Halloween Costume ideas 2015

प्रजासत्ताक अबाधित ठेवण्याचे आव्हान

राज्यघटना कितीही चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले नसतील तर ती वाईटच ठरते, राज्यघटना कितीही वाईट असली तरी त्याची अमलबजावणी करणारे चांगले असतील तर ती चांगलीच सिद्ध होईल. - डॉ. बाबासाहेब आंबेडकरइंग्रजांच्या जुल्मी राजवटीला कंटाळून भारत दारूल हरब (शत्रु राष्ट्र) असल्याचा पहिला फतवा शाह अब्दुल अजीज यांनी 1804 साली दिला आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला सुरूवात झाली. इंग्रजांनी मुस्लिमांकडून सत्ता हिसकावली होती म्हणून मुस्लिमांनी ती पुन्हा प्राप्तीसाठी पुढाकार घ्यावा हे नैसर्गिक होते. मुठभर इंग्रजाळलेल्या लोकांना वगळता बाकी सर्व देशबांधवांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले आणि स्वातंत्र्याची पहाट उगवली.

1950 साली एक सुंदर राज्यघटना अस्तित्वात आली. तत्पूर्वी स्वतंत्र भारत कसा असावा? यासाठी प्रत्येकाने आपापल्या परिने स्वप्न पाहिले होते. म. गांधीनी दै. हरीजन मध्ये आपले स्वप्न प्रकाशित केले होते की स्वतंत्र भारतातील राज्यकर्ते ह.उमर फारूख रजि. सारखे उपभोगशुन्य स्वामी असावेत.73 वर्षाच्या पोक्त प्रजासत्ताकाने त्या स्वप्नांशी कितपत न्याय केला? याचा धावता आढावा घेण्यासाठी हा संक्षिप्त लेखन प्रपंच.         

1947 साली झालेल्या विभाजनातून दोन देश निर्माण झाले एकाने इस्लामची वाट धरली व त्याला पृथ्वीवरील सर्वात सुंदर इस्लामी राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहिले. दुसऱ्याने धर्मनिरपेक्षतेची वाट धरली आणि जगत्गुरू होण्याचे स्वप्न पाहिले. पण दुर्देवाने आज 73 वर्षानंतर दोन्ही देशांच्या प्रजासत्ताकात त्यांचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मदतीवर जगणारे एक अपयशी राष्ट्र म्हणून उदयास आले. अण्वस्त्राशिवाय गर्व करावा असे काही त्याला प्राप्त करता आले नाही. सुदैवाने भारताचे मात्र तसे झाले नाही. आपला देश जगद्गुरू जरी झाला नसला तरी तो होण्याची पात्रता अजूनही बाळगून आहे. अनेक क्षेत्रात आपल्या देशाने जगद्गरू बणून दाखविले आहे. जगाचे आय.टी. क्षेत्र भारतीय संगणक अभियंत्याच्या जीवावर चालू आहे. करायला आपण मंगळावर स्वारी केलेली आहे, बुलेट ट्रेन येऊ घातलेली आहे आपणही अण्वस्त्र संपन्न झालोय.

ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानामध्ये आपली झेप जगाला दखल घेण्यास भाग पाडणारी ठरली आहे यात वाद नाही. मात्र अनेक बाबतीत चिंता करावी लागेल अशा स्थितीचाही आपल्याला सामना करावा लागत आहे. राजनीति व्यवसाय झाल्यामुळे सगळ्यात चिंताजनक स्थिती आपल्या राजकीय व्यवस्थेत निर्माण झालेली आहे. एव्हाना एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की विकास त्यांचाच होणार, ज्यांची सरकारे तयार करण्यामध्ये किंवा ती पाडण्यामध्ये काही ना काही भुमीका असेल. राजकारणाचा ज्यांच्याशी पाच वर्षातून एकदा संबंध येतो त्यांचा विकास होणार नाही.

पूर्वी काही निवडक औद्योगिक घराणे देशातील राजकीय पक्षांचा खर्च चालवित. आपल्या नफ्यातून, चॅरिटी म्हणून धन देत. मात्र गेल्या 73 वर्षात त्यांच्या लक्षात आले आहे की राजकारण एक हमखास नफा देणारा उद्योग सुद्धा आहे. म्हणून जवळ-जवळ सर्वच औद्योगिक घराणेच नव्हे तर व्यापारी घराणे सुद्धा अगदी ठरवून राजकीय पक्षांत गुंतवणूक करीत आहेत. मग सहजच त्या पक्षांमध्ये गुंतवणूक जास्त होते. ज्यांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. या गुंतवणूक व्यवसायाचा अंदाज येण्यासाठी फार मोठी ’रिसर्च’ करण्याची गरज नाही. त्यात पुन्हा निनावीनिवडणूक बाँड आणून सरकारने काळा पैसाही राजकारणात वापरण्यास सुरूवात करून एक वाईट पायंडा पाडला आहे.  

ऑक्सफाम चा रिपोर्ट  

याच आठवड्यात प्रकाशित झालेला ऑक्सफामचा अहवाल भारतातील टोकाची आर्थिक विषमता आणि त्यात कशी वाढ होत आहे हे दर्शवतोय. 

1) 2020 मध्ये भारतात 102 बिलियनेअर्स (किमान 8000 कोटी रुपये संपत्ती असणारे) होते 2022 मध्ये तो आकडा 166 वर गेला.

2) भारतातील 166 बिलियनेअर्स, कोविड सुरु झाल्यापासून दिवसाला 3608 कोटी रुपये कमावत होते. 

3) भारतातील 10 सर्वाधिक श्रीमंतांची संपत्ती एका वर्षात 27.52 लाख कोटी रूपयांनी वाढली. 

4) 21 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची संपत्ती, 70 कोटी भारतीयांच्या संपत्तीइतकी आहे. 

5) भारतातील श्रीमंत 1%(1 कोटी 40 लाख) व्यक्तींची संपत्ती देशाच्या एकूण संपत्तीच्या 40% पेक्षा जास्त आहे. 

6) श्रीमंत 5% (7 कोटी)व्यक्तींची संपत्ती देशाच्या 60% संपत्तीपेक्षा जास्त आहे. 

7) वरच्या 30% (42 कोटी) नागरिकांकडे देशाची 90% संपत्ती आहे. 

8) उलट भारतातील तळाच्या 50% (70 कोटी)लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीच्या फक्त 3% संपत्ती आहे.

9) अंदाजे 23 कोटी नागरिक कमालीच्या (कमळीच्या) दारिद्र्यात राहत आहेत.  

10)  पण एकूण जीएसटी पैकी 64% टक्के जीएसटी तळाच्या 50% जनतेकडून तर फक्त 4% कर वरच्या 10% श्रीमंतांकडून जमा होतो. म्हणजे मध्यमवर्गीय व्यक्तींकडून जमा होणारा कर अतिश्रीमंतांपेक्षा जास्त आहे. शिवाय इतर कर सवलती , कॉर्पोरेट टॅक्स मध्ये सूट वगैरे आहेच. मोदीसरकारने कॉर्पोरेट टॅक्स 30% वरून 22% केला आणि तूट भरून काढण्यासाठी इंधनावर कर वाढवले. जीएसटी चे वाढीव कर जनतेवर थोपवले.देशातील अतिश्रीमंतांवर अतिरिक्त कर आकारणी करण्याची  सूचना अनेकांकडून, अनेकवेळा करण्यात आली आहे. परंतु सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. भारतात गर्भश्रीमंतांच्या संपत्तीवर 2% करआकारणी केल्यास, एका वर्षातील करउत्पन्नातून, देशातील कुपोषित नागरिकांना पोषक आहार 3 वर्ष देता येऊ शकतो. 

कॉर्पोरेट क्षेत्राला दिलेल्या सवलतीचे उदाहरण म्हणजे  2017 ते 2021 पर्यंत फक्त गौतम अदानीकडून कररूपी उत्पन्नातून 1.79 लाख कोटी असू शकणार होते, जे नाही मिळाले. ही देशातील भयानक विषमतेची झलक आहे. धर्माच्या, द्वेषाचा गांजा मारून तहान भूक विसरून भ्रमित प्रजेच्या झुंडी बनलेल्यांना हा देश ’फक्त श्रीमंतांच्या राहण्यासाठी योग्य’ बनण्याच्या ’शेवटच्या टप्प्यात’ आहे हे थोडेच कळणार? असे प्रख्यात मराठी विचारवंत सुरज सामंत यांनी ऑक्सफामच्या ताज्या अहवालावर प्रतिक्रिया देतांना म्हटलेले आहे. 

नोटबंदी व जीएसटीच्या त्रुटीपूर्ण अंमलबजावणीचा फटका ही गरीब लोकांना व छोट्या व्यापार्यांना बसला आहे. बँका तुडूंब भरलेल्या आहेत मात्र लोकांचे खीसे रिकामे आहेत. अनेकांचे छोटे-छोटे व्यवसाय बंद पडलेले आहेत. सीएसटी आणि जीएसटीमध्ये औषधांना सुद्धा वगळण्यात आलेले नाही. सरकारी रूग्णालयात औषधे मिळत नाही, खाजगी दुकानातून औषधी घेता येत नाही अशा अभूतपूर्व स्थितीत सामान्य माणूस अडकलेला आहे.

मोठ्या उद्योगपतींनी व व्यापाऱ्यांनी जेव्हा अब्जावधींची गुंतवणूक ’राजकीय उद्योगात’ केली असेल तेव्हा सरकार निश्चितपणे त्यांचेच हित पाहणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची गरज नाही. कारखानदारी मध्ये वेगाने होत असलेल्या यांत्रिकी करणामुळे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. सरकारी क्षेत्रात आऊट सोर्सिंग जोरात सुरू आहे. 

आज उद्योगपती व्यापारी यांना इतर उद्योगात जेवढी जोखीम आहे त्यापेक्षा अर्धी जोखीम ही ’राजकीय उद्योगात’ नाही. यामुळे व हमखास नफ्याची खात्री असल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत या लोकांची गुंतवणूक वाढत जाणार आहे. हीच खरी प्रजासत्ताक भारतात सर्वाधिक चिंतेची बाब आहे. असे माझे मत आहे. यांच्या आणि राजकीय पक्षांच्या अभद्र युतीमुळे भविष्यात गरीब जनता आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच भीषण होणार आहे. लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा यांना प्रामाणिक बनवू शकलेल्या नाहीत. यावरून ही युती किती निबर आहे, याचा अंदाज यावा. जेव्हा प्राचीन भारताच्या श्रेष्ठ राजकीय परंपरेत स्वतःला व्यापारी म्हणविण्यात गौरव मानणारे राजकारणी व जनतेपेक्षा स्वतःच्या नफ्याला महत्व देणारे नवउद्योगपती एकत्र येतील तर आपले गणतंंत्र ही युरोप व अमेरिकेच्याच दिशेने जाईल, ज्यात गरीब अधिक गरीब व श्रीमंत अधिक श्रीमंत होईल, याची खात्री वाटते.

आश्चर्य म्हणजे देशाच्या या ढासळत्या राजकीय मुल्यांची कुणालाच फारशी काळजी नाही. शेवटी या देशात जुल्मी म्हणून गणल्या गेलेल्या व भारतावर ज्याने 50 वर्षे एकछत्री राज्य केले, ज्याच्या सल्तनतीमध्ये सध्याच्या भारताशिवाय अफगानिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, बर्मा, नेपाळ, भुटान, सिक्कीम, कंबोडीया सामिल होते. असा राजा आलमगीर औरंगजेब (रहे.)यांच्या मृत्यूपत्रातील कांही ओळी वाचकांच्या सुपूर्त करतो.

मेरी सी हुई टोपियों की कीमत मे से 4 रूपये 2 आणे महालदार, ’आया बेगा’ के पास हैं. उस रकम को लेकर उसे बेसहारा इन्सान पर चादर डालने में सर्फ (खर्च) करो. मेरी जाती खर्च की तहेसील में कुरआन नक्ल करने के मेहनताने के 350 रूपये हैं. मेरी मौत के दिन उन्हें फकीरों में तकसीम करना.चूं के शिया फिरका कुरआन को नकल करके रकम हासिल करने को नाजायज समझता है इसलिए उस रकम को मेरे कफन की चादर वगैरा पर खर्च न किया जाए. मजहब की राह को छोडकर गुमराही की राह में भटकनेवाले मुझ आवारा को नंगे सर दफनाना. क्यूं के शहेंशाह-ए-कबीर (खुदा) के हुजूर सर बरहना (खुले सर) हाजीर होनेवाला हर गुनाहगार यकीनन रहेम का मुस्तहेक करार पाता है  (संदर्भ : अहेद-ए-आलमगीर के दरबारी अखबार, लेखक अ‍ॅड. सय्यद शाह गाजीयोद्दीन पान क्र. 2)

         या एकेकाळच्या भारताच्या राजाच्या या मृत्युपत्रावरून आपल्याला कल्पना येईल की राजकारण उद्योग नाही तर सेवा आहे व राजकीय लोकांचे चारित्र्य कसे असावे? शासनकर्ते हे उपजतच नीतिमान असावे लागतात. मग ते राजेशाहीत असो का लोकशाहीत. प्राचीन भारतीय राजसत्तेने अनेक नीतिमान राज्यकर्ते जन्माला घातले पण 73 वर्षाच्या प्रजासत्ताकाने अनीतिमान राज्यकर्त्यांची एक सर्व पक्षिय टोळीच जन्माला घातली. अनीतिमान राजकारणाच्या या बजबजपुरीत नीतिमान राजकारण देण्याची जबाबदारी मुस्लिमांची आहे. ती देण्यास आपण सुद्धा अयशस्वी झालेले आहोत. प्रजासत्ताक भारतात जेवढे मुस्लिम राजकारणी झाले त्यापैकी कोणताही नेता इस्लामी राजकारणाच्या नीतिमत्तेच्या उंचीवर पोहोचला नाही हे सुद्धा मान्य करावेच लागेल. प्रजासत्ताक जसा-जसा प्रौढ होत जाईल तसा- तसा त्याचे मोठ्या उद्योगात रूपांतर होत जाईल. म्हणून आपल्या प्रिय भारत देशाच्या राजकारणामध्ये स्वच्छ आणि नैतिक राजकारण देण्याची जबाबदारी उचलण्याची अल्लाह रब्बुल इज्जत आपल्या सर्वांना समज देवो. (आमीन.)

- एम.आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget