कुरआनात सांगितल्याप्रमाणे माणसाने स्वतःची वास्तविकता समजून घेतली नाही तर त्याला अध्यात्मिकता हा विषय समजणार नाही. माणसाचे अस्तित्व हे संमिश्र अस्तित्व आहे. एक त्याचे जैविक अस्तित्व आहे आणि दुसरे त्याचे आत्मिक अस्तित्व आहे. जैविक अस्तित्वामध्ये मातीपासून बनलेले शरीर व त्यामधील जीवाचा समावेश होतो तर आत्मिक अस्तित्वात अल्लाहच्या आदेशानुसार शरीरात फुंकला जाणारा आत्मा आहे. सामान्य अर्थाने आत्मा आणि शरीर वेगळे होणे याला मृत्यू असे म्हणतात.
जीव आणि आत्मा दोघांची आपापली स्वतंत्र ओळख आहे. दोघांच्या आपापल्या गरजा आहेत आणि या गरजा मोठ्या प्रतिद्वंद्वी व परस्परविरोधी आहेत. दोघांच्या रुची, प्रवृत्तीमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे.
एकाच्या उत्पत्तीचा संबंध उंच स्थानी आहे तर दुसऱ्याचे अस्तित्व मातीपासून निर्माण झालेले आहे. एकाची दिशा खाली आहे तर दुसऱ्याची वर आहे. दोघेही आपापल्याकडे खेचत असतात. ही वस्तुस्थिती माहीत नसेल तर अध्यात्मिक शिकवणी समजून घेणे अगदी अशक्य आहे.
या विषयावर भाष्य करताना मौलाना मुहीयुद्दीन गाझी यांनी आपले मत व्यक्त केले आहे की, "जेव्हा अध्यात्माची चर्चा केली जाते, तेव्हा आत्मा म्हणजे जीव असा अर्थ होत नाही, किंवा माणसात आढळणारे अनेक जैविक घटकही आत्म्याचा अर्थ नाही, कारण कधी असंही होतं की माणसाचा जीव टवटवीत असतो पण आत्मा कोमजलेला असतो. खरं तर जीव हा शरीराचाच एक भाग आहे."
(अनुवाद:- रूहानियत - पृष्ठ १२ )
माणसाच्या अस्तित्वाचे दोन पैलू आहेत म्हणून त्याचे प्रेमही दोन गोष्टींवर आहेत. कुरआनमध्ये म्हटल्याप्रमाणे एक प्रेम त्याच्या जैविक गरजेपोटी आहे.
"लोकांसाठी त्या सर्व गोष्टी आकर्षक बनविण्यात आल्या आहेत ज्या त्यांना मनापासून आवडतात. जसे, स्त्रिया, मुले, सोन्या-चांदीचे ढीग, उमदे घोडे, गुरेढोरे आणि शेतजमिनी, ही सर्व या क्षणिक जीवनाची साधने आहेत, खरे पाहता सर्वोत्तम ठिकाण मृत्यूनंतरच्या जीवनात अल्लाहपाशी आहे." (आले- इम्रान : १४)
उल्लेखित गोष्टी जीवनासाठी आवश्यक आहेत. तसेच जगाचा कारभार चालू ठेवण्याची साधने आहेत. या गोष्टींच्या इच्छा अतिशय तीव्र असतात आणि यासंबंधीच्या भावनाही खूप भक्कम असतात. अल्लाहने खुद्द या गोष्टींबद्दलचे प्रेम नैसर्गिकरित्या मानवी मनात ठेवले आहे आणि त्याच्यासाठी सुशोभित केले आहे म्हणूनच माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो. या आकर्षणात अनेक हिकमती लपलेल्या आहेत. याविषयींचे प्रेम नसेल तर जगाचे वैभव नाहीसे होईल, पण हे आपल्या कोणत्या अस्तित्वाचे प्रेम आहे? हे आपल्या जैविक अस्तित्वाचे प्रेम आहे.
याशिवाय आपल्या आत्मिक अस्तित्वातही एक प्रेम आहे. हे प्रेम आपल्या निर्मात्यावर असलेले प्रेम आहे. ज्याचा अल्लाहशी एक विशेष संबंध आहे, जो आपण समजू शकत नाही, पण जेव्हा हे प्रेम दडपले जाते तेव्हा त्याची जाणीव आपल्याला होत नाही, परिणामी आपण आपल्या निर्मात्याच्या प्रेमाला विसरतो. असे का होते? या प्रश्नाचे उत्तर शोधताना कुरआनमध्ये मार्गदर्शन मिळते,
"त्या लोकांसारखे होऊ नका जे अल्लाहला विसरले म्हणून अल्लाहने त्यांना स्वतःचेच विस्मरण घडविले. तेच तर आहेत मर्यादेचे उल्लंघन करणारे." (अल-हश्र-१९)
माणूस स्वतःलाच विसरतो म्हणजे काय होते? त्याला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जाणीव राहत नाही का? तो आपली तहान भूक विसरतो का? कि आपले आजार, आपले दुखणे त्याला समजत नाही? साहजिकच कोणत्याही माणसाचे त्याच्या शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष होत नाही.
यावरून हे ज्ञात होते की शरीरा व्यतिरिक्तही माणसाचे आणखी एक अस्तित्व आहे ज्याचा त्याला विसर पडतो आणि जी माणसाची अस्सल वास्तविकता आहे, ती म्हणजे 'मानवी आत्मा' होय.
या आयतीमध्ये अल्लाहला विसरणाऱ्या लोकांना या जीवनात मिळणाऱ्या शिक्षेचा उल्लेख आहे. अल्लाह त्यांना त्यांच्या वास्तविकतेपासून गाफील व बेफिकीर करतो. मग अशा लोकांना आपण माणूस आहोत हे लक्षात राहत नाही. आपण आपल्या निर्मात्याची सर्वोच्च निर्मिती आहोत याचा माणसाला विसर पडतो. आपण अल्लाहचे भक्त आहोत आणि प्रत्येकाला आपापल्या कृत्यांचा निर्मात्यासमोर जाब द्यायचा आहे हेही ध्यानात राहत नाही. मग तो प्राण्यांसारखा वागू लागतो. नैतिक बंधनातून मुक्त होऊन नैसर्गिकरीत्या जनावरासारखे जगावे अशी त्याला दुर्बुद्धी सुचते, म्हणूनच तो निर्लज्जपणे विचारतो की,
"कपडे घालणे ही मूलभूत गरज आहे का? हे माणसाचे आविष्कार नाहीत का? पत्नी, मुलगी आणि आई असा भेद प्राण्यांमध्ये आढळतो का?" ही आहे माणसाच्या विचारांची शोकांतिका!
या चर्चेचा सारांश असा की, मानव हा शरीर आणि आत्मा यांचे मिश्रण आहे. कुरआनात म्हटल्याप्रमाणे जीवाला आवडणाऱ्या गोष्टींचे प्रेम हे नैसर्गिकरित्या मानवी मनात वसलेले आहे. ज्यामध्ये अनेक हिकमती दडलेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे माणूस जर या गोष्टींकडे झुकलेला नसता तर जगाचा कारभार कसा चालला असता? पण सिमा ओलांडून जीवाचे लाड पुरवल्यास तो बिघडतो. हे घातक सिद्ध होऊन माणसाला आपल्या निर्मात्याचा विसर पडतो. मग शेवटी तो केवळ एक प्राणी उरतो जो आपल्या आत्म्यापासून म्हणजेच आपल्या वास्तविकतेपासून दुरावला जातो. ज्यामुळे त्याच्यापुढे बस एकच लक्ष्य असते. खा-प्या, मजा करा, उद्याची कशाला चिंता, म्हणूनच त्याच्या डोळ्यांना चांगले-वाईट आणि हलाल व हराम दिसत नाही.
अशा बेजबाबदारपणे जगण्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? यासंबंधीही आपल्या निर्मात्याने कुरआनमध्ये मानवतेला मार्गदर्शन केले आहे.
- अब्दुल कय्यूम शेख अहमद
9730254636 - औरंगाबाद
Post a Comment