Halloween Costume ideas 2015

नवीन वर्षाचे संकल्प

संकल्प करून काम केल्यामुळे आयुष्य किती छोटे आणि करावयाचे काम किती मोठे आहे, याचा आपल्याला अंदाज येतो.


जानेवारी 2023 पासून नवीन ख्रिस्ती वर्षास सुरूवात झालेली आहे, ज्याचे स्वागत 3 प्रकारे केले जाते. पहिल्या प्रकारात ते लोक असतात जे स्थितप्रज्ञ असतात. त्यांना नवीन वर्षाच्या येण्याजाण्याने काही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी 1 जानेवारी हा दिवस सामान्य दिवस असतो. दूसरे लोक ते असतात जे 31 डिसेंबरच्या रात्री खूब धमाल करतात आणि उत्साहाच्या भरात नवीन वर्षासाठी काही रेझ्युलेशन्स (संकल्प) करतात. पण ते संकल्प फारसे टिकत नाहीत. जानेवारी अखेर पर्यंत त्या संकल्पनांचा फज्जा उडतो. तिसऱ्या प्रकारची माणसं ती असतात जे सरत्या वर्षाचा गोषवारा मनोमनी जुळवून अगदी गंभीरपणे नवीन वर्षासाठी योजना आखतात आणि काही संकल्प करतात. या तिसऱ्या प्रकारच्या माणसांच्या मार्गदर्शनासाठीच हा लेखन प्रपंच. 

एक जानेवारी रोजी प्रेषित येशू ख्रिस्त (त्यांच्यावर शांती होओ) यांचा जन्म झाला होता. वडिलाविना झालेले ते मरियमपुत्र एकमेवाद्वितीय असे होते. ही एवढी मोठी घटना होती की त्यांच्या जन्मापूर्वी (इ.स.पू) व त्यांच्या जन्मानंतर (इ.स.नं.) असे कालखंडाचे दोन भाग पडले. या कालगणनेला आज जागतिक मान्यता मिळालेली आहे. मागच्या वर्षी आपण काय मिळविले, काय गमविले याचा हिशोब करणे व नवीन वर्षाचे काही संकल्प करणे शहाणपणाचे लक्षण आहे. मागच्या वर्षी काय मिळविले आणि काय गमविले हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. म्हणून त्याला बाजूला ठेऊन केवळ नवीन वर्षामध्ये काय संकल्प करायला हवेत यासंबंधी चर्चा करण्यापुरताच हा लेख मर्यादित ठेऊया. संकल्प करण्यापूर्वी प्रत्येकाने दोन पातळीवर विचार करावा. एक व्यक्तीगत पातळीवरील संकल्प, दोन सामुहिक पातळीवरील संकल्प. विशेष म्हणजे हे संकल्प लिहून घ्यावेत व रोज डोळ्यासमोर राहतील याची व्यवस्था करावी. कारण असा अनुभव आहे की, जी गोष्ट दृष्टीआड होते माणसाला तिचा विसर पडतो. मनोमन केेलेल्या संकल्पापेक्षा लिखित संकल्प पूर्णत्वास जाण्याची संकल्पना 17 टक्के अधिक असते, असा मानसशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. 

चंगळवादी संस्कृतीच्या प्रभावामुळे लोक आजकाल आयुष्याला फारसे गंभीरपणे घेत नाहीत. साधारणतः लोक आलेला दिवस ढकलण्यात विश्वास ठेवतात. मात्र मोठे वैज्ञानिक, खेळाडू, उद्योगपती, लेखक, मोजके विद्यार्थी इत्यादी मात्र दरवर्षी योजनापूर्वक संकल्प करूनच आपल्या आयुष्याची वाटचाल करतात. संकल्प करून काम केल्यामुळे आयुष्य किती छोटे आणि करावयाचे काम किती मोठे आहे, याचा आपल्याला अंदाज येतो. इस्लामी इतिहासाचे एक प्रसिद्ध विद्वान इमाम शाफई या संबंधी एक महत्त्वपूर्ण टिपण नोंदवलेले आहे. ते असे की, ’’मी आयुष्याचे महत्त्व एका बर्फ विक्रेत्याकडून समजून घेतले आहे. जो बर्फाच्या लाद्या पुढ्यात ठेऊन ग्राहकांना उद्देशून ओरडत होता लोकहो माझा बर्फ घेऊन जा! बर्फ घेऊन जा! बघा माझे भांडवल वितळत आहे.’’ माणसाचे आयुष्य देखील बर्फासारखे क्षणोक्षणी वितळत आहे. पवित्र कुरआन आयुष्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी म्हणतो,  ’’जवळ येऊन ठेपली आहे लोकांच्या हिशोबाची घटका आणि ते गाफील आहेत. ’’ (सुरे अंबिया 21: आयत नं.1).

डोळे दिपवणाऱ्या आर्थिक प्रगतीने माणसाचे जीवनाविषयीचे गांभीर्य नष्ट करून टाकलेले आहे. ते गफलतीत पडले आहेत. ते असे जगत आहे जणू त्यांना कधीच मृत्यू येणार नाही. त्यांच्या ह्या जीवनशैलीमुळे ’नीड’ आणि ’डिझायर’ यातील सीमारेषा पुसली गेली आहे. ते प्रचंड खरेदी करत असतात. त्यामुळे महागाई वाढते आणि इतर लोकांना वस्तू खरेदी करता येत नाही. त्यात पुन्हा वेगवेगळे ’डे’ज साजरे करण्याचे जे टार्गेट उपभोक्तावादी मार्केटने लोकांना दिलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी लोक वेड्यासारखे वस्तू खरेदी करत असतात. यात व्यावसायिकांचे हित लपलेले असतात, हे अवाजवी खरेदी करणाऱ्यांच्या लक्षातच येत नाही. या ’डे’ज साजरे करण्यामध्ये किती श्रम, पैसा आणि मानवी तास वाया जातात याचा कोणालच अंदाज लागत नाही. यातून वाईटच निर्माण होते हे ही लोकांना कळत नाही. व्हॅलेंटाईन डेज चे सात दिवस व फ्रेंडशिप डे सारख्या तदन् फालतू उपक्रमांमधून युवा पीढिच्या चारित्र्याचे स्खलन होते. हे सत्य युवकांनाच नाही तर त्यांच्या आई-वडिलांच्याही लक्षात येत नाही. आपसात चढाओढ करून एकापेक्षा एक मोठे वाढदिवस साजरे करण्यामधून समाजामध्ये अनावश्यक स्पर्धा आणि इर्ष्या निर्माण होते, हे ही लोकांना कळत नाही. अशा प्रकारचे ’डे’ज साजरे करत असतांना स्त्री-पुरूषांचा पुन्हा-पुन्हा अनावश्यक संपर्क वाढतो व त्यातून अनेक गुंतागुंतीची नाती निर्माण होतात. ज्यांचा परिणाम जीवनामध्ये तणाव आणि शेवट अपराधामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. दर 31 डिसेंबरला किती व कसा धिंगाना घातला जातो हे सर्वांना विदित आहे. यावर्षी 31 डिसेंबरला दिल्लीच्या सुलतानपुरीमध्ये कसा अपघात झाला याची माहितीही एव्हाना सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. म्हणून असे प्रकार टाळण्यासाठी येत्या वर्षात गंभीरपणे काही संकल्प करण्याची गरज आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे संकल्प असू शकतात. नमुन्यासाठी म्हणून काही संकल्पांचा खाली उल्लेख करीत आहे. 

अनावश्यक खर्च करणार नाही

पत्नी आणि मुलांचा आग्रह टाळता येत नसल्यामुळे जाहिरातींना भुलून किंवा 50 टक्के प्राईस ऑफ सारख्या ऑफर्स जेव्हा बाजार आणि मॉल्समध्ये दृष्टीस पडतात तेव्हा अनेक माणसं आवश्यकता नसतांना केवळ स्वस्तात मिळत आहेत म्हणून अनेक वस्तू भविष्यात कामाला येतील म्हणून खरेदी करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. ही अनावश्यक खरेदी करणार नाही असा खंबीरपणे संकल्प करण्याची हीच खरी वेळ आहे. अनावश्यक खरेदीसारखाच अनावश्यक पर्यटनाचाही प्रकार अलिकडे फोफावला आहे. ऋण घेऊन सण साजरे करणे किंवा पर्यटन करणे ही पाश्चात्यांची जीवनशैली आहे आपली नव्हे. आपल्या संस्कृतीत आहे त्यात समाधानी राहणे आणि त्यातूनही शक्य तेवढी बचत करणे ही संकल्पना आहे. जी की आता मागे पडत आहे. पर्यटनाला माणसाच्या जीवनात महत्त्व नाही असे मुळीच नाही. मात्र आपल्या आवश्यक गरजा डोळ्यासमोर स्पष्ट दिसत असतांना केवळ लोकांना दाखविण्यासाठी म्हणून पर्यटनावर अनाठायी खर्च करणे शहाणपणाचे लक्षण नाही. यासंदर्भात पवित्र कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’ हे आदमचे वंशज, प्रत्येक उपासनेच्या वेळी यथायोग्य पोषाख परिधान करा. आणि खा, प्या परंतु मर्यादांचे उल्लंघन करू नका, अल्लाह मर्यादेच्या बाहेर जाणाऱ्याना पसंत करीत नाही.’’   (सुरे अलआराफ 7: आयत नं.31)

’’वायफळ खर्च करणारे सैतानचे बंधू होत, आणि शैतान आपल्या पालनकर्त्याशी कृतघ्न आहे’’ (सुरे बनी इस्राईल 17: आयत नं.27). या संदर्भात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनीही अनाठायी खर्च करण्यापासून वाचण्याची अनेकवेळा ताकीद केलेली आहे. विस्तारभयामुळे त्या अहादीस (प्रेषितांचे मार्गदर्शन) चा उल्लेख या ठिकाणी टाळतोय. 

लोक हो...! जरा विचार करा फालतूचा खर्च करून ईश्वराच्या नजरेत सैतानाचा भाऊ बनणे तुम्हाला पसंत आहे का? लोक हो...! लक्षात ठेवा जी व्यक्ती आपल्या मिळकती आणि खर्चामध्ये संतुलन साधू शकत नाही ती लवकरच कंगाल होऊन जाते. मग मोठ्या दराने कर्ज घेण्याशिवाय तिच्याकडे पर्याय राहत नाही. आणि एकदा का व्यक्ती कर्जाच्या सापळ्यात अडकली की मग ती त्यातच गुरफटत जाते. अनेक लोक आयुष्यभर कर्जावरचे व्याज फेडत-फेडत मरून जातात. मूळ कर्ज त्यांच्या मुलांना फेडावे लागते. त्यासाठी त्यांना घरदार, शेतीबाडी विकावी लागते. म्हणून पहिला संकल्प नवीन वर्षानिमित्त अत्यावश्यक गरजांवरच खर्च करायचा आणि शक्यतेवढी बचत करायची, हा करा. यातून तुमचा फायदा होईल. त्यातही बचत करतांना सोन्याच्या स्वरूपात करण्याला प्राधान्य द्या. कारण सरकारच्या कृपेने रूपयाचे रोज अवमुल्यन होत आहे. त्यामुळे रूपयात केलेली तुमची बचत काही काळानंतर मूल्यहीन होण्याचा धोका आपल्या सर्वांसमोर आहे. नोटबंदी भलेही सर्वोच्च न्यायालयाने उचित ठरविली असली तरी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे यावर्षीही रूपयाचे अवमूल्यन सुरूच राहणार यात शंका नाही. त्यात पुन्हा आयएमएफने जगाचे 33 टक्के लोक यावर्षी मंदीमुळे प्रभावित होणार असे भाकित केले आहे. त्यात पुन्हा हे वर्ष लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीचे वर्ष आहे. त्यामुळे कठोर आर्थिक धोरण सरकारला राबविता येणार नाही हे ओघानेच आले. त्यामुळे महागाई वाढणार हे निश्चित.

कुटुंबाला वेळ द्या

साधारणपणे भारतीय पुरूष पैसा कमाविण्याच्या नादामध्ये आपल्या कुटुंबाला आणि त्यातल्या त्यात वृद्ध आई-वडिलांना फारसा वेळ देत नाहीत. यावर्षी या लोकांना ठरवून वेळ देण्याचा संकल्प करा. रोज त्यांच्यासोबत थोडावेळ घालवा. त्यांच्या गरजा, त्यांच्या भावना समजून घ्या. वृद्ध आई-वडिलांचे म्हणणे ऐकूण घेतल्यामुळे तुमचे भावविश्व समृद्ध होईल, हे लक्षात घ्या. त्यांच्याशी बोलतांना मोबाईल स्वीचऑफ राहील याची दक्षता घ्या. विषय असो, नसो पण त्यांच्यासोबत थोेडावेळ जरूर घालवा. शक्य तेवढी त्यांची सेवा करा. जुन्या आठवणींना उजाळा द्या. वाढत्या हृदयघाताच्या प्रकरणांमुळे आयुष्य कधी संपेल याचा नेम नाही. म्हणून कुटुंबासोबत रोज थोडा वेळ घालविणे तुम्हाला आणि मला गरजेचे झालेले आहे, हे लक्षात ठेवा. 

महागडे निकाह आणि निकाहमधील जेवण

लॉकडाऊन संपल्याबरोबर महागडे निकाह सोहळे पुनःश्च सुरू झालेले आहेत आणि निकाहमध्ये पंचपक्वाने तयार करण्याची चुकीची पद्धत नव्याने पुन्हा सुरू झालेली आहे. यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. ज्या मुलींचे वडिल गरीब आहेत त्यांच्याकडे स्थळच जाईनासे झालेले आहे. त्यामुळे 30-30, 35-35 वर्षांपर्यंत मुली अविवाहित राहत आहेत. यासाठी तुम्ही, मी महागडे निकाह करणारे, उलेमा, काझी अर्थात सर्वच मुस्लिम समाज जबाबदार आहे. आता वेळ आलेली आहे की अशा महागड्या निकाह सोहळ्यांचा मूक बहिष्कार करण्याचा, आपण सर्व मिळून हा संकल्प करूया. सामाजिक किंवा वैयक्तिक संबंधांमुळे एखाद्या समारंभाला हजर राहणे गरजेचेच असेल त्या ठिकाणी हजर रहा, मात्र कुठल्याही आग्रहाला बळी न पडता जेवण करणार नाही, अशी ताठर भूमिका घ्या. 

लोक हो...! आपल्या प्रिय प्रेषित सल्ल. यांनी कधीही निकाहचे जेवण केल्याचा दाखला त्यांच्या दैदिप्यमान आयुष्यात मिळत नाही. तर मग आपण कोण टिकोजी लागून गेलो जे पोटभरून निकाह सोहळ्यामध्ये निर्लज्जपणे खात आहोत. लक्षात ठेवा निकाहला सोपे करण्यासाठी निकाहच्या जेवणाचा (जरी ते हराम नसले तरी) मूक बहिष्कार करणे आज समाजाची गरज बनली आहे. कारण ही प्रथा रूढ झाल्यामुळे ऐपत नसतांनाही अनेक मुलींच्या बापांना कर्ज घेऊन अशा जेवणावळी उठवाव्या लागत आहेत. ही एक सामाजिक विकृती आहे, जिला नष्ट करण्यासाठी यावर्षी दृढपणे संकल्प करण्याची गरज निर्माण झालेली आहे. या शिवाय, टीव्ही आणि मोबाईल पाहण्यामध्ये आपले दैनंदिन किती तास जात आहेत, याचा मनोमन हिशोब करून ते तास कमीत कमी कसे होतील व त्यावर पाहत असलेली सामुग्री ही आपल्या व्यक्तीमत्त्वाच्या विकासासाठी उपयोगी राहील हे पाहणे गरजेचे झाले आहे. म्हणून यावर कठोर नियंत्रण करण्याचा संकल्पही करणे गरजेचे झालेले आहे. टीव्हीवरील फालतू डिबेट्सचा तर जाणीवपूर्वक एकतर्फी बहिष्कार करणे गरजेचे झालेले आहे. याशिवाय, जमाअते इस्लामी हिंदचे वरिष्ठ सदस्य मौलाना मोहियोद्दीन गाझी यांनी नवीन वर्षासाठी खालीलप्रमाणे संकल्प करण्याची ताकीद केलेली आहे. त्याकडेही लक्ष दिल्यास हे वर्ष आपल्यासाठी अत्यंत उपयोगी राहील, यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही. 

1. अंतःकरणाचे शुद्धीकरण करत रहा. 

2. कुरआन नियमितपणे समजून वाचा आणि वाचलेल्या भागावर चिंतन, मनन करा. 

3. अल्लाहशी आपला संपर्क दृढ करा 

4.सामान्य लोकांना मदत करण्याची संधी शोधत रहा. 

5. चांगली पुस्तकं वाचा. 

6. आपल्या परिवार आणि नातेवाईकांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्याशी सातत्याने प्रेमाचे वर्तन करा. 

7. आपल्यापेक्षा वयाने छोट्या लोकांमध्ये चांगल्या सवयी रूजविण्यासाठी प्रयत्नशील रहा व त्यांचे चारित्र्य संवर्धन करण्याकडे लक्ष द्या. 

8. इस्लामचा परिचय इतर लोकांना करून देण्याची कोणतीही संधी वाया घालू नका. 

9. नियमितपणे व्यायाम करा. 

10. आपली योग्यता सातत्याने वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्न रहा. 


शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, ऐे अल्लाह, ’’ हे वर्ष मला, तुम्हाला व सर्व देशबांधवांना सुखा  समाधानाचे जाओ आणि माझा हा प्रिय देश एका नव्या ताकदीने पुनःश्च भरारी घेओ ’’ आमीन. 

- एम. आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget