इज्तेमा-ए-आम : मलिक मोतसीम खान यांचे प्रतिपादन
दुआ मागताना तौफिक असलम खान म्हणाले, ‘‘ऐ अल्लाह ! देशात सुख, समृद्धी नांदू दे, जे आजारी, गरजू आहेत त्यांना राहत दे, ज्यांची नाती जुळत नाहीत त्यांचे नाती जुळव, कुटुंबात सुख नांदू दे. आपआपसात प्रेम, आपुलकी, सद्भावना वाढीस लागू दे, शेतशिवार बहरू दे, व्यवसाय वृद्धींगत होऊ दे... आमीन...
लातूर (बशीर शेख)
प्रत्येक व्यक्तीने देश आणि समाजाच्या विकासात आपले योगदान दिले पाहिजे. स्वतःमध्ये चारित्र्यसंपन्नता, बंधूभाव, प्रेम, आपुलकी वाढीस लावली पाहिजे. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात उच्चस्थान प्राप्त करण्याकरिता नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. ईश्वरीय आदेश आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे विचार जीवनात अंगीकारून ऐहिक आणि पारलौकिक जीवन सुसह्य केले पाहिजे, असे विचार जमाअते इस्लामी हिंदचे केंद्रीय सचिव मलिक मोतसीम खान यांनी व्यक्त केले.
जमाअते इस्लामी हिंद लातूरच्या वतीने ’वैफल्यग्रस्त होऊ नका, दुःखी होऊ नका, तुम्हीच प्रभावी ठराल जर तुम्ही श्रद्धावंत असाल. (कुरआन3:139)’ या शिर्षकाखाली, रविवारी एक दिवसीय जिल्हास्तरीय इज्तेमा-ए-आमचे आयोजन लातूर येथील कायमखानी फं्नशन हॉल येथे केले होते. यावेळी अध्यक्षीय संबोधनात खान बोलत होते. मंचावर जमाअते इस्लामी हिंदचे मजलिसे शुराचे सदस्य तौफिक असलम खान, जिल्हाध्यक्ष मिसबाहुद्दीन हाश्मी, शहराध्यक्ष अशफाक अहेमद यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठण आणि सार सांगून तौफिक असलम खान यांनी केली.
पुढे बोलताना खान म्हणाले, मानवकल्याणाचे गुपित समजून घेण्यासाठी कुरआन आणि प्रेषित मुहम्मद पैगंबर यांची वचने आणि आचरणपद्धती अभ्यासून ती आपल्या आचरणात आणली पाहिजे. जगातील सर्व लोक एकाच आई-वडिलांची संतती आहेत. त्यामुळे आपण सर्व आपसांत बंधू आहोत. उच-नीच, काळा-गोरा, श्रीमंत-गरीब, जात-पात असा कुठलाही भेद होऊ शकत नाही अन् कोणी करत असेल तर ते गुन्हेगार ठरतील. ईश्वरासमोर आपण सर्व एकसमान आहोत. काही लोक धर्माच्या नावावर फाटाफूट करू पाहत आहेत. एकमेकांना भीती दाखवत आहेत. त्या भीतीला कोणीही बळू पडू नये. फूट पाडणाऱ्यांनी ईश्वराचे भय बाळगावे. कोणीही ईश्वराच्या तावडीतून सुटणार नाही. परिस्थिती कितीही वाईट आली तरी सत्याचा मार्ग सोडू नका. कारण अल्लाह कुरआनमध्ये फर्मावितो, ’’’वैफल्यग्रस्त होऊ नका, दुःखी होऊ नका, तुम्हीच प्रभावी ठराल जर तुम्ही श्रद्धावंत असाल.’’ स्वतःसोबत सर्वांच्या कल्याणासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. प्रगतीच्या सर्व क्षेत्रात नैतिकता बाळगून मार्गक्रमण करावे. उच्च चारित्र्य, आदर, संयम, हिकमत, न्यायाचे पाईक बनावे. वाईटाचा तिरस्कार करावा, अश्लीलता, व्याभिचार, भ्रष्टाचार, अन्याय आणि अत्याचारापासून स्वतःला वाचवावे. कुटुंबाची प्रगती विवाह आणि स्त्री-पुरूषाच्या चांगल्या आचरणात दडली आहे. नवरा-बायको एकमेकांचे पोशाख असतात. धोका, खोटे बोलणे, विनाकारण एकमेकांवर आळ घेणे सोडावे, भांडण, तंटे यापासून दूर रहावे. मुला-मुलींचे वेळेत आणि साध्या पद्धतीने विवाह करून सन्मानाने पित्याची भूमिका पार पाडावी. आई-वडिलांना जन्नत आणि जन्नतचा दरवाजा म्हटले जाते. त्यापद्धतीने प्रत्येक आई-वडिलांनी आपली जबाबदारी ओळखावी. जीवन जेव्हा असह्य बनते तेव्हाच तलाकचे प्रावधान आहे. इस्लामने सांगितलेल्या नात्यांतील नाजूक बाबींचा अभ्यास करावा तेव्हाच प्रपोगंडा करणाऱ्यांनी त्यावर अंगुलिनिर्देश करावा, असे आवाहनही खान यांनी केले.
इज्तेमामध्ये वृद्ध माता-पित्यांच्या सेवेचे महत्व यांवर अन्वरूल्लाह खान इनामदार, दाम्पत्यिक जीवनाचे महत्व - यासमीन आरा, शिक्षकांवर- सय्यद मुसव्वीरा, व्यापारी-उद्योजक- अब्दुल कदीर खान, उलेमा- मुफ्ती रिजवान अशर्फी, समाज सुधार नियोजनबद्ध पद्धतीने - मो.आरीफ, नव्या पिढीचे मार्गदर्शन- साजीद पठाण, पैंगबरांची शिकवण- एम.आय.शेख, देश आणि समाजातील उभारणी आणि आपली भूमीका यावर अब्दुल रहीम उदगीर, दावत- मोमीन अब्दुल अन्वर हुसैन यांनी आपले विचार मांडले. सुत्रसंचालन सय्यद वाजीद आणि साजीद आझाद यांनी केले. आभार शहराध्यक्ष अशफाक अहमद यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एसआयओ, जीआयओ, युथ विंग आणि जमाअतच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी समाजबांधव, बहिणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Post a Comment