सुख साधेपणात दडले आहे आणि त्यात विवाह सारखा सोहळा अगदी साधेपणाने साजरा होणे म्हणजे दुग्धशर्करा योग. खामगाव (जि. बुलढाणा) येथील जावेद खान यांची मुलगी व मुहम्मद अफजल यांचे चिरंजीव मुहम्मद फजल यांचा विवाह 30 ऑ्नटोबर रोजी खामगाव येथील मस्जिदीत सरबत वाटून झाला.
आजच्या परिस्थितीत विवाह अगदी खर्चिक बनले आहेत. त्यामुळे मुलीच्या पित्याला मुलीचे लग्न लावून देणे म्हणजे जीवाला धास्तीच असते. मात्र चांगल्या विचारांची, चांगल्या आचाराचे नाते जुळले की सगळं काही सोप आणि आनंदी होतं. जमाना काहीही म्हणो परंतु, जे कुटुंब ईश्वरीय आदेशाचं अवलंबन करतात त्या कुटुंबात आनंदाचे वारे सतत वाहत असते. त्यामुळे आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी प्रेरित करणे एक सुखद आणि दीर्घकालीन आनंद देणारे असते. असाच विवाह खामगाव येथे पार पडला आणि विवाहात उपस्थित संगळ्यांना आदर्श विवाहाच मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दाखविणारा ठरला.
मिल्लत कॉलनी, खामगावातील रहिवासी जावेद खान यांच्या मुलीचे नाते पिंपळगाव राजा येथील रहिवासी मुहम्मद अफज़ल यांचा मुलगा मुहम्मद फज़ल यांच्याशी जुळले होते. दोन्ही कुटुंबांचा जमात-ए-इस्लामीशी संबंध असल्याने, दोन्ही कुटुंबांच्या पालकांनी हुंडा आणि जेवणाच्या खर्चिक परंपरेला फाटा देत अत्यंत साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.
वर मुहम्मद फजल यांचा संबंधही स्टुडन्ट इस्लामी आर्गनायझेशनशी व वधू गर्ल इस्लामिक ऑर्गनायझेशन ची सदस्य. दोघेही इस्लामचे जाणकार. 30 ऑक्टोबर 2022 रोजी पिंपळगाव राजा येथील मुहम्मद अफज़ल व त्यांचे काही नातेवाईक आणि मित्रांसह दुपारच्या सुमारास झिया कॉलनी मशिदीत पोहोचले. जेथे जावेद खानचे कुटुंबीय आणि स्थानिक समुदायातील सदस्य त्यांच्या स्वागतासाठी होते. जुहर (दुपार)च्या नमाजनंतर जमात-ए-इस्लामी हिंदचे बुलढाणा जिल्हा सहाय्यक नियंत्रक मौलवी हाफिज मुजाहिद कुरेशी यांनी कुरआन आणि प्रेषित सल्ल. यांच्या आदेशाच्या प्रकाशात सुलभ आणि मसनून विवाहाचे महत्त्व आणि परिणामकारकता यावर उपस्थितांना संबोधित केले. भाषणानंतर विवाह सोहळा पार पाडला. नवरदेवाच्या कुटुंबीयांनी वधूच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला नाही. यावेळी उपस्थित नातेवाईक व मित्र परिवारांना शरबत देऊन निकाह संपन्न झाला. विवाहानंतर उपस्थितांनी वधू-वरांना प्रार्थना करून आशीर्वाद दिले. या आदर्श विवाहाबद्दल जिल्ह्याभरातून कौतुक होत आहे.
मुस्लिम समाजामध्ये खर्चिक विवाह करण्याची जणू स्पर्धाच सुरू झालेली आहे. मस्जिदीमध्ये निकाह करून जेवणाची व्यवस्था मात्र फं्नशन हॉलमध्ये केली जाते. त्यासाठी लाखो रूपयांचा खर्च केला जातो. हा अनाठायी खर्च वाचविला गेला तर मुस्लिमांच्या ज्या खऱ्या समस्या आहेत त्यावर उपाय शोधता येतील. विशेषतः शिक्षणामध्ये मुस्लिम तरूण फार मागे आहेत. त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी लग्नाच्या आगाऊ खर्चाला फाटा देऊन मदत करता येईल. आज ही काळाची गरज आहे. मात्र याकडे समाज लक्ष देत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. लग्नामध्ये शेकडो लोकांना जेऊ घालण्याचा अत्यंत वाईट पायंडा इतका लोकप्रिय झालेला आहे की, लोकांना फजल सारख्या तरूणाचा विवाह साध्या पद्धतीने होऊ शकतो, यावर विश्वास बसणे कठीण वाटण्याची शक्यता आहे. मात्र जसं वर म्हटलेलं आहे सादगी में ही खुशीयाँ हैं. अल्लाह सर्वांना सद्बुद्धी देओ. आमीन.
Post a Comment