छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी जे विचार व्यक्त केले आणि त्याआधीसुद्धा वेळोवेळी त्यांनी महाराष्ट्राचे इतर महापुरुषांविषयी आणि खुद्द महाराष्ट्राविषयी जे विचार जाहीरपणे शासकीय समारंभात व्यक्त केले त्याविरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेने तीव्र प्रतिक्रिया देणे स्वाभाविक होते. तरीदेखील इथल्या जनतेने संयम सोडलेला नाही. इथले लोक सडकेवर उतरले नाहीत. जनतेच्या संयमाचे कौतुक करत असतानाच त्यांच्या भावनांची परीक्षा घेण्याचे धास कुणी करू नये.
राज्यपालांनी एकदा नाही अनेकदा महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी अनुचित उद् गार काढले आहेत. यामागे त्यांचे खरे उद्दिष्ट काय हे माहीत नाही. सत्तेच्या सर्वोच्च आणि अतिशय सन्मानजनक पदावर बसलेल्या व्यक्तीने जनतेचा, जनतेच्या भावनांचा, त्यांच्या महापुरुषांचा आदर करावा ही कुणाची अपेक्षा नाही तर हे अशा उच्चपदस्थ सत्ताधाऱ्यांवर बंधनकारक असते. ही साधी गोष्ट अशा व्यक्तींना कळायला हवी.
इतक्या घटना घडत असताना देखील भाजपने याविषयी आजपर्यंत काहीच केले नाही. यामुळे भाजपला नेमके काय हवंय हे त्यांनी बोलून दाखवावे. लोक हिंसेवर उतारु होत नाहीत, होऊ नयेत पण यामुळेच तर भाजपची कोंडी होत आहे काय? या सगळ्या घटनांमागे भाजपचे कोणते कुटिल राजकारण तर नाही ना. जनतेने हिंसक निदर्शने करावी, जेणेकरून राज्यात शांतता भंग व्हावी आणि याचा राजकीय फायदा भाजपला मिळावा अशी तर या पक्षाची खेली नसावी! कारण वारंवार अशा घटना घडत असताना महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांचा विचार भाजप करत असल्याचे दिसत नाही. उल च त्यांचे नेते काही वेळा असे काही वक्तव्य देऊन जातात ज्यामुळे अधिकच शंका वाटू लागते.
दुसरे असे की महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. भोतिक, आर्थिक क्षेत्रातच नाही साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक क्षेत्रात सुद्धा महाराष्ट्राची स्थिती इतर राज्यांपेक्षाच नव्हे तर भारतभरचा जरी विचार केला तरी फार प्रगत आणि विकसित आहे. महाराष्ट्राची ही ख्याती, हे नावलौकिक इतर राज्यांना काही प्रमाणात का असेना पसंत नाही. उघडपणे कोणतेही भूमिका ते घेत नसले तरी छुप्या कारवाया नेहमी चालूच असतात. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वच जाती-धर्माचे लोक शांततेने एकमेकाशी सुसंवादाने वागत असतात. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. आणि नेमके हेच इतर राज्यांना, विशेषतः जिथे जिथे भाजपचे सरकार आहे त्यांच्यासाठी चिंताजनक आणि दुःखदायक बाब आहे, असे वाटते. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादाला एक इतिहास आहे. वारंबार त्याची पुनरावृत्ती होत असते. पण ज्या वेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी छ. शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपले विचार मांजले त्याच वेळी पुन्हा सीमावाद चव्हाट्यावर येण्यामागचे संदर्भसुद्धा शोधावे लागतील.
राज्यपाल म्हणतात की ते छ. शिवाजी महाराजांवर टीका करण्याचा विचार स्वप्नातसुद्धा मनात आणू शकत नाही. त्यांचे हे वक्तव्य खरे आहे. कारण कोणताही माणूस स्वप्नात जे करू शकत नाही ते प्रत्यक्षात करत असतो. त्यांनी छत्रपतींबद्दल आपले विचार स्वप्नात मांडले असते तर कुणी आक्षेप घेण्याचे कारण नव्हते, पण त्यांनी जाहीरपणे एका समाजासमोर आपले विचार मांडले आहेत, झोपेत नाही. इतकेच नाही तर महाराष्ट्राची आर्थिक प्रगतीसुद्धा त्यांना पाहवत नाही. म. ज्योतिबा फुले यांच्याविषयी देखील त्यांनी आपले विचार मांडले होते. हे सगळे स्वप्नात नव्हते पण स्वप्नातलीच इच्छा-आकांक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठीचा खटाटोप आहे.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment