Halloween Costume ideas 2015

व्यसनमुक्तीशिवाय शक्तीशाली होणे अशक्य

एक पोलिस अधिकारी म्हणून मी माझ्या कारकिर्दीमध्ये जेवढ्या लोकांना अटक केली त्यापैकी गुन्हा करतांना बहुतेक लोकांनी दारू पिलेली होती, असा माझा अनुभव आहे. याचे महत्त्वाचे कारण जे माझ्या लक्षात आले ते हे की, साधारणपणे सामान्य माणूस गुन्हा करायला धजत नाही. गुन्हा करण्यासाठी जी अतिरिक्त उर्जा लागते ती दारूमुळे प्राप्त होते. 


साधारणतः दारूला विरोध करणारे लोक दारूबंदीची मागणी करत असतात. वास्तविक पाहता त्यांनी नशामुक्त भारताची मागणी करायला हवी. कारण दारू पेक्षाही पुढची पायरी अंमली पदार्थाच्या स्वरूपात समाजाने गाठली आहे. 

नोव्हेंबर रोजी अमेरिकेतून दिल्लीला येत असलेल्या विमानामध्ये शंकर मिश्रा (34) याने बिझनेस्नलास (विमानातील सर्वोच्च्नलास) मध्ये दारू पिऊन एका 70 वर्षीय वृद्ध महिलेवर लघवी केली. त्यानंतर याच आठवड्यात इंडिगोच्या दिल्लीहून पटणाला जाणाऱ्या विमानामध्ये (फ्लाईट क्र. 6 ई-6383) तीन मद्यधुंद तरूणांनी विमानामध्ये येथेच्च गोंधळ घातला. एअर होस्टेस आणि पायलट यांनाही मारहाण केली. तत्पूर्वी 31 डिसेंबरच्या रात्री येथेच्च दारू पिलेल्या पाच तरूणांनी आपल्या कारखाली एका 20 वर्षीय तरूणीला 12 कि.मी.पर्यंत फरफटत नेले ज्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या एकापाठोपाठ एक घडलेल्या या तीन घटनानंतर अचानकच दारू हा विषय चर्चेत आला. अनेकांची सहानुभूती पिडितांच्या बाजूने व्यक्त करण्यात आली. शाहरूख खानच्या मीर फाऊंडेशन आणि दिल्ली सरकार यांनी त्यात मरण पावलेल्या तरूणीच्या कुटुंबाला भरीव अशी मदत जाहीर केली. मद्यधुंद तरूणांवर गुन्हे दाखल करण्याची चहुबाजूंनी मागणी झाली. त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले, अटकही झाली. मात्र लक्षात घेण्याजोगी एक बाब ही आहे की कोणीही दारू बंद करा, अशी मागणी केली नाही. उलट केतकी चितळे या अभिनेत्रीने दारूचे महत्त्व विषद केले. यावरून भारतीय समाजाची दारूकडे पाहण्याची मनःस्थिती कशी आहे, याचा अंदाज वाचकांना येईल. मुळात आता हा विषय दारूच्या पुढे पोहोचलेला असून, ड्रग्सच्या विळख्यात भारतातील लोक मोठ्या प्रमाणात अडकले असल्याचा अंदाज मुंद्रा पोर्टवर टॅलकम पावडरच्या नावावर आलेल्या व पकडल्या गेलेल्या हजारो किलो ड्रग्सच्या घटनेवरून लक्षात येते. एखाद दुसरी खेप पकडली जरी गेली, नार्कोटिक्स विभागांनी एखाद दोन यशस्वी छापे जरी मारले तरी न पकडल्या गेलेल्या अंमलीपदार्थांचा पुरवठा देशात किती मोठ्या प्रमाणात होत असावा याचा फक्त अंदाजच करता येऊ शकतो. मक्का आणि मदिना ही दोन महानगर सोडली तर जगाच्या पाठीवर शंभर टक्के नशाबंदी असलेले एकही शहर नाही. सऊदी अरब, कतर, ओमान सारख्या काही खाडीच्या राष्ट्रांमध्ये सार्वजनिक ठिकाणी जरी दारू मिळत नसली तरी तारांकित हॉटेल्समध्ये विदेशी पर्यटकांसाठी ती नियंत्रित स्वरूपात का असेना उपलब्ध असते. बाकी जगात दारू पिणाऱ्यांची संख्या मोजता येण्यासारखी नाही. आपल्या देशात 21 टक्के पुरूष नियमितपणे दारू पितात, असा अंदाज एका सर्व्हेक्षणातून पुढे आलेला आहे. तर डॉ. अभय बंग (व्यसनमुक्ती समर्थक) यांच्या मते दारूचा पहिला घोट घेणाऱ्या पहिल्या चार लोकांपैकी एक केव्हा ना केव्हा दारूग्रस्त होतो. दारू पिणाऱ्या प्रत्येक सात लोकांपैकी एक निश्चितपणे दारूग्रस्त होऊन जातो. प्रत्येक दारूग्रस्तामागे किमान चार लोक त्याचे दुष्परिणाम भोगत असतात. याशिवाय, त्याच्या संपर्कात आलेल्या अनेक लोकांना त्याचा उपद्रव सहन करावा लागतो. 

एक पोलिस अधिकारी म्हणून मी माझ्या कारकिर्दीमध्ये जेवढ्या लोकांना अटक केली त्यापैकी गुन्हा करतांना बहुतेक लोकांनी दारू पिलेली होती, असा माझा अनुभव आहे. याचे महत्त्वाचे कारण जे माझ्या लक्षात आले ते हे की, साधारणपणे सामान्य माणूस गुन्हा करायला धजत नाही. गुन्हा करण्यासाठी जी अतिरिक्त उर्जा लागते ती दारूमुळे प्राप्त होते. एवढेच नव्हे तर दारू पिऊन वाहन चालविणे हे सुद्धा अपघाताच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे. याचा अनुभवही मला वाहतूक शाखेत काम करतांना आलेला आहे. दारू प्राशन केल्यामुळे भल्याभल्या लोकांचा तोल सुटतो. या संदर्भात एक प्रसिद्ध उदाहरण पंजाबच्या माजी पोलिस महासंचालकांचे देता येईल. केसीएस गिल हे पंजाबचे पोलिस महासंचालक होते. राज्यपालांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या एका मेजवाणीमध्ये त्यांनी दारूच्या अमलाखाली वरिष्ठ महिला आएएस अधिकारी रूपन देवल बजाज यांना अवांच्छित ठिकाणी स्पर्श करून त्यांचा विनयभंग केला होता. हे प्रकरण कोर्टापर्यंत गेले होते. साधारणतः दारूला विरोध करणारे लोक दारूबंदीची मागणी करत असतात. वास्तविक पाहता त्यांनी नशामुक्त भारताची मागणी करायला हवी. कारण दारू पेक्षाही पुढची पायरी अंमली पदार्थाच्या स्वरूपात समाजाने गाठली आहे. 

गाजलेली अमेरिकेची दारू बंदी

जगाच्या इतिहासात दारूबंदीचा सर्वात मोठा प्रयत्न आजपासून 102 वर्षापूर्वी अमेरिकेत करण्यात आला होता. अमेरिकेत 1920 साली 18 वी घटनादुरूस्ती करून दारूचे उत्पादन, वहन, विक्री, आयात आणि निर्यात या सर्वांवर बंदी लावण्यात आली होती. याचा असा परिणाम झाला की सरकारने दारूबंदीचा निर्णय घेताच त्या व्यवसायाचा ताबा गुन्हेगार टोळ्यांनी घेतला आणि त्यानंतर जो हाहाकार माजला व त्यात जी हानी झाली त्याचा तपशील या ठिकाणी नमूद करणे केवळ अशक्य आहे. फक्त एवढेच नमूद करतो की लाखो लोकांना अटक झाली, शेकडो लोकांना शिक्षा झाली, हजारो लोकांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाला व नाईलाजाने सरकारला शेवटी 1933 साली म्हणजे अवघ्या 13 वर्षात ही दारूबंदी उठवावी लागली. 

भारतातही अनेक राज्यात, अनेक वेळा दारूबंदीचे प्रयोग झाले. केरळमध्ये झाला, गुजरातमध्ये झाला, बिहारमध्ये झाला. एन.टी. रामाराव यांनी मुख्यमंत्री असताना आंधप्रदेशामध्ये हा प्रयोग करून पाहिला. महाराष्ट्रात वर्धा आणि चंद्रपूरमध्ये अनेक वर्षांपासून दारूबंदी होती ती चंद्रपूरमध्ये उठवावी लागली. गुजरातमध्ये सातत्याने विषारी दारू पिऊन लोक मरत असल्याच्या बातम्या येत असतात. जुलै 2022 मध्ये विषारी दारू पिऊन 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला तर डिसेंबर 2022 मध्ये बिहारमध्ये 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू दारूने झाला. दोन्ही राज्यात सर्व सरकारी मशिनरी झोकून देऊन सुद्धा दारूबंदी यशस्वी करता येत नाही, याचा हा अर्थ हा प्रश्न कायदा करून व प्रशासनाच्या मदतीने बळाचा वापर करून सोडविता येणे शक्य नाही. मग नाविलाजाने त्या ठिकाणचे अवलोकन करावे लागेल ज्या ठिकाणी दारूबंदीच नव्हे तर व्यसनमुक्ती गेल्या 1400 वर्षांपासून यशस्वीपणे राबविण्यात आलेली आहे. ते ठिकाण म्हणजे अरबस्तान. 

मदिनामध्ये 4 हिजरीमध्ये जेव्हा कुरआनमध्ये संपूर्ण नशाबंदीची आयत अवतरित झाली तेव्हापासून गेली 1441 वर्षे दारूच सोडा त्या ठिकाणी कुठलाच प्रकारचा नशा लोक करत नाहीत. हे केवळ कायदा करून नाही तर मनपरिवर्तन करून शक्य झाले आहे व मनपरिवर्तन कुरआनच्या आयतीमुळे झाले आहे. म्हणजे जी गोष्ट जगात कोणालाच साध्य करता आली नाही ती कुरआनने साध्य केली आहे. म्हणून साहजिकच या संदर्भात अधिक माहिती घेणे चुकीचे ठरणार नाही. कुरआनमध्ये नशाबंदीच्या संदर्भात एकूण चार आयती अवतरित झालेल्या आहेत. 

1. ’’हे श्रद्धावानांनो, जेव्हा तुम्ही नशेच्या स्थितीत असाल तेव्हा नमाजच्या जवळ जाऊ नका.’’  (सुरे निसा 4 : आयत नं. 43) 

2. हे श्रद्धावंतांनो, ही दारू आणि जुगार व वेदी आणि शकून ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, यांच्यापासून दूर राहा, आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.  (सुरे अलमायदा 5: आयत 90)

3. शैतानाची तर अशीच इच्छा आहे की दारू व जुगाराद्वारे तुमच्यात शत्रुत्व व कपट निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहचे स्मरण व नमाजपासून रोखावे. मग काय तुम्ही या गोष्टीपासून अलिप्त राहाल?  ( सुरे अलमायदा 5: आयत नं. 91)

4. ’’ते तुम्हाला दारू आणि जुगाराविषयी विचारतात. त्यांना सांगा की दोन्हीमध्ये मोठा अपराध आहे. जरी त्यामध्ये लोकांसाठी काही लाभ आहे परंतु त्यांचा अपराध त्यांच्या लाभापेक्षा अधिक मोठा आहे. ते तुम्हाला विचारतात की काय खर्च करावा? सांगा की जे काही आवश्यकतेपेक्षा अधिक असेल. अशा प्रकारे अल्लाह तुम्हाला आपली संकेतवचने स्पष्ट करून सांगत आहे जेणेकरून तुम्ही चिंतन करावे भौतिक आणि मरणोत्त्तर जीवनाचे.‘‘  (सुरे बकरा 2: आयत नं. 219)

यातील क्रमांक 1 ची आयत ही इस्लामच्या सुरूवातीच्या काळात अवतरित झालेली आहे. त्यावेळेस पूर्ण नशाबंदीचा आदेश अवतरित झालेला नव्हता. त्यामुळेे आजही आयत वाचल्यानंतर असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की, इस्लाममध्ये दारू पिऊन नमाज अदा करता येत नाही. एरव्ही दारू पिल्या जाऊ शकते. परंतु असे नाही. जेव्हा बाकीच्या आयाती अवतरित झाल्या तेव्हा स्पष्ट झाले आहे की, इस्लाममध्ये नशा ’मुतलकन हराम’ म्हणजे पूर्णपणे निषिद्ध करण्यात आलेला आहे. याचसाठी तंबाखूला सुद्धा अनेक उलेमांनी हराम असल्याचे फतवे दिलेले आहेत. कारण तंबाखूने सुद्धा एका सौम्य प्रकारची नशा येते. 

2015 साली 37 मुस्लिम देशात दारूसंबंधी एक सर्व्हेक्षण करण्यात आले होते. तेव्हा 10 टक्के मुस्लिम नागरिकांनी या गोष्टीचा संकोच करत स्वीकार केला होता की, हां, इस्लाममध्ये दारू हराम आहे परंतु आम्ही कधी-कधी पितो. या 10 टक्क्यांना वगळले तरी ही गोष्टी समाधानकारक आहे की, 90 टक्के मुस्लिम जनता दारू पीत नाही. आणि ज्या समाजात 90 टक्के नागरिक नशा करत नाहीत तो समाज इतर वाईट कृत्यांपासून सहज सुरक्षित राहू शकतो. कारण प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी एकदा म्हटले होते की, ‘‘ दारू ही सर्व वाईट कृत्यांची जननी आहे’’. दारू पिणे जरी स्वतः एक वाईट कृत्य असले तरी ती पिल्यानंतर माणसामध्ये चुकीचा फाजील आत्मविश्वास उत्पन्न होतो आणि त्यातून तो अनेक गुन्हे करण्यासाठी धजावतो.  

एकंदरित वरील विवेचनावरून एक गोष्ट लक्षात येते की, इस्लामी श्रद्धेवर असलेल्या गाढ्या विश्वासाव्यतिरिक्त जगात दूसरी कुठलीच गोष्ट नाही जी माणसाला नशा करण्यापासून परावृत्त ठेऊ शकेल. शेवटी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, ’’ऐ अल्लाह! आम्हा सर्वांना नशेपासून लांब राहण्याची या देशाला नशामुक्त करण्यासाठी काम करण्याची प्रेरणा आणि शक्ती दे.’’ आमीन. 

- एम. आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget