किसी को ज़ख्म मत देना
खराशे ज़िंदा रहती हैं
जुबां से वार मत करना
सदाएं ज़िंदा रहती हैं
खराशे ज़िंदा रहती हैं
जुबां से वार मत करना
सदाएं ज़िंदा रहती हैं
बिगर मुस्लिमांसह अनेक मुस्लिमांचाही असा समज आहे की, इस्लाममध्ये राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेस मान्यता नाही, त्यामुळे राष्ट्रभक्ती ही संकल्पना मुस्लिमांसाठी गौण आहे. त्यातच कवी इक्बाल यांनी, “मुस्लिम हैं हम वतन हैं सारा जहाँ हमारा,” असे म्हटल्याने सुद्धा असा व्यापक गैरसमज पसरला आहे की, मुस्लिमांचा स्वत:चा असा कुठलाच देश नसतो, म्हणून ते ज्या देशात राहतात त्यावर त्यांची निष्ठा नसते, ते देशाला आपलं मानत नाहीत.. वगैरे... वगैरे...
या विचाराला बळ मिळवून देणारा दुसरा मुद्दा असा आहे की, कुरआनचे सर्व तत्वज्ञान समस्त मानवजातीसाठी आहे. ते कुठल्याही देशापुरते मर्यादित नाही, म्हणून मुस्लिम हा जागतिक समुदाय आहे. तो कुठल्या एका राष्ट्राला मानत नाही, म्हणून त्यांच्याकडून राष्ट्रभक्तीची अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे.
तीसरा मुद्दा असा की, 1923 साली वि.दा. सावरकर यांनी लिहिलेल्या हिंदूत्व या ग्रंथात सुद्धा हाच धागा पकडत पितृभू व पुण्यभूमीचा सिद्धांत मांडताना असा दावा केला आहे की, ”मुस्लिमांची पितृभू जरी भारत असली तरी पुण्यभू मक्का-मदिना आहे म्हणून ते हिंदू एवढे राष्ट्रभक्त असूच शकत नाहीत.”
बहुसंख्य मुस्लिमांना या संबंधी काहीच माहिती नसते. म्हणून ते हा विषय निघाला की, त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. काही मुसलमान विनाकारण अपराध बोध घेऊन जगत असतात. त्यांना देशभक्ती आणि देशप्रेम यातील फरक स्पष्ट करता येत नाही. शहीद अब्दुल हमीदपासून शहीद सरफराज खानपर्यंतच्या अनेकांची नावे माहित असूनसुद्धा, त्यांना या विषयाची नीट मांडणी करता येत नसल्यामुळे ते कायम अस्वस्थ असतात.
30 आणि 31 मार्च 2020 दरम्यान, तबलिगी जमाअतच्या मर्कजमध्ये गोळा झालेल्या मुस्लिमांमधील काही लोकांना कोरोनाची बाधा झाल्याची उघड होताच तबलिगीच नव्हे तर अखिल भारतीय मुस्लिम समाजाला राष्ट्रद्रोही ठरविताना राष्ट्रीय म्हणविल्या जाणार्या माध्यमांना जरा सुद्धा लाज वाटली नाही. किंबहुना एकांगी, खोटे आणि विद्वेषी वार्तांकन केल्यानंतरही बहुसंख्य समाजातून अगदी क्षीण प्रतिक्रिया उमटल्या. एवढेच नव्हे तर राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधानांना सुद्धा मीडियाने चालविलेल्या या विद्वेषी प्रचाराची दखल घ्यावीशी वाटली नाही. स्वातंत्र्यानंतर एकही वर्ष असे गेले नाही ज्यावर्षी दंगली झाल्या नाहीत. सततच्या
होणार्या दंगली, बॉम्बस्फोट, मीडियाचा अपप्रचार, त्यातून प्रेरित होऊन घडलेले लिंचिंगचे प्रकार, या सर्वांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे मुस्लिम हे देशभक्त नाहीत म्हणून ते सहानुभूतीस पात्र नाहीत. या सर्व परिस्थितीने व्यथीत होऊन हा लेख लिहिण्याचा विचार मनात आला. म्हणून हा लेखनप्रपंच.
राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम
ज्याला राष्ट्रभक्ती म्हणतात ती इस्लामला मान्य नाही, हे मान्य करताना माझ्या मनात कुठलाही संकोच नाही. एकेश्वरवादी धर्मात अर्थात ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांमध्ये एका ईश्वराशिवाय दुसरी कोणाचीच भक्ती करण्याची परवानगी नाही. भारतातच नव्हे तर जगातील कोणत्याही राष्ट्रात राहणारा मुसलमान, जर त्या राष्ट्राची भक्ती करत असेल तर तो मुसलमानच राहू शकत नाही. इस्लाममध्ये भक्ती फक्त एका ईश्वरासाठी राखीव आहे. त्याच्याशिवाय कोणाचीही भक्ती करता येत नाही. प्रत्येक मुस्लिमाला प्राणप्रिय असलेल्या प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची देखील भक्ती करण्याची परवानगी इस्लाममध्ये नाही. भारतीय परिपेक्षामध्ये बहुसंख्य हिंदू बांधव भक्ती हा शब्द सर्रास वापरत असतात. त्यामुळे त्यांना मुस्लिमांच्या श्रद्धेची ही अडचण समजून घेण्यामध्ये अडचण येईल. तरी परंतु त्यांनी ती समजून घ्यावी ही विनंती.
आता राहता राहिला प्रश्न देशप्रेमाचा ! तर त्याची इस्लाममध्ये फक्त परवानगीच नाही तर तो इस्लामी श्रद्धेचा एक अविभाज्य भाग आहे. राष्ट्रप्रेम कोणत्याही मुस्लिमाच्या इमान (श्रद्धे) चाच एक भाग आहे. आणि त्या श्रद्धेमधून एका मुस्लिम नागरिकाला राष्ट्रनिष्ठेची जी ऊर्जा मिळते ती कुठल्याही बहुसंख्य नागरिकापेक्षा कमी नसते. हे भारतीय मुस्लिमांनी जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा-तेव्हा, ज्या व्यासपीठावरून मिळाली त्या व्यासपीठावरून सिद्ध केलेले आहे. म्हणून भारतीय मुस्लिम हे राष्ट्रभक्त नाहीत म्हणून राष्ट्रनिष्ठ नाहीत, हे समीकरण चुकीचेच नव्हे तर मुस्लिमांवर अन्याय करणारे आहे. स्वातंत्र्यानंतर गेल्या 73 वर्षांपासून मुस्लिमांवर होणारा हा अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेमी यातील सूक्ष्म फरक सर्वांनीच समजून घेण्याची गरज आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.
हा तर झाला एक विचार. मात्र या विचाराला इस्लाममध्ये काही स्थान आहे का? तसेच इस्लाममध्ये राष्ट्रीयत्व ऽ नेशनहूड ऽ कौमियतचा आधार धर्म आहे की देश? या महत्त्वाच्या प्रश्नासंबंधी कुरआनमध्ये काय मार्गदर्शन केलेले आहे? हे जाणून घेणे सर्वार्थाने आवश्यक आहे. या दोन्ही प्रश्नांचे एका ओळीमध्ये उत्तर असे की, इस्लाममध्ये देश हाच राष्ट्रीयत्वाचा पाया आहे. तो कसा? तर चला पाहूया.
पहिला मुद्दा : असा की, मुस्लिम हा जरी जागतिक समुदाय असला तरी तो ज्या देशात राहतो तो स्वत:ला त्याच देशाचा नागरिक असल्याचे गौरवान्वित होऊन सांगत असतो. उदा. सऊदी मुस्लिम, कॅनडियन मुस्लिम, अमेरिकन मुस्लिम, ब्रिटिश मुस्लिम, भारतीय मुस्लिम वगैरे... वगैरे... एवढेच नव्हे तर ते आपापल्या राष्ट्राचे पारपत्र अभिमानाने मिरवत असतात. थोडक्यात इस्लाममध्ये राष्ट्रीयत्वाचा पाया धर्म नसून राष्ट्र आहे.
दुसरा मुद्दा : आजमितीला जगात 57 मुस्लिम राष्ट्र आहेत, पण युरोपियन युनियनसारखे ते एक नाहीत. प्रत्येकाच्या भौगोलिक सीमा निश्चित झालेल्या आहेत. प्रत्येकाचे संविधान, प्रत्येकाचे कायदे, प्रत्येकाची संस्कृती, प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. जरी सर्वांचा धर्म एक असला तरी पॅन इस्लामायझेशन ऽ बृहदइस्लामी राष्ट्राच्या संकल्पनेचा येथे दुरान्वयेही संबंध नाही.
तीसरा मुद्दा : असा आहे की, फाळणीच्या वेळेस भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांना आजही मुहाजिर म्हणून हिनविले जाते व आज 73 वर्षानंतरही हे लोक कराचीच्या जुन्या चाळींमध्ये विपन्न अवस्थेत राहतात व मिळेल ती कामे करून उपजीविका चालवितात. पाकिस्तानची राष्ट्रीय नीति ठरविण्यामध्ये त्यांचा अपवादखेरीज करून कुठलाच सहभाग नसतो. त्यांच्यासोबत पावलोपावली भेदभाव करणारेही मुस्लिमच आहेत. एवढेच नव्हे तर पीओके मधून नियमितपणे काश्मीरमध्ये पाकिस्तानचा गोळीबारच नव्हे तर उखळी तोफांचा मारा सुरू असतो. हे माहित असतानांसुद्धा की इकडे राहणारे मुस्लिम आहेत व आपल्या हल्ल्यामध्ये त्यांचे नुकसान होणार आहे. म्हणजे पहा! राष्ट्रीयत्व बदलल्याबरोबर इस्लामला मानणारे दोन वेगवेगळे समूह एकमेकांची हानी करण्यात जरासुद्धा कचरत नाहीत. इराण आणि इराक दोन्ही मुस्लिम राष्ट्रे, त्यांच्यातील युद्ध 10 वर्षे चालले, दोन्ही राष्ट्रांची प्रचंड हानी झाली. सऊदी अरबने गेल्या पाच वर्षांपासून यमनवर आक्रमण करून तो देश एवढा बेचिराख करून टाकला आहे की, जेवढा अमेरिकेने अफगानिस्तानलाही बेचिराख केला नसेल. या सर्व उदाहरणामधून एव्हाना वाचकांच्या लक्षात आलेच असेल की, इस्लाममध्ये राष्ट्रीयत्वाचा पाया राष्ट्र आहे धर्म नाही. राष्ट्रीयत्वाचा पाया धर्म असता तर 57 मुस्लिम देश विजाफ्री झोन झाले असते, युरोसारखे त्यांचे एक चलन झाले असते, आपसात त्यांनी करमुक्त व्यापार केला असता, पण असे कुठेच घडताना दिसत नाही. याचाच अर्थ इस्लाममध्ये राष्ट्रीयत्वाचा आधार राष्ट्र आहे धर्म नाही.
इस्लाममध्ये राष्ट्रप्रेम शिकविणार्या तरतुदी
एक - सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, अनेकांना असे वाटते की, कुरआनमध्ये राष्ट्रप्रेम शिकविणारी तरतूद नसावी, पण हे खरे नाही. सुरे अनफालमध्ये अशी एक तरतूद आहे, ज्यात म्हटलेले आहे की, ’ ते लोक ज्यांनी इमानधारन केले मात्र हिजरत करून (मुस्लिम राष्ट्रात) आले नाहीत त्यांच्यासोबत तुमचा कुठलाही नातेसंबंध नाही.’ (आयत क्र.72). तफहीमुल कुरआन खंड 2 पान क्र. 161 ते 162 मध्ये मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी यावर सविस्तर भाष्य केलेले आहे. विस्तारभयामुळे या ठिकाणी त्याचे वर्णन करणे शक्य नाही.
दोन - 6 हिजरीमध्ये मक्का आणि मदीना या दोन छोट्या राज्यांमध्ये हुदैबिया येथे झालेल्या तहाचे उदाहरण, या संदर्भात महत्त्वाचे उदाहरण आहे. मदीना हे मुस्लिम राज्य होते. तर मक्का बिगरमुस्लिम. दोघांमध्ये शांततेचा करार झाला आणि त्यात एक तरतूद अशी होती की, मक्काहून कोणी मुस्लिम व्यक्ती पळून मदिन्यात गेली तर तिला मदिनावाले परत करतील, तसेच मदिनामधून एखादी बिगर मुस्लिम व्यक्ती पळून मक्कामध्ये आली तर तिला परत केले जाणार नाही. या तहावर प्रेषित सल्ल. यांची सही झाल्याबरोबर मक्कातील दोन व्यक्ती एक हजरत अबु बसीर (रजि.) आणि दूसरे अबु जुंदल (रजि.) हे आश्रय मागण्यासाठी प्रेषित सल्ल. यांच्याकडे आले व सोबत मदिनाला घेऊन चालण्याची विनंती केली. तेव्हा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कराराचा हवाला देत त्यांना सोबत नेण्याबाबतीत स्पष्ट नकार दिला. वाचकांनी या उदाहरणातील नजाकत लक्षात घ्यावी. मुस्लिम असूनसुद्धा दुसर्या राष्ट्राशी झालेल्या करारामुळे मुस्लिम व्यक्तीलासुद्धा प्रेषित सल्ल. यांनी आश्रय नाकारला. याचाच अर्थच असा की, राष्ट्रीयत्वापुढे धार्मिक बंदुभावाला महत्त्व नाही.
तीन - एवढेच नव्हे तर ’हुब्बूल वतनी मिनल इमान ’. हुब्बुल म्हणजे प्रेम, वतनी म्हणजे राष्ट्र, मिनल म्हणजे चा आणि ईमान म्हणजे श्रद्धा. थोडक्यात राष्ट्रप्रेम हा इस्लामी श्रद्धेचाच भाग आहे. ही तरतूद प्रेषित सल्ल. यांच्या काळापासून चालू आहे.
आजतर राष्ट्रप्रेमाची व्याख्या ही अधिक व्यापक झालेली आहे. याच आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे आयसीयूमध्ये आठवडाभर होते. तेव्हा ब्रिटनचा प्रत्यक्ष कार्यभार गृहमंत्री प्रिती पटेल यांनी सांभाळला. एवढेच नव्हे तर ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक हे सुद्धा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेमध्ये पाठिच्या कण्याची भूमिका बजावत आहेत. अनेक भारतीय असे आहेत जे अमेरिकेमध्ये न्यायव्यवस्थेमध्ये अतिशय उच्च पदावर आसीन आहेत. आपल्याला त्यांचा सार्थ अभिमानसुद्धा आहे. परंतु आपण एक गोष्ट विसरतो की त्यांची निष्ठा त्यांच्या देशाशी आहे, भारताशी नाही. वंशाने जरी भारतीय असले तरी त्यांचे राष्ट्रीयत्व ब्रिटीश किंवा अमेरिकन आहे. त्यांची जशी स्थिती आहे, अगदी तशीच स्थिती भारतीय मुस्लिमांची आहे. त्यांची पुण्यभूमी जरी मक्का मदिना असली तरी त्यांची राष्ट्रनिष्ठा बावनकशी भारतीय आहे. भारतातले मुस्लिम जेव्हा हज किंवा उमराहला जातात तेव्हा तिथे तिरंगा अभिमानाने मिरवितात. भारताच्या भरभराटीसाठी उत्कटतेने रडून प्रार्थना करतात. म्हणून शेवटी विनंती करतो की, मीडियाद्वारे भारतीय मुस्लिमांच्या विषयी जो अपप्रचार चालविलेला आहे त्याचे उत्तर देण्याच्या स्थितीत जरी मुस्लिम नसले तरी भारतीय मुस्लिम हे एकनिष्ठ भारतीय आहेत, यात शंका नाही. जय हिंद !
- एम.आय.शेख
Post a Comment