Halloween Costume ideas 2015

नैतिकते आणि भौतिकतेतील संतुलन साधण्यासाठी कुरआन का वाचावं


फार कमी लोक हे सत्य लक्षात घेतात की मानवाला नैतिकता आणि भौतिकता यातील संतुलन साधने गरजेचे असते. मनुष्य दोन गोष्टींनी बनलेला आहे एक त्याचे हाडामासांचे शरीर, दोन त्याचा अदृष्य आत्मा. शरीराशिवाय आत्म्याला महत्त्व नाही आणि आत्म्याशिवाय शरीराला महत्त्व नाही. ज्याप्रमाणे शरीर आजारी पडते त्याप्रमाणे आत्माही आजारी पडतो. जेंव्हा भौतिकतेचा अतिरेक  होतो तेंव्हा व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली  चंगळवादी जीवन पद्धती अंगिकारली जाते तेव्हा आत्मा आजारी पडतो. जेव्हा आध्यात्मिकता वाढते तेव्हा आत्मा सुदृढ होतो. म्हणूनच नैतिक मूल्य आणि भौतिक मूल्य यांच्यामधील संतुलन साधने आवश्यक आहे. यामधील असंतुलन माणसाला जीवनात अपयशी बनवते.

इस्लाममध्ये एकीकडे अनैतिकतेला निषिद्ध केलेले आहे तर दुसरीकडे नैतिकतेचा अतिरेक करण्यासही मनाई केलेली आहे. त्यामुळे संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या टाळून केवळ भक्तीमध्ये लीन होण्यास मनाई केलेली आहे तर पैसा-पैसा करत आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष करण्याची ही मनाई केलेली आहे. 

विज्ञानाची जशी-जशी प्रगती होत जाते तशी-तशी भौतिकता वाढते आणि इबादतींची जशी-जशी प्रगती होते तशी नैतिकता वाढते. यापैकी कुठली एक प्रगती उपयोगी नसते. जो समाज दोन्हीमध्ये प्रगती करतो तोच यशस्वी होतो. साधारणपणे लोक आपल्या नैतिक स्वास्थ्याची काळजी न घेता चंगळवादी जीवनाचा आस्वाद घेण्यामध्ये एवढे तल्लीन होऊन जातात की अनैतिक कृत्य करणे ही त्यांची दैनंदिन गरज होऊन जाते. त्याशिवाय ते जगू शकत नाहीत. त्यांच्या या दुष्कृत्यामुळे त्यांनाच नाही तर समाजाला सुद्धा नुकसान सहन करावे लागते. आत्मोन्नतीकडे लक्ष न देता शरीरोन्नतीकडे लक्ष दिल्यामुळे शरीर लठ्ठ होऊन जाते परंतु आत्मा कृष होऊन जातो, आजारी पडतो आणि शेवटी मरून जातो. असे आत्मा मेलेले लोक मग कुठलाही मोठा गुन्हा करण्यास मागे पुढे पाहत नाहीत आणि अशा लोकांच्या लक्षणीय वाढीमुळे समाजाचे एकूणच फार मोठे नुकसान होते, ज्याला शासन, प्रशासन, न्यायालय आणि कायदे कोणीही थांबू शकत नाही.

कुरआन नैतिकता आणि भौतिकता यांच्यातील संतुलन साधण्यासाठी तंतोतंत मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा संतुलित विकास व्हावा यासाठी मार्गदर्शन प्राप्त करावयाचे असल्यास तुम्हाला कुरआन वाचणे गरजेचे आहे. शिवाय कुरआन ज्ञान, प्रेरणा आणि शक्तीचे स्त्रोत आहे. या गोष्टीचा पुरावा हा आहे की, टोळ्या करून राहणारे, उंट राखणारे, सभ्य जगाशी संपर्क नसलेले, मागास अरबी बद्दू (ग्रामीण अरब) लोकांनी जेव्हा या ग्रंथावर श्रद्धा ठेवली तेव्हा त्यांच्यात एवढा आमूलाग्र बदल झाला की शंभर वर्षाच्या आत त्यांनी पृथ्वीतलावरील एक तृतीयांश भागावर आपले राज्य प्रस्थापित केले. ज्या जनसमुदायाला अशी अद्वितीय शक्ती प्राप्त करावयाची असेल त्यांनी कुरआन वाचले पाहिजे. यासाठी तुम्ही कुरआन वाचले पाहिजे.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget