हजरत आयेशा (र.) म्हणतात की एकदा एका प्रतिष्ठित घराण्याच्या महिलेने चोरी केली होती. तिला हात कापण्याच्या शिक्षेबद्दल काही समस्या झाली. तिचा हात कापला जाऊ नये म्हणून सर्वांनी आपसात सल्लामसलतीने असे ठरवले की प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे उसामा बिन झैद (र.) यांनी शिफारस करावी. उसामा (र.) यांनी प्रेषितांना या बाबतीत विचारले असता प्रेषित फारच रागावले आणि म्हणाले, "तुम्ही अल्लाहच्या मर्यादांविषयी शिफारस करता?" नंतर प्रेषितांनी प्रवचन देताना म्हटले, "तुमच्या पूर्वीचे लोक या अपराधासाठीच उद्ध्वस्त झाले की त्यांच्यातील ज्या कुणी प्रतिष्ठित माणसाने चोरी केली तर त्याला सोडून दिले जायचे आणि जर कुणी दुर्बल माणसाने चोरी केली तर त्याला शिक्षा दिली जायची. अल्लाहची शपथ, मुहम्मद (स.) च्या कन्या फातिमा (र.) यांनी जरी चोरी कोली असती तर मी तिचे हात कापले असते."
- (बुखारी, मुस्लिम, मिश्कात)
सफवान बिन सुलैम यांचे म्हणणे आहे की प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, "ऐका! ज्याने कोणत्या व्यक्ती किंवा एका समूहाशी जर करार केला असेल आणि नंतर त्यावर अत्याचार केले किंवा त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त बोजा टाकला किंवा त्याची संमती नसताना त्याच्याकडून काही बळकावले तर मी कयामतच्या दिवशी अशा व्यक्तीकडून वकील म्हणून उभा राहीन." (अबू दाऊद, मिश्कात)
हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी हे जाहीर केले आहे की "ज्या लोकसमूहातील लोक एकमेकांशी दगा करतील, ज्या लोकसमूहात लैंगिक अपराध वाढत जातील, त्या लोकसमूहाचा विनाश होईल. ज्या समूहात लोक माप-तोलमध्ये कमी-जास्त करतील त्या समूहासाठी उपजीविकेची साधनं घटत जातील. ज्या लोकांमध्ये अन्यायकारक निर्णय घेतले जातील तिथे रक्तपात घडणारच आणि जे लोक एकमेकांचे वचन पाळणार नाहीत त्यांच्यावर शत्रू ताबा मिळवील." (मिश्कात)
जेव्हा अल्लाहचजे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर एखाद्या कर्जदाराचे अंतिम विधी करण्यासाठी आणले जायचे तेव्हा प्रेषित विचारत होते की मयताने आपल्या कर्जाच्या परतफेडीसाठी आपल्या मागे काही माल सोडला आहे काय? आणि याच्या उत्तरादाखल लोकांनी हो म्हटले तर त्याची जनाजाची नमाज अदा करत असत. नंतर जेव्हा इस्लामी राज्य विस्तारत गेले तेव्हा प्रेषितांनी आपल्या प्रवचनात म्हटले की "मी मुस्लिमांशी त्यांच्या प्राणांपेक्षा अधिक जवळचा आहे. जर कुणा मुस्लिमाने आपल्या मागे काही कर्ज सोडले असेल तर मी त्याची परतफेड करेन आणि जर कुणी मालमत्ता सोडली असेल तर त्याचे वारस त्याचे नातेवाईक असतील." (बुखारी, मुस्लिम, मिश्कात)
संकलन :
सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment