Halloween Costume ideas 2015

पुरोगामी महाराष्ट्राला अधिक उदार, सहिष्णू व सेक्युलर बनवणारं पुस्तक


इतिहास-संशोधक सरफराज अहमद यांचं ‘अमीर खुसरो-दारा शुकोह : प्रवास एका इतिहासाचा’ हे अकरा इतिहास-संशोधनपर लेखांचं लवकरच हरिती प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला कथा-कादंबरीकार आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

समी मूळचा मराठवाड्याचा व माझे वडील हैदराबादला वाढलेले. त्यामुळे दखनी भाषा, दखनी संस्कृती व उर्दू भाषा-साहित्य हा माझ्या आस्थेचा विषय. त्यामुळे समान आवडीमुळे सरफराज अहमद हे माझे केव्हा व कसे घनिष्ट मित्र बनले हे समजलेच नाही.

सरफराज अहमद हे हाडाचे इतिहास संशोधक आहेत. आणि मराठी जगताला ते दखनी इतिहासाचे अज्ञात पैलू उलगडून दाखवत आहेत. आणि त्याद्वारे मुस्लिम इतिहास म्हणजेच मुस्लिम राज्यकर्त्याच्या इतिहासाचे वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यात संशोधकीय शिस्त पाळत उपलब्ध, फारसी, उर्दू व इंग्रजी दस्तावेजाच्या आधारे पुर्नलेखन करत आहेत आणि मुस्लिमांचे भारत वर्षाला दिलेले योगदान व त्यातल्या अभिमान बाळगाव्या, अशा सकारात्मक बाबी तटस्थ, प्रामाणिकपणे पुराव्यासह आणि तर्कशुद्ध प्रतिपादनाद्वारे करत आहेत, हे लक्षात येत होतं.

आणि आता त्यांचे ‘अमीर खुसरो-दारा शुकोह : प्रवास एका इतिहासाचा’ हे अकरा इतिहास-संशोधनपर लेखांचे पुस्तक मराठी रसिकांपुढे येत आहे, ही समाधानाची बाब आहे, मी सदर पुस्तकाचे मन:पूर्वक स्वागत करतो.

आज देशात इतिहासाचे भारतीय दृष्टीकोनातून पुनर्लेखनाच्या नावाखाली भारतातला जवळपास हजार वर्षांचा मुस्लिम इतिहास हा केवळ अन्याय व अत्याचाराचाच आहे, अशी भूमिका घेतली जात आहे. आणि त्याद्वारे मुस्लिमांचे ऐतिहासिक योगदान नाकारण्याचा अश्लाध्य प्रयत्न होत आहे. सर्वच मुस्लिम राज्यकर्ते हे सद्गुणांचे पुतळे होते, असा कोणी दावा करणार नाही, पण अकबर, शेरशहा सुरी, रजिया सुलतान, दक्षिणेतली चांदबीबी यांच्या राजवटी, तसेच मुस्लिमांचे स्थापत्यकलेमधले भरीव योगदान (उदा. - ताजमहल, कुतूबमिनार, लाल किल्ला, गोलघुमट), कला-संस्कृतीमध्ये टाकलेली भर (अमीर खुसरो ते मिर्झा गालिब) आणि मध्ययुगीन भक्ती सांप्रदायाचा समकक्ष आध्यात्मिक समता व बंधुतेचा आणि प्रेम - शांती - मानवधर्माचा पुरस्कार करणारा सूफी संतांचा संप्रदाय व त्यांचं काव्य, यांस आपण नाकारू शकत नाही.

ब्रिटिशांनी तसेच डाव्या विचारवंतांनी भारताच्या लिहिलेला इतिहासावर पूर्वीही प्रश्न उपस्थित केले जात होते व आजही केले जातात. त्यात काही गैर नाही. त्यामुळे नव्याने इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची आवश्यकता असतेच. पण ते करताना आधी भूमिका ठरवून, विशिष्ट नजर वा विचारसरणी घेऊन आणि त्याला अनुकूल तेवढेच पुरावे व संदर्भ उदधृत करून इतिहासलेखन करणारे इतिहासकार एकांगी चित्र वाचकांपुढे उभे करतात. हे अर्थातच योग्य नाही. पण त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरी बाजू दाखवताना तशीच चूक करणारे इतिहासकार पण कमी नाहीत. त्यामुळे वैज्ञानिक वृत्तीने प्रश्न उपस्थित करत पुरावा तपासणे व त्यातून प्रसंगी परस्पर विरोधी बाजू एकाच राज्यकर्त्यांच्या येत असल्या तरी त्या तशा मांडणे व जिथे तर्कसंगती लागत नाही, तिथे वैज्ञानिकांप्रमाणे तसे नमूद करत त्याचा शोध पुढील काळावर सोपवून तसे प्रामाणिकपणे नोंदवणे, हे अस्सल इतिहास संशोधकाचे काम आहे.

असे इतिहासकार कमीच असतात. पण अशा दुर्मीळ इतिहास संशोधकात सरफराज अहमद येतात, असे माझे हे पुस्तक वाचताना मत झाले आहे. पण तरीही ज्यांच्यावर जमातवादी इतिहासलेखनाने अन्याय झाला आहे, त्यांच्या उजळ बाजूवर व उल्लेखनीय योगदानावर प्रकाश टाकणे, ही भूमिका घेऊन हे लेखन झाल्यामुळे काही वेळा सरफराज अहमदच्या लेखनात खंडन-मंडणाचा अभिनिवेश डोकावतो, हे पण खरे आहे.

तरीही बऱ्याच अंशी सत्याचा वस्तुनिष्ठ शोध घेण्याचा खऱ्या इतिहास संशोधकाच्या भूमिकेशी ते ठाम राहिले आहेत, म्हणून या पुस्तकातून मुस्लिम राज्यकर्त्यांच्या इतिहासाची पुनर्व्याख्या करत जो इतिहास सरफराज अहमद यांनी कथन केला आहे, तो महत्त्वाचा आणि भारताच्या ‘गंगा-जमनी तहजीब’च्या संकल्पनेला सत्याचा आणि संशोधकीय आधार देणारा झाला आहे. आज अशा संशोधनाने विभिन्न संस्कृतीबाबत ‘मेल्टिंग पॉट’ झालेल्या भारताचा हा सर्वधर्मसमभाव आणि आदराचा इतिहास प्रभावीपणे सांगण्याची गरज होती, ती या पुस्तकानं बऱ्याच अंशी सफल झाली आहे.

पहिला लेख ‘अमीर खुसरो ते इब्राहिम आदिलशहा - गंगा-जमनी संस्कृतीचे दोन नायक’, ‘दारा शुकोहचा सुफी वारसा’ आणि टिपू सुलतान आणि बाबरच्या अपरिचित पैलूंवर प्रकाश टाकणारे लेख मुस्लिम राज्यकर्त्याचे भारतीय इतिहास, संस्कृतीबाबतचे योगदान आणि त्यांनी आचरलेल्या शांततामय सहअस्तित्वावर प्रकाश टाकणारे आहेत.

अमीर खुसरोबाबत ते भारतीय संस्कृतीचे आत्मभान घेऊन सामान्य माणसांच्या बाजूने उभे राहणारे आणि समाजाला मूल्यविवेक शिकवणारे महाकवी आहेत, हे लेखकाचं प्रतिपादन पटणारं आहे. त्यांनी एच. एन. सोल्कनॉज या मध्ययुगीन इतिहासाच्या संशोधकाचं अमीर खुसरोबाबत नोंदवलेलं निरीक्षण महत्त्वाचं आहे- ‘‘मध्ययुगीन काळात भारतीय संस्कृतीची पालखी अमीर खुसरोंनी आपल्या खांद्यावर घेतली. समतेचे तत्त्व भारतीय समाजात रुजवण्यासाठी शब्दांचे माध्यम वापरले. इस्लामच्या उदारमतवादी परंपरेचे प्रतिनिधित्व करणारा खुसरो हा अद्वितीय कवी आहे.’’

या लेखात लेखकाने खुसरोची ‘धर्म जपत धर्मापलीकडे जाण्याची सद्भावना’ आणि ‘भारतप्रेम व राष्ट्रीयत्वाच्या कविता’  उदधृत करून ‘तो प्रेमाचा काफीर आहे व त्याला मुसलमानीची आवश्यकता नाही’, हे त्याचं बंडखोर व्यक्तिमत्त्व समर्पकपणे चितारलं आहे. त्याच्या एका कवितेच्या ‘किश्वरे हिंद बहिश्ते बर जमिन’ या ओळी दिल्या आहेत, ज्याचा अर्थ ‘भारत पृथ्वीवरील स्वर्ग आहे’, असा होतो. त्यातून तो या भूमीशी व इथल्या संस्कृतीशी किती एकरूप झाला होता, हे लेखकाने योग्य रीतीने दाखवून दिले आहे.

मोहमद कुली कुतुबशहा तर दख्खनी साहित्याचा महाकवी होता, हे लेखकाने सप्रमाण दाखवून त्याचा एक वेगळा पैलू कथन केला आहे. फारसीचा दुराग्रह न करता त्याने स्थानिक लोकभाषेत काव्यलेखन केलं. हे संदर्भ आणि हा सांस्कृतिक इतिहास आजच्या धार्मिक विद्वेषाच्या कालखंडात उच्चरवाने सांगणे आणि लोकांपर्यंत ही माहिती नेणे शांततामय सहअसित्वासाठी महत्त्वाचे आहे.

खरं तर प्रस्तुत पुस्तकातील प्रत्येक लेख मुस्लिम इतिहासावर नवा प्रकाश टाकणारा आहे. सरफराज अहमद यांनी टिपू सुलतानाच्या पत्रव्यवहारातून आणि बाबरच्या आत्मचरित्र ‘बाबरनामा’ व अन्य कृतींमधून हे दोन राज्यकर्ते प्रचलित गैरसमजुतीच्या पलीकडे कसे प्रजाहितदक्ष व उदार सुलतान होते, हे संक्षेपाने पण प्रमाणानिशी दाखवून दिले आहे. खरे तर टिपू सुलतानाचं नायकत्व गिरीश कार्नाडांच्या ‘द ड्रिम्स ऑफ टिपू’ या नाटकाद्वारे भारतीयांपुढे आले होते, पण त्याच्या पत्रातून तो कसा इंग्रजांच्या वसाहतवादाला विरोध करणारा एतद्देशीय बादशहा होता, हे या लेखातून मला वाटते, मराठीत प्रथमच प्रभावीपणे आले आहे.

बाबराची आजची प्रतिमा ही बाबरी मशीद-रामजन्मभूमी वादानं हिंदूंसाठी नकारात्मक झाली आहे, मात्र त्याची राजवट ही मंदिरं तोडण्याच्या एक-दोन घटना वगळता अत्यंत सहिष्णू होती, हा लेखकाने काढलेला निष्कर्ष पुरेशा पुराव्याविना पटणारा नाही. लेखकाने उरवाच्या डोंगरावरील मूर्त्या नग्न होत्या म्हणून तोडल्या, हा लेखकाने दिलेला संदर्भ माझ्या मते पुरेसा नाही. ‘‘बाबरच्या अधिकाऱ्यांनी बाबरला न कळवता स्वत:हून घेतलेल्या (म्हणजे मंदिर विध्वंसाच्या) निर्णयासाठी बाबराला जबाबदार धरता येणार नाही’’, हा लेखकाने काढलेला निष्कर्ष पुराव्याला धरून नाही, तर त्याचं मोठेपण वाचकांच्या मनावर ठसवण्यासाठी केलेलं विधान आहे, असं मला वाटतं.

इथं एक संशोधक इतिहासकाराच्या भूमिकेपासून सरफराज अहमद काही प्रमाणात ढळले गेले, असा निष्कर्ष एक वाचक म्हणून काढला तर चुकीचा ठरणार नाही. पण बाबराचं मोठेपण एका साम्राज्याचा निर्माता म्हणून निर्विवाद आहे. रयतेचं मन जिंकल्याखेरीज आणि स्थानिकाचा धर्म व संस्कृतीला आपलंसं केल्याखेरीज मोगल साम्राज्य एवढं प्रदीर्घ काळ टिकलं नसतं. त्यात अकबर, जहांगीर व शहाजहानचा - खास करून अकबराच्या उदार राज्यकारभाराचा वाटा मोठा आहे.

तसेच हैदराबादच्या शेवटचा निजाम मीर उस्मानअली खाँवर ‘शत्रूभावी समीक्षेच्या पलीकडचा’ नावाने जो लेख प्रस्तुत ग्रंथात आहे, तोही त्याला वाजवीपेक्षा अधिक उजळ करणारा व इतिहासाशी काहीसा विसंगत ठरणारा आहे. लेखकाने अनंत भालेराव या ‘मराठवाडा’ दैनिकाच्या संपादक व मराठवाड्याचं वैचारिक नेतृत्व करणाऱ्या सव्यसाची लेखकानं मीर उस्मान अलीला ‘शोषक बादशहा’ ठरवलं, ते या ग्रंथलेखकास व्यथित करणारं म्हणून अमान्य आहे.

मला स्वत:ला प्रस्तुत ग्रंथातील ‘मराठवाड्याच्या मध्ययुगीन इतिहासाचे पुनर्लेखन’ व ‘हैदराबादची साहित्य संस्कृती’ हे दोन लेख मूळचा मराठवाडी म्हणून विशेष महत्त्वाचे वाटतात. त्याद्वारा माझ्या उज्ज्वल मराठवाडी सांस्कृतिक व साहित्यिक परंपरेची जाणीव, हे लेख वाचताना मला झाली. दख्खनी भाषेचा उदय आणि प्रगती, साहित्य निर्मिती तसेच उर्दू भाषेला निजामाने दरबारी भाषा केल्यामुळे त्या भाषेच्या विकासाला चालना मिळाली, याचे सम्यक ज्ञान या लेखांनी वाचकांना समाधानकारक रीतीने होते.

पण येथे लेखकाने कुतुबशाही-आदिलशाहीची स्थानिक मराठी, कानडी व तेलुगू भाषेला महत्त्व देण्याच्या उदार परंपरेला छेद देत निजामशाहीत उर्दू ही राज्यकारभाराची व शिक्षणाची भाषा करून ती स्थानिक लोकांवर का थोपवली गेली? त्यामागे निजामाच्या कोणत्या प्रेरणा होत्या? यावर भाष्य करणं आवश्यक होतं. निदान पुढील पुस्तकात तरी करावं व तटस्थपणे त्याचं ऐतिहासिक मूल्यमापन प्रस्तुत करावं असं मला जरूर सुचवावंसं वाटतं. सरफराज अहमद हे संशोधकीय शिस्तीनं इतिहासाकडे तटस्थपणे पाहणारे अभ्यासक आहेत, ज्याची प्रस्तुतचा ग्रंथ साक्ष आहे, म्हणून त्यांच्याकडून ही अपेक्षा करणं अवाजवी होणार नाही.

या पुस्तकातील इतर लेख म्हणजे ‘मुघलांचे जनानखाने’, ‘अलबरुनी’ आणि ‘फखरे मुदब्बीर’ हे लेख मुस्लिम जीवन व मुस्लिम विचारवंतांचे वैचारिक योगदान कथन करणारे आहे. मलिक अंबर याच्यावर स्वतंत्र लेख खरे तर त्याचे दखनी राजवटीच्या संदर्भातले योगदान पाहता आणि औरंगाबाद शहराचा निर्माता म्हणून त्याचं महत्त्व लेखकानं स्वतंत्रपणे लिहिणं आवश्यक होतं. इतर लेखात त्याच्या कर्तृत्वावर संक्षिप्तपणे प्रकाशझोत टाकला गेला आहे, पण तो दखनी संस्कृतीचा एक नायक होता, त्याच्यावर वेगळा लेख हवा होता, असं राहून राहून वाटतं. असो. मागेपुढे ते नक्कीच मलिक अंबर लेख लिहितील, अशी अपेक्षा आहे.

एकूणच प्रस्तुत पुस्तक नावाप्रमाणे दखनी संस्कृतीचं ऐतिहासिक महत्त्व व त्याला लाभलेली दखनी राष्ट्रीयत्वाची किनार आणि इब्राहिम आदिलशहा व मलिक अंबर या दोन मराठी राष्ट्रीयत्वाची उभारणी करणाऱ्या नायकांचं योगदान समर्थपणे दाखवून देणारा झाला आहे. भारतातील गंगा-जमनी संस्कृतीचं साधार व सम्यक दर्शन आजच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात सप्रमाण व पुराव्यानिशी घडवल्याबद्दल या लेखकाचं मी अभिनंदन करतो. आणि हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसानं उघड्या मनानं वाचावं, म्हणजे हा पुरोगामी महाराष्ट्र अधिक उदार, सहिष्णू व सेक्युलर होऊ शकेल!


‘अमीर खुसरो-दारा शुकोह :

प्रवास एका इतिहासाचा’

लेखक : सरफराज अहमद

हरिती प्रकाशन, पुणे

पाने – २४०, मूल्य – ३०० रुपये.

सदर पुस्तक प्रकाशनपूर्व पन्नास टक्के सवलतीत मिळवण्यासाठी  संपर्क :

राहूल लोंढे – 7385521336


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget