Halloween Costume ideas 2015

सऊदी अरबमध्ये बंड?

गेल्या दीड महिन्यांपासून मक्का येथील हरम शरीफ मधील ’काबागृहा’ला दोन ठिकाणी कृत्रिम अडथळे उभारून ’कार्डन-ऑफ्फ’ केले आहे. त्यामुळे जगभरातील श्रद्धावान मुस्लिम चिंताग्रस्त झालेले आहेत. लाखो रूपये खर्चून मक्का येथे जावे व तेथे काबागृहाला स्पर्श करण्याचे पुण्यही मिळू नये यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते? दीड महिन्यापूर्वी ’कोरोना’ विषाणुचा संघर्ष होऊ नये म्हणून सऊदी अरब सरकारने आखाती देश वगळता सर्वांना उमराहसाठी विजा बंद केला. त्यानंतर काबागृहाची सतत होणारी तवाफ (प्रदक्षिणा) ही थांबविली, ती अलिकडे तो दोन अडथळ्यांबाहेरून सुरू असल्याचे दिसते. सकृतदर्शनी कोरोनाचे कारण चपलख बसले असले तरी काबागृहाचा तवाफ रोखण्याचे मूळ कारण कोरोना नसून ’सत्ता’ आहे. सऊद घराण्यात एक अयशस्वी बंड झालेले असून त्याची तीव्रता फार मोठी आहे. हा सर्व घटनाक्रम समजून घेण्याचा अधिकार प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला आहे कारण काबागृहावर जेवढा अधिकार अरबांचा आहे तेवढाच अजमींचाही आहे. म्हणून हा घटनाक्रम उलगडून दाखविणे हाच ह्या लेखामागचा हेतू आहे. या बंडाला समजून घेण्यासाठी सप्तसुदैरींची कहाणी समजून घेणे गरजेचे आहे.
सात सुदैरी
    आधुनिक सऊदी अरबचे संस्थापक राजे अ.अजीज-बिन-अल-सऊद यांनी 22 कबिल्यांच्या 22 स्त्रियांशी विवाह करून सऊदी अरबची स्थापना केली. लग्नाशिवाय हे सर्व कबिले एकत्र येणार नसल्याने त्यांना हे सारे विवाह करावे लागले. त्या सर्व राण्यांना मिळून 37 मुले झाली. या सर्वांचा विस्तार होत-होत आजमितीला दोन-अडीच-हजार राजपुत्र-पुत्री ह्या घराण्यात आहेत. त्यांना सरकारी खजिण्यातून मोठ्या प्रमाणात तन्खा मिळतो. म्हणून हे सर्व युरोप आणि अमेरिकेमध्ये ऐश-आरामी जीवन जगत असतात. मात्र सत्तेमध्ये यांचा समावेश नाही. सत्तेमध्ये सात-सुदैरी बंधू व त्यांच्या मुलांचीच चलती असते. सात भावंडांपैकी एकाच्या मृत्यूनंतर त्यानंतरचा भाऊ राजा बनतो. राजाच्या पुत्राला राजा करण्याची प्रथा सऊदी अरबमध्ये नाही. राजाच्या मृत्यूनंतर ’बैत काऊन्सिल’ नावाची या सात भावंडांची व त्यांच्या मुलांची एक शिर्ष संघटना आहे ती मृत्यू झालेल्या राजाच्या धाकट्या भावाची राजा म्हणून निवड करत असते. तत्पूर्वी तो ’किंग इन वेटिंग’ माणला जातो व त्याला ’क्राऊन प्रिंस’ म्हणून संंबोधिले जाते. त्याच्याकडे गृह खाते असते. बाकी महत्त्वपूर्ण खाती बाकी बंधू व त्यांच्या मुलांना दिली जातात. या सुदैरी बंधु व त्यांच्या मुलां व्यतिरिक्त कुणीही मंत्री किंवा लष्करप्रमुख होऊ शकत नाही. सुदैरी बंधूंचे हे महत्वपूर्णच्या साठी आहे की, ’किंग-अब्दुल-अ़जी़ज-इब्ने सऊद यांनी 1913 मध्ये त्या काळातील सर्वात सक्षम असलेल्या सुदैरी कबिल्यातील हुस्सा बिन्ते अहमद अल सुदैरी यांच्या मुलीशी लग्न केले त्या लग्नातून त्यांना  साद नावाच्या राजपुत्राचा जन्म झाला. (1914 -1919) परंतु तो अल्पजीवी ठरला. त्यानंतर हुस्सा आणि (उर्वरित लेख पान 2 वर)
अ.अजीज यांच्यात मतभेद झाले व त्याची परिणीती घटस्फोटात झाली. त्यानंतर हुस्सा यांनी मुहम्मद बिन अ.रहेमान यांच्याशी विवाह केला. हुस्सा यांना मुहम्मद बिन अ.रहेमान यांच्यापासून अब्दुल्लाह नावाचा पुत्र झाला. परंतु काही खाजगी कारणाने हा विवाह ही टिकला नाही. तेव्हा राजे अब्दुल अजी़ज यांनी हुस्सा यांच्यासमोर पुन्हा विवाहाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्यांनी व त्यांच्या कबिल्याने अशी अट टाकली की हुस्सा यांच्या पोटी जन्माला येणार्‍या पुत्रांनाच भविष्यात राजा करण्यात येईल. अन्य 21 राण्यांच्या मुलांना नाही. सुदैरी कबिल्याच्या दबदब्यामुळे व आधुनिक सऊदी अरबच्या निर्मितीमध्ये त्यांच्या भूमिकेच्या महत्वामुळे राजे अ.अजी़ज यांनी ही अट मान्य केली व हुस्सा यांच्याशी पुन्हा लग्न केले. या लग्नातून हुस्सा यांच्या पोटी सात राजपुत्र जन्माला आले व तेच एकानंतर एक राजे झाले. अशी ही चमत्कृत करणारी, जुन्या चित्रपटात शोभेल अशी कथा आहे. या सात भावांच्या गटाला असाबियाह (पवित्र गट) म्हंटले जाते.
    23 जानेवारी 2015 रोजी अब्दुल्लाह बिन अब्दुल अजीज अल सऊद यांच्या निधनानंतर मुहम्मद सलमान बिन अब्दुल अजीज हे वारसा हक्काने राजे बनले व त्यांनी आपला पुत्र मुहम्मद बिन सलमान (एमबीएस) याला संरक्षण व न्यायमंत्री बनविले व 28 एप्रिल 2015 रोजी राजे सलमान यांचे वारस म्हणून त्यांचा पुतण्या मुहम्मद बिन नायफ यांना क्राऊन प्रिन्स घोषित करण्यात आले. कारण सलमान  यांच्यानंतर त्यांचे भाऊ मुहम्मद बिन नायफ यांची पाळी होती पण त्यांच्या मृत्यू झाल्याने त्यांच्या पुत्राला त्यांच्या जागी क्राऊन प्रिन्स म्हणून बैत काऊन्सील ने मंजूरी दिली. मात्र अंतर्गत राजकारण खेळून प्रिंस मुहम्मद बिन नायफ यांची क्राऊन प्रिन्स पदावरून उचलबांगडी करून राजे सलमान यांनी आपले पुत्र मुहम्मद बिन सलमान यांना 21 जून 2017 रोजी क्राऊन प्रिन्स घोषित केले. त्या क्षणापासून सेव्हन सुदैरी असाबियाह गटामध्ये असंतोषाची ठिणगी पडली.
    किंग सलमानचे सख्खे बंधू व सात सुदैरियन पैकी एक अहमद बिन अब्दुल अजीज हे राजे सलमान व प्रिन्स नायफ यांनी एमबीएसला क्राऊन प्रिन्स बनविण्यास विरोध केला व त्यांच्या राजा बनण्याच्या क्रमवारीवर आक्षेप घेतला. राजे सलमान हे 84 वर्षांचे असून त्यांना विस्मृतीचा आजार आहे म्हणून प्रत्यक्षात क्राऊन प्रिन्स मुहम्मद बिन सलमान हेच सऊदी अरबचा राजकारभार पाहतात. त्यातून त्यांना सत्तेची चटक लागली. येत्या नोव्हेंबर मध्ये जी-20 देशांच्या राष्ट्र प्रमुखांची परिषद सऊदी अरबमध्ये होणार आहे. त्या आधी कांहीही करून राजेपद मिळवायचेच या लालसेने मुहम्मद बिन सलमान यांना झपाटले आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचे दोन विश्‍वासू मित्र ट्रम्प आणि त्यांचे जावाई जेरॉर्ड कुश्‍नर यांची मदद घेतली आहे. 130 अब्ज डॉलरची रक्षा उपकरणे खरेदी करून मुहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकेच्या मरगळलेल्या हत्यार उद्योगांना उर्जित अवस्था प्राप्त करून दिल्याने ट्रम्प आणि त्यांचे जावाई दोघांनी मिळून अमरिका धार्जिण्या मुहम्मद बिन सलमान यांना राजेपद मिळवून देण्याचा जणू चंगच बांधला आहे.
एमबीएसला बैत काऊन्सीलचा विरोध
    एक तर पाळी डावलून क्राऊन प्रिन्स पद मिळविल्याने बैत काऊन्सीलच्या अधिकारांवर मुहम्मद बिन सलमान यांनी अतिक्रमण केल्याचा राग बैत काऊन्सिलच्या सदस्यांमध्ये आहे. दूसरे आणि त्यापेक्षा मोठे कारण म्हणजे एमबीएस यांनी सऊदी अरबचे वेगाने सुरू केलेले पाश्‍चिमात्यीयकरण होय. सीनेमा हॉल, मल्टीप्लेक्स, म्युजीक कंसर्ट, सीगारेट, महिलांना महेरमच्या व्यवस्थेतून मुक्ती, व्याज आधारित नीऑन सीटीची निर्मिती, अविवाहीत विदेशी जोडप्यांना सऊदी अरबच्या हॉटेल्समध्ये प्रवेश, इस्राईलशी अनावश्क जवळीक, जेफ बोझेसची हेरगीरी, सेंच्युरी डीलचे समर्थन, पत्रकार जमाल खशोगीची घडवून आणलेली हत्या, तीन वर्षांपासून यमनवर लादलेले युद्ध व त्यातून नाहक मरण पावलेले दोन लाख मुसलमान या सर्व कारणांमुळे  सऊदी अरबची तरूण पिढी जरी एमबीएसच्या बाजूने असली तरी बैत काऊन्सीलचे बहुतेक सदस्य आणि पुराणमतवादी सऊदी जनतेमध्ये मुहम्मद बिन सलमान अलोकप्रिय झालेले आहेत. त्यामुळे त्यांना पदच्युत करण्यासाठी बैत काऊन्सीलचे सदस्य असलेले व नसलेले 20 पेक्षा अधिक राजपुत्र तसेच अहेमद बिन अब्दुल अजीज, प्रिंस मुहम्मद बिन नायफ या सर्वांनी मिळून मुहम्मद बिन सलमान यांना पदच्युत करून प्रिंस अहेमद बिन अब्दुल अझीझ यांना राजा घोषित करण्याचा डाव रचला. याची कुनकुन मुहम्मद बिन सलमान यांना लागताच 6 मार्च 2020 रोजी मुहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकेच्या ब्लॅक वॉटर या सुरक्षा एजन्सीच्या मदतीने होणार्‍या संभाव्य बंडाचा बिमोड केला. मुहम्मद अहेमद बिन अब्दुल अजीज, प्रिंस मुहम्मद बिन नायफ व इतर 20 राजपुत्र आणि 200 सैन्य आणि प्रशासनातील अधिकार्‍यांना अटक करण्यात आली. हे बंडखोर काबागृहाच्या गीलाफवर हात ठेऊन बंडात एकमेकांची साथ देण्याच्या शपथा घेणार असल्याचा सुगावा लागल्याने आयत्या चालून आलेल्या ’कोरोना’ची संधी साधून बंडखोरांना काबागृहाजवळ जाता येऊ नये यासाठी दुहेरी अडथळे तयार करून काबागृहाशी संलग्न मताफमध्ये कुणालाही प्रवेश मिळणार नाही याची पक्की व्यवस्था एमबीएसने केली.
    आजमीतिला रियादमधील शाही महाल, मक्का-मदीना आणि इतर महत्त्वाच्या प्रांतातील गव्हर्नर हाऊसच्या सुरक्षेची जबाबदारी सऊदी अरबच्या सैनिकांच्या कडून काढून घेऊन ब्लॅक वॉटरकडे देण्यात आल्याचे वृत्त अलजझीरा वाहीनी आणि वॉल स्ट्रीट जर्नलने अधिकृरित्या दिलेले आहे. 
    या कार्यवाहीत मुहम्मद बिन सलमान जखमी झाले व प्रिन्स नायफ मारले गेले अशा ही बातम्या बहरीनच्या वाहिन्यांनी दिल्या पण नंतर लगेच त्याचा इन्कार करण्यात आला. मुहम्मद बिन सलमान 6 मार्च पासून भूमिगत असल्याचा व कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित नसल्याच्या बातम्या ही आलेल्या आहेत. 20 राजपुत्र आणि 200 अधिकारी यांचे काय झाले हे जगाला माहित नाही. मुहम्मद बिन सलमान कसे आहेत? हे ही माहित नाही मात्र एवढे नक्की की सत्तेची सुत्रे त्यांच्याच हाती आहेत. कोरोनामुळे त्यांनी स्वतःला जद्दापासून जवळ असलेल्या एका बेटावरील राजप्रसादामध्ये सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. आज न उद्या ते प्रकट होतील व बाकी गोष्टींचा उलगडा होईल. तूर्त इतकेच !

- एम.आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget