Halloween Costume ideas 2015

समता

पूर्वी जगामध्ये गुलामगिरी अस्तित्वात होती ज्याच्याकडे पैसा, संपत्ती आहे किंवा उच्च कुळातील उच्च जातीतील आहे असे लोक गरीब खालच्या जातीतल्या समजल्या जाणाऱ्या लोकांना आपले गुलाम बनवत असे. या गुलामांना कोणत्याच प्रकारचे मानवी अधिकार नव्हते. गुराढोरांप्रमाणे त्यांची खरेदी विक्री केली जायची. अनेक वेळा त्यांच्यावर अमानवी अत्याचार केले जायचे. कुठे दाद ना फिर्याद, अशी त्यांची अवस्था होती. गुलामांची मुलंही गुलामच समजली जायची. गुलामाचा मालक आपल्या मर्जीप्रमाणे त्यांना वागवायचा. 

आजही गुलामगिरी पूर्णपणे संपुष्टात आली असे आपण छातीठोकपणे सांगू शकत नाहीत. आर्थिक गुलामी, वैचारिक गुलामी असे गुलामीचे रूप मात्र बदलले आहे.

अशाच एका गुलामाची सत्यकथा...

आफ्रिकन निग्रो, एका उच्च कुळातील श्रीमंत सरदाराचा गुलाम होता. तो सरदार त्याच्यावर अनन्वित अत्याचार करायचा. जनावरांप्रमाणे त्याला राबवायचा. एकदाचा किस्सा असा झाला की गुलामाला खूप ताप आला. तापाने त्याचे अंग लाहीलाही होत होते. परंतु त्याच्या मालकाने त्याच्यावर कसलीच दया दाखवली नाही. दिवसभर शेळ्या चारून आल्यानंतर रात्री त्याला दळण दळायला बसवले. हिवाळ्याचे दिवस होते, तापाने शरीर फणफणत असताना हा गुलाम घराच्या अंगणात दळण दळत बसला होता आणि दळता दळता रडत होता. त्याच्या आवाजात त्याच्या वेदना जाणवत होत्या. त्याचा रडण्याचा आवाज ऐकून रस्त्याने जाणारा एक तरुण थांबला.

रात्रीची वेळ... कोण रडत आहे? कोणाला एवढे दुःख झाले आहे? या विचाराने त्या तरुणाने दारावर उभे राहून आत येण्याची परवानगी मागितली. गुलामाने त्याला आत येण्याची परवानगी दिली. तो तरुण गुलामाजवळ गेला आणि त्याला रडण्याचे कारण विचारले. गुलाम म्हणाला, "सांगून काय उपयोग! तुम्ही काय माझे दुःख हिरावून घेणार का? साऱ्या शरीरात ताप भरलेला आहे. दिवसभर मी शेळ्या चारुन आलो, परत मालकाने मला इथे दळायला बसवले आहे. मी ही माणूस आहे. माझ्या शरीरालाही आराम हवा आहे परंतु; इथे गुलामांची कोणतीच गय केली जात नाही.  इथे बोलणारे खूप असतात परंतु मदतीला कोणी येत नाही. जा, तुम्ही तुमचं काम करा. मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही."

गुलामाचे ते बोलणे ऐकून, त्याला कोणतेच उत्तर न देता तरुण मागे फिरला आणि अंधारात नाहीसा झाला. गुलामाला वाटू लागले, 'आपण उगाच उलट सुलट बोललो. आपल्या मालकाचा राग त्या तरुणावर काढला आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी आपल्याशी सहानुभूतीने, प्रेमाने बोलत होता. त्यालाही आपण कडवट शब्द बोलून मागे फिरवले.'  या विचाराने स्वतःलाच दोष देत तो परत दळत बसला. डोळ्यातून अश्रूंचा ओघ सुरूच होता. इतक्यात तो गेलेला तरुण परत आला. त्याच्या हातात गरम गरम दूध होते, हळद घातलेले! त्या तरुणाने गुलामला ते दूध दिले आणि सांगितले 'हे दूध पिऊन तू झोपी जा.' गुलाम म्हणाला, 'माझे हे काम.... सकाळी जर मालकाने पाहिले की, मी दळण दळलेले नाही, तर तो चाबकाचे फटके देईल, माझी चामडी जाग्यावर ठेवणार नाही. तरुण म्हणाला, 'तू काळजी करू नको तुझ्या जागी मी तुझं दळण दळून देतो. तू बिनघोर झोपी जा.' तरुणाच्या बोलण्यात जिव्हाळा होता, आपुलकी होती. गुलाम, तरुणाने सांगितल्याप्रमाणे गरम दूध पिऊन झोपी गेला.  

सकाळी उठून पाहिले तर तरुणाने सर्व दळण दळून ठेवलेले होते. गुलाम खुश झाला. पुढे तीन दिवस असेच होत राहिले. तो तरुण रात्रीच्या अंधारात येऊन गुलामाला दळण दळून द्यायचा आणि गुलाम रात्रभर आराम करायचा. 

ते तरुण होते, आदरणीय प्रेषित मुहम्मद सल्लम. आणि ते गुलाम होते आदरणीय बिलाल ( र.). आदरणीय प्रेषित मुहम्मद स. आणि आदरणीय बिलाल र. यांची ही पहिलीच भेट होती. 

वयाच्या चाळीसाव्या वर्षी जेव्हा प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी इस्लामची घोषणा केली. स्वतः प्रेषित असल्याची घोषणा केली आणि एका ईश्वराकडे सर्व लोकांना बोलवायला सुरुवात केली. समतेवर आधारित समाज रचना स्थापन करायला सुरुवात केली. गोरे-काळे, गुलाम-मालक, मानव म्हणून सर्व समान आहेत. कोणी उच्च नाही कोणी नीच नाही. प्रेषितांनी इस्लामच्या तत्त्वानुसार समतेचा जयघोष केल्यानंतर समाजात दुफळी निर्माण झाली. समता मान्य असलेले लोक प्रेषितांच्या बाजूने उभे राहिले तर, लोकांना आपले गुलाम बनवण्याची इच्छा असणारे विषमतावादी लोक प्रेषितांचे विरोधक बनले. त्यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला.

आदरणीय बिलाल र. यांनी देखील इस्लामचा स्वीकार केला. त्यांचा मालक उमया बिन खल्फ खूप चिडला. तो, बिलाल (र.) यांना चाबकाचे फटके द्यायचा. एवढ्यावरच न थांबता  तप्त वाळूवर तो त्यांना झोपवून त्यांच्या छातीवर मोठा दगड ठेवायचा. जेणेकरून त्यांना हालचाल करता येऊ नये. आदरणीय बिलाल (र.) यांनी सर्व हाल अपेष्टा सहन केल्या परंतु ते त्याला बधले नाहीत. एकदा त्यांचा मालक त्यांच्यावर अत्याचार करत होता. तेव्हा पैगंबरांचे अनुयायी आदरणीय अबूबकर सिद्दिक (र.) हे तिकडून जात होते. आदरणीय बिलाल (र.) यांची अवस्था पाहून अबुबकर (र.) यांना फार वाईट वाटले. ते उमया बिन खल्फकडे गेले आणि उमया बिन खल्फ ने मागितलेली रक्कम देऊन आदरणीय बिलाल (र.) यांना खरेदी केले आणि त्याच ठिकाणी त्यांना स्वतंत्र करून टाकले. 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आदरणीय बिलाल (र.) सरळ पैगंबर मुहम्मद सल्लम. यांच्या छायेत आले. संपूर्ण आयुष्यभर प्रेषितांचे एकनिष्ठ अनुयायी म्हणून जगले. 

मदीना येथे जेव्हा पैगंबरांनी मस्जिद बांधली आणि त्या मस्जिदमध्ये अजान देण्याची वेळ आली, इस्लामची पहिली अजान देण्याचा मान पैगंबरांनी आदरणीय बिलाल यांना दिला! तसेच मक्केवर विजय मिळवल्यवर मक्का मध्ये पहिली अजान देण्याची वेळ आली तेव्हा; दहा हजार मुस्लिम लोकांमधून पैगंबरांनी आदरणीय बिलाल यांचीच निवड केली.

जे बिलाल र. मक्केमध्ये गुलाम बनून राहिले होते, ज्यांना दोरीने बांधून मक्के मध्ये फरपटले गेले होते, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले होते. ते बिलाल आज मक्केत मोठमोठ्या सरदारांसमोर कबागृहावर चढून आजान देत होते. लोक हैराण होऊन त्यांच्याकडे पाहत होते की, एका गुलामाला प्रेषितांनी एवढा मान सन्मान दिला. प्रेषितांनी केवळ समतेची घोषणाच केली असे नाही तर ती समता प्रत्यक्षात अंमलात आणली...

-सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget