आज संपूर्ण जग सुरक्षीत रहावे असे सर्वांना वाटते. परंतु जगातील मानवांच्या अतिरेकामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड, खणन, नदीतील रेती खणन त्याचप्रमाणे सोने, चांदी, हिरे व खनिज संपत्ती इत्यादीवर मानवाने सरळ घणाघाती प्रहार करून निसर्गाच्या मुळावरच मानवाने कुऱ्हाड मारल्याचे दिसून येते यामुळे निसर्गाचे संतुलन डगमगतांना दिसत आहे. पर्यावरणाची ढासळती परीस्थिती पहाता पृथ्वीतलावरील संपूर्ण मानवजाती व जीव-जंतू भयभित झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आज जगाला पर्यावरणाचे संरक्षण कसे करता येईल याकडे सर्वांनीच लक्ष केंद्रित केले पाहिजे.
भारतात जंगल, पशु-पक्षी व प्राणी यांना सरकारकडून संरक्षण मिळावे यासाठी 26 मार्च 1974 ला गढवाल मधील हेनवलघाटी येथे गौरादेवी यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलनास सुरूवात झाली व पर्यावरण संरक्षणाची मिसाल जागृत केली. आज तसे पाहिले तर स्थल, जल, वायु मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे दिसून येते. मानवाने जर पर्यावरणाला वाचविले तर जलप्रदूषण, वायुप्रदूषण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरपूर मदत मिळू शकते. आज पर्यावरणात इतके प्रदूषण दिसून येते की पक्ष्यांचे जगणे कठीण झाले आहे. आज भारतातच नाही तर संपूर्ण जगात जंगल तोड मोठ्या प्रमाणात होत आहे. याचाच परिणाम पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात होतांना दिसते. भारतासह जगातील वाढती लोकसंख्या हीच पर्यावरण नियंत्रण ठेवण्यास मोठी अडचण आहे. मानवाने आपल्या सुख-सुविधांसाठी पर्यावरणाकडे पुर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
पर्यावरणावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की "जगावं की मरावं", कारण आज पर्यावरणाचा आधारस्तंभ "वृक्ष"आहे व त्याला साथ हवी जल व वायूची. परंतु हे संपूर्ण दूषित झाल्यामुळे पर्यावरण धोकादायक स्थितीत पोहोचले आहे. असेही सांगण्यात येते की पर्यावरणाच्या ढासळत्या परिस्थितीमुळे जगातील 10 लाख प्राणी व वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ज्या पक्ष्यांवर पर्यावरणाची धुरा आहे ते गिधाड पक्षी सुध्दा संपुष्टात येत आहेत. मानवाने निसर्गावर एवढा अत्याचार केला की वृक्ष कटाईच केली नाही तर वृक्षांना जळामुळा सकट त्याला उपडून फेकले. यामुळेच आज पर्यावरण मानवापासुन भयभीत आहे. आज औषधोपयोगी वनस्पती पर्यावरणाच्या ढासळत्या परीस्थितीमुळे नस्तनाबुत होत आहे. त्याचप्रमाणे अनेक औषधोपयोगी वनस्पती लुप्त झाल्या आहेत. जगातील वाढत्या प्रदूषणामुळे 30 टक्के वृक्षप्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि विविध देशांतील 142 प्रजाती याआधीच पृथ्वीतलावरून लुप्त झाल्या आहेत ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
भारतात वृक्षांच्या 2603 प्रजाती आहेत. यातील 469 प्रजाती धोकादायक स्थितीत आहेत. म्हणजेच भारतातही गंभीर समस्या आहे. आज पर्यावरणाचे संतुलन विस्कळीत झाल्यामुळे जंगलातील संपूर्ण प्राणी शहरात, गावात प्रवेश करतांना दिसतात. यात हिंसक प्राणी शहरात व गावात प्रवेश करून मानव हानी व पाळीव प्राण्यांची हानी मोठ्या प्रमाणात होतांना दिसते. यामुळे जंगली प्राणी व मानव यांच्यात मोठ्या प्रमाणात शत्रृत्व दिसून येते. कारण जंगल संपदा नष्ट होत आहे यामुळे जंगलात रहाणारे पशु-पक्षी यांचे खान-पान ऐका-मेकांवर अवलंबून असते. परंतु जंगलतोडीमुळे अनेक प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होतांना दिसतात किंवा त्यांची शिकार होतांना दिसते किंवा पर्यावणाच्या ढासळत्या परीस्थितीमुळे मृत्यृशी झुंज देतांना अनेक पशु-पक्षी दिसतात. त्यामुळे आज पर्यावरणाचे संरक्षण करण्याची प्रथम जबाबदारी मानवजातीची आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.
प्लास्टीकनेसुध्दा पर्यावरणाला प्रदूषित केल्याचे दिसून येते. मानवाने स्वत:च्या स्वर्थासाठी पर्यावरणाचे जणुकाय संपूर्ण रक्त पिऊन निचोडून ठेवल्याचे दिसून येते. आज विश्वशांतीसाठी पर्यावण वाचविण्याची गरज आहे. मानवजातींमध्ये वाढणाऱ्या बिमाऱ्या, अनेक व्याधी ह्या सर्व पर्यावरणाच्या बिघडत्या संतुलनामुळे दिसून येतात. यामुळे आज मानवाचे आयुष्यमान दिवसेंदिवस कमी होतांना दिसून येते. पशुपक्ष्यांचे तर जगणे अत्यंत कठीण झाले आहे. जगात वाढते कारखाने आणि जगातील युध्दसामुग्रीची शर्यत व अनेक परमाणु परीक्षण यामुळे संपूर्ण जग प्रदूषित होतांना दिसते.
भारतातील जिवंत उदाहरण म्हणजे "भारताची राजधानी दिल्ली" प्रदूषणाच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगितले जाते. याचाच अर्थ असा की दिल्ली आज प्रदुषणाच्याबाबतीत महाभयानक परीस्थिती असल्याचे दिसून येते. प्रदूषणामुळे दिल्ली गॅसचेंबर बनले की काय असे वाटत आहे. या महाभयानक परिस्थितीत दिल्लीवासी "मास्क"चा मोठ्या प्रमाणात वापर करतांना दिसतात. यामुळे असे वाटते की "दिल्लीमध्ये मास्कयुग आले की काय?". संयुक्त राष्ट्राने 1992 ला पर्यावरण संरक्षण करण्याची संकल्पना जाहीर केली होती. परंतु याबद्दल किती देश अलर्ट व सजन आहे हे पहाणे गरजेचे आहे. पर्यावरण संरक्षण करण्याची घोषणा करणे वेगळे आहे. परंतु त्याला कृतीत कोणता देश रूपांतरित करतो त्याला जास्त महत्त्व आहे.
आज संपूर्ण जग बारूदच्या ढीगाऱ्यावर बसलेले आहे. याचे उदाहरण म्हणजे अझरबैजान-आर्मेनिया युद्ध आणि आता गेल्या 9 महिन्यांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध. त्यामुळे मानवजातीने आपल्या मृत्यृचीही व्यवस्था केल्याचे दिसून येते. मानवजातीने आता पर्यावरण वाचवीले नाही तर पृथ्वीचा विनाश अटळ आहे. याकरिता जगातील सर्व देशांनी पर्यावरण संरक्षण दिवसाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला पाहिजे. वाढते शहरीकरण थांबविले पाहिजे, कारखान्यांतील धूळ व दूषित पाणी यांचा बंदोबस्त केला पाहिजे. भारतासह जगात अनेक वाहने दूषित धूर ओकत असतात, ते कुठेतरी थांबविले पाहिजे.
पर्यावरण विस्कळीत झाल्यामुळे व प्रदूषणामुळे मानवजातीच्या आरोग्यावर संकट ओढावले आहे. यात कॅन्सर, टीबी, मधूमेह, हार्ट अटॅक इत्यादींसह अनेक बिमाऱ्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. भारत मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे. परंतु पर्यावरणाच्या बाबतीत मागे असल्याचे दिसून येते. भारताने मुख्यत्वे करून पर्यावरण संरक्षणासाठी युध्दपातळीवर कार्य करण्याची गरज आहे. गेल्या 5 ते 10 वर्षांपासून जगात अनेक महाप्रलय, मोठ्या प्रमाणात त्सुनामी, ग्लेशीअर वितळणे, अती पाऊस, अती उष्णता, अती थंडी, मोठमोठे जंगल संपदा जळून खाक होणे ह्या सर्व घटना निसर्गाचे संतुलन डगमगल्याने व पर्यावरणाची हत्या केल्याने घडल्याचे स्पष्ट दिसू येते. पर्यावरणाला वाचविण्याकरिता जगातील सर्व देशांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.
भारतात शहरांचे सौंदर्यकरन करण्याच्या उद्देशाने जंगलतोड करणे बरोबर नाही. यामुळे पर्यावण शुद्ध राहील. पर्यावरण संरक्षण दिनाच्या निमित्ताने सरकारला एकच आव्हान आहे की जंगलतोड ताबडतोब थांबवली पाहिजे व ओसाड जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करायला पाहिजे. त्याचप्रमाणे जनतेलाही आवाहन करावेसे वाटते की 26 नोव्हेंबर पर्यावरण संरक्षण दिवसाचे औचित्य साधून या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरासमोर एकतरी झाड लावावे. जागा नसेल तर एखाद्या कुंडीत झाड लावावे व पर्यावरणाचे संरक्षण करावे. त्याचप्रमाणे सरकारने "घर तीथे झाड" ही मोहीम राबविली पाहिजे. वृक्ष लागवडीमुळे "गुरांना चारा, पक्ष्यांना आणि मानवाला फळ व सर्वांना सावली आणि ऑक्सिजन मिळेल" यांच्या संगमाने शुध्द हवा मिळून पर्यावरणात आल्हाददायक वातावरण निर्माण होईल. आज संपूर्ण जगाला पर्यावरण वाचविण्याची हीच संधी आहे. ही संधी गमावून नये.
पर्यावरण प्रदूषित झाल्यामुळे नदी, नाले, तलाव, समुद्र प्रदूषित झाले आहेत. यामुळे जलचर प्राण्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालेला आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी विश्वातील संपूर्ण मानवजातीवर आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी पावले उचलली पाहिजेत. पर्यावरण सुरक्षित तर पृथ्वी सुरक्षित, पृथ्वी सुरक्षित मानव, पशु-पक्षी सुरक्षित हेच ध्येय पुढे ठेवून पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे. आजच्या अत्याधुनिक युगात "मोबाईल टॉवर" मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामुळेसुध्दा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतांना दिसतो. यावरसुध्दा नियंत्रण आणन्याची गरज आहे. साडे तीनशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी निसर्गाचे, पर्यावरणाचे आणि झाडांचे महत्त्व आपल्या अभंगातून सांगितले होते आणि त्याचे आज अनुकरण होण्याची गरज आहे.
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे!
पक्षी सुस्वरे! आळविता!!
येणे सुख रूचे एकांताचा वास!
नाही गुणदोष! अंगीयेता!!
- रमेश कृष्णराव लांजेवार
नागपूर,
मो.नं.९३२५१०५७७९
Post a Comment