Halloween Costume ideas 2015

इस्लाममध्ये स्त्रीयांना सन्मानाचे स्थान


स्त्री म्हटले की अन्याय सहन करणारी अशी परिभाषा सर्वमान्य झालेली आहे. अगदी त्रेतायुगापासून स्त्री वर अन्याय होत आहे आणि आजही तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने चालूच आहे. स्त्री युगानयुगे अन्याय सहन करत आलेली आहे. जगाच्या पाठीवरील सर्वच राष्ट्रात तिच्यावर अन्याय होत आहेत. इतिहासात डोकावून पाहिले तर इराक, भारत, चीन, अरब प्रत्येक ठिकाणी तिच्यावर अन्याय व तिची अवहेलना व्हायची. यत्र नारिस्ते पूजेतम रमते तत्र देवता, असे म्हणणाऱ्या आणि मानणाऱ्या भारत देशांमध्ये स्त्रीला जिवंत जाळण्याची प्रथा होती. ग्रीकमध्ये तर स्त्रीला आत्मा आहे की नाही यावर वाद विवाद होते. स्त्री अगदी अन्यायाने ग्रासून गेली होती. स्त्रीला अधिकार किंवा हक्क हे शब्द सुद्धा माहित नव्हते. मात्र इस्लाम धर्माने स्त्रियांना अन्याय, अत्याचारापासून वाचविले व तिला न्याय दिला. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचार व गुलामी विरुद्ध आवाज उठविला. 

रात स्त्रीच्या तीन स्पष्ट भूमिका असतात. आई, पत्नी व कन्या. इस्लामने या तिनी भूमिकांना अत्युच्च स्थान प्रदान केले आहे.

1.आईच्या रूपात स्त्रीचा दर्जा

      इस्लाममध्ये अल्लाह आणि पैगंबर यांच्या नंतर आईला सर्वोच्च दर्जा प्राप्त आहे. मुलांना आई-वडील दोघांशी सद्व्यवहार करण्याचा आणि आज्ञा पालनाचा आदेश देतो. कुराणमध्ये याचा उल्लेख आहे. आई आपल्या बालकास नऊ महिने पोटात वाढविते व दोन वर्षे आपले दूध पाजवीते. त्यामुळे आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात. त्यामुळे असे म्हटले जाते की, आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. मुहम्मद पैगंबरांनी तर आईच्या बाबतीत सद्व्यवहाराची ताकीदच केली आहे. माननीय अबू हुरैरा रजि. यांनी सांगितले की, एक इसम पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्याकडे आला व त्याने  पैगंबर (सल्ल.) यांना विचारले, माझ्या सद्व्यवहारास सर्वाधिक योग्य कोण आहे? पैगंबरांनी उत्तर दिले, तुझी आई! पुन्हा त्याने तोच प्रश्न दोन वेळेस विचारला. प्रेषितांनी दोन्ही वेळेस आईच सद्व्यवहारास अधिक पात्र असल्याचे सांगितले. व नंतर वडील असे म्हटले. अल्लाहने आईला खूप मोठे श्रेष्ठत्व बहाल केले आहे.

2. पत्नीच्या रूपात स्त्रीचा दर्जा 

इस्लाममध्ये स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. इस्लामची अशी मान्यता आहे की, विवाहामुळे तिचे व्यक्तिमत्व पतीच्या व्यक्तिमत्त्वात विलीन होत नाही अथवा ती आपल्या पतीची सेविका वा दासी बनत नाही. पैगंबरांना त्यांच्या एका साथीदाराने पत्नीच्या अधिकारा बाबतीत विचारले असता पैगंबर (सल्ल.)  म्हणाले, जेव्हा तुम्ही भोजन कराल तेव्हा तिलाही भोजन द्या जेव्हा तुम्ही वस्त्रे परिधान कराला तेव्हा तिलाही वस्त्रे द्या. रागाच्या भरात तिला मारहाण करू नका तिला बरे वाईट बोलू नका तिच्याशी मतभेद विकोपाला गेल्यास तिला घरातून हाकलून न देता घरातच तिच्याशी अलिप्त रहा. जर तिची एखादी सवय वाईट वाटत असेल तर तिची दुसरी चांगली सवय कोणती आहे त्यावर लक्ष द्या. प्रेषित (सल्ल.) यांच्या म्हणण्यानुसार उत्तम तोच आहे जो आपल्या पत्नीशी सत्यनिष्ठ आहे आणि चांगली वर्तणूक ठेवून आहे. 

3. कन्येच्या रूपात स्त्रीचा दर्जा

अज्ञानकाळात म्हणजेच इस्लामपूर्व काळात मुलांना गर्वाचे साधन आणि श्रेष्ठ संपत्ती समजत होते. परंतु मुली त्यांच्याकरिता क्लेशदायक होत्या. मुलींना ते लज्जास्पद समजत असत आणि त्यांच्याविषयी बोलताना देखील त्यांची मान शरमेने खाली जात होती इतकेच नव्हे तर कठोर हृदयी बाप आपल्या मुलींना जिवंत दफन करीत होते. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी मुलींच्या पालनपोषणाची प्रेरणा दिली तसेच पैगंबर यांचे म्हणणे असे होते की, तुमच्यापैकी ज्याला तीन मुली अथवा तीन बहिणी असतील आणि तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल तर त्याला स्वर्गात निश्चितच स्थान प्राप्त होईल. तसेच एका प्रसंगी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद  (सल्ल.) यांनी सांगितले जी व्यक्ती दोन मुलींची त्यांच्या तारुण्यावस्थेपर्यंत पालनपोषण करील,  अंतिम निवाड्याच्या दिवशी ती व्यक्ती आणि मी अशा तऱ्हेने एकत्र येऊ असे म्हणून पैगंबरांनी दोन बोटे जुळवून दाखवली. तसेच मुलींशी घृणा करू नका त्या सहानुभूतीची प्रतिमा व अति मौल्यवान आहेत. (हदीस मसनद अहमद). पैगंबर (सल्ल.) यांच्या म्हणण्यानुसार ’’आपल्या त्या मुलीवर उपकार करा जी (वैधव्यामुळे अथवा घटस्फोट दिला गेल्यामुळे) तुमच्याकडे परत पाठविली गेली असेल आणि तुमच्याशिवाय दुसरा कोणीही तिचा पालक नसेल.’’

पैगंबर (सल्ल.) यांचे हे विचार ऐकूणच मन भरून येते. वरील नैतिक स्वरूपाचे अधिकार व उच्च सन्मान व प्रतिष्ठेचे ज्ञान इस्लामने मानवाला प्रदान केले आहेत. इस्लामी शिकवणीचा आढावा घेण्यात आला तर स्पष्टपणे एका स्त्रीचे अधिकार खालील प्रमाणे सांगितले आहेत.

1. एका महिलेस समाजात सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकार आहे. कुरआननेे हे अधिकार दिले आहेत. जो कोणी त्यांच्या या अधिकाराचे हनन करील त्यास अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहसमोर जवाब द्यावा लागेल.

2. इस्लामने शिक्षणाचा अधिकार पुरुष व महिला दोघांना फक्त प्रदानच केला नसून मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले आणि मुलींचे पालनपोषण त्यांचे शिक्षण प्रशिक्षण आणि उत्साहपूर्ण विवाह इत्यादी करणाऱ्यास स्वर्गाची शुभ सूचना दिली आहे. 

3. इस्लामने विवाहाच्या बाबतीत मुलींच्या परवानगीनेच होईल असे स्पष्ट सांगितले आहे. जोपर्यंत विधवा वा घटस्फोट मिळालेल्या महिलेचे मत प्राप्त होत नाही तोपर्यंत तिचा विवाह केला जाणार नाही आणि कुमारीकेची अनुमती घेतल्या शिवाय तिचा विवाह होणार नाही.

4. इस्लाममध्ये ’महेर’ दिला जातो. म्हणजेच लग्नामध्ये वराने वधूस द्यावयाची रक्कम. हा महिलेचा अधिकार आहे. महिलेला महेर दिलाच जातो तो देणे अनिवार्य राहील. महेर विना विवाह वैध नसेल. विवाह प्रसंगी पतीकडून पत्नीस धन, दागदागिने व संपत्ती देणे अनिवार्य आहे. तिची स्वतःची संपत्ती आहे. यास महेर म्हटले जाते. परंतु ते निश्चित करणे अनिवार्य असते. 

5. इस्लाममध्ये स्त्रीच्या पालनपोषणाची जबाबदारी विवाहापूर्वी पित्यावर विवाहानंतर तिच्या उपजीविकेची जबाबदारी पतीवर येते.  तसेच महत्त्वाची बाब म्हणजे जर पत्नी पतीच्या नातेवाईकांबरोबर एकत्र कुटुंबात राहू इच्छित असेल तर ती वेगळ्या घराची मागणी करू शकते हा तिचा वैधानिक अधिकार आहे. इस्लामने स्त्रीला व्यवसाय आणि उद्योग धंद्याचेे स्वातंत्र प्रदान केले आहे. स्त्रियांना वारसा हक्कांबाबत पुरुषांप्रमाणेच हक्क दिलेले आहेत. इज्जत व अब्रू प्रत्येक माणसाची मौल्यवान संपत्ती असते. इस्लामने स्त्रीस इज्जत व अब्रूचा हक्क प्रदान केला आहे. उत्तम चारित्र्यवान श्रद्धावंत भोळ्याभाबड्या स्त्रीयांच्या चारित्र्यावर आरोप करण्यास मनाई करण्यात आली आहे. याविरूद्ध इस्लामी कायद्यानुसार असे कठोर पाऊल उचलले आहे की जो कोणी एखाद्या स्त्रीवर व्याभिचार व चारित्र्य हिनतेचा मिथ्या आरोप करील त्याला 80 फटके मारले जावेत आणि कोणत्याही प्रकरणात त्याची साक्ष ग्राह्य धरले जाऊ नये. इस्लाम स्त्रीस समीक्षण व आपले मत व्यक्त करण्याचा देखील अधिकार प्रदान करतो. अशा प्रकारे वरील सर्व बाबीचे सूक्ष्म निरीक्षण केले तर इस्लाम धर्माने स्त्रियांवर होणारे अनेक अन्याय व अत्याचार दूर करून त्यांना प्रतिष्ठेचे व श्रेष्ठत्वाचे स्थान दिले आहे. 


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget