Halloween Costume ideas 2015

मी कुरआनकडे कसा आकर्षित झालो

Kuran

कुरआनकडे आकर्षित होण्याचे माझे पहिले कारण म्हणजे कुरआननी माणसाला ज्या धर्मात जन्माला त्याच धर्मात मरेपर्यंत राहण्याची सक्ती नाकारली. दुसर्‍या शब्दात सांगायचे म्हणजे कुरआनने धर्म स्वातंत्र्य दिले. कुरआनपूर्व काळामध्ये राजाला ईश्‍वराचा अंश मानण्याचा प्रघात होता. त्यामुळे प्रजेला राजाला वंदन (सज्दा) करावा लागत असे. ब्रिटनसारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये सुद्धा, ”किंग कँग डू नो राँग” म्हणजे राजा चुकच करू शकत नाही, अशी मान्यता होती. यामागे सुद्धा राजाला ईश्‍वरी अंश मानण्याचाच विचार होता. कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. कितीही मोठा असला तरी तो चुकणारच. पण एकदा का त्याला ईश्‍वरीय रूप प्रदान केले गेले की मग त्याच्याकडून चूक होणार नाही, अशी धारणा मनाशी पक्की करण्यात काहीच अडचण राहत नाही. आणि त्यामुळे राजाने केलेले अत्याचारसुद्धा सुसहाय्य होत.


कुरआनने सर्वप्रथम सर्व भ्रामक ईश्‍वरी संकल्पनांचा इन्कार करून एक ईश्‍वराची संकल्पना मांडली. त्यामुळे आपोआपच मानवनिर्मित धर्म सोडून खर्‍या धर्माकडे वळण्याची सोय झाली. ज्यांना कोणाला, ”वहेदत” एका ईश्‍वराची संकल्पना पटली त्याला जन्मलेल्या आपल्या धर्मातच नाविलाजाने मरेपर्यंत राहण्याची सक्ती संपली. माझ्यासारख्या कोट्यावधी लोकांनी कुरआनचा संदेश लक्षात आल्यावर मरेपर्यंत जन्मलेल्या धर्मात राहण्याची सक्ती झुगारलेली आहे.

या ग्रंथाकडे आकर्षित होण्याचे दूसरे कारण म्हणजे यात आचरण स्वातंत्र्याची संकल्पना मोठ्या आकर्षक स्वरूपात मांडलेली आहे. एकतर्फी चांगले कृत्य करून त्याचा परिणाम ईश्‍वरावर सोडल्यामुळे माणसाला एक आत्मिक आनंद मिळतो. दुसर्‍यांचे हक्क देण्याकडे माणसांचा कल वाढतो. आज जगामध्ये प्रत्येकजण स्व:चा हक्क प्राप्त करण्यासाठी इतरांशी भांडताना दिसतो. मात्र त्याचवेळेस दुसर्‍यांचे हक्क नाकारण्याकडे सर्वांचाच कल दिसून येतो. कुरआनने एकतर्फी पुण्यकर्म करून फळाची अपेक्षा इतरांकडून न करता साक्षात ईश्‍वराकडून करण्याची जी संकल्पना मांडली, त्या संकल्पनेने मला मोहिनी घातली. आपला हक्क आपल्यासारख्या इतर माणसाकडे मागण्यापेक्षा तो सर्वशक्तीमान ईश्‍वराकडून मागणे मानवासाठी कधीही सन्मानजनक आहे.

कुरआनकडे आकर्षित होण्याचे एक महत्त्वाचे कारण असे की, अज्ञान काळामध्ये माणसाकडून ज्या काही चुका होतात, जी काही अपकृत्य होतात कुरआनवर विश्‍वास ठेऊन सद्वर्तन करण्यास सुरूवात करताच अज्ञानकाळात केलेल्या सर्व अपकृत्यांची क्षमा मिळवून देण्याची हमी कुरआन देतो. मात्र यासाठी मागील काळात केलेल्या अपकृत्यांबद्दल माणसाला खरा पश्‍चाताप होणे व भविष्यात पुन्हा तशी अपकृत्य करणार नसल्याचा निश्‍चय करणे बंधनकारक आहे. ही फार मोठी सवलत ईश्‍वराने माणसाला दिलेेली आहे. 

कुरआनकडे आकर्षित होण्याचे कारण म्हणजे कुरआनच्या शिकवणीमध्ये हिकमत (जीवनात येणार्‍या वेगवेगळ्या परिस्थितीला कसे तोंड द्यावे याचे नैतिक शिक्षण म्हणजे हिकमत) हा फार महत्त्वाचा भाग आहे. ज्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये येणार्‍या चढ उतार, चांगल्या-वाईट घटनांना यशस्वीपणे धैर्याने तोंड देण्याची शक्ती माणसामध्ये निर्माण होते. 

कुरआनमध्ये दिलेले समानतेचे तत्व हे कुरआनकडे आकर्षित करण्याचे फार मोठे कारण आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ”लोकहो !  आम्ही तुम्हाला एका पुरूष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविक: अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे.” (सुरे हुजरात आयत नं.13).

या आयातीने एका फटक्यात जगात अस्तित्वात असलेल्या जवळ जवळ 800 कोटी लोकांना भाऊ-बहिण करून टाकलेले आहे. यापेक्षा उदात्त विचार दूसरा कुठला असू शकत नाही. एक माणूस म्हणून दुसर्‍या माणसावर प्रेम करणे यापेक्षा मानवतेचा सन्मान दुसरा काय असू शकतो? या विचाराने वंशवाद, रंग, जात, धर्म, भाषा, राष्ट्र या सर्व विचारांच्या पुढे जावून माणसाला माणूस म्हणून सख्या भावा-बहिणींप्रमाणे एकमेकांवर प्रेम करण्याची शिकवण दिली. ही फार मोठी वैचारिक देणगी ईश्‍वराने माणवाला दिलेली आहे. या आयातीवर विश्‍वास ठेऊन माणसाने जर जीवन जगायचे ठरवले तर कुठलाही संकुचित विचार त्याच्या मनामध्ये टिकू शकणार नाही. या आणि अशाच अनेक आयती कुरआनमध्ये आहेत. यामुळे मानवजातीमध्ये खरी समानता रूजू शकते. 

कुरआनमध्ये अनेक ठिकाणी आई-वडिलांचा सन्मान करण्याची ताकीद करण्यात आलेली आहे. ही अतिशय मोलाची शिकवण आहे. आजकाल तर भौतिक सुखाच्या मागे पळणार्‍या नवीन पिढीला वृद्ध आई-वडिलांकडे पहायला सुद्धा वेळ नाही. त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वेगाने वाढत आहे, हे विदारक सत्य आहे. कुरआनने तरूण मुलांना आपल्या आई-वडिलांची सेवा स्व:च्या घरी ठेऊन करण्याची ताकीद केलेली आहे. एका ठिकाणी म्हटलेले आहे कि, ”आई-वडिलांशी सद्वर्तन करा, जर तुमच्यापाशी त्यांच्यापैकी कोणी एक अथवा दोघे वृद्ध होऊन राहिले तर त्यांच्यासाठी ’ब्र’ शब्ददेखील काढू नका व त्यांना झिडकारून प्रत्युत्तरदेखील देऊ नका. तर त्यांच्याशी आदरपूर्वक बोला.” (सुरे बनी इसराईल आयत नं. 23) ही आणि हिच्यासारख्या आयतींमध्ये आई-वडिलांच्या सेवेचे महत्त्व कुरआनमध्ये अधोरेखित केले आहे. कुरआनकडे आकर्षित होण्याचे हे एक मोठे कारण आहे. 

जगामध्ये कुरआनने स्त्रीला जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार इतर कुठल्याच व्यवस्थेमध्ये देण्यात आलेले नाहीत. विशेष: आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये वारसा हक्क कुरआनने 1442 वर्षापूर्वी दिले. इतर व्यवस्थांमध्ये हा हक्क कायद्याने तो ही खूप उशीरा दिला. सर्वातप्रथम हा हक्क महिलांना देण्याचा मान कुरआनकडे आहे. हे सुद्धा कुरआनकडे आकर्षित होण्याचे हे एक मोठे कारण आहे. 

कुरआनमध्ये मृत्यूपश्‍चातच्या जीवनाची जी संकल्पना मांडलेली आहे ती, कुठल्याही विवेकी माणसाला पटण्यासारखी आहे. तर्कसंगत आहे. आपण पाहतो जगामध्ये अनेक गोष्टी अशा घडतात की सकृतदर्शनी त्यात अत्याचार करणार्‍याची सरशी होती. उदा. एका माणसाने 10 खून केले. त्याला एकदा फाशी झाली. मग त्यामुळे त्याचा बदला पूर्णपणे घेण्यात आला, असे म्हणता येणार नाही. थोडक्यात हे जग अपूर्ण आहे. याला पूर्ण होण्यासाठी मृत्यनंतर अत्याचार करणार्‍याच्या पदरात अत्याचाराचे माप तर पुण्यकर्म करणार्‍याला पुण्याचे माप टाकल्याशिवाय हे जग पूर्ण होणार नाही. या जगातून मृत्यू झाल्यानंतर सुटका झाली असे म्हणता येणार नाही. मृत्यू पश्‍चात त्याच्या पाप-पुण्याचा हिशोब होऊन त्याला त्याचा बदला दिल्याखेरीज मानवी जीवन परिपूर्ण होणार नाही, ही एक जबदरस्त संकल्पना आहे, जी कुठल्याही बुद्धिवादी माणसाला पटण्यासारखी आहे. 

एकंदरित हे आणि असेच अनेक मुद्दे कुरआनमध्ये जे की, गांभीर्याने वाचल्यास कोणालाही आकर्षित करू शकतात. जसे त्यांनी मला आकर्षित केले आहे.


- किशन जयवंतराव पाटील 

मुखेड जि.नांदेड 

मो.9175793247


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget