माननीय जियाद बिन लबीद यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एका भयानक गोष्ट सांगितली आणि मग म्हणाले, ``असे तेव्हा घडेल जेव्हा `दीन' (जीवनधर्मा) चे ज्ञान संपुष्टात येईल.'' यावर मी म्हणालो, ``हे अल्लाहचे पैगंबर! आम्ही पवित्र कुरआनचे पठण करतो आणि आमच्या अपत्यांना पठण करण्यास शिकवितो आणि आमची मुले त्यांच्या अपत्यांना पठण करण्यास शिकवतील; तर मग ज्ञान कसे नष्ट होईल?'' पैगंबरांनी सांगितले, ``अति उत्तम! मी तुम्हाला मदीनेतील सर्वांत समजदार मनुष्य समजत होतो. ज्यू व िख्र्चाश्न तौरात आणि इंजीलचे किती अधिक प्रमाणात पठण करतात, परंतु त्यांच्या शिकवणींचे जरादेखील अनुसरण करीत नाहीत, हे तुम्ही पाहात नाही काय?'' (हदीस : इब्ने माजा)
माननीय अली (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीचे स्वर्ग आणि नरक लिहिले गेलेले आहे.'' लोकांनी विचारले, ``हे अल्लाहचे पैगंबर! मग आम्ही आमच्या लिहिलेल्याचा का लाभ घेऊ नये आणि कर्म सोडून द्यावे?'' पैगंबरांनी सांगितले, ``नाही, कर्म करा, कारण प्रत्येक व्यक्तीला तीच ईशकृपा लाभते ज्यासाठी त्यास जन्माला घालण्यात आले आहे, जो दैववान आहे त्याला स्वर्गातील कामांची ईशकृपा मिळते आणि जो दुर्दैवी (नरकवासी) आहे त्याला नरकातील कामांची ईशकृपा मिळते.'' यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी `सूरह अल-लैल'च्या या दोन आयतींचे पठण केले (ज्या वरील हदीसमध्ये लिहिलेल्या आहेत, त्यांचा अर्थ असा की) ज्याने संपत्ती खर्च केली आणि ईशपरायणतेच्या मार्गाचा अवलंब केला आणि उत्कृष्ट गोष्टीचा स्वीकार केला (म्हणजे इस्लामचे अनुसरण केले) तर आम्ही त्याला उत्तम जीवन म्हणजे स्वर्गाची ईशकृपा देऊन आणि ज्याने आपली संपत्ती खर्च करण्यात कंजूषपणा दाखविला आणि (अल्लाहशी) अनभिज्ञ आणि उत्तम जीवनास खोटे ठरविले तर आम्ही त्याला त्रासदायक जीवनाची (नरक) ईशकृपा देऊ. (हदीस : बुखारी व मुस्लिम)
स्पष्टीकरण : अल्लाहपाशी ही गोष्ट निश्चित आहे की मनुष्य आपल्या कोणत्या कर्मांमुळे नरकात जाईल आणि तो कोणत्या कर्मांमुळे स्वर्गात जाईल. अल्लाहने या `दैवा'ला अतिशय विस्तारपूर्वक पवित्र कुरआनात समजावून सांगितले आहे आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांनीदेखील चांगल्या पद्धतीने स्पष्ट केले आहे. आता मनुष्याचे हे वैयक्तिक काम आहे की त्याने नरकाचा मार्ग अवलंबिणे पसंत करावा अथवा स्वर्गाचा मार्गावर चालणे. दोन्हींपैकी एकाची निवड करणे ही त्याची जबाबदारी आहे आणि त्याची जबाबदारी यासाठी आहे की अल्लाहने त्याला निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे आमि मार्गाची निवड करण्यास मोकळे सोडले आहे. हे स्वातंत्र्य त्याला शिक्षा मिळवून देईल आणि त्याद्वारेच त्याला स्वर्गप्राप्ती होईल. परंतु अनेक अल्पबुद्धी लोक आपल्या जबाबदारी अल्लाहच्या माथी मारतात आणि स्वत:ला विवश समजतात.
माननीय अबूी ख़िज़ामा (आपल्या वडिलांकडून प्राप्त माहितीवरून) यांच्या कथनानुसार, ते म्हणाले, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ``ही दुआ (प्रार्थना) `तअवीज्' (ताईत) जे आम्ही आजारपणाच्या बाबतीत करतो आणि ज्या औषधांचा आम्ही आपला आजार दूर करण्यासाठी वापरतो आणि दु:ख व संकटांपासून वाचण्यासाठी जे उपाय करतो, हे सर्व उपाय अल्लाहच्या भाग्यापासून वाचवू शकतात काय?'' पैगंबरांनी उत्तर दिले, ``या सर्व वस्तूदेखील अल्लाहच्या भाग्याचाच एक भाग आहेत.'' (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उत्तराचे स्पष्टीकरण असे आहे की ज्या अल्लाहने हा आजार आमच्यासाठी लिहिला आहे त्याच अल्लाहने हेदेखील निश्चित केले आहे की अमुक औषधाने आणि अमुक उपायाद्वारे हा आजार बरा होऊ शकतो. आजार निर्माण करणारा अल्लाहच आहे आणि तो बरा करणारे औषधाचा निर्मातादेखील. सर्वकाही त्याने बनविलेल्या कायदेकानूनुसारच आहेत.
माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मागे स्वारीवर बसलो होतो. पैगंबर म्हणाले, ``हे मुला, मी तुला काही सांगत आहे (ते लक्षपूर्वक ऐक). पाहा, तू अल्लाहचे स्मरण कर अल्लाह तुझे स्मरण करील. तू अल्लाहचे स्मरण कर, अल्लाहला समोर पाहशील. जेव्हा मागशील तेव्हा अल्लाहकडे माग. जर तुला एखाद्या संकटात मदत हवी असेल तर अल्लाहकडे माग. अल्लाहला तुझा मदत करणारा बनव आणि या गोष्टीवर विश्वास ठेव की अल्लाहने तुझ्याकरिता जे काही लिहून ठेवले आहे त्याव्यतिरिक्त लोक एकत्र येऊन तुला एखादा लाभ पोहोचवू इच्छित असतील तरी ते तुला लाभ पोहचवू शकणार नाहीत. (म्हणजे कोणाकडे देण्याकरिता काहीही नसल्यामुळे तो देऊ शकणार नाही, सर्व काही अल्लाहचे आहे. तो जे काही देण्याचा एखाद्याबाबत निर्णय घेतो तेवढेच मिळेल, मग ते कोणत्याही माध्यमातून मिळो.) आणि अल्लाहने तुझ्या भाग्यात जे काही लिहिले आहे त्याव्यतिरिक्त जर लोकांनी एकत्र येऊन तुला एखादे नुकसान पोहचवू इच्छिले तरी ते कसलेही नुकसान पोहोचवू शकणार नाहीत. (तर मग अल्लाहलाच आपला एकमेव आधार बनविले पाहिजे.) (हदीस : मिश्कात)
संकलन
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment