आरोप करा अन् ईडी,सीबीआयद्वारे अटक करून डायरेक्ट तुरूंगात टाका, असा होरा देशभरात सुरू होता. तो फक्त आणि फक्त विरोधकांसाठीच सत्ताधाऱ्यांनी वापरला, असा सूर जनमानसातून उमटतोय. अशीच स्थिती महाराष्ट्रात बनली आणि एकामागून एक असे राष्ट्रवादीचे दिग्गज दोन मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक झाली. हे तिन्ही नेते चर्चेतले आणि ताकदवान. यापैकी नवाब मलिक आणि संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल चढविला होता. हे नेते माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या रडारावर आले आणि जेलमध्ये गेले. त्यातील संजय राऊत नुकतेच बाहेर आले आहेत. तर राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची 28 डिसेंबर रोजी सीबीआय न्यायालयाने तब्बल 1 वर्ष, 1 महिना, 27 दिवसांनी जामीनावर सुटका केली. सुटका होताच देशमुखांचे जोरदार स्वागत अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि इतर नेते, कार्यकर्त्यांनी केले.
कारागृहाबाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटले की, मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं. तसेच माझ्यावरील आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. सचिन वाझेंनी केलेल्या आरोपात देखील तथ्य नाही. माझ्यावरील आरोप ऐकीव माहितीवरुन करण्यात आल्याचं कोर्टाने सांगितल्याची माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली. मुंबईतील हुक्का पार्लर बारकडून दरमहा 100 कोटी रुपयांच्या लाचेच्या प्रकरणात देशमुख यांना ईडीने 1 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती. ईडीप्रमाणेच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची सीबीआय चौकशीही सुरू होती.
Post a Comment