Halloween Costume ideas 2015

लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची

आपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात. बहुमताच्या जोरावर निवडून आलेला तो सत्ताधारी पक्ष आणि दुसरा विरोधी पक्ष, ज्या पक्षांकडे आवश्यक ते संख्याबळ असत नाही अर्थात लोकशाही समाजव्यवस्था ही विरोधी पक्षांवर अवलंबून असते. म्हणून  विरोधी पक्ष लोकशाहीच्या रक्षणासाठी महत्त्वाचा असतो. सत्ताधारी हा नेहमीच ‘हम करे सो कायदा’ या न्यायाने वागत असतो. मात्र विरोधी पक्ष मजबूत व कणखर असेल तर  सत्ताधारी पक्षाला हुकूमशाही पद्धतीने वागता येत नाही. सत्तेचा गैरवापर होऊ द्यायचा नसेल तर मजबूत विरोधी पक्षाची अत्यंत आवश्यकता असते. विधायक कामासाठी विरोधी पक्ष  सत्तेवर आलेल्या पक्षाला दिशादर्शन करणारा असतो. देशहिताचे निर्णय कसे घ्यावेत हे विरोधी पक्ष दाखवून देत असतो.
मात्र सध्या आपल्या देशात विरोधी पक्षांचे अस्तित्व आहे की नाही, अशी परिस्थिती आहे. विरोधी पक्ष कमकुवत व हतबल झाल्यासारखे आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे, येणारा  काळ सशक्त लोकशाहीसाठी सकारात्मक असेलच असे ठामपणे कुणीच सांगू शकत नाही.
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे दोनच राष्ट्रीय पातळीवरील मुख्य पक्ष आहेत. डाव्या पक्षाचा प्रभाव नगण्य आहे. त्यांच्याबद्दलची विश्वासाहर्ता संपुष्टात आली आहे.  बाकीचे पक्ष नावापुरतेच राष्ट्रीय आहेत. काही ठराविक ठिकाणी राज्यातील ठराविक भागांत त्यांचे अस्तित्व दिसून येते. अर्थात राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली असली तरी ते  पक्ष प्रादेशिकच आहेत. परिणामी आजच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर केंद्रातील सत्तास्पर्धेसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे दोनच पक्ष अधोरेखित होतात. देशभरात असंख्य राजकीय पक्ष असले तरी केंद्रीय स्तरावर यातील बहुतेक पक्ष भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या दोन पक्षांपैकी एका पक्षाचे  आघाडीचे घटक पक्ष असणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे एन.डी.ए. सरकार तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यु.पी.ए. सरकार या देशातील जनतेने अनुभवली आहेत. १९९० पासून आघाडी सरकार स्थापन व्हायला सुरुवात  झाली. २०१४ साली भारतीय जनता पक्षाचे सरकार हे एन.डी.ए.चे सरकार म्हटले तरी संपूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाकडे होते. त्यामुळे २०१४ ते २०१९ ही पाच वर्षे भारतीय जनता  पक्ष हा एकमेव सत्ताधारी पक्ष होता. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष विरोधी बाकावर होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापण झालेल्या सरकारने संपूर्ण ५ वर्ष सत्ता उपभोगली. या पाच वर्षात नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची लोकप्रियता पूर्वीसारखी  राहिलेली नाही, हे वास्तव आहे. मध्यंतरी लोकसभेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पानिपत झाले आहे. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या मोठ्या राज्यांत भाजपच्या लोकप्रियतेच्या बाबतीत सुरूंग लागला असल्याचे दिसून आले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते हडबडले. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही, हे त्यांनी  ओळखले. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला ग्रहण लागले आहे ही जाणीव झाली. त्यामुळे पुलवामाचा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतांने पाकिस्तानात हवाई हल्ला केला व  चोख प्रत्युत्तर दिले, याचा फायदा भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांना झाला. आपल्या देण्यासाठी असणारी आपत्ती भाजपसाठी इष्टापत्ती ठरली. या घटनेचं भाजपने चांगले भांडवल करून पुन्हा आपले आसन खुट्टा मारून जाम केले. अर्थात भाजपच्या जागी काँग्रेस असती तर त्यांनीही तेच केलं असतं. काँग्रेस पक्ष जे प्रश्न भाजपच्या नेत्यांना विचारत आहेत, तेच प्रश्न भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला विचारले असते. हवाई हल्ल्याचा पुरेपूर वापर भाजप करून घेत आहेत. लोकमत पुन्हा आपल्याकडे वळविण्यात भाजप यशस्वी  झाले आहे. या इष्टापतीमुळे देशबांधवांना आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांचा विसर पडला आहे. देशभरातील बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्वामिनाथन आयोगाच्या  शिफारशी, चलनवाढ, नोटाबंदी, वाढलेल्या भ्रष्टाचार, काळापैसा, दहशतवादी कारवाया, मॉब लिंचिंग, धार्मिक असहिष्णुता, जातिभेद, गोहत्याबंदी, त्यातून झालेल्या हिंसाचाराच्या घटना  यासारखे अनेक प्रश्न आपोआप मागे पडले आहेत. केवळ पाकिस्तानचा दहशतवाद आणि मोदी यांचे राष्ट्रप्रेम हे दोनच मुद्दे लोकांच्या लक्षात राहिले आहेत. पाकिस्तानला नमवायचे  असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही, असा बहुतेकांचा समज करून देण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला आहे. खरं तर देशाच्या सीमासुरक्षेची जबाबदारी ही सरकारची असते.  शिवाय अशा कठीण परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिक व विरोधी पक्षासह सर्व राजकीय पक्ष हे सरकारसोबत असतात. मात्र भाजपने सर्जिकल स्ट्राईक करुन सर्वांचं लक्ष  आपल्याकडे वेधून घेतले. विरोधी पक्षाने मात्र सरकारने सर्जिकल स्ट्राईक केलाच नाही, अशी भूमिका घेतली व पुरावे मागत बसण्याचा मूर्खपणा केला, त्यामुळे आपोआपच जनतेच्या  मुख्य प्रश्नांवरुन जनतेला देशभक्तीच्या मुद्द्यावर केंद्रित करण्याची भाजपची खेळी अफलातून यशस्वी झाली. त्यामुळे भाजपच्या अंगात पुन्हा बळ आल्यासारखे सध्यातरी वाटत आहे.  फसलेली नोटा बंदी, राफेल करार व त्यातील भ्रष्टाचार, जीएसटी, स्विस बँकेतील काळा पैसा परत आणणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, तरूणांना नोकऱ्या उपलब्ध  करून देणे, अंबानी, अदाणी, विजय माल्या यांच्या आर्थिक भानगडी व त्यांच्यावर असलेला भाजपचा वरदहस्त हे चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर आपोआपच पडदा पडला आहे. पाकिस्तान  पोसत असलेल्या दहशतवादीवर भाजपच्या तडफदार नेतृत्वाखाली केलेली धडक कारवाई हा मुद्दा जनमानसांत ठसविण्याचा भाजपचा प्रयत्न पुरेपूर यशस्वी झालेला आहे, असे आता तरी  स्पष्टपणे दिसून येते आहे.

- सुनीलकुमार सरनाईक
मो.: ७०२८१५१३५२, कोल्हापूर
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget