Halloween Costume ideas 2015

आदरणीय येशू ख्रिस्त.... संक्षिप्त परिचय

नुकताच संपूर्ण जगात ख्रिसमस साजरा करण्यात आला. मराठीत या सणाला नाताळाचा सण असे म्हटले जाते. आज येशू मसीह यांचा जन्मदिवस आहे. जगात 1 लाख 24 हजार पेक्षा जास्त प्रेषित होऊन गेलेत यापैकी सुमारे 25-26 प्रेषितांचा उल्लेख कुरान शरीफ मध्ये आढळतो. दिव्य कुरआन, सुरह क्रमांक 3 'आलेइम्रान' मध्ये आदरणीय इसा (अ.) मसीह यांच्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. आदरणीय मरयमच्या आईने प्रार्थना केली होती की, हे माझ्या पालनकर्त्या, मी हे मूल जे माझ्या गर्भात आहे, तुला अर्पण करते. ते तुझ्याच कार्याकरिता समर्पित असेल. माझी ही भेट स्वीकार कर तू ऐकणारा व जाणणारा आहे."

परंतु तिच्या पोटी मुलगी जन्मास आली तेव्हा तिने सांगितले, 'हे पालनकर्त्या माझ्या पोटी तर मुलगी जन्मली आहे. आणि मुलगा, मुली सारखा असत नाही.' (म्हणजेच पुत्र त्या सर्व नैसर्गिक आणि सांस्कृतिक प्रतिबंधापासून स्वतंत्र असतो, जे मुलींना लागू होतात.) म्हणून मुलगा झाला तर तो उद्देश चांगल्याप्रकारे प्राप्त झाला असता. ज्यासाठी ती तिच्या पुत्राला त्याच्या मार्गात अर्पण करू इच्छित होती. त्या मुलीचे नाव तिने आदरणीय मरयम (अ.) ठेविले. तिचे खूप चांगली मुलगी' म्हणून संगोपन केले आणि आदरणीय जकरियाला (अ.) तिचे पालक बनविले. जेव्हा आदरणीय मरयम प्रौढ अवस्थेला आली, बैतूल मकदिसच्या (एक मोठी मस्जिद) दाखल केली गेली. अल्लाहच्या स्मरणात रात्रंदिवस व्यस्त राहू लागली. आदरणीय याहयाच्या (अ) देखभालीत तिला ठेवण्यात आले होते. ते संभवतः त्यांचे काका होते आणि हैकलच्या पुजाऱ्यांपैकी एक होते.

आदरणीय मरयम एकांतवासात राहत होत्या. जेव्हा, आदरणीय जकरिया अ. त्यांच्याजवळ जात तेव्हा, आदरणीय मरयमजवळ काहीना काही खाण्यापिण्याच्या वस्तू आढळत असत. आदरणीय जकरिया विचारत, 'मरियम हे तुझ्याजवळ कोठून आले. आदरणीय मरियम उत्तर देत असे, "अल्लाहकडून आले आहे. अल्लाह ज्याला इच्छितो अमर्याद देतो."

आदरणीय जकरिया (अ.) वृद्ध झाले होते. तसेच ते निपुत्रिक होते. आदरणीय मरयम यांच्यासारख्या नेक युवतीला पाहून त्यांच्या मनात ही भावना उत्पन्न झाली की, अल्लाहने त्यांनाही आदरणीय मरयमसारखी सदाचारी संतान द्यावी. अल्लाह आपल्या सामर्थ्याने एकांतवासी मुलीला अगणित उपजीविका पोहोचवित आहे. जर त्याने इच्छिले, तर मलाही वृद्धापकाळी संतती देऊ शकतो. अल्लाहने त्यांची प्रार्थना ऐकली व त्यांना आदरणीय याहयाची (अ.) शुभवार्ता दिली. बायबलमध्ये त्यांचे नाव आदरणीय योहन्ना आहे.

एका चमत्काराद्वारे अल्लाहने अतिशय वृद्ध जोडप्याला संतती बहाल केली. आदरणीय इसा (अ.) मसीह यांच्या जन्माआधी आदरणीय याहया (अ) यांचा जन्म एक चमत्कार होता. हा चमत्कार दाखवण्याचा उद्देश हा होता की, आदरणीय इसा (अ.) मसीह यांचा जन्मही एका चमत्कारातून होणार होता. मग ती वेळ येऊन ठेपली. जेव्हा ईशदूतांनी येऊन आदरणीय मरयमला सांगितले, 'हे मरियम (अ.) अल्लाहने तुझी निवड केली व तुला पावित्र्य दिले. आणि जगातील सर्व स्त्रियांवर तुला प्राधान्य देऊन आपल्या सेवेकरिता निवडले. हे मरियम (अ.) आपल्या पालनकर्त्याशी आज्ञाधारक बनुन रहा, त्याच्यापुढे नतमस्तक होत राहा, व जे दास त्याच्यापुढे झुकणारे आहेत त्यांच्या बरोबर तू सुद्धा झुकत राहा. जेव्हा दूताने म्हटले, "हे मरयम (अ.) अल्लाह तुला आपल्या एका आदेशाची शुभवार्ता देत आहे त्याचे नाव मरियम पुत्र मसीह इसा असेल व तो इहलोक व परलोकात प्रतिष्ठित राहील. अल्लाच्या निकटवर्ती दासांमध्ये त्याची गणना होईल. तो लोकांशी पाळण्यात देखील संभाषण करील आणि मोठा होऊन सुद्धा. आणि तो एक सदाचारी पुरुष असेल. हे ऐकून आदरणीय मरयम म्हणाली, हे पालनर्त्या, मला मूल कसे होणार, मला तर कोणा पुरुषाने स्पर्श देखील केला नाही." उत्तर मिळाले असेच होईल अल्लाह जे इच्छितो ते निर्माण करतो.

आदरणीय मरियम यांना कोणत्याही पुरुषाशी संबंधाविना पुत्ररत्न प्राप्तीचा शुभ संदेश दिला होता आणि वास्तवतः याच प्रकारे पैगंबर इसा (अ.) यांचा जन्म झाला. अल्लाहाने आदरणीय इसा (अ.) यांना ग्रंथ व विवेकाची शिकवण दिली. तौरात व इंजिलचे (बायबल) शिक्षण दिले आणि त्यांना बनीइस्त्राईलसाठी आपला प्रेषित नियुक्त केले.

अल्लाहाने त्यांना काही चमत्कार प्रदान केले होते. आदरणीय इसा (अ.) मातीपासून पक्ष्याच्या आकाराचा एक पुतळा तयार करत आणि त्याला फुंकर मारत तो अल्लाहच्या आदेशाने पक्षी बनायचा. जन्मजात आंधळ्याला व महारोग्यांना अल्लाच्या आदेशाने बरे करत. तसेच मृताला जिवंत करत. आदरणीय ईसा मसीह है अल्लाहचे पाठविलेले प्रेषित आहेत यावर बनी इस्राईलने विश्वास ठेवावा यासाठी हे चमत्कार व निशाण्या होत्या. आदरणीय इसा (अ.) बनीइसराईलला म्हणाले, 'पहा, मी तुमच्या पालन कर्त्याकडून तुम्हा पाशी संकेत घेऊन आलो आहे. म्हणून ईश्वराचे भय बाळगा, आणि माझी आज्ञा पाळा. अल्लाह माझाही पालन कर्ता आहे आणि तुमचा सुद्धा."

अल्लाह येशू (अ.) मसीह यांना शांती प्रदान करो व त्यांचे जीवन जगवासीयांसाठी मार्गदर्शक ठरो. आमीन.

संकलन-

सय्यद जाकेर अली

परभणी, 9028065881


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget