा उद्देशच समजून घेतला नाही.
    माणसे आपल्या भविष्यातील असुरक्षिततेबाबत सतत विचार करत असतात. परंतु त्यांच्या लक्षात एवढी साधी गोष्ट येत नाही की, भविष्य वर्तमानात केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम असतो. तुम्ही वर्तमानामध्ये चांगले असाल तर तुमचे भविष्यही चांगले असेल. आणि वर्तमानात तुमची वर्तणूक चांगली नसेल तर भविष्यही चांगले नसणार. काहीही करून भविष्य सुरक्षित करण्याच्या नादामध्ये माणसे अनेकांच्या हक्कांचे हनन करून आपले भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. यातून समाजाचे फार मोठे नुकसान होत असते.
    भविष्य सुरक्षित करण्यासाठी वर्तमानात योजना तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी लागते. नसेल तर अल्पावधीतच चांगली वागण्याची उरमी थंड पडते व चांगले वागणे बंद पडते. हेच वर्तन एखाद्या समाजाचे असेल तर तो समाज मागे पडतो. जो समाज आपल्या इतिहासाची खरी जाण ठेवत नाही तो समाज आपल्या भविष्याबद्दल खरी योजनाही तयार करू शकत नाही.
भारतात मुस्लिमांचे आगमन
    भारतात मुस्लिमांचे आगमन सुफी संतांच्या रूपाने झाले. तेव्हा भारतीय समाज जाती-पातीमध्ये विखुरलेला होता. वर्णव्यवस्थेमध्ये खालच्या वर्णातील लोक भरडले जात होते. समाजात अनेक अंधश्रद्धा होत्या. शिक्षण आणि     - (उर्वरित पान 2 वर)
संस्कृतीवर मुठभर लोकांची मक्तेदारी होती. निम्नवर्णीय लोक अनेक समस्यांना तोंड देत होते. समाजामध्ये प्रचंड विषमता होती. म्हणूनच सुफी संताच्या आगमनाचे तत्कालीन लोकांनी स्वागत केले. त्यांची साथ दिली. त्यांच्या समतामुलक विचारांनी ते भारावून गेले. मुस्लिमांनीही या देशाला स्वतःचा देश मानला व येथील लोकांना स्वतःचे लोक समजून या देशात ’लोकसेवा हीच ईश्‍वरसेवा’ या तत्वाप्रमाणे काम सुरू केले. सुफींच्या सेवाभावी वृत्तीने प्रभावित होऊन विषमतेचे चटके झेलणारे स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात इस्लाममध्ये दाखल झाले. दुसर्‍या बाजूने मुस्लिम आक्रमणकार्‍यांनीसुद्धा येथे आल्यावर या देशाला स्वतःचा देश समजून या ठिकाणी अनेक सुधारणा केल्या. सामाजिक सुधारणांबरोबर राजकीयदृष्ट्या देशाला एकसंघ करण्यामध्ये या मुस्लिम बादशहांनी मोलाची भूमिका बजावली. ते जरी अपरिचित होते तरी त्यांनी ब्रिटिशांप्रमाणे या देशाला एक व्यापारीपेठ न समजता, इथला माल न लुटता विकासाची कामे केली. न्यायाची स्थापना केली, अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या, अनेक किल्ले बांधले, स्थानिक लोकांशी रोटी-बेटी व्यवहार केला. तुकड्या-तुकड्यात विखुरलेल्या शेतीचे एकत्रिकरण केले. नहरी बांधून सिंचन व्यवस्था उभी केली. शेतमालाच्या विक्रीसाठी अनेक मंड्या उभ्या केल्या. व्यापार्‍यांसाठी व्यापारपेठा उभ्या केल्या. रस्ते बांधले, त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावली. प्रवाशांसाठी मुसाफिरखाने बांधले. विहिरी खोदल्या आणि अल्पावधीतच या देशाला सोन्याची चिडिया बनवून टाकले. त्यांच्या अस्तित्वाने अवघा देश भारावून गेला. याच जुल्मी (?) बादशहांच्या काळात अनेक कलाकारांना राजाश्रय मिळाला. त्यामुळे कला आणि संस्कृतीचा विकास झाला. त्यांनीच गुजरातमध्ये कपड्यांच्या उद्योगाला चालना दिली. दिल्ली, लाहोर, आग्रा, हैद्राबाद, अहमदाबाद सारख्या शहरांना वैभव प्राप्त करून दिले. तुर्की आणि इराणमधून कारागीर बोलावून अनेक सुंदर इमारती बांधल्या. व्यापाराला उत्तेजन देऊन पूर्वेकडे चीन तर पश्‍चिमेकडे युरोपपर्यंत भारतीय मालाला लोकप्रियता मिळवून दिली.
    मुस्लिमांच्या या कल्याणकारी सेवांची दखल डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये नेहरूंनीसुद्धा घेतली. ते म्हणतात, ”भारतात मुस्लिमांच्या आगमन व त्यांच्या इस्लामी श्रद्धेमुळे येथील समाजजीवन प्रभावित झाले. परदेशी आक्रमक किती जरी वाईट असले तरी त्यांनी एक फायदा जरूर केला. त्यांनी येथील लोकांमध्ये एक चैतन्य निर्माण केले. त्यांच्या वृत्तीमध्ये बदल घडवून आणला. त्यांना संकीर्ण विचारातून बाहेर पडण्यास मदत केली. त्यांच्या लक्षात आणून दिले की जग किती मोठे आहे. त्यांच्या आगमनाने भारतीय समाजजीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून आले. त्यातल्या त्यात मुगलांच्या आगमनानंतर तर भारतीय जनमानस एकदम बदलून गेले. ते त्या काळात उच्च शिक्षण आणि सभ्यतेचे प्रतीक होते. त्यांनी त्या काळात भारतात सभ्यता आणि संस्कृतीचा विकास केला. जी की त्या काळात फक्त ईरानमध्ये होती. (संदर्भ ः डिस्कव्हरी ऑफ इंडिया पान क्र. 219).
    नेहरू म्हणतात, ”मुस्लिमांनी आमच्या संस्कृतीला श्रीमंत करून टाकले आणि आमच्या कायदा आणि सुव्यवस्थेला सामर्थ्यशाली बनविले. अनेक तुकड्यामध्ये विखुरलेल्या भारताला त्यांनी एकसंघ केले. या देशातील साहित्य आणि कलेच्या क्षेत्रामध्येही त्यांनी आपली छाप सोडलेली आहे.” (संदर्भ ः भारतीय मुस्लिम, पान क्र.30).
सद्य परिस्थितीत मुस्लिमांची भूमिका
    इंग्रजांच्या आक्रमनाबरोबर भारतात मुस्लिमांची जी पिछेहाट सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांच्या साहबा रजि. यांच्या काळात मुस्लिमांनी जगाच्या एक तृतीयांश भूभागावर यासाठी राज्य प्रस्थापित नव्हते केले की ते केवळ मुस्लिम होते. ते मुस्लिम होण्याबरोबरच त्या काळातील सर्वात पुढारलेले लोक होते. त्या काळात असलेल्या ज्ञान आणि विज्ञान तसेच लष्करी शक्तीमध्ये जगात सर्वोत्कृष्ट होते.    
    इंग्रज ज्या वेळेस भारतात आले. त्यावेळेस त्यांनी सोबत बंदुका आणल्या. मुस्लिम मात्र तलवारी आणि भाल्याच्या भरोशावरच त्यांच्याशी लढत होते. स्पष्ट आहे मुस्लिमांना पराजय स्वीकारावा लागला. या जगात तोच समाज पुढे जातो जो श्रद्धेबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्येही प्रगती करतो. युरोपीय देशांनी आपल्या श्रद्धेचा बळी देऊन विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मोठी प्रगती साध्य केेलेली आहे. मध्ययुगानंतर मात्र मुस्लिम या क्षेत्रात मागे पडलेले आहेत.
    आज परिस्थिती अशी आहे की, युरोप आणि अमेरिकेमध्ये एकांगी प्रगती झालेली आहे. श्रद्धेच्या अभावामुळे मानवी जीवन विस्कळीत झालेले आहे. एकट्या अमेरिकेमध्ये रोज 100 लोकांचा मृत्यू बंदुकीतून झालेल्या गोळीबारातून हत्या आणि आत्महत्येच्या रूपाने होतो. अशी प्रगती मानवी जीवनाला अल्पावधीतच नष्ट करणारी प्रगती आहे. मुस्लिमांच्या बाबतीत एक गोष्ट समाधानकारक आहे ती म्हणजे बहुसंख्य मुस्लिमांनी आपली श्रद्धा प्राणपणाला लावून जपलेली आहे. त्यांना आवश्यकता आहे फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये झेप घेण्याची. एवढं त्यांनी केलं की ते पुन्हा महासत्ता बनू शकतील. कारण आज अमेरिका महासत्ता आहे. त्यापूर्वी ब्रिटन महासत्ता होती. त्यापूर्वी मुस्लिम देश महासत्ता होते. आज मुस्लिमांना पूनर्वैभव प्राप्त करावयाचे असल्यास आपल्या श्रद्धेच्या जपणुकीबरोबर ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नवनवीन शाखांमध्ये प्रगती करावी लागेल.
    मुळात इस्लामी श्रद्धेच्या बाबतीतही अनेक मुस्लिम गफलतीमध्ये आहेत. त्यांनी इस्लामला स्वतःच्या वैयक्तिक जीवनापर्यंत सीमित करून टाकलेले आहे. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. या युरोपमधून निघालेल्या लोकप्रिय घोषणेची आज बहुतेक मुस्लिम आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणी करत आहेत. वास्तविक पाहता इस्लाम फक्त वैयक्तिकच नव्हे तर सार्वजनिक जीवनातही उपयोगीच नव्हे तर एकमात्र यशस्वी जीवन जगण्याचा खरा मार्ग आहे. साधी गोष्ट आहे जो धर्म वैयक्तिक जीवनामध्ये उपयोगी आहे, तो सार्वजनिक जीवनामध्येही उपयोगी असणार. म्हणून आज मुस्लिमांना इस्लामला जो की काळाच्या कसोटीवर खरा उतरलेला आहे, आपल्या जीवनाचा आधार बनवायला हवा. इस्लामी ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून आपल्या नवीन पीढिची रचना करायला हवी. एका बाजूला स्वतःचा विकास तर दुसर्‍या बाजूला इस्लामचा संदेश देशबांधवांपर्यंत पोहोचवायला हवा.
    आज देशात अनेक समूह असे आहेत ज्यांचा कुठलाही इतिहास नाही. कृत्रिम प्रतिके तयार करून ते त्यांपासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशात मुस्लिमांचा इतिहास सूर्यासारखा तेजस्वी आहे, याचा विसर पडता कामा नये. आपल्या इतिहासाकडून आत्मविश्‍वास प्राप्त करून भविष्याकडे वाटचाल केल्यास आपले अस्तित्व या देशामध्ये उपकारक राहील, यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही.
    अल्लाह पाक ने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना सार्‍या जगासाठी कृपावंत म्हणून पाठवलेले होते. आपण त्याच कृपावंत प्रेषितांचे वारसदार आहोत. त्यांचे मिशन जगाच्या शेवटपर्यंत नेण्याची जबाबदारी आपली आहे. ते जगावर कृपावंत होते तर त्यांचे वारसदारही कृपावंतच असायला हवेत. या मूळ संकल्पनेचा भारतीय मुस्लिमांना विसर पडल्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास रसातळाला गेलेला आहे. तो परत मिळविण्याची जबाबदारी उलेमा, मुस्लिम बुद्धीजीवी आणि मुस्लिम प्रेसची आहे. एकदा का मुस्लिमांना या देशाला घडविण्यामध्ये आपली ऐतिहासिक भूमिका आठवली की त्यांचा आत्मविश्‍वास आपोआप परत येईल. त्याची सांगड मजबूत इस्लामी श्रद्धेशी घालून हा समाज पुन्हा राखेतून फिनिक्स पक्षी ज्या प्रमाणे परत भरारी घेतोत्याप्रमाणे भरारी घेऊ शकेल व एका नवीन भारताच्या जडणघडणीमध्ये पुन्हा आपली भूमिका बजावू शकेल. या देशाला महासत्ता करण्यामध्ये आपले योगदान देऊ शकेल, यात शंका नाही. शेवटी अल्लाकडे प्रार्थना करतो की, ऐ अल्लाह! आम्हाला रास्त मार्ग दाखव आणि या देशाच्या सेवेसाठी आमचा पुन्हा स्वीकार कर. (आमीन.)

- एम. आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget