(२०) आणि त्यांचे वर्तन असे असते की अल्लाहशी केलेल्या आपल्या वचनांची ते पूर्तता करतात आणि त्याची भक्कम बांधिलकीनंतर तोडून टाकत नाहीत.३७
(२१) त्यांचे वर्तन असे असते की अल्लाहने ज्या ज्या संबंधांना कायम राखण्याची आज्ञा दिली आहे३८ त्यांना कायम ठेवतात. आपल्या पालनकत्र्याला भितात आणि या गोष्टीचे भय बाळगतात की एखादे वेळी त्यांच्याकडून वाईट प्रकारे हिशेब घेतला जाऊ नये.
(२२) त्यांची अवस्था अशी असते की आपल्या पालनकत्र्याच्या प्रसन्नतेकरिता संयमाने वागतात,३९ नमाज कायम करतात, आमच्या दिलेल्या उपजीविकेतून उघड व गुप्तपणे खर्च करतात आणि वाईटाला भलाईने नाहीसे करतात.४० परलोकाचे घर याच लोकांसाठी आहे.
(२३,२४) अर्थात अशी उद्याने जी त्यांची चिरकालीन निवासस्थाने असतील. ते स्वत:देखील त्यांच्यात प्रवेश करतील व त्यांचे वाडवडील व त्यांच्या पत्नीं आणि त्यांच्या संततीपैकी जे जे सदाचारी आहेत तेदेखील त्यांच्या समवेत तेथे जातील. दूत चोहोंबाजूंनी त्यांच्या स्वागताकरिता येतील. आणि त्यांना सांगतील, ‘‘तुम्हावर कृपा आहे.४१ तुम्ही जगात ज्याप्रकारे संयम पाळला त्यामुळे आज तुम्ही याचे हक्कदार ठरला आहात.’’ तर किती छान आहे हे परलोकाचे घर!
३७) म्हणजे ती आदिकालीन प्रतिज्ञा आहे जी अल्लाहने सृष्टीच्या आरंभीच सर्व मानवजातीपासून घेतली होती. ती प्रतिज्ञा म्हणजे `आम्ही सर्व फक्त तुझीच उपासना करु' (तपशीलासाठी पाहा सूरह ७, टीप १३४-१३५) ही प्रतिज्ञा समस्त मानवजातीपासून घेतली असल्याने प्रत्येकजण तिच्याशी बांधील आहे. अल्लाह मनुष्याला त्याच्या आईवडिलाकरवी जन्माला घालतो आणि त्याला लहानाचा मोठा करतो. अल्लाहच्या उपजीविकेवर पालनपोषण करणे, त्याच्या निर्मित वस्तूंना वापरात आणणे आणि त्याने दिलेल्या शक्तींना उपयोगात आणणे इ. सर्वामुळे मनुष्य अल्लाहच्या उपासनेत स्वयं बांधला जातो. या भक्तीबंधनाला तोडण्याचे धाडस कोणी बुद्धिवंत व कृतज्ञ मनुष्य करू शकत नाही. ही गोष्ट वेगळी आहे की चुकीने एखादा अपराध त्याच्या हातून घडतो.
३८) म्हणजे ते सर्व सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध ज्यांचे व्यवस्थित राहण्यावर मनुष्याच्या सामाजिक जीवनाचे हित व कल्याण अवलंबून आहे.
३९) म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षाना काबूत ठेवतात, आपल्या भावनांना आणि कल्पनांना सीमेत ठेवतात. अल्लाहच्या अवज्ञेत जे काही लाभ आणि स्वादाचे लोभ दिसतात त्यांना पाहून बेकाबू होत नाही. अल्लाहच्या आज्ञापालनात ज्या काही अडचणी आणि हानींना तोंड द्यावे लागते त्या सर्वांना ते सहन करतात. या दृष्टीने ईमानधारकाचे पूर्ण जीवन धैर्याचे (सब्र) जीवन असते. कारण तो ईश प्रसन्नतेच्या आधारावर आणि परलोकातील स्थायी (शाश्वत) परिणांमाच्या आशेवर जगात आत्मनियंत्रणाने काम घेतो. पापी कृत्याकडे मनाचा प्रत्येक कल तो धैर्याने मोडून काढतो.
४०) म्हणजे ते वाईटाचा मुकाबला वाईटाशी नव्हे तर भलाईने करतात. त्यांच्यावर कोणी कितीही अत्याचार करोत ते उत्तरात अत्याचार नव्हे तर न्यायच करतात. कोणी त्यांच्याविरुद्ध कितीही खोटे बोलो ते उत्तरात सत्य बोलतात आणि कोणी त्यांच्याशी कितीही बेईमानी करोत ते उत्तरात ईमानदारीनेच काम घेतात. याच संदर्भात एका हदीसमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) सांगतात, ``तुम्ही आपल्या व्यवहाराला लोकांच्या व्यवहाराच्या आधीन बनवून ठेवू नका. असे म्हणणे चूक आहे की लोक जर भलाई करतील तर आम्ही भलाई करू आणि लोक अत्याचार करतील तर आम्हीसुद्धा अत्याचार करू. तुम्ही स्वत:ला नियमबद्ध बनवा. जर लोक सदाचार करतील तर तुम्ही सदाचार करा आणि लोक तुमच्याशी दुर्व्यवहार करतील तर तुम्ही अत्याचार करू नका.'' याच अर्थात ती हदीस ज्यात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``माझ्या पालनकर्त्याने मला नऊ आदेश दिले आहेत.'' यातील चार आदेश पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, `मी कोणाशी खूश असो अथवा नाराज, प्रत्येक स्थितीत न्यायानेच वागेन. जो माझे हक्क हिरावून घेईल मी त्याचा हक्क देईन. जो मला वंचित करेल मी त्याला प्रदान करीन, जो माझ्यावर अत्याचार करील मी त्याला माफ करीन.' याच संदर्भात एका हदीसमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, `जो तुझ्याशी अपहार करील तू त्याच्याशी अपहार करू नकोस.' माननीय उमर (रजि.) यांचे कथन आहे, `जो माणूस तुझ्याशी मामला करण्यात (व्यवहारात) अल्लाहचे भय बाळगत नाही, त्याला शिक्षा देण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे तू त्याच्याशी अल्लाहचे भय बाळगत व्यवहार करीत जावे.'
४१) याचा अर्थ हाच नाही की फरिश्ते चोहोबाजूंनी येऊन त्यांना सलाम करतील तर हेसुद्धा आहे की फरिश्ते त्यांना शुभवार्ता देतील की तुम्ही अशा ठिकाणी आला आहात जेथे तुमच्यासाठी समृद्धीच समृद्धी आहे. आता येथे तुम्ही प्रत्येक आपत्तीपासून, कष्टापासून, संकटापासून आणि धोक्यापासून सुरक्षित आहात. (तपशीलासाठी पाहा सूरह १५, टीप २९)
Post a Comment