Halloween Costume ideas 2015

मनं जिंकणारा जग जिंकतो

जाणारे कधी परतत नसतात, जाणाऱ्यांची आठवण येत असते. जेव्हा एखादा आमच्यातून निघून जातो तेव्हा त्याची आठवण खूप येते. मौलाना सिराजुल हसन यांच्या निधनाच्या  बातमीमुळे आठवणींच्या शांत समुद्रात जणू एक लाट उसळली. काय लिहावं आणि काय सोडून द्यावं हेच काही समजत नाही. मौलानांचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर येतो. ते म्हणत असत, ‘‘सोडा हे सगळं, कामं करा’’, पण मनाला राहावत नाही. जेव्हा माणसाचं डोकं एकदम सुस्त होते आणि पेनातली शाई सुकून जाते तेंव्हा माणूस काय करू शकतो? काल संध्याकाळपासून माझे मित्र आजम शहाब आग्रह करीत होते की मी काही लिहावं परंतु व्यक्त होण्याची शक्ती नष्ट झाली नाही तर माणूस हतबल होतो. मंचाशिवाय मौलानांना पहिल्यांदा बेंगलुरू मधे जवळून पाहण्याची संधी मिळाली. कर्नाटकात एस.आय.ओ.नं चांगलंच बस्तान बांधलं होतं तर एस.आय.एम.चं कार्य नगण्य होतं. काही विभागांत थोड्याफार  प्रमाणांत असलेला संपर्क दृढ करण्यासाठी मी बेंगलुरूला गेलो तेंव्हा सर्वप्रथम प्रदेशाध्यक्षांना (जमात-ए-इस्लामी-हिंद, कर्नाटक) भेटण्यासाठी त्यांच कार्यालय गाठलं.
मौलाना सिराजुल हसन यांच्या भेटीनं माझा उत्साह वाढला. त्यांचा दिलखुलासपणा व विशालहृदयतेनं माझं मन मोहित झालं. त्या काळी लोकांनी एस.आय.एम. ला जमाअतची बंडखोर  व अवज्ञा करणारी संघटना ठरवली होती. परंतु याचा मौलाना सिराजुल हसन यांना लवलेशही नव्हता. त्यांनी प्रदेश कार्यालयात मुक्काम करू देण्याची तयारी दर्शविली.
त्या वेळी कार्यालयात सुरू असलेल्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत मला घेऊन गेले आणि सर्व सदस्यांची ओळख करून दिली. मौलानांच्या वागणुकीमुळे एस.आय.एम. आणि एस.आय.ओ. दरम्यानची भिंत क्षणार्धात कोसळली. त्यानंतर मौलाना दिल्लीतील केंद्रीय जमाअतमध्ये सचिवपदी विराजमान असताना तेथील वातावरण अतिशय गंभीर होते. त्यांच्या  आगमनानंतर पहिल्यांदाच केंद्रीय जमाअतमध्ये नाष्ट्याच्या वेळी दिल्लीचे पापे आणि मौलानांचे विनोदी चुटके प्रसिद्ध होऊ लागले. वर्षानुवर्षे ये-जा करूनदेखील परकेपणा बाळगणारे लोक  खळखळून हसू बोलू लागले. हे नवीन पिढीला खूपच आवडत होते.
मौलाना सिराजुल हसन यांच्या खांद्यावर जमाअतच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली आणि त्यांनी आमच्यासारख्यांना जमाअतचे सदस्य बनवून घेतले. दरम्यानच्या काळात जमाअतचे  कार्यालय चितली कबरहून अबुल फजल या ठिकाणी हलविण्यात आले होते. त्या वेळी काही कामानिमित्त दिल्लीला जाण्याची संधी मिळत असे तेव्हा मौलानांना भेटण्याची उत्कट इच्छा असायची.
स्वागतानंतर जमाअतच्या अध्यक्षांची भेट होऊ शकते काय? असे विचारणार इतक्यात पाठीमागून एक कुरवाळणारा हात माझ्या खांद्यावर विसावला. मागे वळून पाहतो तर मौलाना सलामसाठी पुढे सरसावले आणि गळाभेट घेतली. एखाद्या संघटनेचा प्रमुख आपल्या नव्या सदस्याशी इतक्या आत्मीयतेने वागू शकतो, ही गोष्ट कल्पनातीत होती. ते माझा हात पकडून आपल्या खोलीत घेऊन गेले. क्षणार्धात अध्यक्ष आणि नवनियुक्त सदस्य यांच्यातील तफावत दूर झाली. अशा नम्रता आणि मनमोकळेपणाची कल्पनाही करवत नाही. वयोवृद्धांच्या  संगतीत आत्मा समृद्ध व सुशोभित होत असतो, हे पुस्तकांमध्ये वाचलं होतं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. या भेटीचा सुगंध अंत:करणाच्या कोनाड्यात आजही दरवळतोय.
मुंब्रा येथे सदस्यांचं एक संमेलन माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर होतं. मौलानांना आपल्या घरी घेऊन जाण्याबद्दल मी स्थानिक अध्यक्षांना विचारलं, ते म्हणाले की जर ते येऊ इच्छित असतील तर मी नाकारू शकत नाही. मौलानांना मी म्हटलं की चला आमच्या घरी आराम करा, तेव्हा ते म्हणाले की नको इथंच ठीक आहे. विचारलं, का? ते म्हणाले की  तुमच्या घरच्यांना त्रास नको. मी म्हणालो, घरी कोणी असेल तर त्रास होईल! मुलं आपल्या आईबरोबर आपल्या नानानानीकडे  सुट्टी साजरी करताहेत. मौलानांनी होकार दिला. मी  त्यांना शयनागारात आराम करण्यास सांगितलं आणि स्वत: हॉलमध्ये येऊन अंग टाकलं. काही वेळानं ते बाहेर आले आणि मला आत जाऊन झोपण्यास सांगितलं. मी विचारलं, आपण  कुठे आराम करणार? तर म्हणाले, मी इथं बाहेरच्या खोलीत जमिनीवर! तुम्ही आपल्या बिछान्यावर जाऊन झोपा. मी म्हणालो, हे शक्य नाही. ते आग्रह करू लागले तेव्हा मी विचारलं,  मी रात्रभर जागं राहावं अशी आपली अच्छा आहे काय? यावर ते नि:शब्द होऊन आत निघून घेले. यानंतर त्यांना गाढ झोप लागली. परंतु ते आत झोपू शकले की नाही, हे मला ठाऊक  नाही. कुरआनचं मराठीत भाषांतर झालं. त्याचं विमोचन करण्यासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष मौलाना सिराजुल हसन यांचं मुंबईत आगमन झालं. मुंबईतल्या के. सी. कॉलेजचा हॉल बाल्कनीपर्यंत भरला होता. त्या कार्यक्रमात मराठीचे प्रसिद्ध लेखक यू. म. पठाण, प्रसिद्ध पत्रकार अरुण साधू आणि एका न्यायाधीशांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  काही वक्त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी मी पार पाडली. दरम्यान मगरिब नमाजची वेळ होताच दरम्यानच्या काळात ‘सलीमने ओळख करून देणे थांबवावे,’ असे मौलानांनी  स्थानिक अध्यक्षांकरवी सांगितले. मग यापुढील कार्यक्रमात ओळख करून देण्याचे काम कोणा दुसऱ्याला देण्यात यावे. ते म्हणाले, असे केल्यास मौलाना नाराज होतील. मौलाना  सिराजुल हसन यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीचं मन दुखविणे कोणा निष्ठूर अंत:करणाच्या व्यक्तीला शक्य होतं? विषय तेव्हाच संपला आणि आज त्याची चर्चा. महाराष्ट्र  प्रदेशाध्यक्षाची निवड होणार होती. मौलाना केंद्रीय कार्यालयाकडून निरीक्षक म्हणून विराजमान झाले होते. त्या बैठकीत नेहमी अतिशय उत्साही असणारं व्यक्तिमत्त्व खूप गंभीर  असल्याचं दिसत होतं.
दिवसभर चर्चा सुरू होती. अनेकांपैकी काहींनी आपलं मत सावधगिरी बाळगत तर काहींनी बेधडकपणे मांडलं. मौलानांनी अतिशय गंभीर रूप धारण केलं होतं. संपूर्ण कार्यवाहीदरम्यान  त्यांनी कसलाही हस्तक्षेप केला नाही. प्रत्येकाला उत्स्फूर्तपणे बोलण्याची संधी दिली आणि स्वत: शांतपणे सर्व काही लिहून घेत राहिले. मौलानांची आवेशपूर्ण भाषणं आणि लहान लहान  विनोदी चुटक्यांचा मजा लुटणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना कोरड्या संघटनात्मक चर्चेतील मौलानांच्या असाधारण रुचीने प्रभावित केलं होतं. ज्या दोन व्यक्तींच्या नावांवर सर्व लोकांनी  चर्चा केली असतानादेखील त्या दोघांनी तिसऱ्या व्यक्तीचे नाव का सादर केले? असा प्रश्न बैठकीनंतर एकांतात मौलानांना विचारण्यात आले. यावर त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीत स्मितहास्य करत ज्ञान व युक्तीने परिपूर्ण वक्तव्य केले की खूप अधिक विचार करणे चांगले नसते. अर्थात त्यांना असे म्हणायचे होते की ‘मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित करू नका,  पुन्हा पुन्हा उपस्थित केलेल्या शंका अपराध ठरतात.’ मग त्यापुढे प्रश्न करण्याची हिंमत झाली नाही.
मौलाना सिराजुल हसन यांच्या आश्चर्यकारक लोकप्रियतेचा सुगावा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या या हदीसमध्ये आढळतो- एका व्यक्तीने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे येऊन विचारणा  केली, ‘हे पैगंबर! मला एक अशी गोष्ट करण्यास सांगा जी केल्याने अल्लाहदेखील माझ्यावर प्रेम करील आणि लोकसुद्धा माझ्यावर प्रेम करतील.’ येथे अल्लाहवरील प्रेमाच्या सामथ्र्याचा  तगादा नसून अल्लाहच्या प्रेमाची आवश्यकता आहे. सृष्टीनिर्मात्याशी प्रेमाचं नातं जुळावं ही सृष्टीतील अस्तित्वात महान सचोटी आहे.
अल्लाहने स्वत: आपल्या दासावर प्रेम करू लागावे. या हकीगतीचा अंदाज प्रेम करणाऱ्या हृदयाव्यतिरिक्त कुणी दुसरा लावू शकत नाही. एखाद्या दासावर अल्लाह किती प्रेम करतो  हेदेखील आम्हाला कळू शकत नाही, परंतु त्याचे दास कुणावर प्रेम करतात याचा अंदाज सहजगत्या लावला जाऊ शकतो. या स्पष्टीकरणानुसार मौलाना सिराजुल हसन अतिशय हेवा  वाटणारे व्यक्तिमत्त्व होते. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या सहकाऱ्याच्या प्रश्नाचे असे उत्तर दिले की ‘जगाकडून अभिलाषा बाळगू नकोस, अल्लाह तुझ्यावर प्रेम करील आणि  लोकांकडे जे काही आहे त्यापासून नि:स्पृह राहा, लोक तुझ्यावर प्रेम करतील.’
जागतिक अभिलाषा न बाळगणे आणि लोकांपासून नि:स्पृह राहाणे यावर प्रवचन आणि भाषण देणे अगदी सोपे आहे, परंतु हे सर्व आपल्या नसानसांत वसविणे अतिशय अवघड आहे.  मौलाना  सिराजुल हसन यांनी याचे बोलके उदाहरण कशा प्रकारे सादर केले आहे. पाहा जमाअत- ए-इस्लामी हिंदच्या अध्यक्षांची निवड होणार होती. चौथ्यांदा मौलाना सिराजुल हसन  यांची निवड होण्याची दाट शक्यता होती. तेव्हा मौलानांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले, ‘मी माझ्या संपूर्ण आयुष्यात जमाअतचा कोणताही निर्णय नाकारलेला नाही. म्हणून  आपण सर्वांनी मला विवश करू नये. मी घरी जाऊन माझ्या मातेची सेवा करू इच्छितो. कृपया करून माझी विनंती मान्य करावी.’
ईश्वरेच्छेपोटी आपले तारुण्य धर्माच्या उद्धारासाठी व्यतीत केलेल्या व्यक्तीचे हे वक्तव्य होते. चाळीस वर्षांपर्यंत जमाअतद्वारा धर्माची सेवा केल्यानंतर ते आपल्या मातेची सेवा करण्यासाठी अत्युच्च नम्रतेनं निरोप घेऊ  इच्छित होते. नि:स्वार्थ आणि ईशसेवेचे महत्तम उदाहरण सादर करून मौलानांनी केंद्रीय कार्यालयाचा मागे वळून न पाहता निरोप घेतला.
हैद्राबादेत जमाअतच्या संमेलनाचा दुसरा दिवस होता. मौलाना सिराजुल हसन आपली तब्बेत ठीक नसतानाही खाली सामान्य सदस्यांच्या दरम्यान येऊन बसले. आमच्यासारख्या काही  लोकांना हे कळताच त्यांच्याभोवती जमा झालो. स्टेजवर विराजमान होण्याची त्यांना विनंती करण्यात आली. मौलाना नकार देत राहिले, ‘माझा कार्यक्रम नाही. मी फक्त उपस्थित  राहाण्यासाठी आलोय. आपल्या सदस्यांना भेटण्यासाठी आलोय.’ लोकांनी काही एक ऐकलं नाही आणि त्यांना स्टेजवर घेऊन गेले. भाषण देण्यास सांगण्यात आले तेव्हा प्रकृती ठीक   नसतानाही थोडक्यात मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ‘कस्रfचत ही आमची शेवटची भेट असेल.’ त्यांचे हे शब्द खरे ठरले आणि आमच्यासारख्या दूरवरच्या निष्ठावंतांना त्यानंतर  मौलानांच्या भेटीचे भाग्य लाभले नाही. अब्दुल्लाह जावेद यांच्याकडून मौलाना हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी ऐकून मन सुन्न झाले. विष संपूर्ण शरीरात पसरल्याचे मुहम्मद  सिद्दीक कुरैशी यांनी व्हिडिओसह लिहिल्याचे वाचले तेव्हा ते पाहाण्याची हिंमत झाली नाही. प्रार्थनेने अनुसरण केले आणि काही दिवसांनंतर पुन्हा अब्दुल्लाह जावेद यांनी सांगितले की  मौलानांना आय सी यू मधून सामान्य वार्डात हलविण्यात आले आहे. त्यानंतर घरी परतल्याची देखील बातमी कळाली. आम्ही सर्वांनी अल्लाहचे आभार मानले, मात्र खुशी फार काळ  टिकली नाही आणि थोड्याच दिवसांत दु:खद वार्ता आली की मौलाना सिराजुल हसन आपल्यातून निघून गेले.
मौलाना रजीउल इस्लाम नदवी यांनी दिवा विझल्याचंही लिहिलं परंतु मनाला पटलं नाही. जर हे खरे आहे तर मनाच्या तळघरात हा उजेड का आहे? मौलानाचं शरीर गेल्या शुक्रवारी  दफन करण्यात आलं, परंतु सिराजुल हसन नामवंत अंत:करण व मस्तिष्कात प्रकाशमान आहे व राहील. मौलानांच्या मनमोहक हास्यात लपलेल्या धर्मनिष्ठेची तडफ खालील ओळींच्या  साक्षीने आमच्या बरोबर राहीलजिया हूं उम्र-भर सो़जे निहां में रहा हूं मिस्ले गुल में इस जहां में।

- डॉ. सलीम खान
(अनुवाद- शाहजहान मगदुम)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget