(३) आणि तोच आहे ज्याने ही पृथ्वी विस्तृत केली आहे, हिच्यात पर्वतांच्या मेखा रोवल्या आहेत आणि नद्या प्रवाहित केल्या. त्यानेच प्रत्येक प्रकारच्या फळांच्या जोड्या निर्माण केल्या आणि तोच दिवसावर रात्र आच्छादित करीत असतो.८ या सर्व वस्तुंमध्ये मोठ्या निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरपणे विचार करतात.
(४) आणि पाहा! पृथ्वीवर वेगवेगळे भू-भाग आढळतात जे एकमेकांशी संलग्न असलेले आहेत.९ द्राक्षांच्या बागा आहेत, शेते आहेत खजुरींची झाडे आहेत ज्यांच्यापैकी काही एकेरी आहेत आणि काही दुहेरी.१० सर्वांना एकच पाणी सिंचित करतो, परंतु चवीत आम्ही काहींना उत्तम बनवितो तर काहींना कनिष्ठ. या सर्व वस्तूंमध्ये पुष्कळशा निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे बुद्धीचा उपयोग करतात.११
८) आकाशीय ग्रहांनंतर या पृथ्वीकडे लक्ष केंद्रित केले जाते आणि येथेसुद्धा अल्लाहची शक्ती आणि तत्त्वदर्शीतेच्या निशाण्यांनी या दोन सत्यतेवरील (एकेश्वरत्व आणि परलोक जीवन) साक्षी एकत्रित केल्या आहेत. या प्रकृती जगताची एकूण रचना स्पष्ट करत आहे की या तर्काचा सार खालीलप्रमाणे आहे,
१) आकाशीय ग्रहांबरोबर पृथ्वीचा संबंध, पृथ्वीबरोबर सूर्य, चंद्र यांचा संबंध, पृथ्वीच्या अगणित सजींवाच्या गरजेशी पर्वत आणि समुद्राचा, नद्यांच्या संबंध इ. सर्व गोष्टी स्पष्ट साक्ष देत आहेत की यांना न तर अनेकानेक ईश्वरांनी बनविले आहे आणि न अनेकानेक अधिकारी ईश्वर त्यांची व्यवस्था करत आहेत. असे जर असते तर या सर्वात इतके ताळमेळ, अनुकूलता आणि समन्वय निर्माण झाला नसता आणि तो कायम राहिलाही नसता. वेगवेगळया ईश्वरांसाठी हे कसे संभव आहे की त्या सर्वांनी मिळून सृष्टी निर्माण करावी की त्यात सुसंगत निर्वेधता असावी आणि त्यांच्यात कुठलाही टकराव नसावा.
२) पृथ्वीरूपी या विशाल ग्रहाचे विस्तृत अंतरिक्षात अधांतरित होणे, त्यात विशाल पर्वतांचे उभे राहाणे, पृथ्वीच्या भूपृष्ठावर विशाल नद्या प्रवाहित होणे. पृथ्वीवर अनेकानेक प्रकारची झाडे असणे, तसेच रात्रंदिवसाचे चकित करणारे हे चक्र इ. सर्व अल्लाहच्या सामर्थ्याची साक्ष देतात ज्याने या सर्वांना निर्माण केले आहे. अशा सर्वशक्तिमान अल्लाहविषयी असा विचार करणे की तो मनुष्याच्या मृत्यूनंतर पुन्हा त्याला जन्माला घालू शकत नाही, हे बुद्धीविवेकाचे लक्षण नसून ते मूर्खपणाचे आणि अज्ञानाचे लक्षण आहे.
३) पृथ्वीच्या बनावटीत, तिच्यावरील पर्वतराईच्या उत्पत्तीमध्ये, पर्वतातून नद्या प्रवाहीत करण्यात, निरनिराळया फळांच्या जातीत दोन-दोन प्रकारचे फळ तयार करण्यात तसेच रात्रीनंतर दिवस व दिवसानंतर रात्रीच्या येण्याजाण्यात अगणित निशाण्या आणि तत्त्वदर्शिता आहे. ते सर्व सुस्पष्टपणे साक्ष देत आहेत की ज्या उत्तम तत्त्वदर्शी अल्लाहने ही सर्व संरचना केली आहे तो श्रेष्ठतम तत्त्वदर्शी आहे. हे या सर्व गोष्टींमुळे सिद्ध होते की हे एखाद्या संकल्पहीन शक्तीचे कार्य नाही की खेळ-तमाशासुद्धा नाही. या प्रत्येकात एका तत्त्वदर्शीची अति परिपक्व तत्त्वदर्शिता काम करत आहे. हे सर्व जाणून घेतल्यावर केवळ एक मूर्खच विचार करील की पृथ्वीवर मनुष्याला जन्माला घालून आणि त्याला कर्म करण्याची संधी देऊन शेवटी तो त्याला असेच मातीत मिसळून देईन?
९) म्हणजे पूर्ण पृथ्वीला त्याने एकसारखे बनविले नाही तर तिच्यात अनेक भूभाग निर्माण केले. ते एकमेकात मिसळलेले असूनसुद्धा ते रुप, रंगात, समायोजन तत्त्वात, गुणात, क्षमतेत, शक्तीत, उत्पन्नात, रासायनिक खनिज भंडार यात वेगवेगळे आहेत. या वेगवेगळया भूभागांची उत्पन्नक्षमता आणि त्यांच्यातील वेगवेगळया विभिन्नतांमध्ये विवेकशीलता, कार्यकारणभाव व तत्त्वदर्शिता विपुल प्रमाणात आहेत की त्याचे आपण मोजमापही करू शकत नाही. दुसऱ्या संरचना (निर्मिती) ऐवजी केवळ मनुष्याचे हित डोळयांपुढे ठेवून अनुमान केले जाऊ शकते की मनुष्याचे वेगवेगळे उद्देश आणि हित आणि पृथ्वीच्या भूखंडांच्या विभिन्नतेत समानता आणि अनुकूलता दिसून येते. यामुळे मानवी संस्कृतीला व सभ्यतेला प्रगती करण्याच्या संधी उपलब्ध होत गेल्या. हे सर्व तत्त्वदर्शीच्या चिंतनाचा आणि विचारपूर्वक योजनेचा आणि त्याच्या विवेकपूर्ण संकल्पाचा परिणाम आहे. याला केवळ एक आकस्मित घटना ठरविणे म्हणजे मोठा दुराग्रह आहे.
१०) खजुरीच्या झाडांपैकी काही असे असतात ज्याच्या मुळातून एकच खोड निघते आणि काही मध्ये एकापेक्षा जास्त खोड निघतात.
११) या आयतमध्ये अल्लाहच्या तौहिद (एकेश्वरत्व), त्याची शक्ती आणि तत्त्वदर्शितेच्या निशाण्या दाखविण्याव्यतिरिक्त एका तथ्याकडे सूक्ष्म संकेत केला आहे, तो म्हणजे अल्लाहने सृष्टीत कोठेच समरूपता ठेवली नाही. जमीन एकच आहे परंतु हिचे भाग आपापल्या रंग, रुप आणि गुणांत वेगवेगळे आहेत. जमीन एकच आणि पाणीसुद्धा एकच परंतु यांच्यापासून वेगवेगळया प्रकारचे धान्य व फळे तयार होत आहेत. एकच झाड परंतु त्याचे प्रत्येक फळ दुसऱ्या फळापासून रंग-रुपात एक असूनसुद्धा आकार, प्रकार व दुसऱ्या गुणात वेगळा आहे. मूळ एकच परंतु त्यापासून दोन वेगळे खोड निघतात व ते आपले वेगळे गुण ठेवून असतात. या गोष्टींवर माणूस विचार करील तेव्हा तो कधीही गोंधळात पडणार नाही की मनुष्यस्वभाव, कल व रीत वेगवेगळे आहेत. पुढे याच सूरहमध्ये सांगितले गेले आहे, ``अल्लाहने इच्छिले असते तर सर्व मानवांना एकसारखे बनविले असते. परंतु ज्या तत्त्वदर्शितेच्या आधारावर अल्लाहने या सृष्टीला निर्माण केले आहे, ती एकरंगी नव्हे तर विविधतापूर्ण आणि बहुरंगांची निकड ठेवते.
सर्वांना एकरुप बनविल्यानंतर तर जगातील हा सर्व हंगामा व्यर्थ ठरला असता.''
Post a Comment