हजरत अब्दुल्लाह इब्ने अब्बास (र.) म्हणतात की एके दिवशी मी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मागे चालत होतो तेव्हा ते म्हणाले,
"मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, अल्लाहच्या मर्यादा पाळा (म्हणजे अल्लाहचे अधिकार, त्याने जे वैध केले त्या आणि जे निषिद्ध केले त्या गोष्टी) अल्लाह तुमचे संरक्षण करील. त्याला तुम्ही समोर पाहू शकाल. मागायचे असल्यास अल्लाहकडेच मागा, मदत हवी असेल तर त्याचीच मागा. तेव्हा हे लक्षात ठेवा की जर सर्व लोकांनी तुम्हाला मदत करायचे ठरवले तरी अल्लाहने तुमच्यासाठी जे ठरवले असेल त्या व्यतिरिक्त ते तुम्हाला कोणताही लाभ पोहचवू शकत नाहीत आणि जर सर्व लोकांनी तुम्हाला हानी पोहोचवण्याचे ठरवले असेल तरी अल्लाहने तुमच्यासाठी जे ठरवले आहे त्या व्यतिरिक्त ते तुमची कसलीही हानी करू शकत नाहीत." (तिर्मिजी)
"दुसऱ्या ठिकाणी असे म्हटले आहे की तुमची परिस्थिती चांगली असताना तुम्ही अल्लाहशी जवळीक साधली असेल तर तो तुमच्या संकटाच्या वेळीही तुमची साथ देईल. हे जाणून घ्या की जे काही तुम्हाला मिळाले नसेल ते तुम्हाला मिळणारच नव्हते आणि जे काही तुम्हाला मिळाले हे ते कसल्याही परिस्थितीत तुम्हाला मिळणारच होते. हेही लक्षात ठेवा की संयमाने वागला तरच तुम्हाला यश लाभेल आणि कठीण स्थितीतनंतर पुन्हा तुम्हाला सहजताही लाभणार." (गंजीन ए हिकमत)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात,
"अल्लाहचे विधान आहे की माझ्या भक्तांमध्ये काही लोक असे असतात ज्यांची श्रद्धा गरीब परिस्थितीतच टिकून राहते. मी त्यांना विपुलता दिली तर ते त्यांच्यासाठी समस्या ठरेल. काही लोक असे असतात जे संपन्नावस्थेतच आपल्या श्रद्धेची रक्षा करतात. जर त्यांना गरिबी दिली तर त्यांच्यासमोर ती समस्या उभी राहील. काही लोक आजारपणात श्रद्धा टिकून ठेवतात, त्यांना स्वास्थ्य दिले तर त्यांच्यासाठी समस्या होईल, काही लोक निरोगी अवस्थेत श्रद्धेवर ठाम राहतात, त्यांना आजार दिला तर ते अस्वस्थ होतात. काही लोक असे असतात जे उपासनेचा एखादा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, मी त्यांना रोखतो जेणेकरून ते अहंकारी होऊ नयेत म्हणून. माझ्या भक्तांच्या मनात जे जे काही असते त्यानुसारच मी त्यांच्याशी व्यवहार करत असतो. कारण मी सर्वज्ञ आणि सर्वव्यापी आहे." (ह. अनस र., तिर्मिजी)
संकलन :
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment