Halloween Costume ideas 2015

नजरकैदेचे राजकारण

जम्मू काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि श्रीनगरचे खासदार डॉ. फारुक अब्दुल्ला यांना ‘‘द जम्मू अँड काश्मीर पब्लिक सेफ्टी अ‍ॅक्ट, १९७८' या कायद्यांतर्गत १२  दिवसांकरिता अटक करण्यात आली आहे. या अटकेबाबत राहूल गांधी यांनी म्हटले आहे की ‘राष्ट्रवादी नेते फारुख अब्दुल्ला यांचे राजकीय स्थान संपवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे,  तसे झाले तर त्यांची जागा दहशतवादी घेतील. त्यानंतर मग काश्मीरचा वापर कायम भारताच्या इतर भागात राजकीय ध्रुवीकरणासाठी केला जाईल,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.   यापूर्वी त्यांचे पुत्र व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांनादेखील ५ ऑगस्ट रोजी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि  नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख अब्दुल्ला आणि बेगम अकबर जहान अब्दुल्ला यांच्या घरी डॉ. फारुक अब्दुल्ला यांचा जन्म झाला. जयपूरचे सवाई मानसिंग कॉलेजमधून मेडिकलचे  शिक्षण पूर्ण करून डॉ. अब्दुल्ला लंडनमध्ये प्रॅक्टिस करीत होते आणि तेथेच मौली अब्दुल्ला यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पुढे सारा पायलट आणि उमर अब्दुल्ला यांचा जन्म झाला.  मग १९८२ मध्ये त्यांचे पिता शेख अब्दुल्ला यांच्या निधनानंतर काश्मीर राज्याचे ते मुख्यमंत्री बनले. या पदावर ते तीन वेळा विराजमान झाले आणि संपूर्ण काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री  असल्याचा कीर्तिमानदेखील त्यांच्याच नावावर आहे. सन १९८९ मध्ये जेव्हा डॉ. अब्दुल्ला यांचे राजकीय विरोधक आणि त्यांच्यासारखेच काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मुहम्मद सईद  यांची कन्या रुबियाचे अपहरण ‘जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट’ (जेकेएलएफ) द्वारा करण्यात आले होते आणि त्या मोबदल्यात त्यांनी काही दहशतवाद्यांना सोडून देण्याची अट घातली  होती. केंद्रातील तत्कालीन व्ही. पी. सिंग यांच्या सरकारने ही अट मान्य केली होती मात्र डॉ. अब्दुल्ला यांनी दहशतवाद्यांना सोडून देण्यात स्पष्ट नकार दिला होता. तेव्हा ते म्हणाले  होते की जर आज आम्ही यांना सोडून दिले तर उद्या अशा प्रकारची शंभर कामे सुरू होतील आणि आपण या दहशतवांद्यांच्या हातचे बाहुले बनून राहू. जर कोणी त्यांची कन्या साराचे  अपहरण केले असते आणि तिच्या बदल्यात दहशतवाद्यांना मी मुक्त केले नसते. यानंतर केंद्रीय मंत्री आणि सध्याचे केरळचे राज्यपाल आरिफ मुहम्मद खान यांच्यावर डॉ. अब्दुल्ला  यांची मनधरणी करण्याचे काम सोपविण्यात आले आणि त्यात त्यांना यशही आले. डॉ. अब्दुल्लांचा नकार असूनदेखील दहशतवाद्यांना सोडून द्यावे लागले आणि पुढील काळात त्यांची  भविष्यवाणी खरी ठरली. त्यानंतर ‘एअर इंडिया आयसी८१४’चे अपहरण याचे बोलके उदाहरण आहे. सन १९९६-२००२ पर्यंत डॉ. अब्दुल्ला काश्मीरचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या  कार्यकाळात दहशतवादाला अंकुश लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच सन २००२ मधील निवडणुकीत १९९६ च्या तुलनेत राज्यात अधिक मतदान झाले होते. सन १९९९ मध्ये  कारगिल युद्ध सुरू होते तेव्हा डॉ. अब्दुल्ला कारगिलला गेले होते. ते हेलिकॉप्टरमधून मिलिटरी कॅम्पकडे जात असताना पाकिस्तानी आर्टिलरीतून जोरदार गोळीबार सुरू होता. तेव्हा दिल्लीत बसलेल्या प्रधानमंत्री वाजपेयी यांच्या समर्थनाने कारगिल युद्ध लवकर समाप्त करण्यात मदत केली होती. ही गोष्ट डॉ. अब्दुल्ला यांनी इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये सांगितली  होती. सन १९५३ मध्ये पंडित नेहरू यांच्या आदेशावरून डॉ. अब्दुल्ला यांचे पिता व तत्कालीन काश्मीर राज्याचे प्रधानमंत्री शेख अब्दुल्ला आणि त्यांचे सहकारी मिर्झा अफजल बेग यांना  ‘काश्मीर कॉन्स्परेसी केस’संदर्भात अटक करण्यात आली होती. या खटल्यात या दोघांवर देशविघातक कारवाया करण्याचा आरोप लावण्यात आला होता. या खटल्याच्या निकालानंतर  शिक्षेच्या अंमबजावणीनुसार सुमारे ११ वर्षे शेख अब्दुल्ला कारागृहात होते. १९६४ मध्ये पं. नेहरू यांच्या मृत्युपूर्वी काही महिनेच त्यांची कारागृहातून मुक्तता करण्यात आली होती. तेव्हा  काश्मीर समस्येच्या अनेक जाणकारांनी या कारवाईस पं. नेहरूंची सर्वांत मोठी चूक असल्याचे म्हटले होते. सध्या अशादेखील बातम्या आहेत की कस्रfचत डॉ. अब्दुल्ला यांना २ वर्षे  कारागृहात काढावी लागतील. तसे पाहिले तर सध्या मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री अगोदरपासूनच नजरकैदेत आहेत आणि एक माजी मुख्यमंत्री म्हणजे गुलाम नबी आझाद यांना   नुकतीच काश्मीरला जाण्याची सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. यावरून असे वाटते की पं. नेहरूंनी केलेल्या चुकीची पुरावृत्ती मोदीजी करीत नाहीत ना! सध्या  नजरकैदेत असलेले काश्मीरचे राजकारण पाहता केंद्र सरकारने डॉ. फारुक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती यांना सोडून देऊन संपूर्ण राज्यात निवडणुकीची घोषणा करावी आणि  आणि स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा कारण या बाबतीत राजकीय पक्षांचीच केंद्र सरकारला मदत होऊ शकते.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
Email: magdumshah@eshodhan.com

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget