(१७) अल्लाहने आकाशातून पाण्याचा वर्षाव केला आणि प्रत्येक नदी आणि नाला आपल्या पात्रानुसार ते घेऊन निघाला. मग जेव्हा पूर आला तेव्हा पृष्ठभागावर फेसदेखील आला३१ आणि असेच फेस त्या धातूवरदेखील येत असतात ज्यांना दागिने व भांडी इत्यादी बनविण्यासाठी लोक वितळवीत असतात.३२ याच उदाहरणाद्वारे अल्लाह सत्य आणि असत्याच्या बाबींना स्पष्ट करतो. जो फेस आहे तो नाहीसा होतो आणि जी वस्तू माणसाच्या फायद्याची आहे ती पृथ्वीत स्थिरावते. अशा प्रकारे अल्लाह उदाहरणांनी आपली गोष्ट समजावितो.
(१८) ज्या लोकांनी आपल्या पालनकत्र्याचे आमंत्रण स्वीकारले त्यांच्यासाठी भलाई आहे आणि ज्यांनी त्याला स्वीकारले नाही, ते जर पृथ्वीच्या सर्व संपत्तीचे जरी मालक असले व तितकीच आणखी संपत्ती त्यांनी मिळविली, तर ते अल्लाहच्या पकडीतून वाचण्यासाठी ती सर्व मोबदल्यात देऊन टाकण्यास तयार होतील.३३ हे ते लोक आहेत ज्यांच्याकडून वाईट प्रकारे हिशेब घेतला जाईल३४ आणि यांचे ठिकाण नरक आहे, अत्यंत वाईट ठिकाण. (१९) बरे हे कसे शक्य आहे की तो मनुष्य जो तुमच्या पालनकत्र्याच्या या ग्रंथाला जो त्याने तुम्हावर अवतरला आहे, सत्य मानतो, आणि तो मनुष्य जो या वस्तुस्थितीशी आंधळा आहे, दोघे समान आहेत?३५ उपदेश तर बुद्धिमान लोकच स्वीकारीत असतात.३६
३१) या उदाहरणात ज्या ज्ञानाला पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर दिव्यप्रकटनाद्वारे अवतरित केले त्यास आकाशातून पावसाचा वर्षाव म्हटले गेले आहे. ईमानधारक आणि सदाचारी लोकांना नदी आणि झरे म्हटले आहे. ते आपल्या सामर्थ्यानुसार कृपा वर्षावापासून पूर्ण फायदा उठवून तुडुंब भरून वाहतात. इस्लाम विरोधकांनी जे उपद्रव आणि अडचणी इस्लामी आंदोलनाच्या मार्गात निर्माण केल्या आहेत त्यास पाण्यावरचा फेस आणि केरकचरा म्हटले आहे जे अशाश्वत आणि कमजोर असते आणि पुराच्या पाण्यावर तरंगत राहते.
३२) म्हणजे भट्टी विशुद्ध धातुला तापवून उपयोगी बनविण्यासाठी तापविली जाते. परंतु हे काम जेव्हा केले जाते तेव्हा मळ वर येतो आणि अशा दिमाखात काही काळ खळखळतो की चहुकडे तोच (मळ) दिसतो.
३३) म्हणजे त्यावेळी त्यांच्यावर असे संकट कोसळेल की ते आपले जीव वाचविण्यासाठी जग आणि जगातील सर्व संपत्ती देण्यासाठी तयार होतील.
३४) वाईट किंवा कडक हिशेब घेण्याचा अर्थ म्हणजे मनुष्याच्या कोणत्याच अपराधाला माफ केले जाऊ नये. जी उणिव त्याच्याकडून राहून गेली असेल त्याची चौकशी न करता त्याला सोडून दिले जाऊ नये. कुरआन सांगतो की अल्लाह या प्रकारची चौकशी आपल्या त्या दासांशी करील जे त्याचे द्रोही बनून जगात राहिले होते. याविरुद्ध ज्यांनी अल्लाहशी ईमान राखले आणि त्याच्या आदेशांचे पालन केले, त्यांच्याशी `हलका हिशेब' घेतला जाईल, त्यांच्या सेवेच्या बदल्यात त्यांच्या उणिवांकडे दुर्लक्ष केले जाईल. त्यांच्या एकूण कर्माच्या भलाईला ध्यानात ठेवून त्यांच्या अनेक उणिवांकडे डोळेझाक केले जाईल. याचे अधिक स्पष्टीकरण त्या हदीसने होते ज्यास माननीय आएशा (रजि.) यांच्यातर्फे अबू दाऊदमध्ये कथन केले आहे. माननीय आएशा (रजि.) सांगतात, ``मी म्हटले, अल्लाहचे पैगंबर (स.)! माझ्याजवळ अल्लाहच्या ग्रंथातील सर्वात जास्त भीती घालणारी आयत आहे ती म्हणजे `जो माणूस वाईट कृत्य करेल तो त्याची शिक्षा भोगेल.' (सूरह ४, आयत १२३) यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``आएशा (रजि.) काय तुम्हाला माहीत नाही की अल्लाहच्या आज्ञापालक दासांना जगात जे काही कष्ट सोसावे लागते, जसे एखादा काटा त्याला रुतला तर अल्लाह त्यास त्या माणसाच्या एखाद्या अपराधाची शिक्षा समजून जगातच त्याचा हिशेब चुकता करतो. परलोकात ज्याच्याशी हिशेब घेतला जाईल त्याला शिक्षा मिळणारच.'' माननीय आएशा (रजि.) यांनी विचारले, ` मग अल्लाहच्या या कथनाचा अर्थ काय आहे, ``ज्याचे कर्मनोंद पत्र त्याच्या उजव्या हातात दिले जाईल त्याच्याशी हलका हिशेब घेतला जाईल.'' (सूरह ८४, आयत ७-८) पैगंबर (स.) यांनी उत्तर दिले, ``याने तात्पर्य आहे (त्याच्या भलाईसह त्याची बुराई (वाईट)सुद्धा समोर आणली जाईल.) परंतु ज्याची चौकशी झाली, मग त्याने समजून घ्यावे की तो मारला गेला. लहान-सहान अपराधांवर कधीही कठोर पकड करत नाही तर त्याचे मोठमोठे अपराधसुद्धा त्याच्या सेवेला व सदाचाराला दृष्टीसमोर ठेवून माफ करतो परंतु एखादा कर्मचारी द्रोही व बेईमान आढळला तर त्याची कोणतीच सेवा लक्ष देण्यायोग्य नसते आणि त्याचे लहान-मोठे सर्व अपराध हिशोबात धरले जातात.''
३५) म्हणजे जगात त्या दोघांचे आचरण एकसारखे नसते आणि परलोकात त्यांचे परिणामसुद्धा एकसारखे नसतील.
३६) म्हणजे अल्लाहने पाठविलेल्या या मार्गदर्शनाला आणि अल्लाहच्या पैगंबराच्या आवाहनाला जे लोक स्वीकारतात ते लोक निर्बुद्ध नाहीत तर ते हुशार आणि बुद्धिवंत लोक असतात. जगात त्यांचे ते चरित्र आणि आचरणाचे स्वरुप आणि परलोकातील परिणाम असतात ज्याला नंतरच्या आयतींमध्ये स्पष्ट केले आहे.
Post a Comment