Halloween Costume ideas 2015

एकमेकांना भेटण्याचे इस्लामी शिष्टाचार

ताख़ीर का मौका ना तजबजुब का अमल है
ये वक्ते अमल वक्ते अमल वक्ते अमल है
    आजपासून 1441 वर्षापूर्वी जेव्हा जगातील बहुतेक लोक मागासलेले होते त्यावेळी इस्लामने जगाला ’नफ्सीयात’ अर्थात मानसशास्त्राचा परिचय करून दिला. या व्यापक शास्त्रातील एक छोटासा अंश ’एकमेकांना भेटण्याचे शिष्टाचार’ याबद्दल आज आपण थोडीसी माहिती घेऊ. विषय थोडासा वेगळा आहे मात्र उपयोगी आहे. वाचकांना कदाचित वाटेल की, एकमेकांना भेटण्यामधील शिष्टाचारामध्ये असे काय असामान्य आहे की त्याची चर्चा करण्याची गरज भासावी? तर त्यांना मी सांगू इच्छितो की, कधी-कधी सामान्य गोष्टीमधूनच एखादी अशी असामान्य गोष्ट पुढे येते की माणसाच्या जीवनाला कलाटणी मिळून जाते.
लक्षात ठेवा मित्रांनों ! कोणालाही भेटताना आपण भेटणार्‍या व्यक्तिशी काय बोलतोय यापेक्षा अधिक महत्त्व आपण त्याच्याशी बोलताना कसे वागतो याला आहे. या संबंधीची जी शिकवण इस्लाम आपल्याला देतो ती अशी की, भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तीसमोर तुमची देहबोली अशी असावी की, त्या  व्यक्तिला या गोष्टीची जाणीव व्हावी की त्याला भेटताना तुम्हाला कोण आनंद झालेला आहे. तुमचा चेहरा भेटी दरम्यान प्रफुल्लित असावयास हवा. यासाठी अभिनय करण्याची गरज तुम्हाला भासू नये. आपण स्वतःमध्ये अशी सवय रूजवावी की, प्रत्येक भेटणार्‍याला वाटावे की, आपल्या भेटीमुळे ही व्यक्ती खूपच आनंदीत झालेली आहे. असे करणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुमचा कुरआनच्या खालील आयातींवर आणि प्रेषितांच्या हदीसवर विश्‍वास असेल.
    ”लोकहो! आम्ही तुम्हाला एका पुरूष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्‍चित अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’ (संदर्भ ः कुरआन-अल्हुजरात आयत नं. 13).
    या आयाती शिवाय प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांची एक हदीस अतिशय महत्त्वाची जी या संदर्भात नोंद घेण्यासारखी आहे. ते फरमावतात, ”जगातील लोक हे अल्लाहचा कुंबा (कुटुंब) आहे. या कुटुंबामध्ये अल्लाहला सर्वात प्रिय तो आहे जो या कुटुंबाशी चांगली वर्तणूक ठेवेल.”
    साधारणपणे आपण प्रत्येक भेटणार्‍या व्यक्तिला सारख्याच उत्साहाने प्रतिसाद देत नाहीत. श्रीमंत, मोठ्या हुद्यावरील लोकांव्यतिरिक्त आपण सामान्य लोकांना भेटताना एक तर तिरके बसतो, त्यांच्याकडे चेहरा करत नाही, लक्ष दूसरीकडेच कुठेतरी असते, आता तर सर्वात वाईट गोष्टी अशी सुरू झालेली आहे की, समोरील व्यक्ति बोलत असताना अनेक लोक हे व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुकमध्ये व्यस्त असतात. भेटायला आलेल्या व्यक्तीचा यापेक्षा मोठा अपमान तो कोणता? असे नाही की समोरच्याला तुमचे हे वर्तन कळत नाही. त्याला तुमच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा नसते. आपल्याकडून असे वर्तन घडल्यास तो मनोमन स्वतःला दोष देत काही न बोलता निघून जातो. मात्र तुम्ही केलेला आपण आयुष्यभर लक्षात ठेवतो आणि संधी मिळेल तेव्हा वचपा काढल्याशिवाय राहत नाही.
    आजकाल ज्याच्याकडे काम असेल, जो श्रीमंत असेल, मोठ्या पदावर असेल किंवा भविष्यात ज्याची गरज पडू शकेल,अशाच लोकांशी बोलतांना लक्षपूर्वक वार्तालाप करण्याची, देहबोली नम्र ठेवण्याची आपल्याला सवय जडलेली आहे. परंतु इस्लाम ठीक याच्या उलट आपल्याला निर्देश देतो की, प्रत्येक व्यक्तीशी बोलताना त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐका, देहबोली नम्र ठेवा, चेहरा प्रफुल्लित ठेवा, आज एवढे जरी करण्याचा आपण निश्‍चय केला तरी अल्पावधीतच आपण लोकप्रिय व्हाल, समाजामध्ये तुमचा सन्मान वाढेल.
    तुमच्याकडे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा हेतू प्रत्येक वेळेस साध्य होईलच असे नाही. मात्र तुम्ही त्याला दिलेली वागणूक तो कधीच विसरणार नाही. तुमची भेट घेऊनही त्याचे काम न झाल्याचे दुःख तुमच्या चांगल्या प्रतिसादामुळे सुसह्य होईल. त्यातच जर का तुम्ही त्याला सहानुभूतीपूर्वक हे समजावण्यामध्ये यशस्वी झालात की त्याचे काम करणे तुमच्या अखत्यारित नाही तेव्हा तर त्याचे दुःख आणखीन कमी होईल.
    आज अनेक लोक हा साधा शिष्टाचार पाळताना दिसत नाहीत. किमान मुस्लिमांनी तरी या इस्लामी शिष्टाचाराचे कटाक्षाने पालन करावे, जेणेकरून आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती समाधानी होऊन जाईल. लक्षात ठेवा मित्रानों ! शब्दापेक्षा तुमची देहबोली आणि तुमच्या चेहर्‍यावरील भाव यावरून भेटायला आलेली व्यक्ती चटकन ओळखते की तुम्ही त्याला किती महत्त्व देत आहात ते. म्हणून जोपर्यंत वर नमूद आयात आणि हदीसवर तुमची गाढी श्रद्धा असणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रत्येकाला समान महत्व देऊन भेटू शकणार नाही.
    दूसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तिशी नम्रपणे बोलून, ”नेकी” अर्थात पुण्य कमाविण्याची संधी तुमच्याकडे स्वतः होऊन चालत आलेली आहे, याची जाणीव ठेवणे हा आहे. यासंदर्भात एक हदीस खूपच मार्गदर्शक आहे. सय्यदना हजरत अबुजर रजि. यांनी म्हटलेले आहे की, प्रेषित सल्ल. यांनी फरमाविले की, ”नेकी के एक छोटेसे काम को भी हकीर (तुच्छ) न जानो अगरचे ये नेकी का काम सिर्फ अपने भाईसे खंदा पेशानी (प्रफुल्लितपणे) से मिलना ही क्यूं न हो.” (मुस्लिम).
    अनेक सहाबी रजि. यांनी सांगितलेले आहे की, ”प्रेषित मुहम्मद (सल्ल.) हम सबसे ज्यादा मुस्कुरानेवाले थे.” याचाच अर्थ प्रत्येक भेटणार्‍या व्यक्तीचे मग त्याची ओळख असो की नसो स्वागत प्रेषित सल्ल. स्मितहास्याने करत. ही गोष्ट छोटी आहे मात्र याचे महत्व फार मोठे आहे. सय्यदना अबुजर (रजि.) यांनी म्हटलेले आहे की, प्रेषित सल्ल. यांनी फरमाविले की, ”अपने भाई की तरफ मुस्कुराकर देखना तेरे लिए सदका (दान) है, नेक काम का हुक्म और बुरे काम से रोकना भी सदका है, भटके हुए को रास्ता दिखाना सदका है, रास्ते से पत्थर, कांटा और ऐसीही नुकसान देह चीज हटाना सदका है, अपने बरतन से अपने भाई के बरतन में पाणी डालना भी तेरे लिए सदका है.”
    या हदीसमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. रस्त्यात पडलेल्या नुकसानदायक वस्तू हटविणे, विहिरीतून उपसलेले पाणी दुसर्‍याच्या भांड्यामध्ये ओतणे, एखादी व्यक्ती वाईट गोष्ट करीत असेल तर त्यापासून त्याला परावृत्त करणे या सगळ्या गोष्टी प्रेषितांनी पुण्य कर्म असल्याचे म्हटलेले आहे.
    आजकाल आपण नेमकी याउलट परिस्थिती पाहतो. रस्त्यामधील पिडादायक वस्तू हटविणे तर दूर, रस्त्यात कचरा टाकणे, चालता चालता पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकणे, केळी खाऊन त्याच्या साली फेकणे, सार्वजनिक उत्सवासाठी रस्त्यात खड्डे करणे, वाईट गोष्टी आपल्या डोळ्यादेखत घडत असतांना त्याकडे दुर्लक्ष करणे या सामान्य बाबी झालेल्या आहेत. विहिरीतून पाणी उपसून दुसर्‍याच्या भांड्यामध्ये ओतणे याचा तर आता विचारसुद्धा करता येत नाही, कारण पाण्यासारखी गरजेची वस्तू विकण्यापर्यंत आपण भौतिक प्रगती केेेलेली आहे.
    मित्रांनों ! या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला पूर्वीपासूनच माहिती होत्या. परंतु, ”दुनिया की चमक दमक”मुळे या गोष्टी विस्मृतीमध्ये गेलेल्या आहेत. मला आनंद होईल, माझा हा लेख वाचून आपण इस्लामच्या या  शिष्टाचाराचा अवलंब करण्याचा निश्‍चय केला तर. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ”ऐ अल्लाह! एकमेकांना भेटताना आम्हाला या शिष्टाचारांच्या अंमलबजावणीची समज प्रदान कर.” आमीन.


- एम आय शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget