Halloween Costume ideas 2015

शहादत-ए-हुसैन दु:खाचे नव्हे तर प्रेरणेचे स्त्रोत आहेत

जगाला सगळयात अगोदर लोकशाहीचा परिचय इस्लाम ने करुन दिला. त्यापुर्वी जगात सगळीकडे बादशाहात (राजेशाही) चाच अंमल होता. खलिफा म्हणतात सर्वशक्तिमान अल्लाहच्या नायबला. रशिद म्हणतात नेक (पुण्यवान/पवित्र) ला. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यानंतर झालेल्या चार खलिफांना खुलफा-ए-राशेदीन अर्थात अल्लाहचे चार पवित्र खलिफा असे म्हणतात. प्रेषित हजरत मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांनी आपला उत्तराधिकारी नेमलेला नव्हता. तसेच त्यांना मुलगा ही नव्हता म्हणून त्यांचा उत्तराधिकारी कोणाला नेमण्याचा प्रश्‍नच उद्भवत नव्हता. परंतु खुद्द प्रेषितांच्या तालमीत तयार झालेले सहाबा (साथीदार) रज़ि. यांनी ओळखले होते की इस्लाम शूराई निजाम  (सल्लागार मंडळाच्या व्यवस्थे)च्या माध्यमातून लोकप्रशासन करु इच्छितो. ज्याला अरबी भाषेमध्ये निजाम-ए-खिलाफत असे म्हणतात. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपल्या साथीदारांची मुल्यवान मते ऐकून घेवून त्यानुसार निर्णय घेतले होते. ते स्वत: साहब-ए-वही (अल्लाहकडून मार्गदर्शन प्राप्त करणारे) होते. त्यांच्या मनात आले असते तर सगळे निर्णय त्यांनी स्वत:च्या मर्जीने घेतले असते पण त्यांनी तसे केले नाही. यामुळेच सहाबांनी मजलिस-ए-शूरा (जानकार आणि पात्र व्यक्तिंचे सल्लागार मंडळा) च्या माध्यमातून प्रेषित (सल्ल.) यांच्या नंतर लागोपाठ चार खलिफांना निवडून दिले. म्हणूनच प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नंतर कुठल्याही घराणेशाहीला थारा देण्यात आला नाही. चारही खलिफा चार वेगवेगळया घराण्याचे होते. मजलिस-ए-शूरा एका नंतर एक खलिफा निवडून देत गेली व जनतेनी त्यांच्या हतावर बैत (एकनिष्ठतेची शपथ) केली. ह. अबु मुसा अशआरी रज़ि. यांनी म्हंटले आहे की खिलाफत ती आहे जिच्या स्थापनेमध्ये मश्‍वरा (सल्ला मसल्लत) केला जातो आणि बादशाहत ही तलवारीच्या जोरावर मिळविली जाते. खिलाफतचा आत्मा अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यात आहे जे की त्याकाळात नागरीकांना उपलब्ध होते.
    खलिफा देशाचा प्रशासकीय प्रमुख असल्यामुळे त्याच्याकडे असीमित अधिकार असतात. मात्र तो दोन गोष्टींनी बांधलेला असतो. एक कुरआन आणि हदीस, दोन मजलिस-ए-शूराचा सल्ला. आधुनिक लोकतंत्रात जनता सार्वभौम असते, इस्लामी लोकतंत्रात अल्लाह सार्वभौम असतो. कोणत्याही देशाची घटना त्या देशाचे बुध्दीमान लोक तयार करत असतात. इस्लामी देशांची घटना दस्तूरखुद्द सर्वशक्तिमान अल्लाह ने तयार केलेली आहे. त्या घटनेचे नाव कुरआन असे आहे. प्रत्येक देशाची घटना त्या-त्या देशाच्या नागरीकांना समर्पित असते. इस्लामची घटना (कुरआन) सर्व मानवतेला समर्पित आहे. इस्लामी इतिहासात एकूण चार खुलफाए-राशेदीन झाले आहेत. 1. ह. अबूबकर रज़ि. 2. ह. उमर रज़ि. 3. ह. उस्मान रज़ि. 4. ह. अली रज़ि. त्यांच्यानंतर कांही काळासाठी शूराने त्यांचे ज्येष्ठ पुत्र ह. हसन रज़ि. यांना खलिफा म्हणून निवडले, मात्र तीव्र मतभेद झाल्याने व निष्पाप नागरीकांचे रक्त सांडले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने ह.हसन रज़ि. यांनी स्वत:हून पदत्याग केला. त्यांच्यानंतर मात्र मजलिस-ए-शूराला डावलून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचेच एक ज्येष्ठ सहकारी ह. अमीर मुआविया यांनी स्वत:ला खलिफा घोषित केले. मात्र त्यांना मजलीस-ए-शूराची मान्यता नसल्यामुळे इस्लामी इतिहासात त्यांची गणना खलिफा म्हणून नव्हे तर राजा म्हणून केली जाते. त्यांच्या स्वत:च्या राज्यरोहणांमुळे इस्लामी इतिहासाला एक नवे वळण मिळाले. इस्लामी राजनीति खिलाफतीच्या व्यवस्थेकडून मुलुकियती (राजेशाही) व्यवस्थेकडे वळली. ह.मुआवियाच्या पूर्वी चार ही खलिफा साधारण जीवन जगत होते, त्यांचे राहणीमान ही साधे होते, त्यांचे घर ही साधे होते, मात्र ह. अमीर मुआविया यांची जीवन पध्दती विलासी होती. त्यांनी स्वत:साठी एक मोठा राजप्रसाद ही बांधून घेतला होता. त्यांनी स्वत:हाच्या हयातीतच स्वत:च्या अपात्र मुलास ज्याचे नाव यजीद होते, त्यास आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलेले होते. त्यांनी वीस वर्ष राज्य केले. राजधानी मदीना येथून हलवून कुफा (इराक़) येथे नेली. त्यांच्या मृत्यू पश्‍चात त्यांचा मुलगा यजीद याला राजा करण्यात आले. त्याने चार वर्ष म्हणजे सन 680-84 पर्यंत राज्य केले.
करबलाची घटना
    यजीदच्या राज्यरोहणाचा विरोध मोठ्या प्रमाणात झाला. जनतेची आणि शूराची तीव्र इच्छा होती की प्रेषितांचे नातू ह. हुसैन रज़ि. यांना खलिफा म्हणून निवडण्यात यावे. हीच मागणी कुफावासियांनी केली. त्यांनी सरळ-सरळ ह. हुसैन रज़ि. यांच्याशी संपर्क साधून त्यांना कुफा येथे येऊन देशाची सूत्र हतात घेण्याची विनंती केली. त्यांना या कामी सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमी ही दिली. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून ह. हुसैन रजि. आपल्या खानदानातील 72 लोकांना सोबत घेऊन (ज्यात कांही महिला व मुले सुध्दा सामिल होती) कुफाकडे रवाना झाले. या घटनेची माहिती यजीदला मिळताच त्याने कुफावाल्यांना धमकी दिली. पुढाकार घेणार्‍यांना मृत्यू दंड देण्यात येईल अशी घोषणा केली. त्यामुळे कुफावासी घाबरलेे व त्यांनी आपला निर्णय बदलला. त्याचवेळेस ह. हुसैन रज़ि. यांनी आपला एक दूत मुस्लिम बिन अक़िल यांना यजीदकडे पाठवले. यजीद ने त्यांचाही खून केला. इकडे फुरात नदीच्या किनार्‍यावर करबला नावाच्या मैदानात पोहचल्यावर यजीदच्या एका सरदारांने ज्याचे नाव इब्ने जियाद असे होते. ह. हुसैन आणि त्यांच्या सोबत्यांचा चार हजार सैनिकांसह घेराव केला. त्यांने ह. हुसैन रज़ि. यांच्याकडे यजीदला राजा स्वीकार करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र यजीद ज़ालिम (अत्याचारी) असल्यामुळे ह. हुसैन यांनी इब्ने जियादचा प्रस्ताव धुडकावला. तेव्हां इब्ने जियाद ने त्यांना युध्दाचे आवाहन केले. इकडे 72 लोक तिकडे 4 हजार सैनिक. हे एकतर्फी युध्द होते. पराभव डोळयांसमोर स्पष्ट दिसत होता. तरी पण पराक्रमी ह. हुसैन रज़ि. यांनी या विषम युध्दात उतरण्याचा निर्णय घेतला. युध्द सुरु झाले. 72 लोकांमधील सर्व पुरुष शहीद झाले. अपवाद फक्त ह. हुसैन रज़ि. यांचे पुत्र ह. जैनुल आबेदीन यांचा. ते आजारी असल्यामुळे व अंथरुणावर खिळून असल्यामुळे युध्दात सहभागी होऊ शकले नाही. इब्ने जियादने ह. हुसैन रज़ि. यांचे शीर कापून एका तबकात ठेवून यजीद कडे पाठवून दिले. ह्यानंतर हे युध्द संपले. या युध्दाची अत्यंत तीव्र प्रतिक्रिया इस्लामी जगतात उठली. मक्का मदीना भागात हाहाकार माजला. ह. अब्दुल्लाह बिन जुबैर यांच्या नेतृत्वात लोक यजीदच्या विरुध्द युध्द करण्यासाठी सज्ज झाले. या उठावाची कल्पना यजीदला मिळताच त्याने एक मोठे लष्कर तिकडे रवाना केले. तेथे ही तुंबळ युध्द झाले. त्यात अनेक नागरीक मारले गेले. नेमक्या याच वेळेस यजीदचा मृत्यू झाला. लोकांचा राग पाहुन यजीदच्या मुलाने शहाणपण दाखवत सत्ता स्वीकारण्यास नकार दिला. शूराने ह. अब्दुल्लाह बिन जुबैर यांचीच खलिफा म्हणून निवड केली. करबलाच्या या विषम युध्दातून जगाला हा संदेश मिळाला की मुस्लिम हे अत्याचारी व्यवस्थेपुढे आपले बलिदान देण्यास तयार असतात मात्र ते त्या व्यवस्थेपुढे गुडघे टेकायला तयार नसतात. जर का तसे असते तर ह. हुसैन रज़ि. यांनी यजीदचा प्रस्ताव स्वीकारला असता व त्याच्या अत्याचारी शासनात एखादे मंत्रीपद घेऊन सूखात राहिले असते. मात्र त्यांनी असे न करता स्वत: व स्वत:च्या खानदानातील सर्वांची कुर्बानी यासाठी दिली की कयामत (प्रलय) पर्यंत हा संदेश जीवंत रहावा की मुस्लिम प्रसंगी आपला जीव सुध्दा देऊ शकतात परंतु अत्याचारी व्यवस्थेपुढे आपली मान कदापि झुकवत नाहीत. समस्त मुस्लिम जगतासाठी करबलाच्या ह्या घटनेचा संदेश फक्त संदेशच नसून एक प्रेरणेचे स्त्रोत आहे. रडण्याचा, छाती बडवून घेण्याचा, दुःखी होण्याचा विषय नाही तर हा अभिमानाचा विषय आहे. करबलाच्या या अभिमानास्पद घटनेची नोंद डॉ. इक्बाल यांनी खालीलप्रमाणे घेतलेली आहे - कहे दो गम-ए-हुसैन रजि. मनानेवालों से, मोमीन कभी शोहदा का मातम नहीं करते, है इश्क अपनी जान से ज्यादा आले हुसैन से, यूं सरे आम हम उनका तमाशा नहीं करते, रोएं वो जो मुन्कीर हैं शहादते हुसैन (रजि.) के, हम जिंदा व जावीद का मातम नहीं करते.

- फेरोजा तस्बीह
9764210789
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget