माननीय अब्दुर्रहमान बिन अबू किराद (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी वुजू केली (हात-पाय-तोंड धुवून शुचिर्भूत होणे) तेव्हा पैगंबरांचे काही सहकारी पैगंबरांच्या वुजूचे पाणी घेऊन आपल्या चेहऱ्यावरून फिरवू लागले, तेव्हा पैगंबरांनी विचारले, ''कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही असे करण्यास उद्युक्त झालात?'' लोकांनी म्हटले, ''अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावरील प्रेम.'' पैगंबर म्हणाले, ''अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर प्रेम करण्याने जे खूश होतात त्या लोकांनी सत्य बोलावे आणि जेव्हा त्यांच्या ठेवण्यात आलेली ठेव सुरक्षितपणे तिच्या मालकाला परत करावी आणि शेजाऱ्यांशी सद्व्यवहार करावा.'' (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वुजूचे पाणी घेऊन पवित्रतेसाठी आपल्या चेहऱ्यावर आणि हातावर मळणे पैगंबरांवरील प्रेमापोटी होते. हे काही वाईट कृत्य नसल्यामुळे पैगंबरांनी त्यांच्यावर रागावण्याचा प्रश्नच नाही. पैगंबरांनी त्यांना सांगितले की प्रेमाचे श्रेष्ठत्व यात आहे की अल्लाह आणि पैगंबरांनी जे आदेश दिले आहेत त्यांच्या अवलंब करावा. पैगंबरांनी जो जीवनधर्म सांगितला आहे त्यास आपल्या जीवनाचा धर्म बनवावा. पैगंबरांचे आज्ञापालन करणे पैगंबरांवरील प्रेमाचे सर्वांत उच्च स्थान आहे, अट एवढीच की ते पैगंबरांशी अतीव आसक्तीसह करावे.
माननीय अब्दुल्लाह यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि त्याने पैगंबरांना म्हटले, ''मी तुम्हांवर प्रेम करतो.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''जे तुम्ही म्हणत आहात त्यावर दृढ विचार करा.'' त्याने तीन वेळा म्हटले, ''अल्लाह शपथ! मी तुम्हांवर प्रेम करतो.'' पैगंबर म्हणाले, ''जर तुम्ही आपल्या वक्तव्यावर खरे असाल तर गरिबी आणि उपासमारीचा सामना करण्यासाठी शस्त्रांची जुळवाजुळव करा. जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याकडे गरिबी आणि उपासमार महापुरापेक्षा तीका गतीने येतात.'' (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : कोणावर प्रेम करणे आणि त्याला प्रिय बनविण्याचा काय अर्थ होतो? हाच की त्याच्या पसंतीला आपली पसंत आणि त्याच्या नापसंतीला आपली नापसंती बनविणे, प्रिय व्यक्ती ज्या मार्गाने जात आहे त्याच मार्गाला आपल्या जीवनाचा मार्ग बनविला जावा, तिचा निकटवर्ती बनणे, तिची संगती आणि तिच्या खुशीकरिता प्रत्येक वस्तूचे बलिदान द्यावे आणि बलिदान देण्यासाठी तत्पर असावे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांना प्रिय बनविण्याचा अर्थ असा होतो की त्यांच्या प्रत्येक पावलांवर पाऊल टाकणे आणि मार्गातील प्रत्येक निशाणी माहीत करून घेणे आणि त्यानुसार अनुकरण करणे. पैगंबरांनी ज्या मार्गावर संकटांचा सामना केला आहे त्या मार्गावर संकटे सहन करण्याची शक्ती निर्माण केली जावी. 'हिरा' नामक गुहादेखील पैगंबरांचा मार्ग आहे आणि बद्र आणि हुनैनदेखील पैगंबरांचा मार्ग आहे.
'दीन' (जीवनधर्मा) च्या मार्गाचा अवलंब करण्याच्या परिणामस्वरूप गरिबी आणि उपासमारीचे संकट निर्माण होते आणि उपजीविकेचे संकट सर्वांत मोठे संकट आहे. त्याचा सामना फक्त विश्वास आणि अल्लाहवरील प्रेमाच्या शस्त्रानेच केला जाऊ शकतो. 'मोमिन' (ईमानधारक) अशा स्थिती विचार करतो की अल्लाह माझा वकील आहे, मी निराश्रित आहे आणि मी गुलाम आहे, गुलामाचे काम फक्त आपल्या मालकाची इच्छा पूर्ण करणे असते आणि मी ज्याचे काम करीत आहे तो कृपावंत आणि न्याय करणारा आहे. माझी मेहनत वाया जाऊ शकत नाही. त्याचे अशाप्रकारे विचार करणे प्रत्येक संकटावर मात करू शकते, शैतानाचे प्रत्येक शस्त्र निरुपयोगी करू शकते.
माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) म्हणाले, ''जो मनुष्य अल्लाहच्या ग्रंथाची उपासना करेल तो न या जगात मार्गभ्रष्ट होईल आणि न परलोकात त्याच्या वाट्याला वंचितता येईल.'' मग त्यांनी या आयतीचे पठण केले, ''जो मनुष्य माझ्या आदेशपत्राचे आज्ञापालन करील तो न या जगात मार्गभ्रष्ट होईल आणि न परलोकात दुर्भागी असेल.'' (हदीस : मिश्कात)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''पवित्र कुरआनमध्ये पाच गोष्टी आहेत. 'हलाल', 'हराम', 'मुहकम', 'मुतशाबेह' आणि 'इमसाल'. 'हलाल' (वैध) ला वैध समजा, 'हराम' (अवैध) ला अवैध माना, 'मुहकम' (पवित्र कुरआनचा तो भाग ज्यात धर्मनिष्ठा आणि कायदा वगैरेची शिकवण दिली गेली आहे) चे अनुसरण करा, 'मुतशाबेह' (कुरआनचा तो भाग ज्यात परोक्षाच्या गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे जसे- 'जन्नत' (नंदनवन), 'दोजख' (नरक), 'अर्श' (सिंहासन), 'कुर्सी' (खुर्ची) वगैरे) वर ईमान बाळगा (आणि त्याची अवहेलना करू नका) आणि 'इमसाल' (लोकसमुदायांच्या विध्वंसाच्या धडा शिकविणाऱ्या कथा) पासून उपदेश प्राप्त करा.
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment