Halloween Costume ideas 2015

हे जीवन सुंदर आहे!

"हे जीवन सुंदर आहे." असं एक गीत ऐकायला मिळालं, खरंच जीवनाइतकं तऱ्हेतर्‍हेचं रंगीबेरंगी, मनाला मोहवून टाकणारं आणि सतत हवहवसं वाटणारं दुसरं तिसरं असं काहीच सापडत नाही. उबदार आणि ऐटदार असं फिलींग देणारी केवळ वस्त्रंच असतात असं नाही. तर जीवनात ऐटदार आणि उबदार बोलणारी आणि मनापासून तसं वागणारी माणसं ही असतात. ती आनंद, उत्साह आणि सुरक्षितता देऊन जातात. जणू दैनंदिन वातावरणात अशी माणसं उत्तेजक पेयच देतात. मी बागेत किंवा मैदानात फिरायला जातो, तेंव्हा वय विसरून वयस्कर मंडळी एकमेकांची थट्टा मस्करी करताना, विनोद करतांना, खळाळून हसतांना दिसतात, तेव्हा मला मनस्वी आनंद होतो आणि या वयस्कर मंडळींविषयी अनाहूत अभिमान ही वाटायला लागतो; अशी हसत खेळत, एकमेकांविषयी आदर ठेवून थट्टा मस्करी करणारी वयस्कर मंडळी प्रत्येक गल्ली बोळात दिसायला हवीत, त्यामुळे कीती बहार येईल नै का? जीवन किती बहारदार होईल? वाढत्या वयाबरोबर असणार्‍या आरोग्याच्या समस्या आणि व्याधी कुठल्या कुठे पळून जातील नै का?

माझ्या आप्तेष्टांपैकी ८०-८५ वर्षाचे एक सुस्वभावी, उच्चविद्याविभूषित ग्रहस्थ सेवानिवृत्तीनंतर ही सतत हसतमुख राहत होते, मध्यंतरी त्यांचा एकुलता एक मुलगा नोकरी व्यवसायानिमित्ताने पुण्यात स्थायिक झाला. त्याने आपल्या आई-वडीलांनाही पुण्याला नेले, पुण्यातही या ग्रहस्थाने वयाच्या 80-85 व्या वर्षात समवयस्क मित्रांचा गोतावळा निर्माण केला, इतकेच नव्हे तर आठवड्या- पंधरावड्यातून ‘कोल्हापूरी रस्सा मंडळा’चा बेत यशस्वी करून आपल्याबरोबर पुणेकर मित्रांनाही तांबड्या-पांढर्‍या रस्स्याचा आस्वाद घेऊ दिला, कोल्हापूरच्या वास्तव्यातील स्वत:च्या जीवनात असलेल्या काही गमती-जमती सांगून पुणेकरांना त्यांनी आपलेसे केले होते, त्यांच्या कॉम्प्लेक्समधील अनेक वयस्कर मंडळी या कोल्हापूरकर मित्राचा आदराने उल्लेख करतात. इतकेच नव्हे तर पेन्शन निमित्ताने कींवा शेतीच्या कामानिमित्ताने हे गृहस्थ कोल्हापूरला आले तर हे दररोज पुणेकर मित्र त्यांच्या मुलांकडे-सुनेकडे चौकशी करतात, “ते कधी येणार आहेत?” अशी वारंवार विचारणा करतात. ज्यांच्याजवळ मोबाईल आहे ते मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधतात व “लवकर पुण्यात या” असा प्रेमळ आग्रहसुध्दा करतात. इकडे कोल्हापूरातील त्यांचे मित्र त्यांचा दिवसागणिक मुक्काम वाढवतात. सांगायचा मुद्दा एवढाच की, वय वाढले म्हणून काय झाले, मनाने चीरतरुण राहणे म्हत्त्वाचे!.

‘मेस्मेरिझम’ म्हणजे ‘मोहिनीविद्या’. जर्मनीतील शास्त्रज्ञ डॉक्टर मेस्मर यांनी हे शास्त्र विकसित केले. त्यांना अनुभवाने व प्रयोगाअंती असे लक्षात आले की, रोग्याशी त्याच्या मनाच्या एका लेव्हलपर्यंत जाऊन त्याच्याशी संवाद साधला की, रोगी बरे होण्याच्या मार्गावर द्रूतगतीने चालायला लागतो. इतकेच नव्हे तर रोग्याच्या अंगावरून नुसता हात जरी फिरवला तरी त्याला बरे वाटायला लागते; आपण एखाद्याचा ‘हातगूण बरा आहे’ म्हणतो, त्याचा अर्थ हाच! हाताच्या पंजापासून प्राणशक्ती स्त्रवत असते, या प्राणशक्तीला त्यांनी ‘प्राणीचुंबकत्व’ असे संबोधले. त्यातूनच संमोहनशास्त्र उदयाला आले, संमोहनाने रोगी बरा होतो असा अनुभव त्यांना येऊ लागला. समोहनशास्त्र नावाची रोगनिवारक विद्याच त्यांनी जगाला बहाल केली.

तसं पहायला गेलं तर, कुणीतरी आपल्या पाठीवर थाप मारली, किंवा शाबासकी दिली तर आपली अंतर्गत उर्जा दुप्पट होते, आणखी दुप्पट उत्साहाने आपण कामाला लागतो, यश आपल्या नजरेच्या टप्प्यात आले आहे, असं आपल्याला वाटू लागतं, "पाठीवरती हात ठेवूनी फक्त लढ म्हणा" या कुसुमाग्रज यांच्या कवितेनंही हेच सांगितलं आहे. केवळ पाठीवर किंवा अंगावर पडलेल्या हाताचा आणि प्रेमळ स्पर्शाचा तो चमत्कार असतो, एवढं कशाला लहान मुलांच्या पाठीवर थोपटलं की कीतीही खट्याळ मुलं असो ते क्षणार्धात झोपी जातं, ‘दृष्ट काढणे’, ‘मीठ मोहरी उतरवून टाकणे’ या पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी अंधश्रध्देला खतपाणी घातल असल्याचे वरकरणी वाटत असले तरी, त्यातील भावना, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा महत्वाचा मानायलाच हवा. कारण अशा घरगुती उपायाने अनेकांना बरे वाटायला लागण्याची किमान सुरूवात तरी होते, अर्थात गेल्या हजारो वर्षापासून घरगूती परंपरा टिकून आहेत, यातच त्या त्या गोष्टींची ताकद आपल्या लक्षात यायला हवी, कारण एखाद्या गोष्टीपासून कुणालाच व कुठलाच फायदा नसेल तर ती गोष्ट कालबाह्य होते व पुढे तीचे अस्तित्वही संपुष्टात येते, पण या गोष्टी आजच्या संगणक युगातही टिकून आहेत. 

माणूस हा भावनाप्रधान प्राणी आहे, तो समाजशील असून समुहाने रहायला त्याला आवडते, आपल्या आवडीची माणसे बरोबर आहेत म्हंटल्यावर त्याच्यात ताकद निर्माण होते, त्याच्या अंगात बळ येते, पाठीवर हात पडला की तो उत्तेजित होतो, त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा आत्मविश्वास व आनंद विलसतो, अवतीभवती असलेल्या माणसांची व संवादांची परस्पर क्रिया घडून, एक वेगळीच अद्भूत क्षमता त्यांच्यात उत्पन्न होते. परस्पर भावनीक निखळ नाते मनातील अनेक निगरगाठी सोडवतात.

दुसऱ्यानं आपल्याला चांगलं म्हणावं, आपल्या कार्याचं कौतुक करावं असं यच्ययावत सर्वच मनुष्य प्राण्याला मनापासून वाटत असतं. अहो, एवढं कशाला ईश्वराला देखील त्याचं कौतुक आवडतं. सर्व धार्मिक साहित्यामधून ईश्वराचं कौतुकच केलेले असते, असे कोडकौतुक जर ईश्वराला आवडत असेल तर जित्याजागत्या माणसाला आपले कौतुक ऐकायला आवडणे हे नैसर्गिकच नाही का? असो.

असं प्रेमळ, उल्हासी आणि आपल्याला कोणीतरी मनापासून जपत आहे,आपली काळजी घेत आहे, ही भावनाच तुमचं वय वाढवायला कारणीभूत होत असते. यापुढे जावून एका प्रार्थनेत असे म्हंटले आहे की, “प्राणशक्ती माझ्या ठिकाणी सदैव जागृत व कायमपणे स्पंदमान असो... मला उल्हासित करणारी तसेच स्फुरणारी असो... अगदी प्राणार्पण करून कार्य करण्याची मला उमेद दे!” अशी प्रखर इच्छाशक्ती लाभल्यावर म्हातारपण आपल्या वाऱ्यालाही थांबणार नाही, कारण प्राणपणाने एवढी गोष्ट करण्याची जिद्द निर्माण झाली की, ती जिद्द आणि तो उत्साह वृध्दत्वाला आसपास फिरकू ही देत नाही.

जरा आजूबाजूला सूक्ष्मपणाने, जागरूकपणाने आणि जिज्ञासू वृत्तीने पाहिले की, अनेक अशी वयस्कर मंडळी आपल्याला दिसून येतात, त्यांनी आपल्या जवळही वृध्दत्व फिरकू दिलेले नाही; हे प्रत्कर्षाने अनुभवास येते, आणि अशी माणसं आपल्या अवतीभवती असली की, “हे जीवन सुंदर आहे!” याचा हरघडी प्रत्यय होतो. आभाळाएवढ्या दु:खाला कवटाळून न बसता, त्याला थोडे बाजूला ठेवून जवाएवढ्या सुखाला डोक्यावर घेणारी अशी माणसं नक्कीच समाजात आनंदाची, सौख्याची, उत्साहाची आणि उल्हासाची कारंजी फुलवत असतात; त्यांच्या संपर्कात राहीलं की, नक्कीच वाटू लागतं, “हे जीवन सुंदर आहे!”

- सुनीलकुमार सरनाईक

भ्रमणध्वनी - 9420351352

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget