राहुल गांधी यांच्या "भारत जोडो" पदयात्रेला सर्वसामान्य जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे, या पदयात्रेचे पडसाद देशपातळीवर उमटले आहेत. राहूल गांधींची भारत जोडो पदयात्रा लोकांना आपली वाटते यातच या पदयात्रेचे यश आहे. प्रसार माध्यमांनी व वाहिन्यांनी या पदयात्रेला म्हणावी तेवढी प्रसिद्धी दिली नाहीतरी ती पदयात्रा व या पदयात्रेचा मेसेज लोकांपर्यंत पोहचला, ही गोष्ट स्वागतार्ह आहे. मुद्रीत माध्यमांनी निम्म्या यात्रेपर्यंत बिलकुल दखल घेतली नव्हती, पुढे जनतेचा प्रतिसाद पाहून त्या वृत्तपत्रांना नाईलाजाने का होईना थोडीफार दखल घ्यावी लागली. ही बाब ही ठळकपणे जनतेच्या समोर आली,
सध्या समाजजीवनामध्ये वृत्तपत्रांचे महत्त्व कमी कमी होत आहे,ही वास्तवता अधोरेखित करणारी ही गोष्ट आहे.कारण भारत जोडो पदयात्रा केवळ वृत्तपत्रांमुळे लोकांपर्यंत पोहोचेल, हा गैरसमज होता, हे आता सिद्ध झाले आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल किंवा त्यांनी काढलेल्या भारत जोडो पदयात्रेबद्दल किंवा त्यांनी घेतलेल्या उदात्त भूमिकेबद्दल, प्रसार माध्यमांनी तटस्थपणे प्रसिद्धी द्यायला हवी होती, मात्र तसे झाले नाही, ही नव्या बदलत्या वृत्तपत्रांच्या संपादक मालकांची लाचारी की अगतिकता ?असा प्रश्न ग्रामीण भागातील फार न शिकलेल्या माणसांनाही यानिमित्ताने पडला आहे, त्यामुळे सामान्य माणसांच्या मनातील वृत्तपत्रांविषयीचा आदरभाव व विश्वासार्हता कमी झाली आहे, हे ही वास्तव ठळकपणे नजरेत भरते आहे. दोन-पाच कोस चालत येवून खेडोपाड्यातील सर्व थरातील जनता राहुल गांधी यांना भेटून त्यांच्या सोबत चालत होती, राहुल गांधीसुध्दा आपुलकीने प्रत्येकाला जवळ घेत होते, त्या मध्ये कोणतीही कृत्रिमता दिसून येत नव्हती, जनतेशी समरस होऊन त्यांची दु:खे राहूल गांधी ऐकताना दिसत होते...
भारत जोडो ही पदयात्रा राजकीय नाही. हे कॉंग्रेस पक्षाने वेळोवेळी जाहीर केले होते, जात-धर्म-भाषा यांच्या सीमा ओलांडून "नफरत तोडो भारत तोडो" ही भावना पुन्हा एकदा या पवित्र देशात निर्माण केली पाहिजे. हिच या पदयात्रेमागची भावना होती.जाती-धर्मांत भेदा-भेद करून, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वातावरण दुषीत करणाऱ्यांना या यात्रेने परस्पर उत्तर दिले आहे.
गेल्या ८ वर्षांत देशात जे सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक वातावरण खराब केले गेले.... विरोधकांना शत्रू मानून त्यांना सीबीआय,ईडी सारख्या शासकीय यंत्रणा वापरून हैराण करण्यात आले .. होता होईल तेवढी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी व गळचेपी करण्यात आली... याबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनातील खदखद जाणवत होती. खरोखरच दोषींवर कारवाई ही झालीच पाहिजे मात्र केवळ विरोधासाठी विरोध करुन किंवा विरोधक संपवायचा म्हणून सत्तेवर आहे म्हणून आपल्या हातातील शासकीय यंत्रणेचा गैरवापर करणे, हे कधीही निषेधार्हच आहे, पण गेल्या काही वर्षांत ते केले गेले,ही वास्तवता कुणीही नाकारू शकत नाही.
आता या यात्रेमुळे धर्मवाद, जातियवाद पसरवून जनतेला भयभीत करून सोडणाऱ्या प्रवृत्तीं आपोआप नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत हे स्पष्टपणे दिसून आले. पप्पू म्हणून हिणवणाऱ्यांची समाजात नाचक्की झाली आहे, त्यामुळे राहूल गांधी यांना ट्रोल करणाऱ्यांवर बिळात जावून बसण्याची वेळ आली आहे.
बलाढ्य ब्रिटीश सत्तेला न घाबरता निधड्या छातीने स्वातंत्र्य मिळविलेला हा देश आहे. धगधगत्या स्वातंत्र्य चळवळीचा ज्वलंत इतिहास असणारा हा देश आहे,या भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने लोकही आता धीट होत आहेत. कोणत्याही मुस्कटदाबीला भीक न घालणाऱ्या या जनतेने अनेकदा इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. या यात्रेमुळे निर्माण झालेले स्वातंत्र्याचे वारे आता थांबणार नाही. हे आता स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे या पदयात्रेचे हसे करणाऱ्यांची तोंडं बघण्यासारखी झाली आहेत.
स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधी यांनी मुंबईतून दोन शब्दांचा नारा दिला होता तो म्हणजे... ‘चले जाव....’. आता तेच शब्द राजकीयदृष्ट्या पुन्हा एकदा जनतेची घोषणा होणार कि काय.. असे दिसू लागले आहे.
प्रचंड महागाई, नोटा बंदी, बेरोजगारी, जीएसटी , स्मार्ट सिटी या फसलेल्या योजनांमुळे हैराण करुन सोडलेल्या जनतेला देव-धर्माच्या विषयांत गुंतवून ठेवून दुसरीकडे राज्या राज्यात राजकीय तोडफोड करण्यात व्यस्त असलेल्या सरकारला सामान्य जनतेच्या हाल अपेष्टांविषयी देणेघेणे नाही हे स्पष्ट झाले आहे. इतके घाणेरडे राजकारण या देशात यापूर्वी कधीही झाले नव्हते. राहुल गांधी यांच्या ‘भारत-जोडो’ यात्रेने आज या प्रत्येक प्रश्नांवर सर्व सामान्य माणसाला विचार करणे भाग पाडले आहे. सामान्य माणसाला गेल्या काही वर्षांतील हे घाणेरडे, मुल्यहीन राजकारण आता समजू लागले आहे. त्यामुळे लोकांची उघडपणे शांततामय मार्गाने या सगळ्या चुकीच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरण्याची मानसिकता तयार झाली आहे.... .
'भारत जोडो' या पदयात्रेमुळे देशातील जनतेला लिलया मिळत गेलेले हे सामर्थ्य आहे. हेच या पदयात्रेचे फलित म्हणावे लागेल. त्यामुळेच ज्यांनी या यात्रेकडे दुर्लक्ष केले होते त्याच मंडळींना आता दखल घेण्याखेरिज पर्याय राहिला नाही. ही पदयात्रा राजकीयही नाही.... पण, राजकारण नसतानाही त्यातील ‘मर्म’ लोकांना आपोआप कळत चाललेले आहे. जनतेचा पाठिंबा कुठल्या मुद्द्यांवर कधी कुणाला मिळेल हे कुणालाच सांगता येत नाही ,याची दखल राजकारण्यांनी घ्यायला हवी.
भाजपाविरोधात लढायचे असेल तर सर्वच विरोधकांनी एकत्र पाहिजे, हा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड ही नेतेमंडळी या भारत जोडो यात्रेत सहभागी झाली होती, याची गरज ओळखून सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.
देशभरातील सर्वसामान्य जनतेच्या मनात विचार करायला लावणारी व सर्व थरातील जनतेचे लक्ष वेधून घेणारी ही भारत जोडो यात्रा प्रसिद्धी माध्यमांनी फारशी दखल घेतली नसली तरी यशस्वी होत आहे हे मात्र नक्की...!
- सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)
Post a Comment