Halloween Costume ideas 2015

प्रशांत किशोरांची पदयात्रेने राजकारणात एन्ट्री!


कॉंग्रेस पक्षाचे पुनरूज्जिवन करण्यासाठी  निवडणूक तज्ञ प्रशांत किशोर यांना काँग्रेसने स्वत: निमंत्रण दिले होते की प्रशांत किशोर यांची स्वत:ची तशी इच्छा होती हे माहित नाही. पण त्यांनी काँग्रेस पक्षाचे पुनरूत्थान करण्यासाठी एक प्रझेंटेशन दिले अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली. तसेच ते काँग्रेस पक्षात सामील होतील अशी काही दिवस माध्यमांमध्ये चर्चा चालली. शेवटी त्यांनी स्वत:च हे जाहीर केले की ते पक्षात जाणार नाहीत. नंतर काही कालांतराने त्यांनी बिहार राज्याच्या विकासासाठी काही करायचे असे ठरविले. ते स्वत: बिहारचे असल्याने त्यांना बिहार विषयी चिंता असणे स्वाभाविक आहे. यासाठी ते बिहारमध्ये 1000 किलोमीटरची पदयात्रा काढणार आहेत. घरोघरी जाऊन ते आम जनतेचे प्रश्न काय आहेत त्यांना विकास म्हणजे नेमके काय हवय हे जाणून घ्यायचे आहे. स्वत: ते निवडणूक रणनीतीकार आहेत. अनेक पक्षांना त्यांनी सत्तेपर्यंत पोहोचविले आहे. तरी देखील नागरिकांचे विकास विषयी कोणते विचार आहेत? त्यांच्या समस्या कोणत्या? त्याचे समाधान कसे आणि कुणी करावे? या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे त्यांना माहित आहेत. तरी देखील बिहारच्या समस्या समजून घेण्यासाठी पदयात्रेचे नियोजन कशासाठी? त्यांना स्वत: जनतेशी संपर्क साधण्याची गरज का भासली? काँग्रेस पक्षाविषयी ते म्हणतात की, हा पक्ष कधी संपणार नाही. भारतात त्याची जागा कायम राहणार आहे. त्याचबरोबरच महात्मा गांधी विषयी ते म्हणतात त्यांच्या सारखे व्यक्तीमत्व देशात पूर्वी कधी झालेले नव्हते आणि पुढेही येणार नाही. त्यांनी आपल्या पदयात्रे विषयी माहिती देण्यासाठी जी पत्रकार परिषद घेतली होती तेथे त्यांनी महात्मा गांधीचा फोटो देखील लावला होता. एकंदर असे दिसते की त्यांना काँग्रेस पक्षात स्वत:ला महत्त्वाचे स्थान हवे होते पण ते स्थान त्यांना मिळाले नाही म्हणूनच की काय स्वत:चा एक पक्ष जवळ-जवळ काँग्रेसच्या विचारधारेवर उभं करू पाहत आहेत. त्यांना काँग्रेसमध्ये स्थान मिळाले असते तर बिहारच्या विकासासाठी त्यांनी काही करायचे आहे असे सांगितले असते का? ते म्हणतात गेली तीस वर्षे लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांची बिहारमध्ये सत्ता होती पण या तीस वर्षामध्ये बिहारमध्ये कोणताही विकास झाला नाही. लालू यादव यांनी सामाजिक स्तरावर विकास केला पण सडक, वीज, पाणी या मुलभूत समस्या जसेच्या तसेच राहिल्या. नितीशकुमार यांनी देखील याबाबतीत काही केलेले नाही. 

बिहार असो की उत्तरेकडील इतर राज्य तिथल्या निवडणुका जाती-पातीच्या आधारावर होतात हे त्यांना मान्य नाही. याचा अर्थ आजवर जे जातीपातीचे राजकारण या राज्यांमध्ये होत आहे याच्याशी ते सहमत नाहीत. ते म्हणतात की हे फक्त गृहित धरलेले आहे. यात कोणते तथ्य नाही. यामध्ये तथ्य आहे की नाही याचा पुरावा स्वातंत्र्यापासून आजवर ज्या-ज्या निवडणुका झाल्या त्यात त्यांनी पहायला हवा. नव्हे त्यांना पुरविण्याची गरज नाही त्यांना याची सविस्तर माहिती आहे कारण त्यांनीच बऱ्याच राज्यांच्या निवडणुकीत सल्लागार म्हणून काम केलेले आहे आणि जी रणनीती त्यांनी त्या-त्या राज्यातील पक्षाला दिली असेल ती जातीपातीचे समीकरण मतदानात कसे परिवर्तीत करावे हे देखील सांगितले असणार. त्यांचे खरे उद्दीष्ट असे असेल की जातीपातीचे राजकारण संपवून निवडणुकीसाठी नवीन  समीकरण तयार करावेत. असे झाले तरच त्यांना जेव्हा-केव्हा ते निवडणुकीत पदार्पण करतील तेव्हा त्यांना यश मिळू शकते. यात ते यशस्वी होतील की नाही हे काळच त्यांना सांगणार आहे. भारतात जातीपातीचे राजकारण नाही तर समाजकारण अर्थकारण, शिक्षण कारण, नोकरी भरती वगैरे सर्वच्या सर्व मानवजातीसाठी जे काही आहे ते जातीपातीवरच आधारलेले आहे. त्यामुळे तथ्याला नव्हे गृहिताला कुणीही नाकारू शकत नाही. 

जाती-पातीचे राजकारण न करण्यासाठीच्या गोष्टी करत असतानाच दुसरीकडे ते जातीनिहाय जनगणना करण्यावरही भर देत आहेत. म्हणजे एकंदरीत जात-पात विषयी कोणती भूमीका घ्यावी या प्रश्नात ते अडकलेले दिसतात. ते म्हणतात की काँग्रेस पक्षाची धुरा सोनिया गांधीकडेच असावी पण त्याच बरोबर गांधी परिवाराबाहेरील व्यक्तीला देखील पक्षात महत्त्वाची जबाबदारी द्यावी. सध्या भाजपाला निवडणुकीत पराजय करणं शक्य नसले तरी ते म्हणतात की आजही भाजपाला केवळ 32 टक्के नागरिकांची साथ आहे. उर्वरित 60 टक्के लोक भाजपाला पर्याय देऊ शकतात. भाजपाला जे यश मिळत आहे ते राष्ट्रवाद, हिंदुत्व या विचारधारेबरोबर लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थन आहे. अशा परिस्थितीत भाजपाला निवडणुकीत हरवण शक्य नसले तरी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सांगायचे तात्पर्य हे की बहुदा प्रशांत किशोर यांच्या राजकीय आशा आकांक्षा आहेत. केजरीवाल नंतर ते दूसरे नेते बनू पाहत आहेत. जसे केजरीवाल कोणत्या पक्षांतर्गत लोकशाही व्यवस्थेला जबाबदार नाहीत तसेच आणखी एक नेत्याचा उदय होत आहे की काय हा प्रश्न आहे. केजरीवाल असो की प्रशांत किशोर त्यांना राजकारणात येण्याचा सत्ता प्राप्त करण्याचा अधिकार आहे पण जर ते स्वत:च पक्ष आणि सर्वेसर्वा होतील तर यापासून  इतर धोके निर्माण होऊ शकतात. ऑक्टोबर महिन्यात प्रशांत किशोर पदयात्रा करणार आहेत तेव्हा पुढे काय होणार ते पहावे लागेल.


- सय्यद इफ्तेखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget