Halloween Costume ideas 2015

मदरसे नैतिक शिक्षण देणारी केंद्र


क्या हुआ अगर हमको दो-चार मौजे छू गईं

हमने बदला है न जाने कितने तुफानों का रूख

तीन तलाक, हज सबसिडी, बुरखा, लव्ह जिहाद, कोरोना जिहाद, युपीएससी जिहाद असे एक ना अनेक विषय आहेत जे मीडियाला प्रिय आहेत. काहीही करून मुस्लिम समाजाविषयी सामान्य जनतेमध्ये गैरसमज वाढत राहतील यासाठी मीडिया ’रेडिओ रवांडाप्रमाणे’ अहोरात्र रविवारची सुट्टी सुद्धा न घेता अपप्रचार करत असतो. त्यातच या आठवड्यात मदरसे या विषयाची भर पडली. त्याचे झाले असे की, आसाममध्ये सरकारी अनुदानप्राप्त अरबी मदरसे आणि संस्कृत पाठशाळा यांची मदत बंद करण्याचा राज्यातील भाजपा सरकारने निर्णय घेतला. तर लगेच आसाममध्ये मदरशांवर प्रतिबंध लादण्यात आला, अशी मीडियामधून हाकाटी पिटण्यास सुरूवात झाली. तोच धागा पकडून महाराष्ट्रातसुद्धा भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आव्हानात्मक भाषा करून महाराष्ट्रातही मदरशांची शासकीय मदत बंद करण्याचे किंबहुना मदरसेच बंद करण्याचे आवाहन केले. वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये एक छदामही मदरशांना मिळत नाही. एवढी साधी माहिती आमदार महोदयांना नसावी, याचेच आश्‍चर्य वाटते. किंवा मुद्दामहून आमदार महोदयांनी जाणून बुजून ही थाप मारली असावी. या संदर्भात  एक गोष्ट मात्र सत्य आहे की, केंद्र सरकारने आपल्या बजटमध्ये मदरशांच्या अपग्रेडेशनसाठी निधी वाढवून दिला आहे. त्याबाबतीत सुद्धा सत्य वेगळेच आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार मागील बजट मधील अल्पसंख्यांक कल्याण निधीचा मोठा भाग खर्चच झाला नसल्याचे म्हटले आहे. हे सत्य बहुतेक लोकांना माहित नाही. युपीएच्या काळामध्ये केंद्र सरकारने ज्या मदरशांमध्ये गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय शिकविले जातील. त्यांना थोडेशे अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु अनुदानाचे निमित्त करून सरकारला मदरशांच्या व्यवस्थापनामध्ये दखल देण्याची संधी मिळेल म्हणून बहुतेक मदरशांनी तो निधी नाकारला होता. अपवाद काही मदरसे असतील ज्यांनी हा तुटपुंजा निधी स्विकारला. याचा महाराष्ट्राशी दुरान्वयेही संबंध नाही. कारण महाराष्ट्रामध्ये एकमताने या सरकारी योजनेचा उलेमांनी विरोध केला, असे असतांनासुद्धा मुद्दामहून मदरशांचा विषय चर्चेत आणून मदरशांविषयी गुढ वातावरण निर्माण करण्याचा आमदार महोदयांचा प्रयत्न आहे, यात शंका नाही.  

मदरशांसंबंधी सत्य परिस्थिती 

एबीपी माझाशी बोलतांना आ. अतुल भातखळकर यांनी मदरशांमध्ये राष्ट्रविरोधी शिक्षण दिले जाते, असा गंभीर आरोप अतिशय बेजबाबदारपणे केला. या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा वाचकांनी लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे मदरसे हे गावामध्ये असतात, जंगलात, वाळवंटात किंवा दूर एव्हरेस्टवर नसतात. शिवाय मदरशांमध्ये कोणालाही मुक्त प्रवेश असतो. त्या काही प्रतिबंधित इमारती नव्हेत. ज्यांना मदरशांमध्ये काय शिकविले जाते? ते देशाच्या हिताचे आहे का विरोधात आहे? याची खात्री करावयाची असेल त्यांनी मदरशांमध्ये जाऊन खात्री करावी. उगाच मीडियामध्ये मोघम आरोप लावू नयेत.

जेव्हा लॉ कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले जात नाही, मेडिकल कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण दिले जात नाही तेव्हा मदरशामध्येच इतर विषयांचे शिक्षण देण्याचा आग्रह कशासाठी? मदरसे हे धार्मिक शिक्षण देण्याचे केंद्र आहेत आणि तेथे शिकविणारे शिक्षक सुद्धा त्याचविषयातीलच तज्ज्ञ आहेत. लोकांनी दिलेल्या तुटपुंज्या चंद्यातून या मदरशांची कुतरओढ सुरू असते. तेथे गणित, विज्ञान, इंग्रजी याचे शिक्षण द्यावयाचे ठरविले तरी निधीअभावी ते देता येत नाही. ही झाली सामान्य मदरशांची स्थिती. मात्र काही मदरसे जे मोठ्या शहरात आहेत त्या ठिकाणी गणित, इंग्रजी, विज्ञानच नव्हे तर संगणकाचे ज्ञान सुद्धा देण्याची व्यवस्था केलेली आहे. उदा. दारूल उलूम देवबंद, नदवतुल उलूम लखनऊ इत्यादी. 

मदरशांच्या माध्यमातून धार्मिक शिक्षण देण्याची व्यवस्था केल्यामुळेच आजही मुस्लिम समाजामधील मदरशांमधून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात नैतिकता आढळून येते. मागच्या पीढितील राजा राममोहन रॉय, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, मुन्शी प्रेमचंद, राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा, मौलाना अबुल कलाम आझाद, राष्ट्रपती फकरूद्दीन अली अहेमद यासारखे उंचीचे नेते मदरशातून निघालेले आहेत. याची जाण आधुनिक पीढिला नसावी. आजपर्यंत मदरशातून शिकलेला एकही विद्यार्थी बलात्कार करताना पकडला गेला नाही, चोरी करताना पकडला गेला नाही किंवा कुठलाही अन्य अपराध करताना पकडला गेला नाही. ही उपलब्धी काही कमी नाही. आज देशाला नितीमान जीवन जगणार्‍या नागरिकांची सर्व क्षेत्रात प्रचंड वाणवा आहे. मदरसे ती उणीव काही प्रमाणात का होईना भरून काढतात. खरे तर ही मोठी राष्ट्रसेवा मदरसे करतात. मदरशातून शिकून बाहेर निघालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अनेक छोटेमोठे व्यवसाय थाटलेले आहेत. त्यातून ते नैतिक व्यवहार करून ग्राहकांची म्हणजे पर्यायाने देशाची सेवाच करत आहेत. 

मदरशांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे पालक देशातील सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर भरतात. परंतु त्यांच्या  पाल्यांच्या शिक्षणाचा भार सरकारवर पडत नाही. मदरशातून शिकलेले विद्यार्थी व्याजी कर्ज घेत नाहीत, म्हणून बँकांना बुडवत नाहीत, शासकीय नोकरीस पात्र नसतात म्हणून एम्प्लॉयमेंट एक्सचेंज वर त्यांचा भार पडत नाही. नीट सारख्या परीक्षेमध्ये सहभागी होण्यास पात्र नसल्यामुळे इतर विद्यार्थ्यांची तेवढीच स्पर्धा कमी होते. कुठलेही तांत्रिक शिक्षण घेत नसल्यामुळे आजन्म ग्राहक बणून राहतात व व्यावसायिकांना आर्थिक लाभ मिळवून देतात. मदरशांमधून अरबी भाषा शिकून अनेक विद्यार्थी गल्फमध्ये जातात  व तेथे काम करून मौल्यवान असे परकीय चलन देशात पाठवितात. त्यासाठी खरे तर आमदार भातखळकरांनी त्यांचे आभार मानायला हवेत. 

मदरशाचे विद्यार्थी कधीच मोर्चे, धरणे, उपोषण करत नाहीत व कधीच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करीत नाहीत. हे विद्यार्थी प्रामाणिक, इमानदार आणि नितीमान असतात. ज्या क्षेत्रात जातात त्या क्षेत्रात एकनिष्ठ राहतात. ते ईशभय बाळगणारे असल्यामुळे त्यांच्यावर सहज विश्‍वास ठेवता येतो. जिहादचे शिक्षण दिले जात नसल्यामुळे मदरशांमधून आजपर्यंत एकही आतंकवादी निपजलेला नाही. बॉम्ब कशाला म्हणतात याची साधी कल्पनासुद्धा त्यांना नसते. जिहादचा ज्यावेळेस धर्मग्रंथांमध्ये संदर्भ येतो त्यावेळेस ते ’जिहाद-ए-अकबर’ म्हणजेच स्व:च्या षडरिपूंविरूद्ध जिहाद करण्याचे शिक्षण त्यांना दिले जाते. सर्वात महत्त्वाचा म्हणजे मदरशांतून शिकलेले विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात असोत भ्रष्टाचारापासून मैलोगणिक दूर असतात. नीतिमान नागरिक देशात कुठून निपजत असतील तर ते मदरशांतूनच निपजत आहेत. 

लालकृष्ण आडवाणी जेव्हा उपपंतप्रधान होते तेव्हा त्यांनी देशातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण पोलिसांमार्फत करून घेतले होते. तेथे काय शिकविले जाते? त्यांना निधी कोठून मिळतो? तेथून बाहेर पडलेले विद्यार्थी काय करतात? या सर्वांची चौकशी करून लोकसभेमध्ये त्यानी घोषणा केली होती की, भारतातील मदरशांमधून कुठलेही गैर कायदेशीर कृत्य घडत असल्याचा पुरावा मिळून आलेला नाही. असे असतांनासुद्धा त्यांच्यावर देश विघातक शिक्षण घेत असल्याचा आरोप करणे या सारखे दुर्दैव ते कोणते? हा शुद्ध इस्लामोफोबियाचा प्रकार आहे.


- एम. आय शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget