भारतात जेव्हा इंग्रज साम्राज्यानं आपले पाय पसरणे सुरू केले त्या वेळी भारतीयांना याचा थांगपत्तादेखील नव्हता की एक वेळ अशी येईल जेव्हा भारतावर इंग्रज भांडवलदारी व्यवस्था काबिज होणार आहे. इस्ट इंडिया कंपनीद्वारे इंग्रज आणि भारतीय बाजारपेठेत व्यापार वाढत गेला, पण यासाठी भारतीयांनी इंग्लंडहून माल आयात करावा त्यांनीच तो विकण्याची सोय करावी. इंग्रज फक्त त्यातून होणाऱ्या उत्पन्नाचे मालक होते. सर्व संपत्ती हळूहळू इंग्रजांकडे एकवटली गेली. भारताचे लोक कंगाल झाले आणि इंग्रजांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत गेली. त्या वेळचे एक उर्दू कवी मसहफी यांनी आपल्या एका कवितेत असे महटले होते की- भारताची जी संपत्ती आणि वैभव होते ते सर्वचे सर्व इंग्रजांनी निरनिराळ्या युक्त्या करून खेचून घेतली.
काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी आपल्या एका पुस्तकात असे म्हटले आहे की इंग्रजांनी त्या वेळी तीन ट्रिलियन डॉलर संपत्ती लुटली आणि याच संपत्ती-साधनांच्या जोरावर इंग्लंडमदील औद्योगिक क्रांती पूर्णत्वास गेली. पुढे जाऊन इंग्लंडमधूनच भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उद्गम झाला, ही १९व्या शतकातील गोष्ट आहे. पण त्यापूर्वीच कम्युनिस्ट विचारवंत मार्क्स आणि एन्जेल यांनी भाकित केले होते की ही व्यवस्था जगभर शिरकाव करणार आहे ही १८४८ ची गोष्ट आहे. आणि सध्या त्यांचे भाकित खरे ठरले. भांडवलवादाने जगभर वेढा घातला आहे.
पण इंग्रजांनी आपले हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बराच खटाटोप केला. त्यांनी ख्रिस्ती धर्मियांना हे पटवून दिले होते की ख्रिस्ती देव (ईश्वर) आणि ख्रिस्ती सभ्यता मिळून एका नव्या युगाची, विचारधारेची, संस्कृतीची आणि आधुनिकतेची स्थापना करतील. यासाठी त्यांना जगावर आपले अधिराज्य गाजवायचे होते, हे वेगळे सांगलण्याची गरज नाही. भारतीय संपत्ती लुटत असताना त्यांनी इथल्या नागरिकांना, मानवी कल्याण, न्यायपूर्ण व्यवस्था, सामाजिक समतेकडे आकर्षित करण्याचा मोहीम हाती घेतली. त्यांच्या या विचारांना आधुनिक विचार म्हणून त्या वेळच्या प्रतिष्ठित नागरिक, साहित्यिक आणि इतर क्षेत्रातल्या लोकांनी साथ दिली. यात प्रामुख्याने कवी गालिब, सर सय्यद अहमद खान, राजाराम मोहन राय आणि द्वारकादास टागोर यांचा समावेश होता. ज्या समतावादी समाजाचा प्रचार इंग्रज करत होते ते स्वतः आपल्या समाजात स्थापन करत नव्हते. कारण प्रतिष्ठित आणि उच्च-नीच असा भेदभाव त्यांच्या संस्कृतीचा भाग होता.
ज्यात भांडवलदारी अर्थव्यवस्थेचा पाया घालण्यासाठी त्यांनी एक सूत्र विकसित केले. त्यांच्या मते जगात केवळ युरोपियन लोकच प्रतिष्ठित आहेत, म्हणून संपत्तीवर त्यांचाच ताबा हवा. इतर देशांनी प्रगती करू नये. ते आहेत तसेच राहावेत. यामागे त्यांना जगात वसाहतवादाची स्थापना करायची होती ती त्यांनी अचूकपणे केली. त्यांनी आपही विचारधारा आणि संस्कृतीचा मापदंड बिगर युरोपियन देशांच्या आंतरात्म्यात प्रविष्ट केला. त्यांना मानसिक गुलाम बनविले आणि मग त्यांच्या साधनसंपत्तीवर ताबा मिळवला. जगभर आपला वसाहतवाद स्थापन करून जगातल्या इतर राष्ट्रांची संपत्ती एकवटून आणली. इतकी आर्थिक प्रगती केली त्याला सीमा नाही. भांडवलदारी अर्थव्यवस्थेचे अंतिम ध्येय जगाच्या एक टक्का लोकांकडे जगाची सर्व संपत्ती एकवटली जावी हे त्यांचे लक्ष्य आहे.
भारतात भांडवलदारी अर्थव्यवस्था आता पूर्णपणे काही मोजक्या उद्योगपतींकडे एकवटली आहे. देशाच्या गोरगरीब जनतेची सगळी संपत्ती म्हणजे ५० कोटी लोकांकडील संपत्तीइतकी संपत्ती सध्या १० टक्के उद्योगपतींकडे गोळा झाली आहे. जसे इंग्रजांनी इथल्या नागरिकांना आधुनिक विचारांद्वारे त्यांच्या प्रगतीची स्वप्ने दाखवली आणि ख्रिस्ती ईश्वराने जशी त्यांची साध दिली तशीच अवस्था भारतीय नागरिकांची झाली आहे. उद्योगपतींचे १० लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली जातात आणि ८० कोटी लोकांना महिन्याकाठी ५ किलो अन्नधान्याचे मोफत वाटप करून त्यांना गप्प केले जाते. ख्रिस्ती धर्माने या इंग्रजांना वाट दाखवली आपल्या देशात ती वाट कोण दाखवतात?
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक, मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment