माननीय खुवैलिद बिन अमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह व पारलौकिक जीवनावर ईमान (श्रद्धा, विश्वास) बाळगणाऱ्या लोकांनी आपल्या पाहुण्याचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे. पहिला दिवस पुरस्काराचा असतो, यात पाहुण्याला उत्तमोत्तम जेऊ घातले पाहिजे आणि पाहुणचार तीन दिवसांपर्यंत आहे. (म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी त्याच्या पाहुणचारात नैतिक औपचारिकपणा दाखविण्याची आवश्यकता नाही.) त्यानंतर जे काही तो करेल त्याच्यासाठी तो दानधर्म असेल. पाहुण्याने आपले आतिथ्य करणाराला संकटात टाकून त्याच्याबरोबर राहणे अवैध व चुकीचे आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण
या हदीसमध्ये अतिथी आणि आतिथ्य करणारा या दोघांना उपदेश करण्यात आला आहे. आतिथ्य करणाराला या गोष्टीचा उपदेश करण्यात आला आहे की त्याने आपल्या अतिथीचा पाहुणचार करावा, त्याचे मन:पूर्वक स्वागत करावे. पाहुणचाराचा अर्थ फक्त जेवण-खाण करण्यापुरताच मर्यादित नसून त्याच्याशी आनंदी मुद्रेने बोलणे, उत्साहाने वागणे हे सर्व आले. पाहुण्याला उपदेश करण्यात आला आहे की जेव्हा एखाद्याकडे पाहुणा बनून गेल्यानंतर तेथेच ठिय्या मारून राहू नये जेणेकरून आतिथ्य करणारा वैतागला जावा. ‘हदीस मुस्लिम’मधील एका हदीसकथनात या हदीसचे चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे, ‘‘एखाद्या मुस्लिमाने आपल्या बंधुकडे तो वैतागून जाईपर्यंत किंवा त्याला संकटात टाकून वास्तव्य करणे एका मुस्लिमाकरिता अवैध आहे.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! तो कशा प्रकारे त्याला संकटात टाकील?’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘ते अशाप्रकारे की तो स्वत: त्याच्याकडे पाहुणा बनून आला असेल आणि अधिक दिवस राहिला असेल तेव्हा त्याच्याकडे आतिथ्य करण्यासाठी काहीही नसेल.’’
शेजाऱ्याचे अधिकार
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी तीन वेळा म्हटले, ‘‘अल्लाहची शपथ! तो ईमान बाळगत नाही (किंवा मुस्लिम नाही).’’ विचारले गेले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! कोण ईमान बाळगत नाही?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ज्या मनुष्याचा शेजारी त्याच्या त्रासापासून सुरक्षित नसेल.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जिब्रिल (अ.) मला शेजाऱ्याशी चांगला व्यवहार करण्यास वारंवार सांगत राहिले. एक क्षण असा आला की ते शेजाऱ्याला शेजाऱ्याचा वारसच बनवितात की काय असे मला वाटू लागले. (हदीस : मुत्तफक अलैह) माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना असे म्हणताना ऐकले की ‘‘तो मुस्लिम नाही जो स्वत: पोटभर जेवतो आणि त्याच्या बाजूला राहणारा शेजारी उपाशी राहतो.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय अबू जर (रजि.) यांना पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘हे अबू जर! जेव्हा तू मांसाचा रस्सा शिजवशील तेव्हा त्यात थोडे पाणी अधिक टाक आणि आपल्या शेजाऱ्यांचीही काळजी घे.’’ (हदीस : मुस्लिम)
Post a Comment