Halloween Costume ideas 2015

देशाचा आधारस्तंभ असलेल्या युवाशक्तीने ध्येयापासून भरकटू नये


प्रत्येक देशाची स्थिती तेथील युवाशक्तीवर अवलंबून असते. आजची मुले उद्या देशाचे शिल्पकार असणार. बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या काळात, शिक्षण, संस्कृती, संगोपन, आरोग्य सेवा सुविधा, संधी, सभोवतालचे परिसर, संगत, वागणूक यांचा थेट परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो, त्यांचे संपूर्ण भविष्य या गोष्टींवर अवलंबून असते. ज्यांच्या जीवनात योग्य मार्गदर्शन, चांगले संस्कार, शिक्षण, पुरेसे पोषण, चांगल्या संधी आणि दुर्गुणांपासून दूर आहे, ते तरुण आदर्श नागरिक बनून देशाच्या विकासात अमूल्य भूमिका बजावतात. ज्या देशात युवाशक्तीला उत्तम शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगाराच्या संधी आहेत, तेच देश जगात विकसित होतात आणि ज्या देशात गरिबी, आर्थिक विषमता, महागाई, बेरोजगारी, उत्तम शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा अभाव, भ्रष्टाचार, भेदभाव, गुन्हेगारीचा वाढता आलेख अशा समस्या आहेत, ते समाजाचे विघटन करून देशाच्या विकासात अडथळे निर्माण करतात.

जागतिक युवा विकास निर्देशांकात १८१ देशांमध्ये भारत १२२ व्या क्रमांकावर आहे. २०२१ गॅलप लॉ अँड ऑर्डर इंडेक्समध्ये ८० गुणांसह भारत १२१ देशांपैकी ६० व्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड ८२ गुणांसह यादीत ४८ व्या स्थानावर आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते, देशातील प्रत्येक चार व्यवस्थापन व्यावसायिकांपैकी फक्त एक, पाच पैकी एक अभियंता आणि १० पैकी एक पदवीधर रोजगारक्षम कुशल आहेत. सीएमआईई च्या मते, डिसेंबर २०२२ मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर १६ महिन्यांच्या उच्चांकी ८.३ टक्क्यांवर पोहोचला. 

वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती 

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये दिल्लीत पकडलेल्या ३२८७ गुन्हेगारांपैकी १३८७ हे शिक्षणाच्या बाबतीत दहावी पासही नव्हते. २५३८ त्यांच्या पालकांसोबत राहत होते आणि ५३५ नातेवाईकांसोबत राहत होते, त्यापैकी २१४ बेघर होते. २०२१ मध्ये, दिल्लीत अल्पवयीन मुलांवरील गुन्हेगारी प्रकरणांमध्ये ४४ टक्क्याने वाढ झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अल्पवयीन मुलांविरुद्धचे सुमारे ६०% गुन्हे १६ ते १८ वयोगटातील तरुणांकडून केले जातात. भारतीय दंड संहितेअंतर्गत अल्पवयीन मुलांविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या ४३,५०६ गुन्ह्यांपैकी २८,८३० गुन्ह्यांचा यात समावेश आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे कारण अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या बलात्काराच्या घटनांमध्ये ६० टक्याने वाढ झाली आहे. आयटी कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या ३२४ लोकांपैकी २१५ लोक हे १८-३० वयोगटातील होते, सायबर गुन्ह्यांमध्ये ५३.५ टक्के वाढ झाली आहे. २०२१ मध्ये मुलांविरुद्धच्या १.४९ लाखांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. २०२० (१.२८ लाख प्रकरणे) च्या तुलनेत हे प्रमाण १६.२ टक्के ची तीव्र वाढ दर्शवते. 

वाढती व्यसनाधीन तरुणाई 

प्रत्येक सुख-दु:खात, सण-समारंभात, कार्यक्रमात लोकांना नशा करण्यासाठी निमित्त हवे असते. दररोज वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर अमली पदार्थांची तस्करी, बनावट दारू यामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या येतात. संयुक्त राष्ट्राच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानुसार, भारतात अमली पदार्थांच्या सेवनात गुंतलेले सुमारे १३.१ टक्के लोक २० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. वर्ल्ड ड्रग रिपोर्ट २०२२ चा अंदाज आहे की जगभरात सुमारे २८४ दशलक्ष लोक ड्रग्ज वापरतात, भारत हा जगातील सर्वात मोठ्या अफूच्या बाजारपेठांपैकी एक असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. भारतात या धोक्याचा सर्वाधिक फटका तरुणांना बसतो. बहुतांश व्यसनी हे १५ ते ३५ वयोगटातील असून अनेक बेरोजगार आहेत. देशातील वाढत्या गुन्हेगारीला अंमली पदार्थांचे व्यसन हे सर्वात जास्त कारणीभूत आहे. 

आरोग्य समस्या आणि मानसिक विकार

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ नुसार, पाच वर्षांखालील ३५.५ टक्के मुले खुंटलेली आहेत आणि ३२.१ टक्के कमी वजनाची आहेत, ही आकडेवारी चिंताजनक आहे, अन्नातील भेसळ आणि मानवी प्रदूषणातही चिंताजनक वाढ होत आहे. जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार, भारतात बालकामगारांची संख्या १०.१ दशलक्ष होती. युनिसेफच्या एका नवीन अहवालानुसार, भारतातील १५ ते २४ वर्षांच्या वयोगटातील सातपैकी एक (१४ टक्के) अनेकदा उदासीनता किंवा कामात उत्साही नसल्याचे जाणवतात, भारतातील तरुण मानसिक तणावासाठी मदत घेण्यास कचरतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, किमान २० टक्के तरुणांना नैराश्य, मूड डिसऑर्डर, मादक द्रव्यांचे सेवन, आत्मघाती वर्तन किंवा खाण्याचे विकार यासारखे मानसिक आजार होण्याची शक्यता असते. इंडियन जर्नल ऑफ सायकियाट्रीने २०१९ मध्ये म्हटले आहे की भारतातील किमान ५० दशलक्ष मुले मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे प्रभावित आहेत. 

इंटरनेटचे व्यसन आणि गैरवापर 

कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकल सर्किल्स ने प्रकाशित केलेल्या अहवालात, ४० टक्के भारतीय पालकांनी कबूल केले आहे की त्यांची ९ ते १७ वर्षे वयोगटातील मुले व्हिडिओ, गेमिंग आणि सोशल मीडियाचे व्यसनाधीन झाले आहेत. इंटरनेट आणि ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे शेकडो मुलांनी आपले जीवन संपवले. आज जगातील ५ पैकी जवळपास ४ मोबाईल हँडसेट स्मार्टफोन आहेत, फेममास च्या मते, किशोरवयीन मुले सोशल मीडियावर प्रौढांपेक्षा जास्त वेळ घालवतात, १३ ते १८ वर्षे वयोगटातील किशोर दिवसातील सरासरी ३ तासांपेक्षा जास्त वेळ घालवतात. काही किशोरवयीन मुले दररोज ९ तासांपर्यंत सोशल मीडियावर वेळ घालवतात, शाळेत घालवलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ. ६८ टक्के किशोरवयीन मुले त्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे अंथरुणावर घेऊन जातात, मोबाईल उपकरणांसह झोपतात, व्यसनमुक्ती केंद्राने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, सोशल मीडियावर दिवसातून किमान तीन तास घालवणाऱ्या २७ टक्के मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. 

आत्महत्यांमध्ये वाढ 

पालकांच्या मुलांकडून जास्त अपेक्षा आणि त्यांचा मुलांवरचा वाढता ताण, वाईट सवयी, हट्टीपणा, भीती, अपेक्षा मोडणे यासारख्या कारणांमुळे आत्महत्या वाढतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो रिपोर्ट २०२१ नुसार, गेल्या वर्षी भारतात १३००० हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. खरं तर, २०१६ ते २०२१ या पाच वर्षांत भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण २७ टक्के वाढले आहे. ३० वर्षांखालील तरुणांमध्ये १५०० हून अधिक आत्महत्यांचे कारण "परीक्षेत अपयश" हे होते. २०२१ मध्ये, १८ वर्षाखालील १०,७३२ तरुण आत्महत्येने मरण पावले, जे एकूण १,६४,०३३ आत्महत्यांच्या आकडेवारीपैकी ६.५४ टक्के आहे. 

परदेशी शिक्षणावर वाढते अवलंबन 

ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान, १.८ दशलक्षहून अधिक भारतीयांनी देशाबाहेर प्रवास केला, जेव्हाकी २०२१ मध्ये फक्त ७७.२ लाख लोकांनी. परदेशातील शिक्षणाच्या गुणवत्तेला दिलेल्या महत्त्वामुळे, परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, असे रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्सच्या विश्लेषणानुसार समोर आले आहे. २०१९ मध्ये, ही संख्या ८००,००० होती आणि २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांची ही संख्या १.८ दशलक्षपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. परदेशातील शिक्षणाचा पर्याय आपल्या देशातील शिक्षणात असणे अत्यंत गरजेचे आहे. देशाच्या शैक्षणिक धोरणाचा दर्जा जागतिक स्तरावर उंचावणे हाच एकमेव मार्ग आहे ज्यामुळे देशातील विद्यार्थ्यांना देशातच चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील. 

देशाची वाढती लोकसंख्या मर्यादित साधनांवर अमर्याद दबाव टाकत आहे. नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणाच्या समस्या वाढत असून त्यामुळे जीवघेणे आजारही सातत्याने वाढत आहेत. मुलांसमोर पालकांचे अयोग्य वर्तन, मोठ्यांचा अनादर, असभ्य भाषेचा वापर, असंस्कृत वर्तन, सोशल मीडियाचे व्यसन, खोटा दिखावा, नियमांचे उल्लंघन, नशा, भेसळ, स्वार्थ, लोभ, परोपकाराचा अभाव, जलद शॉर्टकट मार्गाने पैसे कमविण्याची तळमळ, आधुनिकतेच्या नावाखाली उधळण यामुळे युवाशक्ती कमकुवत होत आहे, हेच समाजातील वाढत्या समस्यांचे प्रमुख कारण सुद्धा आहे. एकूण तरुण लोकसंख्या २०११ मध्ये ३३३.४ दशलक्ष वरून २०२१ मध्ये ३७१.४ दशलक्ष पर्यंत वाढले असा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या युवाशक्तीच्या गरजा पूर्ण करणे, सेवा-सुविधा, कार्यक्षम व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे, उत्पादक रोजगार निर्मिती वाढवून आणि श्रम बाजार धोरणांचा अवलंब करून सर्वांसाठी शिक्षण, कौशल्य-योग्य काम, सामाजिक सुरक्षा, दर्जेदार आरोग्य सेवा, पेन्शन यावर भर, नवीन कलागुणांना वाव देऊन चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देणे, लोककल्याणकारी कार्यक्रमांना चालना देणे ही काळाची गरज आहे. तरुणांना चांगल्या संधी आणि सुविधा न देणे म्हणजे समाजात समस्या निर्माण करणे होय. ज्या युवाशक्तीच्या जोरावर देशाचा विकास होईल, त्याच युवाशक्तीला सुविधांपासून वंचित ठेवल्याने ते तरुण चुकीच्या मार्गावर जातील. त्यांना चांगले वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पालक, शासन, सामाजिक संस्था आणि आपल्या सर्वांची आहे.


- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget