प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की, "तुम्ही कष्टात असाल, दुःखदायक परिस्थितीत असलात तरी मरणाची इच्छा बाळगू नका. जर अशी परिस्थिती ओढवलीच तर असे म्हणा की, हे अल्लाह, जोवर मला जगणे बेहतर असेल तोवर मला जीवंत राहू दे आणि जेव्हा माझ्यासाठी मृत्यू योजला असेल तर मला मृत्यू दे. " (ह. अनस, बुखारी, मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) एकदा ह. सअद यांच्याकडे गेले, ज्या वेळी ते वुजू करीत होते (नमाजसाठी स्वच्छ होत होते) आणि म्हणाले, "हे सअद, जास्त पाणी खर्च करू नका." सअद (र.) म्हणाले की वुजू करतानादेखील जास्त पाणी वापरू नये काय? प्रेषितांनी उत्तर दिले, "होय. जरी तुम्ही वाहत्या नदीकाठी बसून वुजू करत असाल तरीही." (ह. अब्दुल्लाह बिन अमरो, अहमद, मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की "ज्या व्यक्तीने सोन्या-चांदीच्या भांड्यामध्ये पाणी प्यायले तर वास्तविकपणे तो आपल्या पोटात नरकाची आग भरतो." (अब्दुल्लाह बिन उमर, दारकिनबी, मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की, "कयामतच्या दिवशी माझ्याजवळ अशी माणसे असतील जी उत्तम चारित्र्याचे असतील आणि माझ्यापासून दूर आणि मला नापसंत असे लोक असतील ज्यांची जीभ कात्रीप्रमाणे चालते आणि ऐट दाखवत संभाषण करत असतील." (ह. अबू साअनब खशबी, अल बैहकी, मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की, "माझ्या लोकांमधील धर्माचे ज्ञान अवलंबतील आणि पवित्र कुरआनचे वचन पठण करतील, इतरांना ते समजावून सांगत राहतील आणि त्याचबरोबर असेदेखील म्हणतील की आम्ही सत्ताधाऱ्यांकडेही जात असतो, जेणेकरून जगातल्या वस्तूदेखील आम्हाला मिळाव्यात, पण हे शक्य नाही, कारण काटेरी झाडांकडे गेल्यास काट्याशिवाय दुसरे काय लाभणार." (ह. इब्ने अब्बास, इब्ने माजा, मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की, "दांभिक माणसांमध्ये दोन गोष्टी मिळणार नाहीत- लोकांशी सभ्य बोलणे आणि धर्माचे ज्ञान. म्हणजे दांभिकपण असा अवगुण आहे की अशी माणसे लोकांशी सभ्यतेचे वर्तन करू शकत नाहीत की त्यांना धर्माची समज नसते." (ह. अबू हुरैरा, मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, "ज्या व्यक्तीमध्ये चार गोष्टी असतील तो खऱ्या अर्थाने दांभिक आहे. (१) त्याच्याकडे कुणी अमानत ठेवली असेल तर त्यात तो लबाडी करतो, (२) जेव्हा जेव्हा तो बोलतो खोटेच बोलतो, (३) कुणाला वचन दिले तर तो वचन मोडतो आणि (४) कुणाशी भांडण झाले तर शिवीगाळ करतो." (अब्दुल्लाह बिन उमरो (र.))
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment