(१४) त्याचाच धावा करणे सत्याधिष्ठित आहे.२३ उरले ते ज्यांचा धावा हे लोक त्याला सोडून करतात, ते त्यांच्या प्रार्थनेला काहीच प्रतिसाद देऊ शकत नाहीत. त्यांचा धावा करणे तर असे आहे जसे एखाद्या मनुष्याने पाण्याकडे हात पसरून त्याला विनंती करावी की तू माझ्या तोंडापर्यंत पोहोच. वस्तुत: पाणी त्याच्यापर्यंत पोहचणार नाही, बस्स अशाच प्रकारे अधर्मियांच्या प्रार्थनादेखील काहीच नाही परंतु एक लक्षहीन बाण.
(१५) तो तर एक अल्लाहच आहे ज्याला आकाश आणि पृथ्वीतील प्रत्येक वस्तू स्वखुशीने वा लाचारीने नतमस्तक होत आहे.२४ आणि सर्व वस्तूंच्या सावल्या सकाळ-संध्याकाळ त्याच्यासमोर झुकतात.२५
(१६) यांना विचारा, आकाशांचा व पृथ्वीचा पालनकर्ता कोण आहे? सांगा, अल्लाह.२६ मग यांना सांगा की जर वस्तुस्थिती अशी आहे तर तुम्ही त्याला सोडून अशा उपास्यांना आपले कार्यसाधक ठरविले आहे का जे स्वत: आपल्याकरितादेखील कसल्याही फायद्या-तोट्याचे अधिकार बाळगत नाहीत? सांगा, काय आंधळा आणि डोळस समान असतात?२७ काय प्रकाश व अंधकार समान असतात?२८ आणि जर असे नाही तर काय यांनी ठरविलेल्या भागीदारांनीदेखील अल्लाहसारखे काही निर्माण केले आहे की जेणेकरून यांच्यासाठी सृजनाची बाब संदिग्ध बनली आहे?२९ सांगा, प्रत्येक वस्तूचा सृजनकर्ता केवळ अल्लाह आहे आणि तो एकमेव आहे, सर्वांवर प्रभुत्वसंपन्न!३०
२३) धावा करणे म्हणजे आपल्या गरजपूर्तीत मदतीसाठी पुकारणे आहे. अर्थ आहे गरज पूर्ण करण्यासाठी आणि अडचणी दूर करण्याचे सर्व अधिकार त्याच्याच हातात आहेत म्हणून त्याच्याशीच याचना करणे उचित आहे.
२४) `नतमस्तक'शी अभिप्रेत आज्ञापालनात झुकणे, आज्ञापालन करणे आणि स्वत:ला समर्पित करणे आहे. जमीन व आकाशातील प्रत्येक वस्तू या अर्थाने अल्लाहला `सजदा' करीत आहे (अल्लाहसमोर नतमस्तक होत आहे) आणि अल्लाहचे आज्ञापालन करीत आहे. अल्लाहच्या इच्छेविरुद्ध कणभरसुद्धा उदंडता करीत नाही. ईमानधारक त्याच्यापुढे स्वखुशीने आणि तन्मयतेने झुकतो आणि नास्तिकांना (काफीर) मजबूर होऊन झुकावे लागते कारण अल्लाहच्या प्रकृतीनियमांपासून दूर जाणे त्यांच्या सामर्थ्याबाहेरील कृत्य आहे.
२५) सावलीचे `सजदा' करणे (झुकणे) म्हणजे वस्तूंच्या सावल्या सकाळ-संध्याकाळ पूर्व व पश्चिमेकडे पडणे. ही याची निशाणी आहे की हे सर्व एक ईश्वराच्या आदेशांचे पालन करणारे आणि त्याच्या कायद्याचे बांधील आहेत.
२६) स्पष्ट व्हावे की लोक स्वत: या गोष्टीला मानत होते की पृथ्वी व आकाशांचा निर्माणकर्ता अल्लाह आहे. ते या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक देऊ शकत नव्हते कारण हा नकार स्वत: त्यांच्या विश्वासाविरुद्ध होता. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांनी विचारल्यानंतर त्यांच्यासमोर ते या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देण्यास मागे-पुढे पाहात कारण होय म्हटल्यानंतर एकेश्वरत्व मान्य करणे अनिवार्य बनते आणि अनेकेश्वरत्वासाठी उचित आधार शिल्लक राहू शकत नव्हता. म्हणून आपल्या दृष्टिकोनाची उणिव लक्षात घेऊन ते या प्रश्नाच्या उत्तरात मूग गिळून बसत. याच कारणामुळे कुरआनमध्ये जागोजागी पैगंबर मुहम्मद (स.) यांना अल्लाह फर्मावितो की त्यांना विचारा `जमीन व आकाशांना निर्माण करणारा कोण आहे? सृष्टीचा पालनकर्ता प्रभु कोण आहे? तुम्हाला उपजीविका देणारा कोण आहे?' नंतर आदेश दिला जातो की तुम्ही स्वत: सांगा, ``अल्लाह!'' आणि यानंतर तर्क देतो की जर ही सर्व कामे अल्लाहची आहेत तर शेवटी हे दुसरे कोण आहेत ज्यांची तुम्ही उपासना करीत आहात?
२७) आंधळयाने तात्पर्य तो मनुष्य आहे ज्याच्यासमोर अल्लाह एक आहे याविषयीच्या निशाण्या आणि साक्ष पसरलेल्या आहेत, परंतु तो त्यांच्यापैकी कोणालाही पाहू शकत नाही. डोळस म्हणजे तो मनुष्य जो सृष्टीच्या कणाकणांत आणि पानापानांत निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाचे मुबलक प्रमाण पहात आहे. अल्लाहच्या या प्रश्नाचा अर्थ आहे, `हे निर्बुद्ध लोकहो! जर तुम्हाला काही सुचत नाही तर शेवटी पाहणारा आपले डोळे कसे फोडून घेणार? जो सत्याला स्पष्ट पाहात आहे त्याच्यासाठी कसे शक्य आहे की तुमच्यासारख्या आंधळया लोकांप्रमाणे त्याने ठोकरा खाव्यात?
२८) प्रकाश म्हणजे सत्यज्ञानाचा प्रकाश जो पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायींना प्राप्त् होता. अंधारापासून तात्पर्य अज्ञानतेचे ते अंधार आहे ज्यात नाकारणारे भटकत होते. प्रश्नाचा अर्थ आहे की ज्याला प्रकाश मिळाला आहे तो का म्हणून दीप विझवून अंधारात ठोकरा खात फिरेल? तुम्ही प्रकाशाचे महत्त्व तर जाणत नाही परंतु ज्याने त्याला प्राप्त् केले आहे आणि ज्याने प्रकाश आणि अंधार यातील फरक जाणून घेतला आहे आणि जो इस्लामच्या प्रकाशात सरळ जीवनमार्गाला स्पष्ट पाहात आहे; तो प्रकाशाला सोडून अंधारात भटकण्यासाठी कसा तयार होईल?
२९) या प्रश्नाचा अर्थ आहे, जर अल्लाहने जगात काही वस्तू निर्माण केल्या असत्या आणि काही दुसऱ्यांनी निर्माण केल्या असत्या तर अशा स्थितीत अल्लाहची निर्मिती कोणती आहे आणि दुसऱ्याची कोणती हे जाणून घेणे अशक्य झाले असते. अशा वेळी अनेकेश्वरत्वाला योग्य कारण प्राप्त् झाले असते. परंतु हे अनेकेश्वरवादी स्वत: मान्य करतात की त्यांच्या उपास्यांनी एक गवताची काडी किंवा एक केससुद्धा निर्माण केला नाही. ते स्वत: मान्य करतात की निर्मिती कार्यात या बनावटी ईश्वरांचा लेश मात्र हिस्सा नाही. मग या बनावटी ईश्वरांना निर्माण कार्यात आणि निर्माणकर्त्याच्या हक्कांत कोणत्या आधारावर भागीदार ठरविण्यात आले आहे?
३०) मूळ अरबी शब्द `कह्हार' आहे म्हणजे `ते अस्तित्व जे आपल्या सामर्थ्याने सर्वांवर आदेश चालवतो आणि सर्वांना आधिनस्त बनवितो.' अल्लाह सर्व गोष्टींना निर्माण करणारा आहे. या सत्याला अनेकेश्वरवादींनी कधीही नाकारलेले नाही. तसेच अल्लाह एकमेव आहे आणि `कह्हार' आहे, या वास्तविकतेला स्वीकार करण्याचा तो स्वाभाविक परिणाम आहे. याचा अस्वीकार करणे पहिल्या वास्तविकतेला मान्य केल्यानंतर कोणत्याही बुद्धिवंतासाठी संभव नाही. जो प्रत्येक वस्तूचा निर्माणकर्ता आहे तो अनिवार्यता एकटा आणि एकमेव आहे कारण दुसरे जे काही आहे त्याच अल्लाहची निर्मिती आहे. मग हे कसे शक्य आहे की निर्मितीला निर्माणकर्त्याच्या अधिकारात, गुणामध्ये किंवा त्याच्या हक्कात भागीदारी मिळावी? याचप्रमाणे तो अनिवार्य रूपात `कह्हार'सुद्धा आहे कारण निर्मितीला आपल्या निर्मात्याच्या आधिनस्त राहाणे स्वयं निर्मित होण्याच्या धारणेत सम्मिलित आहे. निर्माणकर्त्याला जर पूर्ण अधिपत्य प्राप्त् नसेल तर तो निर्माणच कसे करू शकतो? म्हणून जो मनुष्य अल्लाहला निर्माणकर्ता मान्य करतो त्याच्यासाठी या दोन विशुद्ध बौद्धिक आणि तार्किक परिणामांना नाकारणे असंभव होते. यानंतर हे सर्वथा अनुचित ठरते की एखाद्या मनुष्याने निर्माणकर्त्याला सोडून `निर्मिती'ची उपासना करावी, तसेच प्रभुत्वशाली अस्तित्वाला सोडून `आधिनस्ताला' (निर्मितीला) विघ्नहर्ता समजून धावा करीत बसावे.
Post a Comment