Halloween Costume ideas 2015

गुगली!


- १ -

संपादकांची गाडी हॉटेल ग्रँड हयातकडे निघालेली आहे. मागच्या सिटवर बसलेले संपादक (नेहमीप्रमाणेच)

स्वतःवरच खुश आहेत.

संपादक :- (मनातल्या मनात) चला, देवा नाना आपल्याला भेटायला तयार झालेत यातच आपण अर्धा डाव जिंकला ! आपली भेट आटोपली की चॅनलवाल्यांना ब्रेकींग न्युज आणि पेपरवाल्यांना उद्याची हेडलाईन मिळणार. खरं म्हणजे देवा नानांची अशी भेट घेऊन बारामतीकरांना आणि दिल्लीच्या बाईला गुगली टाकावी अशी कधीपासून इच्छा होती. असं करायला मोठे मालक परवानगी देता की देत नाही अशी धाकधूक होती, पण देव मदतीला धावला. छोट्या मालकांनी नाईट लाईफच्या नादी लागून करून ठेवलेले पराक्रम निस्तरता निस्तरता मोठया मालकांना फुल्ल एसीतही घामाच्या धारा लागल्या. आता हे सर्व आवरायला देवा नानाच लागतील हे लक्षात आल्यावर त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली. झालं ! जे मला हवं होतं तेच मी करावं म्हणून मालकांनी मला आग्रह धरला, म्हणून मग आता देवा नानांना घेऊन फाईव्ह स्टारमध्ये जेवावं लागणार आहे. स्वतःच्या पैश्यांनी फाईव्ह स्टारमध्ये जेवायला नाही परवडत आणि दुसऱ्याला न्यायचं म्हटलं तर अंगावर काटाच येतो ! अर्थात पक्षाच्या कामाने जेवलो म्हणून बिल मागून घेता येईल. आता देवा नानांना छोट्या मालकांना वाचवा म्हणून गळ घालतांनाच भविष्यात आपल्याला परत जुळवून घेता येईल का याचा अंदाज घ्यावा लागेल. थोडा समजूतदारपणा दाखवावा लागेल, थोडे सूचक इशारे करावे लागतील. घटस्फोटित नवरा बायको वर्षभरानंतर भेटले तर ते असंच वागत असतील का ?


-२-

देवा नानांची गाडी हॉटेल ग्रँड हयातकडे निघालेली आहे. मागच्या सिटवर बसलेले देवा नाना बऱ्याच दिवसांनंतर खुश दिसतायेत.

देवा नाना :- (मनातल्या मनात)  हे असं असतं बघा. आंधळा मागतो एक आणि - - - असं झालं आहे. कधीपासून विचार करत होतो, की संपादकांची जाहीरपणे गुप्त भेट घ्यावी आणि तिची ब्रेकिंग न्युज करून बारामतीकर दादांना गुगली टाकावी. नुसतंच येतो येतो करतायेत कधीपासून. त्यांना दाखवायलाच हवं की जुने मित्रसुद्धा वेटिंगला आहेत म्हणून. मी काहीतरी हालचाल करण्याच्या बेतातच होतो तोपर्यंत संपादकांचाच फोन आला, की आपण एकत्र जेवण घेऊयात म्हणून. मला माहीत आहे, नाईट लाईफचा खेळ छोटूच्या अंगाशी आलायं. त्याला वाचवा म्हणून गळ घालतील आणि दुसरा घरोबा मानवत नसेल म्हणून परत पहिल्या घरात घुसता येईल का याचा अंदाज घेतील. जाऊ द्या. बारामतीकर दादांना गुगली तर टाकली जाईल ना ? आपल्याला काय, आम के आम गुठलीयोंके दाम !


-३-

हॉटेल ग्रँड हयातमध्ये संपादक आणि देवा नाना समोरासमोर बसलेले आहेत. संपादक मेनूकार्ड देवा नानांकडे सरकवतात.

देवा नाना :- तुम्हीच मागवा जे मागवायचं ते. माझ्या तर तोंडाची चवच गेली आहे वर्षभरापासून.

संपादक :- अहो, चवीचं काय घेऊन बसलात नाना, आमच्या तर प्रत्येक घासात खडा निघतोय वर्षभरापासून.

देवा नाना :- घाईगडबडीत खिचडी बनवायच्या नादात डाळ तांदूळ नीट पाहून नाही घेतलेत ना की असं होणारच.

संपादक :- हो ना. खिचडी पचायला हलकी असते म्हणे. आम्हांला तर जड जातेय पचायला.

देवा नाना :- हसत करावे कर्म, भोगावे मग रडत तेचि, यालाच तर म्हणतात ! बरं, ते असू देत. मुख्य विषय काय आहे ते बोला. कसं काय भेटावंस वाटलं एकदम ?

संपादक :- नानासाहेब, छोट्या मालकांना त्रास होईल असं वाटतंय. आपण मदत करावी अशी मोठ्या मालकांची विनंती आहे.

देवा नाना :- तसे आपण जुने मित्र आहोत. मदत तर करायलाच हवी, पण त्याचं काय आहे की, तुम्ही मला टांग मारल्यापासून दिल्लीतलं माझं वजन थोडं कमीच झालेलं आहे, तरी हे बिहारचं आटोपलं की बघतो प्रयत्न करून.

संपादक :- बिहारचं आटोपेपर्यंत तर आमचे छोटे मालकच आटोपलेले असतील नानासाहेब. ताबडतोब काहीतरी करायला हवं, नाहीतर बैल गेला आणि झोपा केला असं होईल ते.

देवा नाना :- (मिश्कीलपणे) एक दुरुस्ती सुचवू का, छोटीशी ?

संपादक :- सुचवा की.

देवा नाना :- बछडा गेला आणि झोपा केला असं म्हणा.

संपादक :- नाना साहेब, हे तुम्ही बोलू शकता. आम्ही कसं बोलणार ? बरं, ते असू द्या. म्हणजे काहीही बोला, पण काहीतरी करा.आपली जुनी मैत्री आहे. परत केव्हाही चॅनलाईज होऊ शकते. काय ?

देवा नाना :- संपादक, कोणाचा बंद पडलेला पेपर चालवायला घेण्यापेक्षा स्वतःचा नवा पेपर काढलेला कधीही चांगला असतो. काय ?

संपादक :- (नेहमीप्रमाणे कोडगेपणा स्वीकारत) आता पेपरचा विषय काढलात म्हणून विचारतो. आमच्या पेपरसाठी मुलाखत केव्हा देता ?

देवा नाना :- मी कुठे वाचतो तुमचा पेपर ? मी कशासाठी मुलाखत देऊ ?

संपादक :-  पत्रकारांना या आपल्या भेटीचं कारण सांगण्यापूरतं तरी हो म्हणा. आणि हो, मला खरंच माजी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घ्यायची इच्छा आहे.

देवा नाना :- अस्स? मग अजून सहा महिने थांबा आणि तुमच्या मालकांचीच मुलाखत घ्या की !


-मुकुंद परदेशी, मुक्त लेखक,

भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget